खिद्रापूर येथील अप्रतिम सुंदर असे कोपेश्वर मंदिर म्हणजे प्राचीन मंदिर स्थापत्याचा, त्या काळातील स्थापत्यांच्या कौशल्याचा, शिल्पकारांच्या कलात्मकतेचा अवर्णनीय आविष्कार आहे. सुमारे ८०० ते १००० वर्षांपूर्वीच्या या मंदिराचे वर्णन ‘पाषाणातील काव्य’ असे केले जाते. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे मंदिर महत्त्वाचे आहेच; परंतु धार्मिकदृष्ट्याही त्यास आगळेवेगळे महत्त्व आहे. याचे कारण शंकर आणि विष्णूची लिंगे येथे एकाच गर्भगृहात विराजमान आहेत. या मंदिरात दर्शनासाठी आणि येथील शिल्पसौंदर्य पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची रोज मोठी गर्दी असते.
कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीने जेथे चंद्राकार वळण घेतले आहे, त्या वळणात खिद्रापूर हे गाव वसलेले आहे. या गावाचे प्राचीन नाव कोप्पम असे होते. काही अभ्यासकांच्या मते, आदिलशाही सरदार खिदरखान याच्या ताब्यात हे गाव आले असताना त्याने या गावाचे खिदरापूर असे नामांतर केले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नेसरी येथे शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यात लढाई झाली. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ या कवितेमुळे लोकमानसावर कोरल्या गेलेल्या या लढाईत बहलोल खानासमवेत त्याचा सल्लागार असलेला हा खिदरखानही होता. खिद्रापूर हे वाडी कोपेश्वर या आणखी एका नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी प्राचीन काळापासून कोपेश्वराचे स्थान होते.
या मंदिरात कोपेश्वर आणि धोपेश्वर अशी दोन लिंगे आहेत. त्याबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की दक्षयज्ञाच्या वेळी शंकराचा अपमान झाल्यामुळे व्यथित झालेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन प्राणत्याग केला. त्यावेळी क्रोधित झालेल्या शंकराने वीरभद्राची निर्मिती केली व दक्ष राजाचा वध केला. सतीच्या विरहाने कोपिष्ट झालेला तो कोपेश्वर महादेव. त्याने भक्तगणांना असा वर दिला होता की जो भक्त प्रदोषकाळी रायबाग बागेवाडी येथील बंकनाथ लिंगाचे, संकेश्वर येथील शंखनाथ लिंगाचे व खिद्रापूर येथील कोपेश्वर लिंगाचे दर्शन एकाच दिवसात लागोपाठ घेईल त्याला त्वरित स्वर्गप्राप्ती होईल. त्यानुसार अनेक भाविक दर्शन घेऊ लागले व कोपेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शंकराच्या वरानुसार येथील मंडपातून स्वर्गात जाऊ लागले. त्यामुळे येथील मंडपास स्वर्गमंडप असे नाव पडले. यामुळे स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या खूप वाढू लागली. तेव्हा देवांनी विष्णूकडे धाव घेतली व या समस्येतून मार्ग काढण्यास सांगितले. त्यावर विष्णूने कोपेश्वर लिंगासमोर स्वतःच्या लिंगाची स्थापना करवून घेतली. त्यामुळे खिद्रापूर मंदिरात प्रवेश करताच भक्तांना लगेचच कोपेश्वर लिंगाचे दर्शन होईना. वरातील अट अपूर्ण राहू लागली व देवांची समस्या सुटली. अशा प्रकारे स्वर्गात जाणाऱ्यांना थोपवण्यासाठी आलेला विष्णू येथे धोपेश्वर नावाने ओळखला जाऊ लागला. आजही येथे गाभाऱ्यात प्रथम दर्शन होते ते धोपेश्वराचे व नंतर कोपेश्वराचे.
कोपेश्वर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या मंदिराचा अविभाज्य घटक असलेला नंदी येथे नाही. त्याविषयी अशी आख्यायिका आहे की दक्ष राजाचा यज्ञ कृष्णा नदीच्या पलीकडे यडूर येथे झाला. तेथे सतीबरोबर नंदी गेला होता. नंतर तो तेथेच राहिला. त्यामुळे येथील नंदीचे स्थान आजही यडूर येथे आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे.
