रामेश्वर मंदिर

आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

मध्ययुगात म्हणजेच दहाव्या, बाराव्या शतकात आचरे हे व्यापार-व्यवसायाचे मोठे केंद्र होते. येथील बंदरातून त्याकाळी विदेशात व्यापार चालत असे. असा सुमारे हजार-बाराशे वर्षांचा इतिहास असलेले आचरे गाव आजकाल तेथे दर पाच वर्षांनी होणाऱ्या ‘गावपळण’ या वैचित्र्यपूर्ण प्रथेमुळे ओळखले जाते. या गावाची आणखी एक ओळख म्हणजे तेथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर. येथील रामेश्वर हा देवगडमधील कुणकेश्वर येथील कुणकेश्वराचा भाऊ असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे.

येथील रामेश्वर मंदिराचा इतिहास या मंदिराच्या गर्भगृहावरच कोरलेला आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर एका कोपऱ्यात छोटा शिलालेख बसवण्यात आला आहे. त्यात या मंदिराचा कोनशिला समारंभ १६८४ मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर चार वर्षांनी झाल्याची नोंद आहे. छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र व कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी यांनी १७२० साली या मंदिरास आचरे गाव इनाम म्हणून दिल्याचीही नोंद आहे. यामुळेच या देवालयास इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर असे संबोधले जाते. यामुळेच या मंदिरातील उत्सव आजतागायत अत्यंत उत्साहात व संस्थानी थाटाने साजरे केले जातात. विशेष म्हणजे हे मंदिर शंकराचे असले तरी येथे बहुतांशी वैष्णव उत्सव साजरे केले जातात. हरि आणि हर यांच्या एकात्मतेचे अशा प्रकारे हे मंदिर म्हणजे एक प्रतीक आहे.

रामेश्वराचे हे मंदिर कोकणी स्थापत्यशैलीतील बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे. एखाद्या जुन्या वाड्यासारखी त्याची रचना आहे. मंदिराच्या आवाराच्या प्रवेशद्वारावर तीन मजली इमारत उभी आहे. या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेशाचे छोटेसे देऊळ आहे. तेथून आत येताच एका बाजूस दुमजली इमारत, त्यापुढील ओट्यावर उभे असलेले चार प्राचीन दीपस्तंभ आणि या समोर मोकळे आवार आहे. येथेच उंच जगतीवर रवळनाथाचे आधुनिक बांधणीचे मंदिर आहे. आत रवळनाथाची शस्त्रधारी मूर्ती आहे. पुढे काही अंतरावर आणखी एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारास आत दोन्ही बाजूंस देवडी व वरच्या बाजूस नगारखाना आहे. लाकडी जुन्या पद्धतीच्या कवाडातून मंदिराच्या प्राकारात प्रवेश होतो. समोरच पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारभिंतीलगत उजव्या बाजूस आठ दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या सभामंडपासमोर कलात्मक बांधणीच्या दोन दगडी दीपमाळा आहेत. या दीपमाळांवर छोटी-छोटी गजमुखे, व्याल तसेच पक्ष्यांची मस्तके आहेत. त्यांच्या मस्तकावर तसेच हत्तीच्या गंडस्थळी दगडी पणत्या आहेत. यामुळे या दीपमाळा वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. तेथेच तुळशी वृंदावनही आहे.

रामेश्वर मंदिराची संरचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडप खुल्या स्वरूपाचा व प्रशस्त आकाराचा आहे. लाकडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या सभामंडपास बाहेरच्या व आतील बाजूस दोन्ही कडेने पाच-पाच सुरूदार लाकडी खांब आहेत. या खांबांच्या मध्ये महिरपी कमान आहे. मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय या वैष्णव द्वारपालांच्या साधारणतः एक पुरुष उंचीच्या रंगीत मूर्ती आहेत. अंतराळास डाव्या आणि उजव्या बाजूसही प्रवेशद्वारे आहेत. भिंतीलगत बसण्यासाठी संगमरवरी फरशांनी बांधलेले ओटे आहेत. येथूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. अंतराळातील मोठ्या परिघाचे गोल दगडी खांब लक्षवेधक आहेत. त्यांच्या वरच्या भागात सुंदर कोरीवकाम केलेले आहे. यात गणेश, कृष्ण, लक्ष्मी, श्रीराम, नारद, तुंबर, गरुड, पंचानन शिव व नंदी यांच्या मूर्ती दिसतात. या खांबांवरील बहुतांश मूर्ती या वैष्णव परिवारातील आहेत, हे विशेष.

मंदिराच्या गर्भगृहासमोर नंदीचौक आहे. तेथे नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीलगत गणेशाची व अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारस्तंभावर मध्यभागी गरुडाची व बटूची मूर्ती आणि खालच्या बाजूला जय-विजय यांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंब स्थानी गणेशाची कोरीव प्रतिमा आहे. गर्भगृहात भूतलावर रामेश्वराची सुबक पिंडी आहे. रामेश्वराचा मुखवटा शाळुंकेवर स्थापन करण्यात आला आहे. मुखवट्याच्या मागे नागदेवतेचा पंचधातूचा फणा आहे.

रामेश्वर मंदिरात रोज सकाळी देवाची दैनंदिन पूजा होते. त्यानंतर अभिषेक व लघुरुद्र अभिषेक केले जातात. माध्यान्ह पूजा झाल्यानंतर दुपारी १२ नंतर देवाचा दरबार भरवला जातो. यात देवाला कौल लावून भाविकांचे प्रश्न सोडवले जातात. संध्याकाळी देवाला मुखवटा आणि दागिने घालून सजवले जाते. रात्री आठ वाजता महापूजा व आरती होते.

या मंदिरात रामनवमी हा उत्सव साजरा केला जातो. येथील कानविंदे या मानकरी घराण्याकडून येणारी श्रीरामाची मूर्ती वाजतगाजत मंदिरात आणली जाते. तिची पारंपरिकरित्या पूजा केली जाते. रामेश्वराच्या डाव्या बाजूला श्रीरामाची मूर्ती स्थापन करण्यात येते. नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. येथील रामजन्म व हनुमान जन्म सोहळ्यासाठी सज्जनगडावरून रामदासी बुवा येत असतात. या ठिकाणी महिनाभर कार्तिक उत्सव चालतो. कार्तिक महिन्यात रोज संध्याकाळी देवाची पालखी काढण्यात येते. सकाळी काकड आरती व स्नान असे विधी करून पौर्णिमेला देवाची मूळ स्थापना करण्यात येते. दिवाळीत अनेक दिव्यांचे प्रज्वलन करून मंदिर उजळवले जाते. राजेशाही पद्धतीने शिवलग्न लावण्यात येते. मंदिराच्या बाह्यप्रवेशद्वारी डाव्या बाजूला गणेशाचे मंदिर आहे. तेथे भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीला मोठा उत्सव असतो.

या मंदिरातील कार्तिकोत्सवातील सांगीतिक महोत्सव हा सुप्रसिद्ध आहे. रामेश्वराच्या सभामंडपात सकाळ-संध्याकाळी होत असलेल्या या सांगीतिक महोत्सवास आतापर्यंत कुमार गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. प्रभाकर कारेकर, रामदास कामत व देवकी पंडित यांनी हजेरी लावलेली आहे. ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनीही आपली संगीतसेवा येथे अर्पण केली होती. येथे डाळपस्वारी ही प्रथाही पाळली जाते. कोकणातील गावऱ्हाटीनुसार डाळप म्हणजे सीमासंरक्षक देवांचा शांतवन विधी व ग्रामदेवतेचा मानकऱ्यांच्या घरांना भेटीचा विधी होय. या उत्सवात रामेश्वर देवाची मिरवणूक काढून गावातील सर्व देवतांशी भेट होते. लोकांच्या समस्या देवाला सांगितल्या जातात. सर्व समाजाचे लोक यात सहभागी होतात. येथे दर तीन वर्षांनी डाळपस्वारी होते, तर दर पाच वर्षांनी आचरे गावामध्ये गावपळण ही प्रथा पाळली जाते.

महाराष्ट्रातील काही मोजक्या गावांमध्ये शेकडो वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. त्यातील आचरे हे एक प्रमुख गाव आहे. या गावपळणीबाबत आख्यायिका अशी की फार वर्षांपूर्वी एकदा आचरे गावात भूत-पिशाच्चांनी मोठा उच्छाद मांडला होता. सर्व ग्रामस्थ त्यामुळे त्रस्त झाले होते. हे संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी देव रामेश्वराला साकडे घातले. तेव्हा रामेश्वराने सर्वांना तीन दिवस, तीन रात्री गाव सोडण्यास सांगितले. या कालावधीत रामेश्वराने गावातील पिशाच्चबाधा दूर केली. लोकांच्या मनात आजही अशी श्रद्धा आहे की गावातून तीन दिवस बाहेर गेल्यानंतर गावातील भूत-पिशाच्चांना रामेश्वर दूर करून गावाचे शुद्धीकरण करतो. त्यामुळे आजही ही प्रथा पाळली जाते. या काळात गावातील सर्व लोक माळरानावर निवास करतात.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून २० किमी, तर कुडाळपासून ५६ किमी अंतरावर
  • मालवण, देवगड, सावंतवाडी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९०२२०४७५६३
Back To Home