घुमडाई देवी मंदिर

घुमडे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

कोकणी लोककला, संस्कृती आणि लोकजीवनाची एक आगळीवेगळी ओळख आहे. येथील श्रद्धा, विविध देव आणि कोकणी स्थापत्यशैलीतील प्राचीन देवालये यांची अनेकांना भुरळ पडते. असेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील घुमडे गावात असलेले घुमडाई देवीचे प्राचीन मंदिर आपल्या अनोख्या स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिराच्या गर्भगृहात पाण्याने भरलेल्या चौकोनी खोल कुंडातील स्तंभावर देवीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की या कुंडाखालून जिवंत झरा वाहतो व त्यामुळे त्यात बाराही महिने पाणी असते.

घुमडाई देवीचे मंदिर किती प्राचीन असावे याबाबत निश्चित पुरावा उपलब्ध नसला तरी ते चारशे वर्षांपूर्वीचे असावे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते की घुमडे गावातील एका शेतकऱ्याच्या दुभत्या गायीने दूध देणे अचानक बंद केले. तेव्हा शेतकऱ्याने कारणाचा शोध घेतला असता त्याला असे कळले की त्याची गाय रानात चरायला जाते तेव्हा एका विशिष्ट जागी पान्हा सोडते. शेतकऱ्याने त्या जागी जमिनीत खोदले असता त्याला तेथे जिवंत झरा लागला. अधिक खोदले असता त्या पाण्यात देवीचा पाषाण सापडला. शेतकऱ्याने ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली आणि सर्वांनी मिळून त्या पाण्यातून पाषाण बाहेर काढले. देवीचे पाषाण सापडले तरी ती कोणती देवी आहे हे ओळखणे शक्य न झाल्याने घुमडे गावची देवी म्हणून घुमडाई देवी असे देवीस संबोधले जाऊ लागले. त्यावेळी देवीचे चार खांबी घुमटी स्वरूपात लहानसे कौलारू मंदिर बांधले गेले. पुढे तीन वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन मंदिरास आजचे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

दोन डोंगरांमधील सुमारे दोनशे फूट खोल दरीत हे मंदिर स्थित आहे. त्यामुळे मंदिराला नैसर्गिक तटबंदीचे संरक्षण आणि सौंदर्य प्राप्त झाले आहे. डोंगर वाटेवरून खाली उतरताच मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात एकाच लांब-रुंद चौथऱ्यावर तीन स्वतंत्र चौथरे आहेत व त्यांवर दोन्ही बाजूस दोन दीपस्तंभ व मध्यभागी तुळशी वृंदावन आहे. दोन्ही दीपस्तंभ सात थरांचे व अष्टकोनी आहेत. तुळशी वृंदावन कलात्मक आहे व खालील चौकोनी भागातील चारी कोनात हंस शिल्पे आहेत.

दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या समोर, उजव्या व डाव्या बाजूस असे तीन दर्शनमंडप आहेत. या मंडपांची रचना एकसारखीच आहे. तीनही मंडपांत प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. समोरील स्तंभ हे खालच्या बाजूने चौकोनी, वर षट्कोनी व त्यावर नक्षीदार कणी आहेत. या मंडपांची मागील बाजू सभामंडपातील स्तंभांवर आहे. मध्यभागी असलेल्या दर्शनमंडपावरील शिखर दाक्षिणात्य शैलीतील गोपुराकार आहे. त्यावर पाच कळस आहेत. त्यातील देवकोष्टकात गणेशाची मूर्ती आहे. बाजूच्या दर्शनमंडपांवर मोदकाच्या आकाराची शिखरे आहेत व त्यांच्या चारी बाजूंस छोटे मिनाराकृती स्तंभ आहेत. या शिखरांत देवकोष्ठके आहेत व उजवीकडे लक्ष्मी व डाव्या बाजूच्या दर्शनमंडपाच्या शिखरात सरस्वतीची मूर्ती आहे.

सभामंडपात प्रत्येकी सहा स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य रांगांतील स्तंभ चौकोनी आहेत व त्यांवर नक्षीदार कणी आहेत. मधल्या दोन रांगांमधील स्तंभ खालच्या बाजूने गोलाकार व वर चौकोनी आहेत. स्तंभांवर उभ्याधारेची नक्षी आहे. हा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्यात भोवतीने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपापेक्षा अंतराळातील भूतल काहीसे उंच आहे. अंतराळात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूच्या दोन्ही रांगा चौकोनी स्तंभांच्या असून मधल्या रांगांतील स्तंभ पायाला चौकोनी, वर गोलाकार व त्यावर उभ्या धारेची नक्षी असलेले आहेत. ‘काश्यपशिल्प’ या ग्रंथानुसार अशा प्रकारच्या स्तंभांना शिवच्छन्द असे म्हणतात. स्तंभांच्या पायाकडील चौकोनी भागावर अत्यंत बारीक कलाकुसरीच्या नक्षी आहेत. संपूर्ण मंदिराच्या आतील छतावर कमळ, चक्र, लतापुष्प असे नक्षीकाम आहे. हे संपूर्ण मंदिर स्तंभांवर उभारलेले आहे. येथील दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृहात कुठेही भिंती नाहीत.

अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून चार स्तंभांच्या मध्यभागी गर्भगृह आहे. या गर्भगृहात मध्यभागी सुमारे आठ ते दहा फूट खोलीचे पाण्याने भरलेले कुंड आहे. या कुंडाच्या वर एका बाजूला उंच वज्रपीठावर काळ्या पाषाणातील घुमडाई देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवी पद्मासनात बसलेली असून उंची वस्त्रे व अलंकार परिधान केलेली आहे. मूर्तीच्या मागच्या बाजूस कुंडात खोलवर पाणी आहे. असे सांगितले जाते की या कुंडात गावगाड्याचे चालक असलेल्या बारा बलुतेदारांचे प्रतीक असलेल्या बारा पिंडी आहेत.

या मंदिरात वर्षभर विविध वार्षिक उत्सव साजरे केले जातात. गुढी पाडव्यापासून येथील उत्सवांना सुरुवात होते. पाडवा ते रामनवमी हा नऊ दिवसांचा चैत्रोत्सव पुढे तीन दिवस वाढून त्यात दशावतारी नाटकांची भर पडते. याशिवाय श्रावण पौर्णिमा, भाद्रपद मासातील ऋषी पंचमी, गौरी उत्सव, शारदीय नवरात्रोत्सव, नवान्न पौर्णिमा, दिवाळी, तुळशी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, शिमगोत्सव आदी उत्सवासोबत मार्गशीर्ष शुद्ध एकादशीस देवीचा जत्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न होतो. ग्राम प्रदक्षिणा घालून रात्री बारा वाजता देवीची पालखी मंदिरात परत येते. जत्रोत्सवानिमित्ताने मंदिरास विद्युत रोषणाई केली जाते. या दिवशी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीस बोललेल्या नवसाची पूर्तता करतात. या गावात ज्यांचा माहेरवास आहे त्या माहेरवाशिणी आवर्जून देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी या उत्सवकाळात मंदिरात येतात.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून ६ किमी, तर ओरोसपासून ३७ किमी
  • मालवणपासून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home