खिद्रापूरच्या मंदिराचे बांधकाम नक्की कधी झाले याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. काही इतिहासकारांच्या मते येथील कोपेश्वराचे स्थान हे इ.स. १०७७ च्या पूर्वी नक्की होते. याचे कारण कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील येऊर येथे सापडलेला एक शिलालेख. त्यात असा उल्लेख आहे की शंकर आर्य नावाच्या व्यक्तीने पुत्रप्राप्तीकरीता कोप्पम येथील कोप्प देवाची अनेक व्रतांसह पूजा केली. यावरून येथे त्या आधीपासून कोप्प देवाचे म्हणजेच कोप्पेश्वराचे मंदिर होते हे स्पष्ट होते. या प्रदेशावर बराच काळ चालुक्यांची सत्ता होती. चालुक्य हे शिवभक्त होते. त्यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे, असे सांगितले जाते. या मंदिराची स्थापत्यशैली ही चालुक्य काळाशी मिळती-जुळती आहे. मात्र इतिहासकार वा. वि. मिराशी यांनी हे मंदिर शिलाहार राजा गण्डरादित्य याने बांधले असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. गण्डरादित्य याचा काळ इ.स. ११०५ ते ११४० हा होय. एकंदर या बाबत असा अभ्यासपूर्ण तर्क मांडला जातो की येथे आधी कोपेश्वराचे लहान मंदिर होते. चालुक्यांनी तेथे मोठे मंदिर बांधले आणि पुढे शिलाहारांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. देवगिरीच्या यादवांच्या काळात ते पूर्णत्वास गेले.
इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापासून इ.स. २१८ पर्यंत खिद्रापूर हे सातवाहनांच्या साम्राज्यातील एक छोटे खेडे होते. यानंतर येथे राष्ट्रकुटांचे, तसेच त्यांच्या नंतर इ.स. ९७५ पर्यंत चालुक्यांचे राज्य होते. चालुक्यांनंतर खिद्रापूरचा प्रदेश शिलाहारांच्या ताब्यात गेला. खिद्रापूरचा हा भाग म्हणजे त्या काळातील एक कुरूक्षेत्रच होते. याचा अर्थ हा भाग एक युद्धमैदान होते. येथे इ.स. १०५२ मध्ये कल्याणीचे चालुक्य आणि कांचीचे चोल राजे यांच्यात मोठी लढाई होऊन त्यात चोलांचा मोठा पराभव झाला होता. यानंतर कल्याणीच्या चालुक्यांमागून सत्तेवर आलेला सेनापती बिज्जल याची आणि शिलाहार राजा गण्डरादित्य याचा पुत्र विजयादित्य यांची येथे लढाई झाली होती. याचा उल्लेख कोपेश्वर मंदिरातील एका शिलालेखात आहे. खिद्रापूरच्या रणमैदानात या शिवाय आणखी एक मोठी लढाई झाली होती. कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज दुसरा याने देवगिरीच्या यादवांचे स्वामित्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यादव राजा सिंघण याने त्याच्यावर चढाई केली. खिद्रापूर परिसरात इ.स. १२१३ मध्ये झालेल्या त्या युद्धात सिंघण याने भोजराजास जिंकून कोल्हापूरचे शिलाहार राज्य खालसा केले. या यादव राजा सिंघणाचा एक शिलालेख कोपेश्वर मंदिरात आहे. शक संवत ११३६ (इ.स. १२१४) मध्ये चैत्र महिन्यातील सोमवारी सूर्यग्रहणप्रसंगी सिंघण राजाने कोपेश्वराच्या पूजा-अर्चेसाठी कुदलदामवाड (सध्याचे कुरुंदवाड) ग्राम दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या नंतर खिद्रापूरमध्ये अनेक वर्षे शांतता होती. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी यादव साम्राज्यावर अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने केलेल्या हल्ल्याची झळ कोपेश्वर मंदिरास पोचल्याचे सांगितले जाते. मुस्लिम आक्रमकांनी या मंदिरातील अनेक शिल्पांची मोडतोड केल्याचे दिसते. या सुलतानी संकटांबरोबरच वेळोवेळी आलेल्या अस्मानी संकटांना पुरून आज हे मंदिर उभे आहे.
