शहापूर तालुक्यातील वाफे येथे असलेले गंगास्थान व त्याजवळ असलेले त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. या ठिकाणी गोदावरीचे अस्तित्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. भारंगी नदीकाठी वसलेल्या या देवस्थानाला गंगादेवस्थान म्हणूनही ओळखले जाते. येथील गंगाकुंड हे साडेसहाशे ते सातशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी पुढे पेशव्यांचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांनी त्र्यंबकेश्वराचे मंदिर बांधले व कुंडाचे बांधकाम केले. ते त्यावेळी माहुली किल्ल्याचे किल्लेदार होते. या मंदिराशेजारी असलेले काशीविश्वेश्वराचे म्हणून ओळखले जाणारे मंदिरही त्यांनी बांधले होते.
या देवस्थानाची आख्यायिका अशी सांगण्यात येते की पूर्वीपासून या ठिकाणी एक औदुंबराचे झाड आहे. सुमारे ७०० वर्षांपूर्वी या औदुंबराच्या झाडाखाली एक साधू महाराज ध्यान करीत असत. हे महाराज प्रत्येक एकादशी व पौर्णिमेला येथून नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानी स्नानासाठी जात असत. तेथून ते गोदावरी पात्रातून नित्यपूजेसाठी गंगाजल आणत असत. अनेक वर्षे त्यांनी त्र्यंबकेश्वर वारी केली; परंतु वार्धक्यामुळे शहापूरहून त्र्यंबकेश्वरला जाणे त्यांना अवघड होऊ लागले. आयुष्यभर पाळलेल्या नियमात खंड पडत असल्याने ते व्यथित झाले होते.
एकदा साधू महाराज येथील औदुंबराच्या वृक्षाखाली ध्यानधारणा करीत असतानाच साक्षात गोदावरीने दृष्टांत देऊन भेटीला येते, असे सांगितले. तेथेच गोदावरी प्रकट झाली. तेव्हापासून हे स्थळ गंगास्थळ तसेच प्रति त्र्यंबकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. येथे प्रकट झालेल्या नदीसाठी नंतरच्या काळात मंदिरासमोर कुंड बांधण्यात आले. ठाणे जिल्हा गॅझेटियरमधील नोंदीनुसार, येथे पूर्वी पाच कुंडे होती. त्यातील दोन कुंडे व येथील त्र्यंबकेश्वर आणि आज काशीविश्वेश्वराचे म्हणून ओळखले जाणारे भवानीशंकराचे मंदिर हे पेशव्यांचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांनी बांधले.
त्र्यंबकजी डेंगळे हे संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी या गावचे पाटील होते. ते दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू मदतनीस होते. पुढे १८१४ च्या सुमारास ते पेशव्यांचे कारभारी बनले. तत्पूर्वी त्यांच्याकडे माहुलीची किल्लेदारीही सोपवण्यात आली होती. त्या काळात त्यांनी वाफे येथे दोन गंगाटाकी, तसेच शंकराची दोन मंदिरे बांधली. पूर्वी या ठिकाणी आणखी तीन कुंडे होती. त्यातील एक कुंड १८५२ च्या सुमारास शहापूरचे तत्कालीन मामलेदार नारो भिकाजी यांनी, तर दुसरे कुंड स्थानिक ग्रामस्थांनी बांधले. तिसरे कुंड भारंगी नदीच्या खालच्या बाजूस स्थानिक निधीतून बांधण्यात आले, अशी नोंद १८८२ च्या गॅझेटियरमध्ये करण्यात आली आहे. आता यातील दोन कुंडे येथे दिसतात.
ज्या साधू महाराजांमुळे गोदावरी नदी येथे प्रकट झाली असे सांगण्यात येते, ते साधू महाराज औदुंबर वृक्षाखाली समाधिस्थ झाले. मसूर (सातारा) येथे वास्तव्यास असलेल्या बाळकृष्ण आंबीकर या सत्पुरुषास साधू महाराजांनी स्वप्नदृष्टांत दिला. त्यानुसार श्री. आंबीकर गंगास्थळी आले व त्यांनी साधू महाराजांच्या समाधीस्थानाची सेवा करण्यास सुरुवात केली. काही वर्षांनी ते सुद्धा येथेच समाधिस्थ झाले. त्यांची समाधी त्यांचे शिष्य जोशी यांनी येथील संतोषीमाता मंदिराजवळ नंतर बांधली.
