स्वामी नित्यानंद मंदिर

गणेशपुरी, ता. भिवंडी, जि. ठाणे

मुंबई-ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यात गणेशपुरी येथे निसर्गाच्या कुशीत वसलेले नित्यानंद समाधी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून पवित्र भूमी अशी ओळख असलेल्या गणेशपुरी येथे नजीकच असलेल्या वज्रेश्वरी मंदिराच्या परिसराप्रमाणेच गरम पाण्याचे कुंड आहेत. या कुंडांमध्ये स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक या कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी तसेच स्वामींच्या दर्शनासाठी येथे येतात.

गणेशपुरी हे प्राचीन काळापासून एक पवित्र क्षेत्र मानले जात होते. या परिसरात असलेल्या मंदाग्नी किंवा मंदाकिनी पर्वतावर अनेक ऋषी-मुनींनी तपश्चर्या केल्याचे पौराणिक उल्लेख आहेत. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की इक्ष्वाकु वंशाच्या राजांचे, तसेच श्रीरामांचे गुरू असलेल्या वसिष्ठ ऋषी यांनी येथे यज्ञ केला होता. वसिष्ठ ऋषींनी वर्ध्यानजीकच्या केळझर येथे ज्या प्रमाणे वरदविनायकाची स्थापना केली होती, त्याच प्रमाणे त्यांनी येथेही गणेशाच्या मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरामुळे या भागास गणेशपुरी हे नाव प्राप्त झाले. या अशा पवित्र क्षेत्रात येऊन नित्यानंद स्वामी यांनी तपाचरण केले व धार्मिक तसेच सामाजिक कार्य केले.

नित्यानंद स्वामींबाबत असे सांगितले जाते की केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील तुनेही गावातील चतुनायर आणि उन्नी अम्मा या गरीब दाम्पत्याला एकदा धो धो कोसळणाऱ्या पावसात एक बाळ दिसले. फणाधारी नाग त्या बाळाचे पावसापासून रक्षण करत होता. चतुनायर हे गावातील ईश्वर अय्यर नावाच्या व्यक्तीकडे मजूर म्हणून काम करीत असत. त्यांनी त्या बाळाला अय्यर यांच्याकडे आणले. अय्यर यांनी त्या बाळाचे नाव ‘रमण’ असे ठेवले व त्याचे पालनपोषण केले. ग्रामस्थ त्या मुलाला ‘राम’ असे म्हणत. या रामाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खरे होत असत. त्यामुळे तो साधारण बालक नाही, हे ग्रामस्थांनी ओळखले होते. वेद आणि धर्मशास्त्राचे धडे न गिरवताही तो त्यातील माहिती ग्रामस्थांना देत असे.

एकदा त्या बालकाने एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवला असता ती व्यक्ती तात्काळ बरी झाली. तेव्हापासून अनेक रुग्ण त्याच्याकडे येऊ लागले. आपला मृत्यू समीप येत असल्याची जाणीव ईश्वर अय्यर यांना येऊ लागली होती. त्यावेळी त्यांच्या विनंतीनुसार त्या बालकाने अय्यर यांना सूर्याचे दर्शन घडवले. त्यानंतर ‘तुला दैवी शक्ती प्राप्त आहे. तू सर्वांना नेहमीच आनंद देतोस. त्यामुळे तुला लोक नित्यानंद या नावाने ओळखतील’, असे अय्यर त्याला म्हणाले. तेव्हापासून या बालकाला ‘नित्यानंद’ नावाने ओळखले जाऊ लागले. स्वामी नित्यानंद यांनी नंतर काही वर्षे तपस्या केली. तारुण्यावस्थेत असताना त्यांनी हिमालय, वाराणसी, रामेश्वरम, उडिपी, मंगळुरु आदी ठिकाणी प्रवास केला. जेथे जात तेथे आपल्या दैवी शक्तीने ते लोकांच्या दुःखाचे हरण करत. काही वर्षे दक्षिण कर्नाटकमधील कान्हनगड नजीकच्या गुरुवन येथे त्यांचे वास्तव्य होते. गुरुवन येथे त्यांनी अनेक वृक्ष लावले. तेथील गुहेत ते ध्यान करत. या परिसरात त्यांनी पाण्याचा एक झरा निर्माण केला. ‘पापनाशिनी गंगा’ म्हणून ओळखला जाणारा हा झरा आजही वाहत असतो.

