दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले करवीर शहर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. याच शक्तिस्थानापासून दहा किलोमीटरवर राधानगरी रस्त्यावर नंदवाळ गाव आहे. नंदवाळ या गावचे पूर्वीचे नाव नंदग्राम होते, त्यानंतरच्या काळात ते नंदापूर झाले. प्राचीन इतिहास असलेल्या या गावातील हे मंदिर विठ्ठलाचे निजस्थान असल्याचे मानण्यात येते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की विठ्ठल रात्री येथे मुक्काम करतात व सकाळी पंढरपूरला जातात. या मंदिरास प्रतिपंढरपूर असे म्हणतात.
पंडित, कवी आणि ज्योतिषी म्हणून विख्यात असलेल्या कोल्हापूरच्या जोशीराव घराण्यातील दाजीबा जोशीराव यांनी पेशवाईच्या अखेरानंतर इ.स. १८२१ ते १८३७ या कालखंडात मराठीमध्ये ‘करवीर माहात्म्य’ हा ग्रंथ रचला. या ग्रंथात नंदवाळ या तीर्थक्षेत्राची माहिती दिली आहे. येथील रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यासह असलेल्या विठ्ठलाचे दर्शन अगस्ती ऋषींनी घेतले असा उल्लेख त्यात आहे. एवढेच नव्हे, तर श्रीकृष्णाच्या अनेक बाललीला याच गावात घडल्याचे या ग्रंथात म्हटले आहे. या ग्रंथानुसार नंदवाळ म्हणजे नंदग्राम अर्थात नंदाचे गाव होते. तसेच येथून जवळच असलेले वाशी हे गाव म्हणजे वसुदेवांचे वसुदेवग्राम होते, तर कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव या गावात कृष्णाने यमुना
नदीचा प्रवाह आणला होता. येथील यमुनेच्या तीरावर कृष्णाने अनेक बाललीलांचे दर्शन घडवून आणले. नंदवाळ हे नंदाची राजधानी असल्याने येथेही कृष्णाचे वास्तव्य झाले होते व या गावात अनेक कृष्णलीला घडल्या, असे या ग्रंथाच्या हवाल्याने काही अभ्यासक सांगतात.
या मंदिराविषयी आख्यायिका अशी की पंढरपूरला विठ्ठलाचे वास्तव्य असण्याच्या चार युगे आधी विठ्ठलाचे वास्तव्य नंदवाळ येथे होते. विठ्ठल आणि पंढरपूर याविषयीची तीन स्थलपुराणे उपलब्ध आहेत. ती अशी- स्कांद पांडुरंग माहात्म्य, पद्म पुराणांतर्गत येणारे पांडुरंग माहात्म्य आणि विष्णु पुराणांतर्गत येणारे पांडुरंग माहात्म्य. विठ्ठल अभ्यासक व थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मते, स्कांद पांडुरंग माहात्म्य हे हेमाद्री पंडिताच्या काळापूर्वी रचण्यात आले आले व पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसंभार प्रथमतः त्याच ग्रंथामुळे दृढ पायावर स्थिर झाला. या ग्रंथांमध्ये नंदवाळचा उल्लेख नसला, तरी येथील स्थलमाहात्म्यानुसार नंदवाळ हे विठ्ठलाचे विश्रामस्थान आहे. पंढरपुरात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या स्वरूपात नंदवाळमध्ये आजही पाहायला मिळतात. चंद्रभागा नदीप्रमाणे नंदवाळमध्ये भीमा नदी आहे. भीमा नदीजवळ एक स्वयंभू पिंडी आहे, त्याच्याशेजारी तलाव आहे. पिंडीला कान लावताच पाण्याचे आवाज ऐकू येऊ लागतात. विठ्ठलाच्या समोरच गावाच्या मध्यभागी पुंडलिकाचे मंदिर आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर प्राचीन आहे व पंढरपूरप्रमाणेच येथेही गायमुख आहे. पंढरपुरात आहे अगदी त्याचप्रमाणे गोपाल-कृष्ण मंदिर आणि गदा-चक्रधर स्वामींची मूर्ती विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आहे. मंदिराच्या आवारात एक जुन्या काळचे सुंदर तुळशी वृंदावन आहे. या तुळशी वृंदावनाच्या मधल्या भागात कासवाचे शिल्प आहे.
मंदिराच्या आवारात प्रवेश करताच एका बाजूस काही प्राचीन शिळा मांडून ठेवलेल्या दिसतात. त्यात एक वीरगळ आहे. त्याचे खालील दोनच स्तर शिल्लक आहेत. त्यात खालच्या स्तरात युद्धप्रसंग व त्यावर वीरयोद्ध्यास घेऊन चाललेल्या देवांगना असे शिल्पांकन आहे. त्या बाजूस उभा गोल लिंगस्वरूप पाषाण आहे. येथे एका शिळेवर गणेशाचे उत्थानशिल्प कोरलेले आहे. याच ठिकाणी विष्णूची प्राचीन मूर्ती आहे. त्याच्या बाजूला एक देवांगनेचे मोठे शिल्पही आहे. या सर्व मूर्ती झिजलेल्या व भग्नावस्थेतील आहेत.
येथून पुढे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सिमेंट-काँक्रिटने बांधण्यात आलेला एक प्रशस्त सभामंडप आहे. हा नंतरच्या काळात बांधण्यात आला आहे. मोठे उंच सिमेंटचे खांब व त्याच्या आजूबाजूला भाविकांना बसण्यासाठी भरपूर जागा आहे. सभामंडपाच्या भिंतीवर कृष्ण, विष्णू यांची सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. येथून आत जाताना एका काळ्या दगडी शिळेमध्ये कोरलेली केशवाची मूर्ती दिसते. वरच्या बाजूला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गजानन महाराज यांची चित्रे लावण्यात आली आहेत. सभामंडपातून आत जाताच बाह्यमंडपाचे प्रवेशद्वार लागते. काळ्या दगडी पाषाणात घडविलेली द्वारचौकट, मंडारकावरील अर्धचंद्रशिळा यातून जुन्या स्थापत्यशैलीचे दर्शन होते. प्रवेशद्वारावर ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे. आत नक्षीकाम केलेले मोठे दगडी खांब आहेत. मंदिराच्या गर्भगृहात विठ्ठल, रुक्मिणी आणि राही यांच्या काळ्या पाषाणात घडविलेल्या सुबक मूर्ती आहेत. राहीच्या पायानजीक गणेशाची सुंदर मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मागील बाजूस सोनेरी पत्र्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. वर छताच्या बाजूला गोलाकार फुलांची नक्षी कोरण्यात आलेली आहे.
येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात वेगवेगळ्या गावांतून येणाऱ्या दिंड्या सहभागी होतात. त्या प्रथम महालक्ष्मीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून नंदवाळ्च्या विठ्ठल मंदिराकडे येतात. दुपारी १२ ते १ या कालावधीत पुईखडी या ठिकाणी मोठा रिंगण सोहळा पार पडतो. भाविकांसाठी खिचडी, भुईमुगाच्या शेंगा, राजगिऱ्याचा लाडू, केळी असे फराळ प्रसाद म्हणून सेवेकरी देत असतात. भगव्या पताका, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा अखंड गजर चालू असतो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीप्रमाणेच दर महिन्याच्या एकादशीला भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात.