वाघेश्वर मंदिर

तोंडवली, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

हिंदू धर्मात सर्व भूतमात्रांत देव मानलेला आहे. त्यामुळे येथे वनस्पतींबरोबरच गाय, बैल, म्हैस आदी प्राण्यांचीही पूजा होते. वाघ हा प्राणी तर येथे देवी दुर्गेचे वाहन मानण्यात आला आहे. बारा हजार वर्षांपासून भारतीय उपखंडात वास्तव्य असलेल्या पट्टेरी वाघास येथे भयादराचे स्थान आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही आदिवासी समाजांत आजही वसुबारससारखी वाघबारस साजरी केली जाते. कोकणातील तोंडवली या गावात तर वाघेश्वराचे किंवा व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. त्या ठिकाणी दोन वाघांच्या समाध्याही आहेत. वाघाचे मंदिर असलेले गाव म्हणून आज कोकणात या गावाची प्रसिद्धी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात, डोंगर पायथ्याशी तोंडवली हे गाव वसलेले आहे. या गावाच्या परिसरात आजही अधूनमधून वाघ दिसतात, असे येथील ग्रामस्थ सांगतात. ‘ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन – २०२२’ या अहवालानुसार भारतात किमान ३१६७ वाघ आहेत, तर वाईल्डलाईउ कॉन्झर्व्हेशन ट्रस्टच्या २०२४ च्या अहवालानुसार सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर आहे. तोंडवलीतील व्याघ्रेश्वराच्या मंदिरात पूर्वी अनेकदा वाघ येत असत व येथे काही काळ विश्रांती घेऊन परतत असत. विशेष म्हणजे या वाघांनी कधीही गावातील कोणत्या मनुष्यास वा प्राण्यास हानी पोहोचवली नाही, असे येथील ग्रामस्थ सांगतात. प्रत्येक गावास ग्रामदैवत असते. ते गावाची काळजी वाहते. त्याचप्रमाणे तोंडवलीमध्ये वाघास गावाचा पालक मानले जाते. त्यामुळेच तेथील घराघरांत वाघाबद्दल पूजाभाव नांदतो.

अशा या व्याघ्रपूजक गावामध्ये व्याघ्रेश्वराचे जुने मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की पूर्वी टिकम नावाचे एक गृहस्थ एकदा मासेमारीसाठी गेले होते. मासे पकडण्याचे जाळे त्यांनी नेहमीप्रमाणे पाण्यात भिरकावले. काही वेळाने जाळे गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात काही अडकल्यासारखे त्यांना जाणवले. त्यावेळी अंधार पडला होता. म्हणून त्यांनी सकाळी येऊन पाहण्याचे ठरवले. सकाळी पाहिले तर त्यांना तेथे काळ्या पाषाणातील स्वयंभू शिवलिंग आढळले. पूर्वी हा भाग पाण्याखाली होता. येथून काही अंतरावर समुद्र आणि नदी यांचा संगम आहे. मात्र कालांतराने समुद्र मागे हटला व येथे मंदिर बांधण्यात आले, असे ग्रामस्थ सांगतात. मंदिराची घुमटी १७५२ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या खडकावर वाघ येऊन बसत असे. गर्भगृहातून तो डरकाळ्या फोडत असे म्हणून या देवास वाघेश्वर असे नाव पडले, असे सांगण्यात येते.

डोंगर पायथ्याशी असलेले हे वाघेश्वर मंदिर मोठ्या प्रांगणात स्थित आहे. त्यास चार फूट उंचीची प्रांगणभिंत बांधलेली आहे. प्रांगणास प्रवेशाची कमान आहे व तिच्या वरच्या भागात नामफलकाखाली वाघाचे मोठे चित्र चितारलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस छोट्या स्तंभावर ध्यानस्थ ऋषींच्या मूर्ती आहेत.