देशभर भ्रमंती केल्यानंतर ते १९३७ मध्ये मुंबई नजीकच्या तानसा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या अकलोली आणि वज्रेश्वरी परिसरात आले. येथेही त्यांनी शाळा, दवाखाने सुरू केले व परिसरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. ध्यानधारणेसोबतच त्यांनी येथेही लोकांना उपदेश देण्याचे कार्य सुरू ठेवले. काही काळानंतर त्यांचे गणेशपुरी येथे आगमन झाले. येथील प्राचीन भीमेश्वर महादेवाच्या मंदिरात त्यांचे वास्तव्य असे. भल्या पहाटे उठून ते नजीकच्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान केल्यानंतर नदीजवळील भीमेश्वर मंदिरानजीक ध्यान करत असत. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरल्याने येथेही त्यांच्या दर्शनासाठी भाविक येऊ लागले. भाविकांची संख्या वाढल्याने काही वर्षांनी ते नजीकच्या कैलास निवासमध्ये वास्तव्यास गेले. येथील आदिवासीबहुल भागात त्यांनी रस्ते व शाळा बांधल्या. अन्नछत्रही सुरू केली. परिसरातील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या स्वामींनी ग्रामस्थांना जंगलातील औषधी वनस्पतींपासून औषध बनवण्याचे प्रशिक्षणही दिले. त्यांनी गणेशपुरी परिसरात भद्रकाली देवीचे मंदिर बांधले, अनुष्ठान करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनसूया मंदिराचाही जीर्णोद्धार केला. समाधी घेण्यापूर्वी एका भक्ताने बांधून दिलेल्या ‘बेंगलूरवाला’ इमारतीत त्यांचे वास्तव्य होते. समाधी घेण्याच्या १२ दिवस आधी, गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून त्यांनी अन्न-पाणी सोडले. ८ ऑगस्ट १९६१ रोजी त्यांनी देहत्याग केला.

निसर्गरम्य परिसरात त्यांचे समाधी मंदिर आहे. मंदिराकडे येण्याच्या मार्गावर फुले-प्रसादाची अनेक दुकाने आहेत. समोरच समाधी मंदिराची वास्तू व त्यावरील आकर्षक शिखरे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या मागील बाजूस कृष्णाचे मंदिर आहे. समाधी मंदिराला लागूनच भीमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ देवळ्यांमध्ये डावीकडे दत्त व उजवीकडे हनुमानाची मूर्ती आहे. आत आल्यावर समोर नंदीची पांढऱ्या रंगाची आकर्षक मूर्ती असून त्याशेजारीच सिंहाची छोटी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ डावीकडे गणेशाची, तर उजवीकडे विष्णूची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर आकर्षक कलाकुसर व ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. दोन-तीन पायऱ्या उतरून गर्भगृहात यावे लागले. गर्भगृहातील शिवपिंडीवर नागाने छत्र धरलेले आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूच्या भिंतीवर पार्वतीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या वरच्या बाजूस शंकराची प्रतिमा आहे. त्याजवळच स्वामी नित्यानंद यांची प्रतिमा आहे. पार्वतीमातेच्या मूर्तीच्या उजवीकडील कोपऱ्यात शिवशंकरांची चांदीची मूर्ती आहे.