हे देवस्थान वाफे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. पूर्वी येथील त्र्यंबकेश्वर आणि त्याच्या बाजूचे काशीविश्वेश्वराचे मंदिर लाकडी बांधणीचे होते असे सांगण्यात येते. कालांतराने त्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ नव्याने मोठा सभामंडप बांधलेला आहे. या सभामंडपातून आत आल्यावर उजवीकडे त्र्यंबकेश्वर मंदिर व डावीकडे गंगास्थान आहे. अंतराळ व गर्भगृह अशी त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना आहे. खुल्या पद्धतीच्या अंतराळात एका संगमरवरी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची प्राचीन मूर्ती स्थानापन्न आहे. अंतराळातील खांबांवरील सुंदर नक्षीकामासोबतच येथील छतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. घुमटाकार छतावर आतील बाजूने विविधरंगी काचा लावून ते सजविण्यात आलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील संगमरवरी नक्षीदार देवकोष्टकात गणपतीची मूर्ती व उजवीकडील देवकोष्टकात शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या संगमरवरी द्वारपट्टीवरही नक्षीदार कोरीवकाम आहे. अंतराळापासून गर्भगृह काहीसे खोल आहे. या गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. येथील शिवलिंग हे ओंकार-अमलेश्वर येथील नर्मदा नदीतून आणलेले आहे. या मंदिराच्या अंतराळावर अष्टकोनी शिखर आहे. येथील गर्भगृहावरील मुख्य शिखरावर देवकोष्टके व लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. त्यावर आमलक व कळस अशी रचना आहे. या मंदिराच्या अंतराळातून १० फूट खाली असलेल्या बांधीव कुंडात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्याला गंगाकुंड असे संबोधले जाते. या कुंडात गायमुखातून वर्षभर मोठ्या धारेने पाणी पडत असते. हे पाणी नाशिकच्या गोदावरीचे आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या डावीकडे काशीविश्वेश्वराचे मंदिर आहे. दीपमाळ, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह असे याचे स्वरूप आहे. या मंदिरासमोर असलेली प्राचीन दीपमाळ ही १९४० ला आलेल्या महापुरात वाहून गेली. त्यानंतर भाविकांनी येथे दुसरी दीपमाळ उभारली. या दीपमाळेच्या शेजारी नंदीमंडप आहे. या मंडपातील एका चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे. त्यापुढे काशीविश्वेश्वराचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उजवीकडे औदुंबर वृक्ष आहे व त्याखाली श्रीदत्ताचे स्थान आहे. याच ठिकाणी साधू महाराजांनी समाधी घेतली होती.
वाफे येथील गंगास्थानाचे स्थानमहत्त्व ओळखून येथे अनेक साधू व भाविक दर्शनासाठी येत असत. त्यांना राहण्यासाठी मुंबईचे नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांनी येथे धर्मशाळा बांधल्याचा उल्लेख १९१६ मध्ये विनायकराव माधवराव पितळे यांनी लिहिलेल्या ‘श्रीमंत नामदार जगन्नाथ शंकरशेट ऊर्फ नाना शंकरशेट ह्यांचे चरित्र’ या पुस्तकात आहे. नाना शंकरशेट हे मुळचे शहापूर तालुक्यातील मुरबाडचे होते. ते निस्सीम शिवभक्त होते. ताडदेव येथील भवानीशंकराच्या मंदिरात ते नेहमी दर्शनासाठी जात असत. त्यांनी वाफे येथे बांधलेल्या धर्मशाळेत येणाऱ्या साधूंना तीन दिवसांचा शिधा देण्याची व्यवस्थाही केली होती.
असे सांगितले जाते की या गावात पट्टेकर नावाचे मुलकी अमलदार होते. त्यांना मुलगा नव्हता. या ठिकाणी शेगावचे गजानन महाराज आले असताना पट्टेकर यांनी त्यांना पुत्र व्हावा असे साकडे घातले. तेव्हा गजानन महाराजांनी तुला पुत्र होईल, पण तो संसारी असणार नाही, असे सांगितले. तो मुलगा म्हणजे ठाणे येथील प्रसिद्ध संत कै. गजानन महाराज पट्टेकर हे होत. त्यांनी येथील औदुंबराखाली गुरुचरित्राची ११ पारायणे केली होती.
दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला येथे पालखी फिरविली जाते. पालखी उचलणाऱ्यांनी पांढरा पोषाख परिधान केला पाहिजे, अशी येथे प्रथा आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा असते. याशिवाय दरवर्षी येथे गंगापूजनाचा विधी केला जातो.