प्राचीन काळापासून अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या पन्हाळा किल्ल्याशी अनेक पौराणिक कथाही निगडित आहेत. ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथातील आख्यायिकेनुसार, हा पर्वत विश्वातील प्रजोत्पत्तीशीही संबंधित आहे. प्रजा उत्पन्न करण्यासाठी येथेच ब्रह्मदेवाने सोमेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना करून तपश्चर्या केली होती. त्यामुळे हा गड ब्रह्मदेवाचा पर्वत म्हणून ब्रह्मगिरी या नावाने ओळखला जातो. याच प्रमाणे येथे पराशर ऋषींचे सपत्निक वास्तव्य होते. त्यांचा आश्रम जेथे होता ते स्थान म्हणजेच येथील हरिहरेश्वर मंदिर होय. याच परिसरात नागझरी तसेच प्राचीन विठ्ठल मंदिर आहे.
कोल्हापूरच्या जोशी घराण्यातील पंडित कवी दाजीबा जोशीराव यांनी १९व्या शतकात लिहिलेल्या ‘करवीर माहात्म्य’ या मराठी ग्रंथात या स्थानाविषयीची ओवीबद्ध आख्यायिका आहे. ती अशी की पन्हाळा किल्ल्यावर पराशर ऋषी पत्नी सत्यवती व शिष्यगणांसह राहात असत. त्यांनी येथे मोठे तप केले. त्यावेळी त्यांच्या शिरापासून अग्नी उत्पन्न झाला व तो सर्व लोकांस जाळू लागला. तेव्हा त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी इंद्राने मदनास त्यांच्याकडे पाठवले. तो रंभा अप्सरा, तसेच वायू आदी देवता घेऊन तिकडे गेला. मदनाने आपला बाण सोडून पराशरांची एकाग्रता भंग केली. त्यांनी डोळे उघडले तेव्हा रंभेस तेथे ठेवून मदनादी देवता पळून गेल्या. मात्र पराशरांनी ते जाणले. त्यांना शाप दिल्यास आपले पुण्य जाईल हे ओळखून त्यांनी पत्नी सत्यवती हिला रंभेस शाप देण्यास सांगितले. सत्यवती त्या सर्वांना शाप देण्यास सज्ज झाली. ते पाहून रंभा, मदन, वायू हे सर्व तेथून पळू लागले. तेव्हा ‘तैं कामादी पळती हें पाहून। पराशर वदे तपासी वचन। म्हणे न करा रे पलायन । स्वस्थ असा भिऊ नका।। तुम्ही माझ्या स्थानीं येऊन। न केल्या माझे पूजाग्रहण। शून्य होईल माझे स्थान। यास्तव पूजा घ्या माझी।।’ अशा प्रकारे आतिथ्यधर्मास जागून सत्यवती व पराशराने त्यांना अभय दिले. ही घटना पराशर यांच्या या आश्रमात घडली. तेच स्थान हरिहरेश्वर मंदिर होय.
‘करवीर माहात्म्या’त या स्थानाविषयीची आणखी एक आख्यायिका वर्णन केली आहे. ती अशी की मदनाचे बाण वाया गेल्यानंतर पराशर पुन्हा तपास बसले. त्यांच्या तपामुळे पाताळ तापले. त्याचा त्रास पन्नग म्हणजे नाग, सर्पांना होऊ लागला. तेव्हा त्यांनी पराशरांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी विचार केला की ‘ज्याच्या बळे हा तप करी। तेंच उदक आकर्षावे।’. त्यानुसार त्यांनी तेथील सोमकुंड, तसेच सत्यवती व पराशरांनी तयार केलेले कुंड यांतील पाणी शोषून घेतले. परिणामी पराशरांना स्नानाला पाणी मिळेनासे झाले. हे सर्पांचे कृत्य जाणून त्यांनी गारूडिक मंत्रांनी भारलेले दर्भ सोडले. त्यामुळे अनेक सर्प मारले गेले. अखेर उरलेले नाग शरण आले. त्यांना पराशरांनी अभय दिले व ते म्हणाले, ‘नाग हो ऐका माझें वचन। जे विधीनें सर्व तीर्थापासून। जळ आणिलें त्याचें शोषण। ज्या सर्पांनी केलें असें।। ते पवित्र झाले त्या जळपानें। पवित्र करोत स्वपूजनें दर्शनें। सर्वांनींही येथें राहणें। सर्वदा ही सर्प हो।। हें स्थान तुमच्या नामें करून। प्रख्यात हो पन्नगालय म्हणोन।’ अशा प्रकारे पराशरांनी या स्थानास पन्नगालय असे नाव दिले. तेच पुढे पर्नालक झाले. त्या वेळी या सर्पांनी तेथे पराशर मुनींसाठी पाताळगंगा आणली. तेव्हा पराशर म्हणाले की ‘हा पाताळगंगेचा झरा। नागझरी नामक हो खरा। तुम्ही स्थापिले त्या ईश्वरा। नागेश नाम प्रसिद्धि हो।।’ हे नागेश मंदिर येथील विठ्ठल मंदिरानजीक आहे.
पन्हाळगडाकडे जाणाऱ्या पूर्वेकडील रस्त्यावर, चार दरवाजानजीक शिवा काशीद यांचा पुतळा आहे. याच्या समोरच्या बाजूला रस्त्याच्या अलीकडे मोठा तलाव आहे व तेथून पराशर आश्रम, नागझरी तसेच विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी उंच चढणीचा कच्चा रस्ता आहे. या भागात आजही झाडांची भरपूर दाटी आहे. विविध पक्षी आणि औषधी वनस्पती या परिसरात आढळतात. वर काही अंतरावर चढून आल्यानंतर डावीकडे पराशर आश्रम अर्थात हरिहरेश्वर मंदिर आहे. पन्हाळगडावरील हे एक साधे, परंतु महत्त्वाचे मंदिर मानले जाते. मंदिराभोवती झाडीने वेढलेले मोठे मोकळे प्रांगण आहे. हाच सर्व भाग म्हणजे पराशरांचा आश्रम. येथे तीन कमानी असलेला छोटा सभामंडप, दोन गर्भगृहे, त्यावर साधेसे दगडी शिखर अशी संरचना असलेले हरिहरेश्वराचे मंदिर आहे. त्याच्या बांधणीवरून अलीकडे या मंदिराची डागडुजी करण्यात आल्याचे दिसते.
मंदिराच्या डावीकडील गर्भगृहात भूतलावर हरेश्वराचे उंच लिंग आहे. त्यावर पितळी नागाने फणा धरलेला आहे. प्रवेशद्वारासमोर नंदीची दगडी मूर्ती आहे. उजवीकडील गर्भगृहात कोरीव काम केलेल्या दगडी पीठावर विष्णूची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. १६व्या शतकानंतरच्या मूर्तीकलेची छाप असलेली ही मूर्ती समपद व चतुर्भुज आहे. हातात चक्र, गदा, पाश व ग्रंथ आहे. मस्तकी मुकुट व कमरेस धोतरासारखे वस्त्र कोरलेले आहे. या मूर्तीच्या गळ्यात हार आहे. या हरिहरेश्वर मंदिराच्या गर्भगृहांच्या दोन्ही प्रवेशद्वारांच्या मधोमध भिंतीतील कोनाड्यात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. येथेच पाण्याचा अखंड वाहता झरा असलेले नागझरी कुंड आहे. त्याभोवती दगडी बांधकाम करण्यात आलेले आहे. या परिसरात पराशर मुनींनी सिद्ध केलेले सिद्धकुंड आहे व त्यास सिद्धबाव असे म्हणतात.
हरिहरेश्वर मंदिरापासून काही अंतरावर प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठलाचे हे स्थान १४व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या आवारात एक दगडी दीपस्तंभ आहे. येथे दोन तुळशी वृंदावने आहेत. ती एकमेकांस समांतर आहेत. एका तुळशी वृंदावनातील पोकळ भागातून सरळ पाहिल्यावर मुख्य मंदिराच्या पलीकडील वृंदावन दिसते. यातील एका तुळशी वृंदावनात पादुका आहेत, तर दुसऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. हे पराशर पत्नी सत्यवती यांनी स्थापन केलेले सत्यवती लिंग असल्याचे सांगण्यात येते.
पूर्णतः दगडी चिऱ्यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिराची संरचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. त्यावर चारही बाजूंनी वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. या शिखरावर छोट्या छोट्या स्तंभांची एकावर एक असलेली रांग आहे. त्याच्या चारही बाजूंनी वैशिष्ट्यपूर्ण देवळ्यांसारखा आकार आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त व बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्याच्या बाजूच्या भिंतींपासून काही अंतरावर आत पाषाण स्तंभांची रांग आहे. या स्तंभांच्या रचनेवर करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील स्तंभांचा प्रभाव जाणवतो. मात्र हे स्तंभ केवळ ताशीव आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार साधेसे दगडी आहे व त्यावरील ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. मंडारकास अर्धचंद्रशीलेच्या ठिकाणी चौकोनी शिला आहे. आत उंच कोरीव पीठावर राही आणि रखुमाई यांच्यासह विठ्ठलाची काळ्या पाषाणातील कर कटेवर असलेली मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात नागेश्वराचेही छोटे मंदिर आहे. मंदिरात नागेशाचे लिंग व प्रवेशद्वारासमोर नंदी आहे. अशा प्रकारे येथील विठ्ठल मंदिराचाही पराशर ऋषी व सत्यवती यांच्या आख्यायिकेशी जवळचा संबंध आहे.