चिद्‌घनस्वामी देवस्थान

कवाड, ता. भिवंडी, जि. ठाणे

समाज सन्मार्गाला लागावा, या उद्देशाने भाविकांना उपदेशाद्वारे अध्यात्माकडे वळवणारे समर्थ रामदास संप्रदायातील श्री चिद्‌घनस्वामी सखाराम महाराज यांचे समाधी मंदिर भिवंडी तालुक्यातील कवाड गावात आहे. सुमारे दीडशे वर्षांपासून भाद्रपद वद्य सप्तमीला येथे होणारा चिद्‌घनस्वामी पुण्यतिथी सोहळा सज्जनगडावरील उत्सवपद्धतीनुसारच पार पडतो. गावातील घराघरांमध्ये भिक्षा मागून जमा होणाऱ्या शिध्यातून या ठिकाणी महाप्रसाद केला जातो. पंचक्रोशीतील त्यांचे हजारो अनुयायी यावेळी उपस्थित असतात. चिद्‌घनस्वामींच्या जयंतीनिमित्त येथे भरणाऱ्या यात्रेत होणाऱ्या कुस्ती स्पर्धेला १३० वर्षांची परंपरा आहे.

इ.स. १८०१ मध्ये ज्येष्ठ शुद्ध अष्टमीच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळनजीक करंबोवणे येथे दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या चिद्‌घनस्वामींचे मूळ नाव सखाराम हरिपंत केतकर असे होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना संस्कृत भाषा, मोडी लिपी, हिशेब आदींसह सर्व धार्मिक ग्रंथांचेही शिक्षण दिले होते. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असलेल्या चिद्घनस्वामींनी बालवयातच ‘विवेकसिंधु’ सारख्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. पालकांच्या आग्रहाखातर त्यांनी मनाविरुद्ध लग्न केले, पण अल्पावधीतच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. आध्यात्मिक साधना हेच आपले जीवन असा निश्चय केलेल्या चिद्घनस्वामींना तरुणपणीच योगसिद्धी प्राप्त झाली होती. एकदा वशिष्ठी नदीत वादळात अडकलेली नौका बाहेर काढल्यानंतर ते ‘सिद्धयोगी’ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. काही दिवसांनी गुरूंच्या शोधासाठी गाव सोडून ते तारापूर येथे आले. येथे आठलेशास्त्री यांनी त्यांना शिवषडाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. त्यानंतरही जप, ध्यान-धारणा, सूर्योपासना असा त्यांचा नित्यनेम सुरूच होता.

गुरुभेटीची आस त्यांच्या मनात कायम होती. अखेर १८१९ मध्ये माघ शुद्ध दशमीला त्यांना नाशिकचे रघुनाथभट्ट मोघे यांचा दृष्टान्त रूपाने अनुग्रह लाभला. आध्यात्मिक शिक्षणाच्या ओढीतून त्यांचे काही दिवस अलिबाग व पुणे येथे वास्तव्य होते. पुढे ब्रह्मविद्येच्या अभ्यासासाठी योग्य ठिकाण शोधत ते विद्वान अग्निहोत्री ब्राह्मणांच्या कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या कवाड येथे आले. उत्तरेस पेशवेकालीन श्रीराम मंदिर, दक्षिणेला झुळूझुळू वाहणारी कामवारी नदी, पूर्वेला सुंदर तळे, पश्चिमेला अरण्य अशी निसर्गरम्य भौगोलिक रचना असलेल्या कवाड या गावाची त्यांनी ब्रह्मविद्येच्या अभ्यासासाठी निवड केली. गावातील गदाधरभट दाजी घारगुंडे यांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्या घरातील पडवीनजीकच्या खोलीत ४४ वर्षे वास्तव्य केले. या खोलीतच ते ज्ञानसाधना व ब्रह्मविद्येचे चिंतन करत असत. कवाड येथे आले तेव्हा ते २३ वर्षांचे होते, मात्र आध्यात्मिक अधिकार मोठा असल्याने सर्व जण त्यांना ‘सखारामबुवा’ असे संबोधत असत. दररोज पाच घरांमध्ये माधुकरी मागून ते आपला उदरनिर्वाह करीत असत. येथे त्यांनी तब्बल दोन तप (२४ वर्षे) तपश्चर्या केली. त्यांचे ज्ञान, व्यासंग, सिद्धावस्थेची कीर्ती कानावर पडल्याने पंचक्रोशीतील शेकडो लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत. या काळात त्यांचा शिष्यपरिवारही वाढीस लागला. धार संस्थानधिपती तिसरे आनंदराजे पवार यांनी इ.स. १८५२ मध्ये चिद्‌घनस्वामींकडून गुरुमंत्र व उपदेश घेतला होता. चिद्‌घनस्वामींच्या शिष्यांमध्ये बडोदा संस्थानाचे दिवाण गणेशपंत ओझे व पत्नी गंगाबाई यांचाही समावेश होता. ते येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येत असत. बडोदा संस्थानाचे महाराजा खंडेराव गायकवाड व गणेशपंत वोझे हे गंगाबाईंसह इ.स. १८६४मध्ये चिद्‌घनस्वामींच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी गुरुसेवा म्हणून काय करावे असे विचारले असता, स्वामींनी त्यांना तलावाचा गाळ काढून स्वच्छ करण्यास व त्यावर घाट बांधण्यास, विहीर व श्रीराम मंदिराचा अग्नीने दग्ध झालेला मंडप बांधण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी तसे केले. ही बाब नमूद केलेला शिलालेख आजही तळ्याजवळ पाहायला मिळतो. या तळ्याभोवती पूर्वी तटबंदी होती. कालौघात ती कोसळली. मात्र तिचे अवशेष येथे पाहायला मिळतात.

