सोमेश्वर / अंबाबाई / कृष्णेश्वर मंदिर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान जीवनातील ‘पन्हाळ्याहून सुटका’ या थरारक घटनेमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचा नोंदला गेलेला गिरीदुर्ग म्हणजे पन्हाळा. राष्ट्रकुट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहामनी, आदिलशाही आणि अर्थातच मराठे यांच्या इतिहासाचा एक भाग असलेला हा गड पौराणिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. इतिहासात प्रणालक, पद्मनाल, पर्णालगड, पनाला, पुनाला या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या गडाचे ब्रह्मगिरी हे पौराणिक नाव आहे. त्यामुळे यास आगळे महत्त्व आहे.

पौराणिक तसेच १९व्या शतकात दाजिबा जोशीराव यांनी लिहिलेल्या ‘करवीर माहात्म्य’ या मराठी ग्रंथात पन्हाळ्याचा उल्लेख ब्रह्मगिरी असा करण्यात आलेला आहे. ‘करवीर माहात्म्या’त याविषयी ‘नंतर महालिंगाष्टक। पहात पहात मुनिनायक। तेथें जाय जो गिरि ब्रह्म संज्ञक। क्षेत्राच्या वायव्येस असे।।’ असे म्हटलेले आहे. या ग्रंथाच्या नवव्या अध्यायात याविषयी अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे की प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने या किल्ल्यावर ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती. त्याकरीता त्यांनी येथे सरोवर निर्माण करून लिंग स्थापन केले होते. त्यास सोमेश्वर असे म्हणतात. याबाबतच्या ग्रंथातील ओव्या अशा आहेत – ‘जेथें ब्रह्मा तप करी। प्रजा करायासाठी नारी। पावोनि सिद्धी लवकरी। प्रजा करी उत्पन्न।। तेथें स्थापी सोमेश्वरा। आणओन सर्व तीर्थ प्रकरा। करी सोमेश्वर नामक सरोवरा। आणि वर देई प्रिये।।’ ब्रह्मदेवांनी येथे तप केल्यामुळे यास ब्रह्मगिरी असे नाव पडले.

या किल्ल्यास सुमारे १२०० वर्षांचा इतिहास आहे. इ.स. ७५३-५४ मध्ये तो राष्ट्रकुटांचा सातवा राजा दंतिदुर्ग याच्या ताब्यात होता. यानंतर कल्याणीचे चालुक्य, शिलाहार राजा दुसरा जटिग, जटिगचा मुलगा गोङ्क, गोङ्कचा मुलगा मारसिंह यांची येथे सत्ता होती. मारसिंह याने या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली होती. तेव्हा त्यास खिलगिल दुर्ग असे नाव होते. इ.स. ११७५ ते १२१५ या काळात होऊन गेलेला शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याचे बांधकाम करून तो भक्कम केला असे सांगण्यात येते. १२१३-१४ नंतर तो यादव राजा सिंघणदेव याच्या ताब्यात गेला. १३४७ नंतर तो बहामनी साम्राज्याचा भाग बनला. १३७६ मध्ये या गडावर महंमदशाह पहिला याचे वास्तव्य होते. बहामनी साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर, १४८९ पासून हा किल्ला आदिलशाहीत गेला. दुसरा इब्राहिम आदिलशाहा याने या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. त्याने पन्हाळ्यावर मशिदी, ईदगाह, राजवाडे, तटबंदी व अन्य वास्तू बांधल्या. तसेच १५३५ मध्ये नागझरी हा झरा बांधण्यात आला. हा किल्ला म्हणजे आदिलशाहाची दक्षिणेकडील राजधानी होती. ती १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी काबीज केली. पुढे महाराणी ताराराणी यांच्या काळात हा किल्ला कोल्हापूरच्या राजधानीचे ठिकाण होते. तो परत घेण्यासाठी सिद्दी जौहर (सलाबतखान) यास पाठवण्यात आले. त्याने किल्ल्यास दिलेल्या वेढ्यातून १३ जुलै १६६० च्या मध्यरात्री शिवराय मोठ्या युक्तीने निसटले. त्यांचा पाठलाग करणाऱ्या सैन्यास रोखताना बाजी प्रभू देशपांडे यांनी मोठा पराक्रम गाजवला व आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मराठ्यांच्या इतिहासातील हे एक जाज्वल्य प्रकरण म्हणून ओळखले जाते. याच किल्ल्यावर संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांचा श्राद्धविधी केला होता. १८४४ साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. या किल्ल्यावर अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत.

सोमेश्वर मंदिर

करवीर माहात्म्यात वर्णन केलेल्या आणि आदिलशाही काळात, १४९७ मध्ये बांधण्यात आलेल्या सोमेश्वर (सोमाळे) तलावाच्या काठी सोमेश्वराचे मंदिर आहे. पन्हाळा गडाच्या पेठेतील रस्त्यापासून खालच्या बाजूला, तलावाच्या दगडी भिंतीलगत हे मंदिर आहे. काही पायऱ्या उतरून मंदिरापर्यंत यावे लागते.

