संत एकनाथ मंदिर

प्रभू आळी, भिवंडी, जि. ठाणे

ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध व प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले संत एकनाथ मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे १२५ वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिरात परिसरातील अनेक वारकरी, तसेच भाविक दर्शनासाठी येतात. तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठीनिमित्त होणाऱ्या उत्सवादरम्यान येथे भाविकांची मोठी गर्दी असते. अन्य ठिकाणच्या मंदिरांमध्ये कीर्तन, भजन आदी कार्यक्रम होत असले तरी या उत्सवादरम्यान येथे होणारे अष्टपदी भजन हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. अष्टपदी भजन होणारे राज्यातील हे एकमेव मंदिर असावे, असा येथे दावा करण्यात येतो.

वारकरी आणि असंख्य भाविकांचे प्रेरणास्थान असलेले हे एकनाथ मंदिर शहरातील प्रभू आळीत भर वस्तीमध्ये आहे. बाहेरून मंदिराची दुमजली वास्तू नजरेस पडते. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर डावीकडे एक प्राचीन विहीर आहे. ‘गंगामय्या’ या नावाने ही विहीर ओळखली जाते. अनेक वर्षांपूर्वी भिवंडीत भीषण दुष्काळ पडला होता. शहरातील सर्व जलस्रोत आटले होते. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्यावेळी या विहिरीतील पाण्यानेच गावाची तहान भागवली होती.

दर्शनमंडप, प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात देवदेवतांच्या, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद आदी विविध संतांच्या व महापुरुषांच्या प्रतिमा आहेत. सभामंडपातून काही पायऱ्या उतरल्यावर गर्भगृहात जाता येते. गर्भगृहात संत शांताराम महाराज यांची समाधी आहे. समोर एका वज्रपीठावर आकर्षक कलाकुसर असलेल्या देव्हाऱ्यात मध्यभागी संत शांताराम महाराज यांची धातूची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर पादुका आहेत. मूर्तीच्या डावीकडे दत्तगुरू तर उजवीकडे विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. देव्हाऱ्याच्या डावीकडे असलेल्या मोठ्या देवळीत संत एकनाथांची, तर उजवीकडील देवळीत संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. मखराच्या वरच्या बाजूस मध्यभागी विठ्ठलाची प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या डावीकडे संत शांतारामभाऊ जयवंत यांची तर उजवीकडे गणेशाची प्रतिमा आहे.

संत शांतारामभाऊ जयवंत यांचे या मंदिरात अनेक वर्षे वास्तव्य होते. शांतारामभाऊ हे सधन कुटुंबातील होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेचा सांभाळ करण्यासाठी ते भिवंडीला आले होते. येथे त्यांना शंकरबुवा पवार हे भेटले. त्यांच्या संगतीने ते परमार्थाकडे वळले व ते दोघे एकमेकांचे गुरू झाले. ते अनेकदा पंढरपूरच्या वारीस जात. ह.भ.प. सोनोपंत दांडेकर यांच्यासमवेत त्यांनी आषाढी वारी केली होती. त्यांच्या ओवीबद्ध चरित्रात असे म्हटले आहे की ते शिर्डीस जाऊन साईबाबांनाही भेटले होते. अंबरनाथचे देवबाबा, उरणचे स्वामी जीवनमुक्त, त्र्यंबक महाराज कुर्लेकर, बडोद्याचे मस्ताना महाराज यांचा सहवासही त्यांना लाभला होता. ‘नाम स्वयंभू आहे. त्यामध्ये भगवंताची दिव्य शक्ती साठलेली आहे. नामामध्ये गुरुकृपेचा समावेश आहे,’ अशी त्यांची शिकवण होती. शांतारामभाऊ यांनी आपले आयुष्य विठ्ठ्लभक्तीमध्ये व्यतित केले. नाथषष्ठीचा उत्सव ते अत्यंत उत्साहाने साजरा करीत असत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत. ते येथे येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करत. असंख्य रुग्णांच्या औषधोपचाराचा तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही ते उचलत. या मंदिरात ते स्वखर्चाने सर्व उत्सव करत. उत्सवांसाठी त्यांनी आपली काही मालमत्ताही विकल्याचे त्यांचे अनुयायी सांगतात. त्यांच्या निधनानंतर उत्सव तसेच विविध कार्यक्रम करण्यासाठी १९७६ मध्ये मंदिराच्या ट्रस्टची स्थापना झाली. तेव्हापासून लोकवर्गणीतून उत्सव साजरे होतात. या मंदिरात भजन, कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने सुरू असतात. गुरुपौर्णिमेला हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

फाल्गुन महिन्यात तुकाराम बीज व एकनाथ षष्ठीचा उत्सव होतो. या उत्सवाला सुमारे १०० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. या उत्सवानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्यादरम्यान काकड आरती, अखंड नामस्मरण, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम होतात. त्यासाठी राज्यातील विविध भागांतील कीर्तनकार व भजन मंडळांना आमंत्रित केले जाते. उत्सवादरम्यान होणारे अष्टपदी भजन हे येथील मुख्य आकर्षण असते. अन्य मंदिरांमध्ये सहसा न होणारे हे भजन अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील भाविक येथे येतात. अष्टपदी म्हणजे आठ पदांची रचना. जयदेवाचे गीतगोविंद ही अष्टपदीमधील रचना आहे. या रचना आध्यात्मिक गुढार्थाने आणि भक्तिमय भावनांनी भरलेल्या असतात. ही भजने उभ्याने केली जातात व त्यांना पखवाज, संवादिनी, टाळ तसेच नृत्यपरंपरेचीही जोड दिली जाते. शांतारामभाऊ जयवंत यांच्या नाथ मंदिरातील साधकवर्ग सादर करीत असलेली अष्टपदी भजने राज्यात सुप्रसिद्ध आहेत. शहरात निघणाऱ्या पालखी सोहळ्याने या उत्सवाची सांगता होते. शहरातील प्रभू आळी, बाजारपेठमार्गे वाणी आळी, टिळक चौक, कासार आळी व पारनाका येथे फिरणारी ही पालखी पुन्हा मंदिरात येते. शहरातील असंख्य भाविक टाळ- मृदुंगाच्या गजरात निघणाऱ्या या पालखीत भक्तिभावाने सहभागी होतात.

मंदिराच्या प्रांगणात असलेल्या विहिरीच्या मागील बाजूस संस्थानाचे सुसज्ज स्वयंपाकघऱ आहे. मंदिरात होणाऱ्या विविध उत्सवांप्रसंगी लागणारा महाप्रसाद येथे बनवला जातो. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर भोजनालय आहे. उत्सवांदरम्यान येथे महाप्रसाद होतो. उत्सवांदरम्यान राज्याच्या विविध भागांतून येणारे कीर्तनकार, भजनी मंडळ तसेच भाविकांच्या राहण्याची सुविधा येथे आहे. या वास्तूच्या गच्चीवर गेल्यास मंदिराच्या भव्य शिखराचे जवळून दर्शन होते. ८० फूट उंचीच्या या दगडी शिखरावर आकर्षक रंगरंगोटी असून त्यावर सुवर्ण कलश आहे.

उपयुक्त माहिती

  • भिवंडी बस स्थानकापासून २ किमी, तर ठाणे शहरापासून १८ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर येथून भिवंडीसाठी थेट एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९०२८९ २४८९२
Back To Home