जोमकाई देवी मंदिर

चव्हाणवाडी, उत्तुर, ता. आजरा, जि. कोल्हापूर

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हा तालुका घाटमाथा व कोकण यांना जोडणारा आहे. हिरवाई आणि जैवविविधतेने हा परिसर संपन्न आहे. येथील वृक्षराजीत विसावलेले अनेक प्राणी, पक्षी आणि फुलपाखरे संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. निसर्गसंपन्नतेसोबतच हा तालुका अनेक प्राचीन मंदिरांसाठीही प्रसिध्द आहे. त्यापैकी एक असलेले तेराव्या शतकातील जोमकाई देवीचे मंदिर हे जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ही लोकदेवता नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

उत्तूर गावाजवळ असलेल्या एका उंच डोंगरावर जोमकाई देवीचे स्थान आहे. त्याबाबतची आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी गावातील एक गुरव महिला रोज त्या डोंगरावर जावून जोमकाई देवीची उपासना करीत असे. परंतु वयोपरत्वे तिला डोंगर चढून जाणे कठीण होऊ लागल्याने तिने देवीस डोंगरपायथ्याशी येण्याची विनंती केली. या महिलेच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने खाली येण्याची विनंती मान्य केली. परंतु अशी अट घातली की तिने मागे न बघता पुढे चालावे व देवी तिच्या मागोमाग येईल. त्याप्रमाणे देवीच्या पुढे चालता चालता सध्या जेथे मंदिर आहे तेथे आल्यावर त्या महिलेने उत्सुकतेने मागे वळून पाहिले आणि त्यामुळे देवी मूर्तीरुपात येथेच स्थिर झाली. तेव्हा आता आपल्याला देवीने पायाशी जागा द्यावी, अशी विनंती महिलेने केली. देवीने तिची विनंती मान्य केली व आजही ही महिला शीळा रुपाने देवीच्या पायापाशी स्थित आहे.

उत्तुर गावाच्या सीमेवर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा मार्ग आहे. वर जाताना सर्वप्रथम मंदिरासमोरील मोठ्या चौथऱ्यावर असेलली पाच थरांची दीपमाळ लक्ष वेधून घेते. ही अष्टकोनी दीपमाळ वर निमुळती होत गेलेली आहे. दीपमाळेवर दीप लावण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. येथील वैशिष्ट्य असे की यामधील अनेक हस्तांवर विविध प्राण्यांची, तसेच कीचक शिल्पे कोरलेली आहेत. देवीच्या वार्षिक उत्सवांदरम्यान या दीपमाळेवर दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो. दीपमाळेपासून काही पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिराच्या समोरील बाजुला तुलसी वृंदावन व एक प्राचीन वृक्ष आहे. हा वृक्ष मंदिराच्या स्थापनेपासून येथे असल्याचे सांगितले जाते. येथेच उजवीकडे काही पाषाण आणि मेंढ्यांची दगडी शिल्पे आहेत. पुढे सात पायऱ्या चढून मंदिराच्या ओसरीवर येता येते. आटोपशीर सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराचे संपूर्ण बांधकाम घडीव दगडातील हेमाडपंती शैलीतील आहे. मात्र नूतनीकरणाच्या वेळी मंदिराच्या बाह्यभिंतींवर संगमरवरी फरशा लावण्यात आल्याने त्याचे प्राचीन रूप लोपले आहे. आत प्रवेश केल्यानंतर मात्र त्याची हेमाडपंती बांधणी स्पष्ट होते.

