कालिवलीची खाडी या नावाने ओळखली जाणारी गड नदी ही मालवण तालुक्यातील एक मोठी नदी. या नदीच्या किनारी वसलेल्या बांदिवडे या गावी पावणाई भगवतीचे भव्य आणि सुंदर शिल्पांकित असे मंदिर आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे हे देवीचे स्थान आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. या मंदिरात पावणाई आणि भगवती या दोन देवींचे अधिष्ठान आहे. या देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे येथे होणारा देवीचा गोंधळ. एखाद्या जत्रोत्सवाइतकाच मोठा असणारा हा कार्यक्रम येथे अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो.
या मंदिरात देवीची दोन स्थाने आहेत. त्याची आख्यायिका अशी की तुळजापूरची भवानी देवी आणि बांदिवडेची भगवती देवी या दोघी बहिणी होत. एकदा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी भवानी देवी बांदिवडे येथे आली. भगवती देवीने तिचे उत्तम आदरातिथ्य केले. तिला बसण्यासाठी आपले आसन दिले. या ठिकाणी भवानी देवी, भगवती देवीप्रमाणेच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करू लागली. तेव्हा लोकांनी तिला याच ठिकाणी वास्तव्य करून राहण्याचा आग्रह केला. भगवतीदेवीनेही तिला तशी विनंती केली. त्यास मान देऊन तुळजापूरची भवानी देवी येथे राहू लागली. ती पाहुणी होती. म्हणून तिला पाव्हणी आई म्हणजेच पाव्हणाई असे म्हणण्यात येऊ लागले. त्याचा अपभ्रंश होऊन येथील भवानी देवी पावणाई नावाने ओळखली जाऊ लागली व हे मंदिर पावणाई भगवती मंदिर म्हणून ख्यातकीर्त झाले.
पावणाई भगवती देवीचे हे मंदिर विस्तीर्ण परिसरात वसलेले आहे. या पुरातन मंदिराचे २००७ साली नूतनीकरण करण्यात आले. हे मंदिर शुभ्र पांढऱ्या रंगाचे भव्य व देखणे आहे. विशेष म्हणजे या मंदिराची स्थापत्यशैली कोकणातील अन्य मंदिरांसारखी नसून ती द्राविडी स्थापत्यशैलीच्या धर्तीवरील आहे. दोन पाखी उतरत्या छताचा, अर्धखुल्या पद्धतीचा लांबलचक व रुंद असा सभामंडप, गर्भगृह आणि त्यावर पुष्प व सिंह प्रतिमांनी मंडित भव्य शिखर अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या मोठ्या आवारास चहुबाजूंनी सीमाभिंत आहे. रस्त्यावरून चार पायऱ्या उतरून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या समोर एका उंच चौथऱ्यावर कोकणी पद्धतीचा सहा स्तरांचा दीपस्तंभ आहे. त्याच्याशेजारीच तुळशी वृंदावन आहे. उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी चार पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या कट्ट्यावर दोन्ही बाजूंना सिंहाच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या वामनभिंती म्हणजे बुटक्या भिंतीमधील स्तंभ वरच्या बाजूने महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या सर्व कमानींवर सुवर्णरंगातील व नक्षीकाम केलेली मकरतोरणे आहेत.
गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोठ्या देवकोष्ठांमध्ये स्त्रीद्वारपालांच्या सुंदर मूर्ती आहेत. या चतुर्भुज मूर्तींच्या हातांत गदा, पाश व डमरू आहे. गर्भगृहात उंच वज्रपीठावर देवी भगवती आणि पावणाईच्या पाषाणमूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पावणाईची मूर्ती श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजा भवानीच्या मूर्तीची प्रतिकृती आहे. भगवतीची मूर्ती अष्टभूजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. भगवतीची मूर्ती पावणाईच्या मूर्तीहून किंचित उंच पीठावर प्रतिष्ठापित आहे.
हे मंदिर असंख्य भाविकांना आकर्षित करून घेते ते येथील देवीच्या विविध स्वरूपातील शिल्पप्रतिमांमुळे. या मंदिराच्या सभामंडपाचा वरच्या भागामध्ये तयार केलेल्या देवकोष्ठकांमध्ये या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. यामध्ये देवीची पुढील रूपे दिसतात- वागेश्वरी, शिवशक्ती, मनोम्ननी, उरूथराशी, शांभवी, चामुंडी, इंद्रायणी, वराही, वैष्णवी, कौमारी, महेश्वरी, ब्राह्मी, अग्नीदुर्गा, विष्णू दुर्गा, तुळजा भवानी, वन दुर्गा, ब्रह्मचारिणी दुर्गा, स्कंद दुर्गा, कुष्मांडा, रुद्राक्ष दुर्गा, दुर्गा, वीर लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, गज लक्ष्मी, विजय लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धन लक्ष्मी, संतान लक्ष्मी, आदि लक्ष्मी, महालक्ष्मी, राजराजेश्वरी, कामाक्षी व महासरस्वती. या शिवाय मंदिराच्या गर्भगृहाच्या मागील बाह्यभिंतीवरील देवकोष्ठकात महिषारसुरमर्दिनीची प्रत्ययकारी मूर्ती आहे. तसेच सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस मध्यभागी गणेश आणि रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. या सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या आहेत व त्यांतून देवीची विविध रूपे प्रतीत होतात.
या मंदिरात पौष महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात देवीचा वार्षिक जत्रोत्सव होतो. जत्रेची तारीख दसऱ्याच्या दिवशी ठरवली जाते. येथील रवळनाथ हा पावणाईदेवीचा भाऊ आहे. या दिवशी तो पावणादेवीला भेटायला येतो. तोच हा जत्रेचा दिवस असतो. या दिवशी दोन्ही देवतांना मुखवटे घालून साडी नेसवून सजविल्या जातात. विधिवत पूजा केली जाते. १० प्रकारच्या तरंगकाठ्या तयार केल्या जातात. मानाच्या त्या काठ्या साड्यांनी सजविल्या जातात. हाताचा पंजा, देवीचा मुखवटा असे वरच्या टोकाला दिसते. मानकऱ्यांचा मान काही विशिष्ट घराण्यांना असतो. वाजत गाजत श्री देव रवळनाथ व श्री पावणाई देवीची भेट होते. रात्रभर गोंधळ, जागरण सुरू असते. या मंदिराच्या वार्षिक गोंधळासाठी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून ६५ रुपयांची देणगी मिळत असे. संस्थान खालसा झाल्यानंतर ती देणगी बंद झाली. मात्र गावकऱ्यांनी गोंधळाचा उत्सव चालूच ठेवला. येथील देवीचा गोंधळ पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक जमतात. देवीच्या जत्रेच्या दिवशी सकाळी गोडा म्हणजे शाकाहारी, तर संध्याकाळी मांसाहारी महाप्रसाद भाविकांना देण्यात येतो. या मंदिराच्या नजीकच बाराचा पूर्वसाचे मंदिर व काही अंतरावर रवळनाथाचे मंदिर आहे.