छत्रपती शिवाजी महाराज
संभाजी महाराज द्वितीय मंदिर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

सिंधुदुर्ग किल्ल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर असलेला दुसरा किल्ला ही पन्हाळगडाची महत्त्वपूर्ण ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने इ.स. १६५९ मध्ये घेतलेल्या आणि शिवइतिहासातील देदीप्यमान प्रकरणांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यावर शिवरायांचे हे सुबक छोटे मंदिर स्थित आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात सिंधुदुर्ग किल्ल्यावर १६९५ मध्ये शिवछत्रपतींचे जगातील पहिले मंदिर बांधण्यात आले होते. त्यानंतर १९०६-०७ च्या सुमारास शाहू छत्रपतींनी त्या मंदिराचा प्रशस्त सभामंडप बांधला. याच शाहू छत्रपतींनी १९१३ मध्ये पन्हाळगडावरील हे मंदिर बांधले.

गडावरील तबक उद्यानाजवळ आणि ताराराणी राजवाड्याच्या समोर एका प्रशस्त पटांगणात एका उंच दगडी चौथऱ्यावर हे उभट आकाराचे देखणे मंदिर उभे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार महिरपी कमानदार आहे. द्वारस्तंभांवर रेखीव नक्षीकाम केलेले आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूला भिंतीत कोरीवकाम केलेले छोटे कोनाडे आहेत. मंदिरावर उरूशृंग पद्धतीचे म्हणजे मुख्य शिखरावर तशीच लहान लहान शिखरे कोरलेले शिखर आहे. त्यावर मुख्य एक व लहान असे चार आमलक आहेत. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची शुभ्र संगमरवरात कोरलेली अश्वारूढ मूर्ती आहे. ही मूर्ती ध्वज मिस्त्री या कागल येथील शिल्पकाराने तयार केली आहे. मूर्तीच्या बाजूला महाराणी ताराबाई साहेबांच्या पादुकाही स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा अनेकदा पन्हाळगडावर मुक्काम असे. ते जेव्हा जेव्हा येथे वास्तव्यास असत तेव्हा तेव्हा रोज सकाळी ते नित्यनेमाने या मंदिरात येऊन शिवरायांचे दर्शन घेत असत. येथे रोज सकाळी व संध्याकाळी शिवाजी महाराजांची पूजा केली जाते. याच वेळी येथे शिवछत्रपतींच्या मूर्तीचे दर्शन घेता येते. येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. या पवित्र दिवशी पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करीत भव्य मिरवणूक काढण्यात येते.

छत्रपती संभाजी महाराज (द्वितीय) मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती संभाजी महाराज (द्वितीय) यांचे मंदिर हे पन्हाळगडावर येणाऱ्या शिवप्रेमींचे एक आकर्षणस्थळ आहे. हे सुस्थितीतील मंदिर एखाद्या मोठ्या वाड्यासारखे आहे. शंभू छत्रपती महाराज या नावाने लोकप्रिय असलेल्या संभाजीराजे द्वितीय यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पार्थिवावर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले आहे. येथे संभाजीराजांच्या मूर्तीची नित्यनेमाने पूजा केली जाते. या मंदिरवास्तूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आवारात असलेली प्राचीन बावडी. स्वच्छ गोड पाण्याची ही विहीर शिवमुद्रेप्रमाणेच अष्टकोनी आकाराची आहे.

छत्रपती संभाजी महाराज (द्वितीय) हे छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे पुतणे होत. औरंगजेबाच्या अटकेतून संभाजीपुत्र शाहूराजांची सुटका झाल्यानंतर राजारामपत्नी महाराणी ताराबाई आणि शाहूराजे यांच्यातील संघर्षास सुरुवात झाली. त्यातून महाराणी ताराबाईंनी इ.स. १७१० मध्ये पन्हाळगडावर आपला पुत्र शिवाजी (दुसरे) यांच्या छत्रपदाची द्वाही फिरवली व पन्हाळा ही मराठ्यांची दुसरी राजधानी बनली. मात्र चार वर्षांतच पन्हाळगडावर राज्यक्रांती झाली आणि छत्रपती राजाराम व त्यांची दुसरी पत्नी राजसबाई यांचे पुत्र संभाजीराजे हे गादीवर आले. २ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर १७१४ या काळात हे सत्तांतर झाल्याची नोंद आहे. संभाजीराजे ऊर्फ शंभूछत्रपती यांनी १७६० पर्यंत कोल्हापूर संस्थानचा कारभार पाहिला. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी जिजाबाईसाहेब यांनी संस्थानचा कारभार हाती घेऊन उत्तमरीत्या चालवला. १७ फेब्रुवारी १७७३ रोजी त्यांचे निधन झाले.

