महाकालिका मंदिर / काळभैरव मंदिर

बाजारपेठ, भिवंडी, ता. भिवंडी जि. ठाणे

प्राचीन काळापासून राज्यातील प्रमुख व्यापार केंद्र, अशी ओळख असलेल्या भिवंडी शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी एक असलेले महाकालिका मंदिर हे शिवकालिन आहे. चारशे वर्षांहूनही प्राचीन असलेल्या या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज तसेच चिमाजी अप्पा यांनी देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील महाकालिका माता जागृत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्वष्टा कासार ज्ञातीचे आराध्यदैवत असलेल्या या देवीच्या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.

भिवंडीतील कासार आळीत महाकालिका देवीचे मंदिर स्थित आहे. नवसाला पावणारी देवी, अशी तिची ख्याती आहे. असे सांगितले जाते की ही देवी परिसरावर सदैव नजर ठेवून असते. दररोज रात्री ती या परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडते. फेरफटका मारल्यानंतर ती येथून जवळच असलेल्या कालभैरव मंदिरात बसते व पहाटे साडेचारच्या सुमारास पुन्हा मंदिरात येते. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील मोहिमेला जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी येथे येऊन महाकालिका देवीचे दर्शन घेतले होते. वसई मोहिमेवर जाण्यापूर्वी चिमाजी अप्पा हेही आपल्या फौजफाट्यासह भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनीही या मंदिरात येऊन दर्शन घेतले होते.

या मंदिराचे पूर्वीचे स्वरूप वाड्यासारखे होते. त्वष्टा कासार ज्ञाती समाजाच्या मालकीचे असलेले हे मंदिर नेमके कुणी उभारले किंवा देवीची मूर्ती कशी आढळली, याबाबत कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. मंदिराची कौलारू वास्तू कालौघात जुनी होऊन तिला वाळवी लागल्याने त्वष्टा कासार ज्ञाती समाजाने लोकवर्गणीतून २०१३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी वाड्याच्या जागी मंदिराची दुमजली वास्तू उभारण्यात आली. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंकडील देवळ्यांमध्ये द्वारपालांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या तळमजल्यावर छोटी दीपमाळ आहे. पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर जात असताना स्वामी नित्यानंद यांची प्रतिमा दिसते. ‘मंदिराच्या जीर्णद्धाराचे काम विनाअडथळा पूर्ण झाल्यास तुमची प्रतिमा लावण्यात येईल’, असा नवस मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी स्वामी नित्यानंद यांना केला होता. मंदिराची नवी वास्तू उभारल्यानंतर त्यांची प्रतिमा लावून नवसपूर्ती करण्यात आली. पहिल्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह आहे. दुसऱ्या मजल्यावरून मंदिराच्या शिखराचे आणि कळसाचे जवळून दर्शन होते.

प्रशस्त सभामंडपाच्या भिंतींवर गर्भगृहासमोर तुळजापूरची तुळजाभवनी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता आणि सप्तश्रृंगी गडावरील सप्तश्रृंगी या देवींच्या प्रतिमा आहेत. मंदिराच्या वास्तूजवळ औदुंबराचा एक पुरातन वृक्ष आहे. त्या वृक्षाला हात न लावता, ही वास्तू बांधण्यात आली आहे. त्या वृक्षाचा भाग सभामंडपाच्या कोपऱ्यात दिसतो. सभामंडपात जुन्या वाडासदृश्य मंदिराची प्रतिमाही लावण्यात आली आहे. सभामंडपातून गर्भगृहाला प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्या वरच्या बाजूस देवीची नऊ रूपे आहेत. गर्भगृहात एका वज्रपिठावर मध्यभागी महाकालिका मातेची प्रसन्न मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजूस गणेश तर उजव्या बाजूस दत्ताची मूर्ती आहे. देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवण्यात आलेली आहे. जुन्या मंदिरातील मूर्तीचीच येथे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चार भुजा असलेल्या देवीच्या डावीकडील वरच्या हातात तलवार, खालच्या हातात कासार समाजाचे हत्यार असलेली हातोडी, उजवीकडील वरच्या हातात त्रिशूळ तर खालच्या हातात कलश आहे. देवीच्या उजवीकडील खालच्या बाजूस सेवकाची मूर्ती आहे. देवीच्या पायाजवळ खालच्या बाजूस तीन मुखे कोरलेली आहेत. ती वर्जेश्वरी येथील तीन देवींची प्रतिके आहेत, अशी मान्यता आहे. सिंधी समाजाकडून या देवीला लिंबाच्या माळा घालण्याची प्रथा आहे.

भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दररोज अनेक भाविक येथे येतात. चैत्री तसेच शारदीय नवसात्रोत्सवादरम्यान येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या दोन्ही नवरात्रोत्सवादरम्यान देवीची वाडी भरण्यात येते. यावेळी फुलांचे हार, मुकुट, हातात गजरे घालून देवीची यथासांग पूजा करण्यात येते. त्यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम तसेच महाआरती झाल्यावर वाडी भरण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान नऊ दिवस देवीची वस्त्रे बदलण्यात येऊन तिची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात येते. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते.

महाकालिका मंदिरापासून जवळच असलेल्या ब्राह्मण आळीत कालभैरवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या कालभैरवनाथाच्या शिळेवर देव-देवतांचे अष्टमंडळ कोरलेले आहे, हे येथील वैशिष्ट्य आहे. भरवस्तीत असलेल्या या मंदिरात येण्यासाठी छोटी भिंत असलेले प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रांगणात बालसंस्कार, ग्रंथपारायण व भजन हॉल आहे. मंदिराजवळील एका भिंतीवर शिवशंकरांचे हातात त्रिशूळ घेतलेले शिल्प कोरण्यात आले आहे. मंदिराच्या समोर उंबराचा प्राचीन वृक्ष आहे.

मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या मध्यभागी ललाटबिंबावर गणेशमूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना सोंड उंचावलेले गजराज आहेत. गर्भगृहात मध्यभागी असलेल्या वज्रपिठावर कालभैरवाची मूर्ती असलेली शिळा आहे. शिळेच्या वरच्या भागात मध्यभागी शिवलिंगावर ब्रह्म-विष्णू-महेश यांची स्थाने, शिळेच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूस सूर्यनारायण, उजवीकडे चंद्र, खाली जोगेश्वरीमाता, मध्ये कालभैरव आणि कालभैरवाच्या उजवीकडे चामुंडामाता असे देवदेवतांचे अष्टमंडळ आहे. या मंदिरात दररोज भजन केले जाते. सुमारे ४० वर्षापासून ही परंपरा आहे.

मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला येथे कालभैरव जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे वाचन होते. सायंकाळी मंदिरातून वाजतगाजत कालभैरवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर प्रसादाचे वाटप होते. कालभैरवाला लापशी, शिरा, जिलेबी, पेढा, पुरणपोळी, बाजरीची भाकरी, वांग्याची भरीत असा नैवद्य दाखवला जातो. यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात.

उपयुक्त माहिती

  • भिवंडी बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • ठाणे, कल्याण व पालघर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : महाकालिका मंदिर, योगेश शिंगरी, मो. ९८९०१२२०६२
Back To Home