दगडात बांधलेल्या या मंदिराची सध्याची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृह हेमाडपंती शैलीतील आहे व त्यावर पिरॅमिडच्या आकाराचे छोटे शिखर आहे. मंदिराचा सभामंडप बंदिस्त प्रकारचा व समतल छत असलेला आहे. सभामंडपास तीन मोठ्या दगडी पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या भिंतीपासून आत काही अंतरावर चार दगडी स्तंभ आहेत. मध्यभागी दगडात कोरलेला सुबक असा नंदी आहे व त्यालगत ब्रह्मेश्वराचे लिंग आहे.

गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर डावीकडील कोपऱ्यात छोट्या देवळीमध्ये गणेशाची छोटी दगडी मूर्ती आहे व तेथेच नागदेवतेची शिळा मांडलेली आहे. उजव्या बाजूस देवळीमध्ये अष्टभुजा देवीची ओबडधोबड स्वरूपातील मूर्ती प्रतिष्ठापित आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास दगडी चौकट आहे. त्याच्या वर दोन्ही बाजूंस दगडी अश्व मस्तके बसवलेली आहेत. ललाटबिंबस्थानी गणेश विराजमान आहे. गर्भगृहात भूतलावर असलेल्या सोमेश्वराच्या पिंडीवर पंचधातूच्या पात्रातून जलाभिषेक सुरू असतो.

शिवप्रेमींच्या दृष्टीने या मंदिराचे महत्त्व म्हणजे, पन्हाळ्यावर वास्तव्यास असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरात येऊन सोमेश्वराचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या सैनिकांसह सोमेश्वरास चाफ्याची एक लक्ष फुले अर्पण केली होती. जयराम पिण्ड्येकृत ‘पर्णालपर्वत ग्रहणाख्यानम्’ या ग्रंथात ही माहिती आलेली आहे. मूळचा नाशिकप्रांतातील असलेला जयराम पिण्ड्ये हा शहाजी राजे व एकोजी राजे यांच्या पदरी होता. १६७४ मध्ये त्याने ‘पर्णालपर्वत ग्रहणाख्यान’ लिहिले. त्यात तो सांगतो की ‘भूजभूपोप्तचाम्पेयपुष्पैरतिमनो हरै:। देवतायतने तस्मिन्‌ लक्षपूजां समादिशत्‌॥’ (अध्याय ४, श्लोक ६७). याचा अर्थ असा की देवाच्या मंदिरात राजाने सुगंधित अशी लक्ष चंपकफुले वाहून महापूजा करण्याची आज्ञा केली.

या मंदिरासमोर स्वच्छ पाणी असलेला, चारी बाजूंनी दगडी भिंत बांधलेला सुंदरसा तलाव आहे. या तलावात भरपूर मासे विहरत असतात. जयराम पिंण्ड्ये याने याचे वर्णन – ‘ततः सोमालये नाम्ना तटाके प्रस्फुटाम्बुजे ॥ सारसैश्चक्रवाकैश्च हंसैः सथोभिते तटे मत्स्यैः समुच्चलत्युत्थैः कच्छपैश्च तरङ्किते ॥’ अशा शब्दांत केले आहे. (अध्याय ४, श्लोक ६३,६४). याचा अर्थ असा की तेथे नाना कमळे फुललेला सोमालय तलाव होता. त्याचा तट सारस, हंस आणि चक्रवाक पक्ष्याच्या कूजनाने भरलेला होता. उड्या मारणाऱ्या माशांमुळे पाणी हलत होते. कासवांमुळे त्यात तरंग निर्माण होत होते. या तलावाच्या जवळच एक छोटे मारुतीचे मंदिर आहे.

अंबाबाई मंदिर / ब्रह्मेश्वर मंदिर

कोल्हापूरमधील करवीरनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाईप्रमाणेच पन्हाळा गडावरही अंबाबाईचे स्थान आहे. अंबाबाई मंदिरास खेटूनच ब्रह्मेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून हे मंदिर प्राचीन असल्याचे जाणवते. काही अभ्यासकांच्या मते, महालक्ष्मी अंबाबाई ही शिलाहार राजा भोजाची कुलदेवता असल्याने त्याच्या काळात येथील मूळ मंदिर उभारण्यात आले असावे.

किल्ल्यावर प्रशस्त मोकळ्या आवारात हे मंदिर वसलेले आहे. आवारात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. मंदिरासमोर पत्र्याचा मोठा मंडप (शेड) आहे व त्यासमोर दोन मोठ्या दगडी दीपमाळा आहेत. या समोर कमी उंचीचा दगडी ओटा आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथे डाव्या बाजूस ब्रह्मेश्वराचे स्थान आहे. मध्ये भिंत आहे व लगतच अंबाबाईचे स्थान आहे.