इ.स. १८६७ मध्ये भाद्रपद वद्य षष्ठीला वयाच्या ६७ व्या वर्षी शिष्यांसमोर स्वस्तिकासन घालून चिद्‌घनस्वामींनी जिवंत समाधी घेतली. निर्याणापूर्वी काही काळ आधी त्यांनी चतुर्थाश्रमाचा स्वीकार करून सिद्‌धन असे नाव घेतले होते. त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी येथे समाधी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांचे शिष्य रामकृष्णबुवा माटे यांनी पुढाकार घेतला. मंदिराच्या उभारणीसाठी ते गावोगावी कीर्तन करत तसेच भिक्षा मागत. त्यांनी तसेच चिद्‌घनस्वामींच्या अन्य शिष्यांनी मागितलेल्या भिक्षेतून मिळालेल्या द्रव्यातून हे मंदिर उभारण्यात आले. माटे यांच्या पुढाकाराने कालांतराने मंदिराजवळ धर्मशाळा बांधण्यात आली. पुढे माटे यांनी अलिबाग जवळील नागावजवळच्या घाटाळे येथे १८७९ मध्ये माघ वद्य नवमीच्या दिवशी समाधी घेतली. तेथेही कवाडप्रमाणेच माघ वद्य पंचमीपासून नवमीपर्यंत उत्सव होतो.

भिवंडी – वाडा मार्गावरील कवाड या गावात चिद्‌घनस्वामी सखाराम महाराज देवस्थान आहे. मंदिराच्या परिसरात अनेक झाडे आहेत. दुमजली वाड्यासारखे बांधकाम असलेल्या या मंदिराच्या दर्शनी भागावर लोखंडी जाळ्या आहेत. वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी जिना आहे. येथे नगारखाना आहे. जुन्या पद्धतीच्या ओटी-पडवीच्या वाड्यासारखी रचना असलेल्या मंदिराचे बांधकाम दगड आणि लाकडाच्या साह्याने करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करताच घारगुंडे यांची समाधी दिसते. मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर आकर्षक नक्षीकाम आहे व खालच्या भागात दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळच एका चौथऱ्यावरील देवळीत गरुडमारुतीची मूर्ती आहे. सभामंडपात दोन्ही बाजूंस कठडे घातलेले आहेत. त्या पलीकडे महिला भाविकांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथे जुन्या पद्धतीचे एक लाकडी आसनही आहेत. उजव्या बाजूला विष्णुबुवा जोगळेकर महाराजांची समाधी आहे. सभामंडपांत अनेक संतांच्या प्रतिमा आहेत. येथील दगडी पायऱ्या चढून गेल्यावर लागणाऱ्या पडवीत जुना नगारा ठेवण्यात आला आहे. डाव्या बाजूला चिद्घनस्वामींचे ४४ वर्षे वास्तव्य असलेली खोली आहे. या खोलीत त्यांची प्रतिमा, पादुका, कुबडी व ते ज्यावर बसून साधना करत तो लाकडी पाट आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या खालच्या भागात कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला माटे यांची प्रतिमा आहे. गर्भगृहात प्रवेश केल्यावर चिद्‌घनस्वामींची समाधीचे दर्शन होते. समाधीच्या मागील बाजूला असलेल्या चौथऱ्यावर लक्ष्मीकेशवाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या मागील बाजूस गोमुख कोरण्यात आलेले आहे. मंदिराजवळच पाकशाळा, पंचांची कचेरी, धर्मशाळा तसेच चिद्घनस्वामींनी लावलेले पुरातन आम्रवृक्ष आहेत.

