कालिका देवी मंदिर

हडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

कोकणाला आखूड नद्या आणि दिलखुलास समुद्र लाभले आहेत. येथील नद्यांनी सागरात सामावण्याआधी त्याचा खारेपणा आपल्या पात्रांत सामावून घेतला. त्यामुळे समुद्राजवळ नद्यांच्या खाड्या झाल्या. शिवकाळात अशा नद्यांच्या मुखावर जहाज बांधणी कारखाने सुरू झाले, तर काही बंदरे विकसित झाली. अशाच खाडी व नद्यांच्या मुखावर तेथील देवालये विकसित झाली. असेच एक कालिकामातेचे प्राचीन व स्वयंभू देवस्थान मालवण तालुक्यातील गड नदीच्या किनाऱ्यावरील हडी गावात आहे. नवसाला पावणारी देवी अशी मान्यता असल्याने हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान बनले आहे.

हे मंदिर किती प्राचीन आहे याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही; परंतु ते शेकडो वर्षांपूर्वीचे असावे, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. या देवीची आख्यायिका अशी की गावातील एक शेतकरी शेतात नांगर हाकीत असताना नांगराचा फाळ मातीखाली असलेल्या खडकाला लागल्याने त्यातून रक्त वाहू लागले. ते पाहून शेतकरी घाबरला. परंतु त्याच वेळी खडकातून आवाज येऊ लागला, ‘घाबरू नकोस. मी कालिका देवी आहे. या खडकात माझा वास आहे. येथे माझे मंदिर बांधावे.’ देवीच्या आदेशानुसार शेतकऱ्याने ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी लहानसे मंदिर बांधले. पुढे देवीच्या शक्तीची प्रचिती येत गेली तशी येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली व मंदिराचे स्वरूपही प्रशस्त झाले.

‘श्रीदेवी भागवता’च्या पाचव्या स्कंधामध्ये २२ व्या व २३ व्या अध्यायात कालिका मातेच्या उत्पत्तीची कहाणी देण्यात आली आहे. ती आख्यायिका अशी की शुम्भ व निशुम्भ या दोन दानवांनी संपूर्ण जगास त्राही माम् करून सोडले होते. सर्व देवांना त्यांनी पराभूत केले होते. तेव्हा सर्व देव देवगुरू बृहस्पतीकडे गेले. बृहस्पतीने त्यांना देवी भगवतीची प्रार्थना करण्यास सांगितले. त्यांनी देवीची करुणा भाकली. देवी भागवतात असे म्हटले आहे की ‘एवं स्तुता सुरैः सर्वैरम्बिका करुणान्विता। प्रादुर्बभूव तरसा रूपयौवनसंयुता।। दिव्याम्बरधरा देवी दिव्यभूषणभूषिका । दिव्यमाल्यसमायुक्ता दिव्यचन्दनचर्चिता ।।’ याचा अर्थ असा की समस्त देवतांनी केलेली स्तुती ऐकून करुणेने ओतप्रोत भरलेली अंबिका प्रकट झाली. त्यावेळी देवी भगवती रूपात तसेच तारुण्याने संपन्न होती. तिने दिव्य वस्त्र धारण केले होते व अलौकिक आभूषणांनी ती अलंकृत होती. तिने दिव्य माला परिधान केल्या होत्या व दिव्य चंदन लावलेले होते. ती ‘विश्वमोहनमोहिनी’ या रूपात होती. तिला देवांनी आपल्यावर कोसळलेल्या संकटाची माहिती दिल्यानंतर देवीने आपल्या शरीरातून दुसरे रूप प्रकट केले. देवी भागवतात म्हटले आहे की ‘एवं स्तुता तदा देवी दैवतैः शत्रुतापितैः । स्वशरीरात्परं रूपं प्रादुर्भूतं चकार ह ।। पार्वत्यास्तु शरीराद्वै निःसृता चांम्बिका यदा । कौशिकीति समस्तेषु ततो लोकेषु पठ्यते ।।’ म्हणजे देवीच्या शरीरातून अंबिका प्रकट झाली. ती कौशिकी या नावाने ओळखली जाऊ लागली; परंतु ‘निःसृतायां तु तस्यां सा पार्वती तनुव्यत्ययात् । कृष्णरुपाथ सञ्जाता कालिका सा प्रकीर्तिता ।।’ याचा अर्थ असा की देवीच्या शरीरातून अंबिका प्रकटल्यानंतर देवीचे म्हणजेच पार्वतीचे शरीर क्षीण झाले व ती कृष्णवर्णीय झाली. ती कालिका नावाने विख्यात झाली. या देवीलाच कालरात्री असे म्हणतात. तिचे दुसरे मनोहर रूप कौशिकी या नावाने ओळखले जाते. कालिका देवीच्या हडी येथील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कालिका देवी ही तिच्या पहिल्या रूपात विराजमान आहे.

वाहनतळाकडून मंदिराकडे जाताना सर्वप्रथम या मंदिराची स्वागत कमान लक्ष वेधून घेते. या कमानीच्या स्तंभांचा खालील निम्मा भाग चौकोनी व वरील भाग गोलाकार आहे. या स्तंभांवर सज्जा आहे व त्यावर कौलारू छत आहे. स्वागत कमानीला लागून मंदिराभोवती जांभ्या दगडांची सीमाभिंत आहे. मंदिरासमोर तीन पायऱ्या असलेल्या आयताकृती मोठ्या चौथऱ्यावर मध्यभागी तुळशी वृंदावन व वृंदावनाच्या दोन्ही बाजूस तीन असे सहा दीपस्तंभ आहेत.

उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. येथील सभामंडप हा अर्धखुल्या प्रकाराचा आहे. त्यात बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थानिक देवतेचे पाषाण आहेत. अंतराळाचे लाकडी प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आहे. येथील द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे व ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती आहे. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे. त्यात एका बाजूला पाच तरंगकाठ्या व दुसऱ्या बाजूला उत्सव काळात वापरली जाणारी लाकडी पालखी आहे. अंतराळात भिंतीलगत वज्रपीठावर गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहात मध्यभागी कालिका देवीचे स्वयंभू पाषाण आहे. त्यामागे भिंतीलगत देवीची दशभूजा प्रतिमा आहे. देवीच्या हातात गदा, त्रिशूल, चक्र, खड्ग, धनुष्य, अग्निपात्र, मुंड व इतर आयुधे आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर बाराचे पुर्वस व इतर स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. या मंदिरावर दोन शिखरे आहेत. त्यापैकी अंतराळावरील शिखर चौकोनी व वर निमुळते होत गेलेले आहे. गर्भगृहावरील मुख्य शिखर अधिक उंच आहे व त्यावर विविध शिल्पे आहेत. शिखरावर आमलक व त्यावर कळस आहे.

कालिकामाता मंदिरात वर्षभरात विविध उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत येथे चैत्रोत्सव साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमा, ऋषी पंचमी, शारदीय नवरात्रोत्सव, देव दिवाळी, तुळशी विवाह तसेच त्रिपुरारी पौर्णिमा हे उत्सवही होतात. उत्सव काळात मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कालिका देवी मंदिराशिवाय हडी गावातील मार्गेश्वर, रवळनाथ व नागेश्वर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून ११ किमी, तर देवगडपासून ३७ किमी अंतरावर
  • मालवण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home