या परिसरातील वज्रेश्वरी, अकलोली, दातीवली अशा पाच किलोमीटरच्या परिघातील गावांत गरम पाण्याची सुमारे २१ कुंडे आहेत. यातील तीन कुंडे या मंदिरापासून जवळच आहेत. ही तिन्ही कुंडे एकमेकांजवळ असूनही त्यातील पाण्याचे तापमान भिन्न असते. या कुंडातील पाणी उष्ण असल्याने त्यांना उन्हाळी असे म्हणतात. या गरम पाण्यामध्ये गंधक व अन्य खनिजे असतात. त्यातील औषधी गुणधर्मामुळे या कुंडांमध्ये स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, असे मानले जाते. दख्खनचे पठार हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाखो वर्षांपूर्वी तयार झाले. त्यामुळे या भागात काही ठिकाणी असे झरे आढळतात. भूगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कात आलेले पाणी तापते. काही ठिकाणी ते भूगर्भातून वर येते. येथील कुंडांमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पाण्यातून सतत वाफ येत असते. पहाटे तीन वाजल्यापासून रात्री १०.३० पर्यंत या कुंडांमध्ये भाविकांना स्नान करता येते. कुंडांजवळ छोटी दीपमाळ आहे.

मंदिर परिसरात भद्रकाली मंदिर, नवग्रह मंदिर, यज्ञमंडप व दानतुला आहे. या परिसरात अन्नपूर्णा प्रसादालयाची वास्तू आहे. येथे भाविकांना अल्पशा शुल्कात अल्पोपाहार व भोजन मिळते. जवळच असलेल्या सुंदर बागेजवळ एक रेल्वे कोच आहे. या कोचबाबत आख्यायिका अशी की एकदा स्वामी नित्यानंद रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्याकडे तिकीट नसल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कन्नूर रेल्वे स्थानकावर उतरवले. मात्र त्यानंतर रेल्वेचे इंजिन बंद पडले. त्यासाठी केलेले अनेक प्रयत्न फोल ठरले. त्यावेळी आपण ज्यांना रेल्वेतून खाली उतरण्यास सांगितले ती सामान्य व्यक्ती नाही, याची जाणीव रेल्वे अधिकाऱ्यांना झाली. स्वामींना त्यांनी सन्मानपूर्वक कोचमध्ये बसविल्यानंतर रेल्वे सुरू झाली. गणेशपुरी येथील सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय रेल्वेकडून हा कोच मिळवून तो भीमेश्वर सद्गुरु नित्यानंद संस्थेला भेट दिला.

मंदिर परिसरात असलेल्या कैलास निवासात स्वामींचा अर्धपुतळा आणि त्यांच्या काही प्रतिमा आहेत. येथे ज्या बाथटबमध्ये स्वामी स्नान करत तो टबही आहे. नित्यानंद स्वामींच्या समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गजराजांची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या डावीकडे सरस्वती तर उजवीकडे लक्ष्मी देवीची मूर्ती आहे. मंदिरात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. मंदिराच्या घुमटावर एका भक्ताने दान केलेला चांदीचा झेंडा लावण्यात आला आहे. सागवानी लाकडापासून बनवलेल्या मंदिराच्या दरवाजांवर आकर्षक कोरीव काम आहे. मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे. गर्भगृहात स्वामी नित्यानंद यांची बसलेल्या मुद्रेतील आकर्षक मूर्ती आहे. एका पायाच्या ढोपरावर हात ठेवून बसलेल्या नित्यानंद स्वामीच्या मूर्तीवर सोन्याचा मुकुट आहे. त्यावर छत्र व मागच्या बाजूस आकर्षक प्रभावळ आहे.

या मंदिरात नित्यपूजा होते. भाविकांना प्रसाद म्हणून शिरा देण्यात येतो. येथे विविध पूजा, हवन आणि धार्मिक विधीही केले जातात. दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गुरुवारी भाविकांची संख्या अधिक असते. गुरुपौर्णिमेला येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते. या काळात ठाणे व कल्याण आगारातून भाविकांना ये-जा करण्यासाठी विशेष एसटी बस सोडल्या जातात. याशिवाय महाशिवरात्री, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, दीपावली आदी उत्सव येथे साजरे होतात.

उपयुक्त माहिती

  • भिवंडी येथून ३१ किमी, तर ठाणे शहरापासून ५५ किमी अंतरावर
  • ठाणे, कल्याण, भिवंडी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७७७००१५७१५ / १७
Back To Home