प्रांगणात प्रवेश करताच समोरच लहान-मोठ्या परिघाचे व उंचीचे सहा मोठे दीपस्तंभ आहेत. त्यालगतच छोट्या संगमरवरी चौथऱ्यावर लिंगस्वरूप पाषाण आहेत. समोर मंदिराचा अर्धखुल्या स्वरूपाचा, संगमरवरी फरशा बसवलेला सभामंडप आहे. सभामंडपासमोर अंतराळ आहे. या ठिकाणी एका बाजूस तरंग काठ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारालगत डावीकडे दर्शनी भिंतीस खेटून एका चौथऱ्यावर गणेशाची लहानशी संगमरवरी मूर्ती आहे, तर उजव्या बाजूला विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात भूतलावर अनघड शिवलिंग आहे. हे स्वयंभू शिवलिंग असल्याचे सांगण्यात येते. या शिवलिंगाच्या वरच्या बाजूस मागील भिंतीतून अर्धवट पुढे आलेली शिळा आहे. येथे नागदेवता आणि काळ्या पाषाणातील कासव आहे. शिवलिंगावर पंचधातूच्या कमंडलूतून जलाभिषेक सुरू असतो. गाभाऱ्यास अर्धप्रदक्षिणा मार्ग आहे.

वाघेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला गांगेश्वराचे व दुसऱ्या बाजूस विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात वाघाच्या दोन समाध्या आहेत. याबाबत असे सांगितले जाते की अनेक वर्षांपूर्वी शेजारील गावातील जंगलात एका शिकाऱ्याने वाघावर गोळी झाडली. त्यात तो वाघ जखमी झाला. त्याच अवस्थेत तो तोंडवली गावाच्या हद्दीपर्यंत आला. या गावाच्या हद्दीत शिकार करण्यास पूर्ण बंदी आहे. हा नियम अलिखित असला तरी तो येथे पाळला जातो. त्यामुळे तो शिकारी व त्याचे हाकारे मागे परतले. मात्र तोंडवलीच्या हद्दीत आल्यानंतर त्या जखमी वाघाचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी काही गुराख्यांना त्याचा मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी एका डोलीत घालून वाघाचे पार्थिव मंदिरात आणले आणि तेथेच त्याचे दफन करून समाधी बांधली. दुसरी घटना यानंतर १९९५ मध्ये घडली. एके दिवशी या मंदिराच्या गाभाऱ्यात एक वाघ येऊन बसला होता. तो आसन्नमरण स्थितीत होता. त्याला विषबाधा झाली होती. ते पाहून ग्रामस्थांनी पशुवैद्यकास पाचारण केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हे समजल्यानंतर वनविभागाचे अधिकारी गावात आले. वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार त्यांनी वाघाचे शव नेऊन त्याची मरणोत्तर शल्यचिकित्सा करण्याचे ठरवले. मात्र ग्रामस्थांनी त्यास सक्त विरोध दर्शविला. अखेर वनविभागास गावकऱ्यांच्या श्रद्धेपुढे मान तुकवावी लागली. गावकऱ्यांनी त्या वाघाचेही मंदिर परिसरातील व्याघ्रसमाधीशेजारीच दफन केले व तेथे दुसरी समाधी उभारली. आज भाविक या दोन्ही समाध्यांचेही दर्शन घेतात.

या मंदिरापासून काही अंतरावर डोंगरामध्ये एक गुंफा आहे. तेथे एक साधूपुरुष तपश्चर्या करीत असे. या गुंफेत वाघही वास्तव्यास येत असत असे सांगण्यात येते. मंदिरात आलेले भाविक आवर्जून या गुंफेकडे जाऊन दर्शन घेतात. या मंदिरात महाशिवरात्र, शिमगोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, रामनवमी हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यावेळी प्रत्येक घरात वाघाच्या प्रतिमेचे पूजन होते. प्रत्येक ठिकाणी वाघाचा मान पहिला असतो. ग्रामस्थांच्या या श्रद्धेमुळे या परिसराचे व्याघ्र अभयारण्य झाले आहे. या गावाचे लोक वाघाची शिकार करीत नाहीत व कोणास करूही देत नाहीत.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून १७ किमी, तर देवगडपासून ३८ किमी अंतरावर
  • मालवण व देवगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : सुवर्ण पाटील, अध्यक्ष, मो. ९८६९२२५४१९
Back To Home