ओसरीपेक्षा अधिक उंचावर असलेल्या सभामंडपात जाण्यासाठी दोन पायऱ्या आहेत. सभागृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी तीन स्तंभांच्या चार रांगा आहेत. मधल्या दोन रांगांतील स्तंभ खाली चौकोनी व त्यावरील काही भाग षट्कोनी पुन्हा चौकोनी असे मध्ययुगीन मराठा स्थापत्य पद्धतीचे आहेत. स्तंभांच्या वर दगडी कणी व त्यावर नक्षीदार हस्त आहेत. हस्तांवर तुळया आहेत. मधल्या स्तंभांवरील तुळईवर एकात एक दगड लावून षट्कोनी घुमट तयार केलेला आहे. बाजूच्या रांगांतील स्तंभ दंडगोलाकर आहेत. त्यावर कणी, हस्त व तुळई आहेत व त्यावर दगड रचून छत साकारलेले आहे. मधल्या स्तंभांच्या मधली जमीन कोकणातील मंदिर स्थापत्य रचनेप्रमाणे काही इंच खोलगट आहे. या सभामंडपाच्या मध्यभागी कासवमूर्ती आहे.

गर्भगृहाच्या द्वारशाखा नक्षीकामाने सुशोभित आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला द्वारपालांच्या प्रतिमा आहेत व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर जोमकाई देवीची काळ्या पाषाणातील सुमारे तीन फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात त्रिशूल, तिसऱ्या हातात ढाल व चौथ्या हातात असुर मुंड आहे. देवी राक्षसाच्या देहावर पाय ठेवून ऊभी आहे. मूर्तीवर वस्त्रे व अलंकार अत्यंत बारकाईने कोरलेली आहेत. मागे असलेल्या प्रभावळीवर पंचफणी नाग, नागाच्या दोन्ही बाजूस गजराज व बाजूने पाना फुलांची नक्षी आहेत. प्रभावळीत वरच्या बाजूस किर्तीमुख आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वर्षातील काही दिवस पहाटेची किरणे देवीच्या मुखावर पडतात. गर्भगृहाच्या छतात दगडावर दगड रचून गोलाकार घुमट तयार केलेले आहे. देवीच्या उजव्या बाजूस पिंडीस्वरुपात देवीची भक्त असलेल्या गुरव महिलेचा पाषाण आहे. डाव्या बाजूस भावेश्वरी देवीची मूर्ती आहे.

मंदिराचे मुख्य शिखर एकावर एक २१ थरांचा दगडी मनोरा रचून तयार केलेले आहे आणि त्यावर आमलक व कळस आहे. मुख्य शिखराच्या चारही बाजूने छताच्या कोनांवर चार लहान शिखरे व त्यावर आमलक आहेत. मंदिराच्या शेजारी असलेले शंकराचे लहानसे मंदिर ‘बसवाण्णा महादेव मंदिर’ या नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंडी व बाहेर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंदिराच्या मागे नवदुर्गा देवीची शिळा आहे.

चैत्र नवरात्रोत्सव, दिवाळी, महाशिवरात्री आदी वार्षिक उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. शारदीय नवरात्रौत्सवात दहा दिवस देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळते. होळी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेस देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी उत्तुर गावातून देवीची पालखी मिरवणुकीने चव्हाणवाडीत व येथून देवीच्या डोंगरावर जाते. येथे देवीचे मानपान होऊन पालखी पुन्हा उत्तुर गावात पोहोचते. या सोहळ्याला जिल्ह्यातील हजारो भक्त हजेरी लावतात, देवीची ओटी भरतात व नवस फेडतात. या निमित्ताने देवीला बळी अर्पण केले जातात.

या मंदिरापासून काही अंतरावर, गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे गुड्डाई देवीचे व शेंडूर गावात रासाई देवीचे मंदिर आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की जोमकाई, गुड्डाई व रासाई या तिघी बहिणी आहेत. देवींची मंदिरे असलेल्या तिन्ही डोंगरांची उंची सारखी व या मंदिरांचे एकमेकांपासूनचे हवाई अंतरही समान असल्याचे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती

  • आजरा शहरापासून २१ किमी, तर कोल्हापूरपासून ७१ किमी अंतरावर
  • आजरा व कोल्हापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : जोमा गुरव, पुजारी, मो. ८४१२०९०११२, ९९६०५५४३७१
Back To Home