कोकणातील काही मोजक्या स्वयंभू व जागृत देवस्थानांपैकी देवगड तालुक्यातील दहिबाव येथील प्राचीन महादेश्वर मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान दहिबाव गावाचे ग्रामदैवत आहे. सुमारे ३०० ते ३५० वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिराची कोकणी स्थापत्यशैली व येथील लाकडी स्तंभांवरील सुंदर कलाकुसर हे वैशिष्ट्य आहे. असे सांगितले जाते की महादेव नावाच्या एका शिवभक्ताच्या नावावरून या देवस्थानाला महादेश्वर हे नाव पडले आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी या गावात महादेव नावाचा शिवभक्त शेतकरी होता. तो चालता, बोलता, उठता, बसता शंकराचे नामस्मरण करीत असे. एके दिवशी शंकराने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की मी या ठिकाणी पाषाण पिंडीत स्थित आहे. स्वप्नदृष्टांतानुसार त्याने पाषाण पिंडीचा शोध घेतला व त्यावर गवत ताटीचे मंदिर बांधले. तेथे तो तहान भूक हरपून शिवलिंगाची पूजा-अर्चा करीत असे. एकेदिवशी असाच पूजेत लीन असताना शिवलिंगाजवळच त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत गावात हे महादेवाचे (महादेव भक्ताचे) मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले होते. पुढे त्याच नावावरून हे देवस्थान ओळखले जाऊ लागले. या जागृत स्थानाची भाविकांना जशी प्रचिती येऊ लागली तशी येथे दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढू लागली. वेळोवेळी मंदिराचे जुने व साधे स्वरूप पालटत गेले व मंदिराला सध्याचे स्वरूप आले.
रस्त्यालगत असलेल्या या मंदिराच्या प्रांगणाभोवती दगडी सीमाभिंत आहे. या सीमाभिंतीत असलेल्या कमानीसदृश्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस तीन आणि उजव्या बाजूस एक असे चार दीपस्तंभ आहेत. या सर्व दीपस्तंभांच्या वर कळस आहे. दुमजली व कौलारू असलेल्या या मंदिराची संरचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. प्रशस्त सभामंडपात प्रत्येकी आठ स्तंभांच्या चार रांगा आहेत. दोन्ही बाह्य रांगांतील सर्व व मधल्या रांगांतील सहा दगडी स्तंभ चौकोनी आहेत. हा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. मधल्या रांगांतील पुढील दहा लाकडी स्तंभ खाली व वर चौकोनी आहेत. मधला भाग गोलाकर असून त्यावर खालच्या अर्ध्या भागावर कमळ फुलांची व वरच्या भागात उभ्या धारेचे नक्षीकाम आहे. सभामंडपातील स्तंभांच्या मध्यभागी असलेली जमीन कोकणी स्थापत्यशैलीनुसार काही इंच खोलगट आहे.
येथील अंतराळ हे सभामंडपापेक्षा काहीसे उंचावर असल्यामुळे सहा पायऱ्या चढून त्यात प्रवेश होतो. अंतराळाचे लाकडी प्रवेशद्वार कोरीव नक्षीकामाने सुशोभित आहे. द्वारशाखावर पाना-फुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेश प्रतिमा कोरलेली आहे, तर दोन्ही बाजूस पद्म, चक्र, शंख, गदाधारी चतुर्भुज जय-विजय हे द्वारपाल उभे आहेत.
अंतराळात प्रत्येकी चार चौकोनी व मोठ्या दगडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभांचा खालील व वरील भाग अधिक रुंद आहे. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. अंतराळात गर्भगृहासमोर एका कमी उंचीच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे व नंदीच्या डाव्या बाजूला चार तरंगदेवता आहेत. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीजवळ काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती आहे. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. या गर्भगृहाच्या मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. उत्सवाच्या वेळी त्यावर चांदीचा मुखवटा चढविला जातो. त्यामागे काही स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. अंतराळ व गर्भगृह बंदिस्त स्वरूपाचे आहेत. प्रकाश व हवा आत येण्यासाठी येथे अनेक गवाक्ष आहेत. कौलारू छतावर अंतराळ व गर्भगृह अशा दोन ठिकाणी शिखरे आहेत व त्यावर दोन आमलक व त्यावर कळस आहेत. कौलारू छतावर अशा प्रकारच्या शिखरांची रचना दुर्मिळ समजली जाते.
मंदिरात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, कार्तिक एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, महाशिवरात्री हे उत्सव साजरे केले जातात. त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात लघुरुद्र, महाअभिषेक, होम-हवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण, दशावतारी नाटक तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. वार्षिक उत्सवांच्या वेळी येथे हजारो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या परिसरात प्राचीन वाघोबा मंदिर, गोमुख गंगातीर्थ व वडदेश्वर मंदिर अशी काही तीर्थस्थाने आहेत.