हे मंदिर भूमीज स्थापत्यशैलीतील आहे. त्याचे बांधकाम कोणतेही संधीद्रव्य न वापरता आंतरआडक पद्धतीने एकमेकांत दगड बसवून केले आहे. या बांधकाम पद्धतीस हेमाडपंती असेही नाव आहे. मंदिराची लांबी १०३ फूट ६ इंच व रुंदी ६५ फूट एवढी आहे. सध्या येथे असलेल्या शिखरासह मंदिराची उंची ५२ फूट ६ इंच एवढी आहे. नगारखाना, स्वर्गमंडप (मुखमंडप), सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. गावाच्या एका बाजूस असलेल्या या मंदिराच्या आवारात प्रवेश करताना प्रथम नगारखाना लागतो. चार द्वारशाखा, वरच्या बाजूस मंदिराच्या शिखरांची प्रतिकृती असलेले तोरण, ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती असे नगारखान्याच्या प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. येथे दाराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूंस गजमूर्ती बसवलेल्या आहेत. नगारखान्याचे बांधकाम दगड आणि विटांनी केलेले आहे. ते अलीकडच्या काळातील आहे. नगारखान्यात विष्णूची एक प्रतिमा आणि वीरगळ आहे.
येथून आत प्रवेश केल्यानंतर समोर दिसतो तो मंदिराचा अवर्णनीय असा स्वर्गमंडप. हा मंडप मुख्य मंदिरापासून वेगळा बांधलेला आहे. त्याची बांधणी गोलाकार आहे. २६ फुटांचा व्यास असलेल्या या मंडपाच्या मध्यभागी १४ फूट व्यासाची अखंड गोल शिला आहे. तिला रंगशिला असे म्हणतात. स्वर्गमंडपास छत नाही. रंगशिलेवर उभे राहून वर पाहिल्यास आकाशाचे दर्शन होते. या मंडपात एकूण ४८ स्तंभ आहेत. त्यातील १२ स्तंभ रंगशिलेभोवती आहेत. रंगशिलेभोवतीच्या या स्तंभांच्या वरच्या बाजूस मेघडंबरीच्या आकाराच्या देव्हाऱ्यांची रांग आहे. त्यात विविध देवदेवतांची शिल्पे आहेत. स्तंभांच्या शीर्षस्थानी आपापल्या वाहनांवर बसलेले वा उभे असलेले अष्टदिक्पाल दाखवलेले आहेत. यात पूर्वेस इंद्र, पत्नी शची वा इंद्राणी व वाहन हत्ती यांसह आहे. आग्नेयेस अग्निदेवता स्वाहा या पत्नीसह मेंढ्यावर बसलेला आहे. दक्षिणेस यम पत्नी धूमोर्णा हिच्यासह रेड्यावर आरूढ आहे. नैऋत्य दिशेची देवता, भयावह मुद्रा असलेली निर्ऋती प्रेत या वाहनावर आहे. पश्चिमेस वरुणदेवता वारुणीसह मकर वाहनावर, वायव्येस वायु पत्नीसह शशकारूढ, उत्तरेस कुबेर वृद्धीसह अश्वारूढ, तर ईशान्येस ईशान हा पत्नीसह नंदीवर आरूढ आहे. स्वर्गमंडपास बाहेरून सिंहप्रतिमा कोरून सुशोभित केलेले आहे. येथील रंगशिलेवर पूर्वीच्या काळी नृत्य, गायन, वादन आदी रंगभोग सेवा सादर केल्या जात असत.