या मंदिरात भाद्रपद वद्य पंचमी ते सप्तमी या काळात चिद्‌घनस्वामींचा पुण्यतिथी सोहळा, तर मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव होतो. दुसऱ्या दिवशी, प्रतिपदेला पालखी सोहळा होतो. सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावरील उत्सवांप्रमाणेच येथे उत्सव साजरे केले जातात. श्रीरामाचा जयजयकार करत उत्सवाच्या सांप्रदायिक कार्यक्रमांना सुरुवात होते. उत्सवांच्या दिवशी टाळ-मृदुंगाच्या साथीने काकड आरती होते. त्यानंतर भाविक चांदीच्या काठ्या हातात घेऊन ‘राजाधिराज रघुराज गुरुनाथ महाराज की जय’ असा जयजयकार करतात. नंतर महानद्यांच्या स्मरणाने समर्थ संप्रदायातील चिद्घनस्वामी सखाराम महाराज, रामकृष्ण माटे यांच्या भूपाळ्या, ठराविक अभंग व पदे म्हटली जातात. त्यानंतर नित्यपूजा व अभिषेक झाल्यावर मंदिराचे पदाधिकारी व भाविक झोळी व कुबडी घेऊन भिक्षा मागण्यासाठी गावातील घरोघरी जातात. ‘मनाचे श्लोक’ म्हणत द्रव्य व धान्य रूपाने ही भिक्षा मागितली जाते. भिक्षा घेऊन मंदिरात परत आल्यावर आरती म्हणत भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालतात. पूर्वी या कार्यक्रमानंतर पुराण सांगितले जात असे.

चिद्‌घनस्वामींच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गावोगावच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित केले जाते. या दिवशी १६ ब्राह्मणांना पंगतीत बसवले जाते. त्यानंतर त्यांचे पादप्रक्षालन केले जाते. त्यांच्या पायाचे तीर्थ मंगलकलशात भरले जाते. तो कलश डोक्यावर ठेवून त्यातील पाण्याने शरीर भिजेपर्यंत मंदिराचा एक पदाधिकारी नारायणसूक्त व उपनिषदांच्या मंत्रगजरात नृत्य करतो. यानंतर नऊवारी नेसलेल्या सुवासिनी १६ ब्राह्मणांना श्राद्धभोजन देतात. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. त्यात ‘थप्पड’ हा विशिष्ट पदार्थ, भात, चटणी, प्रसादाचा शिऱ्याचा समावेश असतो. सायंकाळी मनाचे श्लोक, करुणाष्टके, चिद्घनस्वामींच्या जीवनावरील मराठी अष्टके म्हटली जातात.

ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला चिद्घनस्वामींच्या जयंतीनिमित्त भरणाऱ्या यात्रेदरम्यान गावात कुस्ती स्पर्धा होते. १२५ वर्षांची परंपरा असलेल्या या स्पर्धेत ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा आदी भागांतील नामवंत मल्ल सहभागी होतात. महिला कुस्तीगीरही या स्पर्धेदरम्यान आपल्या कर्तबगारीचे दर्शन घडवतात. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम तसेच बक्षिसे देण्यात येतात.

उपयुक्त माहिती

  • भिवंडीपासून १० किमी, तर ठाणे शहरापासून २५ किमी अंतरावर
  • भिवंडी, वाडा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home