जिजाबाई यांच्या काळातच शंभूराजे (द्वितीय) यांचे मंदिर बांधण्यात आले. इतिहासकार अप्पासाहेब पवार यांच्या ‘जिजाबाईकालीन कागदपत्रे’ या ग्रंथात याविषयीचे एक पत्र देण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की – ‘आपत्य जोतिबा यादव चरणावर मस्तक ठेऊन विज्ञापना……. साहेबाच कृपा दृष्टीकडून वर्तमान येशास्थित आसे…… तीन दरवाजे उघडून राबता चालविलीयाने गलादाणा वगैरे सर्व राबता चालेल आज्ञा करणार साहेब वडील समर्थ आहेत. सेवेशी विदित जाहले पाहिजे श्रृत होय हे विज्ञापना : रंगा गोड त्याचा …. ।।ऊ व पाथुर्वट यैसे आज्ञा करून पाठविलीयाने महाराजाचे देवालयाचे काम चालीस लागले पाथरवट डोंगर पावनगडचे यावे किला नि।। येथे आहेत….’ जिजाबाईसाहेबांनी पाठवलेल्या या पत्रात संभाजी महाराजांच्या देवालयाच्या कामाविषयीचे उल्लेख आहेत.

भव्य अशा चौकोनी आकाराच्या वाड्यामध्ये हे अठराव्या शतकातील मराठा स्थापत्यशैलीतील मंदिर वसलेले आहे. मंदिर आवारास भव्य दगडी महाद्वार आहे. रायगडावरील मेघडंबरीच्या समोर असलेल्या जुन्या प्रवेशद्वाराप्रमाणेच हे द्वार आहे. आत दोन्ही बाजूंस दोन मोठ्या दीपमाळा, तसेच तुळशी वृंदावने आहेत. आवारात सर्वत्र दगडी फरसबंदी केलेली आहे. चारही कोपऱ्यांत छोटेखानी बुरूज आहेत. एका बाजूस दुमजली अशी नगारखान्याची इमारत आहे. या इमारतीत खालच्या बाजूला मंदिराचे पुजारी असलेले मुस्लिम कुटुंब वास्तव्यास आहे.

हे मंदिर उंच जगतीवर उभारलेले आहे व त्याचा आकार ९० x ४६ फूट एवढा आहे. जमिनीपासून कळसाची उंची ५५ फूट एवढी आहे. मंदिराच्या शिखरावर सुवर्णाचा कलश असल्याचे सांगण्यात येते. मंदिराची रचना समोरील बाजूने सदरेसारखा खुला असलेला उपसभामंडप, विस्तीर्ण सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. उपसभामंडपास चौकोनाकार ताशीव दगडी स्तंभ आहेत व त्यावर समतल छत आहे. येथेच दोन्ही बाजूंस तीन-तीन जुन्या तोफा मांडून ठेवलेल्या आहेत.

सभामंडपाच्या समोरील भिंतींस एक मुख्य व दोन उप अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपाच्या भिंतीपासून आतील बाजूस काही अंतरावर मोठे दगडी स्तंभ आहेत. हे स्तंभ ताशीव दगडाचे आहेत. खालच्या बाजूस चौकोनाकार, त्यावर अष्टकोनी आणि त्यावर पुन्हा चौकोनाकार, त्यावर गोल, त्यावर चकती आणि शीर्षस्थानी असलेल्या चौकोनाच्या चारही कोनांना दिलेला कमलदलाचा आकार अशा प्रकारचे हे स्तंभ आहेत. त्यावर कुठल्याही प्रकारचे नक्षीकाम नसले, तरी ती कसर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराने भरून काढलेली आहे. गर्भगृहास पितळी प्रवेशद्वार आहे. त्यास तीन द्वारशाखा आहेत व त्यावर बारीक नक्षीकाम आहे. या चौकटीच्या बाजूस असलेल्या नक्षीने सुशोभित असा स्तंभावर खालच्या बाजूस द्वारपालांची तर मधल्या बाजूस हनुमान आणि गरुडाचे शिल्प कोरलेले आहे. चौकटीच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे.

गर्भगृहात सिंहासनावर वीरासन घालून बसलेली संभाजी महाराज (द्वितीय) यांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. हे मंदिर शिवशंभूंचे असल्याच्या भावनेतून येथे सकाळ, सायंकाळी विधिपूर्वक पूजा केली जाते. विशेष म्हणजे येथे नगाऱ्याचा मान असलेल्या नगारजी या मुस्लिम कुटुंबाकडून शिवशंभूंची पूजा केली जाते. कित्येक वर्षे या कुटुंबाकडे हा मान आहे व सर्व हिंदू रितीरिवाज पाळून ते येथे राहाते.

या मंदिराच्या मागच्या बाजूस एक विहीर आहे. तेथे अशा खुबीने बांधकाम केलेले आहे की आत विहीर आहे हे कोणासही लक्षात येत नाही. पाण्याचे साठे सुरक्षित राहावेत या हेतूने हे करण्यात आले आहे. येथे दगडी पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर अष्टकोनी आकाराची विहीर दिसते. मंदिराच्या मागच्या बाजूस काही ओवऱ्याही बांधलेल्या आहेत. या मंदिरासमोर, रस्त्याच्या पलीकडील बाजूस राणी जिजाबाईसाहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले शंकराचे मंदिर आहे.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून २२ किमी अंतरावर
  • कोल्हापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट पन्हाळगडावर येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home