स्वर्गमंडपातून पुढे गेल्यानंतर मंदिराचा प्रशस्त असा सभामंडप लागतो. हा गूढमंडप स्वरूपाचा म्हणजे चारही बाजूंना भिंती असलेला आहे. सभामंडपास तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य द्वारचौकटीच्या दोन्ही बाजूंना द्वारशाखांवर द्वारपाल तसेच गंगा, यमुना या नद्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. द्वारचौकटीच्यावर तोरण व ललाटबिंबस्थानी गजलक्ष्मी आहे. या दरवाजाच्या समोर दगडात कोरलेली रांगोळीसदृश्य कलाकुसर आहे. उंबरठ्यावर ‘मुगती गोपाळुन सिंदय जुगळुकाप’ असे काही शब्द कोरलेले आहेत. लेख त्रोटक आहे व त्यातील काही अक्षरे अनाकलनीय आहेत. त्यामुळे याचा अर्थ लागत नाही. सभामंडपात जाताच नजरेत भरतात ते तेथील सुंदर कोरीव काम केलेले स्तंभ. ’५० x ५०’ फुटांच्या या विस्तृत चौरसाकृती गूढमंडपाच्या मध्यभागी गोलाकार रंगशिला आहे. मधल्या भागात १२ स्तंभ आहेत व त्यांच्या भोवती २० चौरस स्तंभ आहेत. मंडपाच्या भिंतीत २८ अर्धस्तंभ म्हणजे भिंतीत कोरलेले स्तंभ आहेत. मंडपाच्या तीनही दिशांना वायुविजनासाठी दगडातून साकारलेली सहा जाळीदार जालवातायाने (खिडक्या) आहेत. ही प्रत्येक जाळीदार खिडकी वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेली आहे. मंडपाच्या माथ्यावर मेघडंबरीच्या आकाराची रचना आहे व त्यात दगडी झुंबर आहे.
येथील स्तंभ तीन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. खालच्या बाजूने चौरसाकार असलेल्या या स्तंभांतील काही स्तंभांचा मधला व वरचा भाग मात्र भिन्न प्रकारचा आहे. यातील सर्व स्तंभांतील चौरसाकार भागावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. रामायणातील श्रीराम-हनुमान भेट, महाभारतातील कासव आणि राजहंसांची गोष्ट, पंचतंत्रातील मगर व माकड यांच्या मैत्रीची गोष्ट असे काही प्रसंग येथे त्या लहान चौरसात मोठ्या कौशल्याने कोरलेले दिसतात. या शिवाय इंद्र, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर, महिषासुरमर्दिनी, गणपती, हनुमान, गरुड, मदन, सूरसुंदरी, व्याल, कीर्तिमुख तसेच महावीर यांची शिल्पेही येथे आहेत. येथे एका स्तंभावर मैथुनशिल्पही आहे, हे विशेष. सभामंडपाच्या डावीकडील भिंतींलगत चौथऱ्यांवर सप्तमातृकांचे दोन आडवे मोठे पट आहेत.
मंदिराचा अंतराळ कक्ष २०x२० फुटांचा आहे. स्तंभविहिन असलेल्या या कक्षामध्ये शिलाखंडाच्या कातीव भिंतींवर कोरलेल्या नवयुवतींच्या मूर्ती आहेत. आपादमस्तक सालंकृत असलेल्या या मूर्ती काही ठिकाणी भंगलेल्या आहेत. या कक्षातील उत्तर भिंतीवर कन्नड भाषा व लिपित कोरलेला शिलालेख आहे. मंदिराच्या गर्भगृहात कोपेश्वर आणि धोपेश्वराचे लिंग आहे. येथील शिवपिंडीच्या शाळुंखेचा पाषाण काळा व लिंग तांबूस रंगाचे आहे. तर विष्णूचे म्हणजेच धोपेश्वराच्या लिंगाची रचना गोल स्तंभासारखी आहे. गर्भगृहात तीन देवकोष्टके आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूंना अर्धस्तंभ आहेत. या शिवाय येथे एकूण १५ स्त्रीशिल्पे आणि तीन पुरुष शिल्पे कोरलेली आहेत.