मंदिराचा सभामंडप समोरून अर्धखुल्या पद्धतीचा आहे. खालच्या बाजूस चौकोनाकार, त्यावर षट्कोनी, त्यावर गोलाकार चकती आणि पुन्हा वर चौकोनी अशा स्वरूपाच्या दोन-दोन दगडी स्तंभांच्या मध्ये या मंदिराच्या सभामंडपांची प्रवेशद्वारे आहेत. आत भिंतीपासून काही अंतरावर अशाच स्वरूपाच्या चार-चार स्तंभांची रांग आहे. या सर्व खांबांना सोनेरी रंग दिलेला आहे.

अंबाबाई देवी मंदिराच्या गर्भगृहात उंच वज्रपीठावर देवीची दोन ते अडीच फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. देवीच्या हातात म्हाळुंग, गजा, ढाल व पानपत्र आहे. माथ्यावर पंचमुखी नागाने फणा धरलेला आहे. शेजारील ब्रह्मेश्वराच्या सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात भूतलावर शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. येथे शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी असंख्य भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात.

कृष्णेश्वर महादेव मंदिर

पन्हाळगडावरील अंबरखाना ही एक अत्यंत महत्त्वाची वास्तू. येथेच गंगा, जमुना, सरस्वती ही तीन धान्यकोठारे आहेत. या कोठारांपासून काही अंतरावर कृष्णेश्वर लिंग महादेवाचे मंदिर आहे. हे पन्हाळगडावरील साध्या दगडी बांधणीचे; परंतु आध्यात्मिकतेबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे मंदिर मानले जाते. दोन्ही बाजूंनी उतरते छत, कमानदार प्रवेशद्वार असलेली छोटी ओवरी आणि प्रशस्त गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिरासमोर छोटे प्रांगण आहे व त्याच्या दोन्ही बाजूंस भिंतींनी आडोसा केलेला आहे.

या मंदिराच्या गर्भगृहाचे छत आतून अर्धवर्तुळाकार आहे. आत काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या संगमरवरी फरशांवर कृष्णेश्वराची उंच पिंडी आहे. पिंडीवरील लिंगावर पितळी नागफण्याचे छत्र आहे. या लिंगासाठी वापरण्यात आलेला पाषाण एका विशिष्ट प्रकारचा आहे. तापमानामध्ये ज्या प्रमाणे बदल होतो, त्याप्रमाणे या लिंगाचा रंग बदलतो. त्यामुळे ‘रंग बदलणारी पिंडी’ अशीही त्याची ओळख आहे.

पिंडीसमोर नंदीची जुनी पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीलगत उंच पीठावर राधा-कृष्णाची छोटी संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. या भिंतीवर निळ्या रंगात शंकराचे तांडवमुद्रेतील चित्र रंगवण्यात आले आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथेच शिवछत्रपती आणि शंभूराजे यांची ‘ती ऐतिहासिक’ भेट झाली होती. ती तिथी पौष वद्य सप्तमी होती. वार मंगळवार, ता. १३ जानेवारी १६८०. शिवाजी महाराजांचे हेर आणि मुत्सद्दी यांनी संभाजी राजांना विजापूरच्या अथणी येथील दिलेरखानाच्या छावणीतून युक्तीने बाहेर काढले. तेथून ते २१ डिसेंबर १६७९ रोजी विजापूरमार्गे पन्हाळ्यास पोचले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पट्टागडावर होते. तेथून ते २५ दिवसांनी पन्हाळगडावर आले. १३ जानेवारी रोजी ते शंभूराजांना भेटले. तब्बल तीन वर्षांनी त्यांची भेट होत होती. ती याच कृष्णेश्वर महादेव मंदिरात झाली, असे सांगण्यात येते.

या मंदिरानजीक असलेल्या अंबरखान्यानजीक एका खोलगट जागी गंगू तेलणीची शिळा आहे. याबाबत अशी आख्यायिका आहे की अंबरखान्याचे बांधकाम सुरू करतेवेळी वास्तुदेवतेची शांती करावी, याकरीता तेथे नरबळी द्यावा, असा सल्ला कोणी तरी भोजराजास दिला. तेव्हा राजाने पंचक्रोशीत दवंडी पिटली की जो कोणी येथे स्वखुशीने बळी जाईल त्याच्या वारसांना जमीन-जायदाद, संपत्ती देण्यात येईल. ही बातमी गंगू तेलीण हिच्या कानी गेली. तिचे घर अतिशय दरिद्री होते. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी ती स्वतःचे प्राण देण्यास तयार झाली. त्यानुसार तिचा विधीपूर्वक बळी देण्यात आला. अंबरखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोजराजाने त्या स्त्रीची स्मृती म्हणून तेथे तिचे स्मारक बांधले. आता तेथे केवळ अर्धवट तुटलेली एक शिळा आहे व त्यावर नरबळीचा तो प्रसंग कोरलेला आहे.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून २२ किमी अंतरावर
  • कोल्हापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट पन्हाळगडावर येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home