कोपेश्वर मंदिर आतून जेवढे शिल्पांकित आहे, तेवढेच ते बाहेरूनही नक्षी, शिल्पे यांनी समृद्ध आहे. या मंदिरावरील एक इंच जागा अशी नसेल की जेथे शिल्प वा नक्षी नाही. हे मंदिर दीड मीटर उंच अधिष्ठानावर उभे आहे. अधिष्ठानास खालच्या बाजूस खूर, पद्म व पुन्हा पद्म असे थर आहेत. त्यावर गजथर आहे. या थरात एकूण ९२ हत्ती आहेत. यातील एकही हत्तीशिल्प दुसऱ्या हत्तीशिल्पासारखे नाही. या गजथरामुळे या संपूर्ण मंदिराचा डोलारा जणू हत्तींनी सावरला आहे असे भासमान होते. येथील हत्तींच्या पाठीवर विविध देवता आरूढ आहेत. दोन हत्तींच्या मधल्या जागेतही विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. येथे मुरलीधर कृष्ण, चामुंडा, अरब व कृष्णवर्णीय व्यापारी आदी शिल्पे उल्लेखनीय आहेत. याच्या वरच्या बाजूस मनुष्यथर आहे. या थरात महागणपती, महासरस्वती, महिषासुरमर्दिनी, गंगा-पार्वतीसह शंकर, लक्ष्मीसह विष्णू आदी देवदेवतांच्या मूर्ती आहेत. रामायण, महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. त्याच प्रमाणे येथे अप्रतिम सुंदर अशा सूरसुंदरींच्या मूर्ती पाहावयास मिळतात. पुत्रवल्लभा, दर्पणा, नर्तकी, पत्रलेखिका, आलसा अशा प्रकारच्या या सूरसुंदरींच्या मूर्तींनी मंदिराच्या सौंदर्यात भर घातली आहे. या मंदिरात अर्धस्तंभांची सलग एकत्र रचना करून मंदिराच्या भिंती निर्माण केलेल्या आहेत. या विशिष्ट रचनेमुळे कोपेश्वर मंदिर तारकाकृती स्वरूपाचे दिसते. मंदिराचे शिखर शंक्वाकृती असून, त्यावर चुन्याचा गिलावा दिलेला आहे. हे मंदिराचे मूळचे शिखर नव्हे. ते मराठा काळानंतर चुन्याचा गिलावा देऊन बांधण्यात आले.
या मंदिराचे प्रशासन श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य, करवीरपीठ यांच्यामार्फत चालवले जाते. १७०६ साली खिद्रापूर हा गाव करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या नावे दुमाला (इनाम) झाला. तेव्हापासून मंदिराची मालकीही करवीरपीठाकडे आली. पूर्वी मंदिराच्या आवारात जगद्गुरू शंकराचार्यांचा मठ होता व तेथे विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाई. १९५४ पासून या मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याने घेतलेली आहे.
या मंदिरात दर सोमवारी कोपेश्वराची पालखी निघते. मंदिरास पालखीच्या तीन प्रदक्षिणा घातल्या जातात. दरवर्षी फाल्गुन दशमीस करवीरपीठातर्फे लघुरूद्राचे आवर्तन केले जाते. चैत्र ते ज्येष्ठ महिन्यापर्यंत कोपेश्वर व धोपेश्वराच्या लिंगाची ‘बुत्तीपुजा’ केली जाते. बुत्ती या कानडी शब्दाचा अर्थ दहीभात असा आहे. येथे दोन्ही लिंगांवर दहीभाताचे लिंपण करून त्याला शिवाच्या व विष्णुच्या मुखाचा आकार देण्यात येतो. नंतर भाताने शिवलिंगावर शिव-पार्वती, नंदी, गणपती, विष्णू यांच्या मूर्ती बनवल्या जातात. कोपेश्वर मंदिरात दरवर्षी पौष महिन्यात विशाल तीर्थ अमावस्येस मोठी यात्रा भरते. त्याच प्रमाणे महाशिवरात्रीस व श्रावणातील सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते.