मौनीनाथ मंदिर

मेढा मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अलौकिक असे होते. ते हिंदूधर्मनिष्ठ होते आणि त्याचवेळी परधर्मियांनाही न्यायाने व औदार्याने वागवणारे जाणते राजे होते. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे परधर्मसहिष्णु आणि उदारमतवादी होते व परधर्मसहिष्णुता हे त्यांच्या धर्मराज्याचे नैतिक अधिष्ठान होते. त्यामुळेच समर्थ रामदास स्वामी, मोरया गोसावी, चिंतामणी देव, सिद्धेश्वरभट ब्रह्मे, गोपाळभट, पुळ्याचे श्रीधरभट्ट बापट यांच्याप्रमाणेच कोकणातील केळशीचे बाबा याकुत यांच्यासारख्या संत-सत्पुरुषांचा ते परामर्ष घेत असत. याच नामावळीतील एक नाव म्हणजे मौनी महाराज!

मालवण शहरातील मेढा भागात मौनी महाराजांचे मंदिर आहे. मौनी महाराज हे सतराव्या शतकातील सत्पुरुष होते. त्यांचे वास्तव्य कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथे असे. त्यांचे पूर्वायुष्य अज्ञात आहे. ते नाथपंथातील अवधूत या उपपंथाचे किंवा गोसाव्यांच्या गिरी पंथाचे असावेत, असा अभ्यासकांचा कयास आहे. ते कथा-कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करीत असत. तुकाराम महाराजांप्रमाणेच ते वेदवाणी व्यक्त करीत असल्याने तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांचा छळ केला, असे विश्वकोशात म्हटले आहे. असे सांगितले जाते की पाटगाव येथे आल्यानंतर त्यांनी या छळास कंटाळून मौन पत्करले म्हणून त्यांना मौनी बुवा नाव पडले. शिवाजी महाराज राज्यातील सर्वच संत-सत्पुरुषांना गुरुस्थानी मानत असत. मौनी महाराजांनाही ते गुरुस्थानी मानत असत.

शिवइतिहासाच्या साधनांपैकी ‘श्रीशिवदिग्विजय’ आणि ‘९१ कलमी बखर’ यामध्ये मौनी महाराजांचा शिवरायांच्या संबंधीचा ऐतिहासिक उल्लेख आढळतो. ‘श्रीशिवदिग्विजया’त, ‘…महाराजांचे संस्थानांत सत्पुरूष योगी साक्षात् ईश्वराच्या विभूतिच, साक्षात्कारी प्रसिद्ध वागत होते, त्यांचीं नावें बीतपशील’ असे सांगून पुढे ‘मौनीबावा पाटगांवीं येऊन राहिले.’ अशी नोंद करण्यात आली आहे. दक्षिण दिग्विजयास जाण्यापूर्वी इ.स. १६७६ मध्ये शिवरायांनी मौनीबाबांची भेट घेतल्याची हकीकत ‘९१ कलमी बखरी’च्या कलम ७६ मध्ये दिली आहे. ही कथा पुढीलप्रमाणे – ‘उपरांतिक पांचवडास (शिवाजी महाराज) आले. तेथें जमाव करून मोरोपंत व अंताजीपंत व कुल सरदार जमा केले. मोठे लोकांसि सर्व राज्याचा बंदोबस्त सांगून बरोबर केसोपंत व निळोपंत मुजमदार घेतले. विजापूरचें राज्यकारण राखून पारगांवी मोहनी बावा होते त्यांचे दर्शनास गेले. मोरोपंताचे हातीं चांप्याचे फुलांचा तुरा व हार दिला. पंचपात्री पंतांचे हातीं होंती. वरकड हुजऱ्यांचे हातीं नारळ व कित्येक फुलांचे जिन्नस दिले. मनांत महाराज कल्पना करून उभे राहिले कीं चंदीचे राज्यावर आपण जातों प्रसाद द्यावा. त्याजवर सात तास पावेतों उभे होते. उपरांतिक पूजा केली. आपले हातीं साखरेचा प्याला घेऊन तोंडांत साखर घातली…’ यावेळी मौनी महाराजांनी मोरोपंतांच्या हातातील फुलांचा तुरा घेऊन महाराजांच्या मस्तकी ठेवला, असे पुढे म्हटले आहे. यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडावर भरविलेल्या एका संतपरिषदेस मौनी महाराज उपस्थित होते, असेही सांगण्यात येते. शिवाजी महाराजांनी मौनी महाराजांच्या मठातील पुराणिक, हरदास आदींसाठी दरसाल १८ होनांची, तसेच हजार माणसांना पुरेल एवढा शिधा दरवर्षी देण्याची तरतूद सनदेद्वारे केली होती. तसेच शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनीही मौनीबाबांच्या मठाचा योग्य परामर्श घेतल्याचे सांगण्यात येते.

‘इतिहास संग्रह’ या दत्तात्रय बळवंत पारसनीस संपादित मासिकाच्या ऑगस्ट १९०८ च्या अंकात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा शिवरायांच्या मालवणमधील प्रतिमेबद्दलचा ऐतिहासिक स्फूट लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी लोककथेचा आधार देऊन असे म्हटले आहे की सिंधुदुर्ग किल्ल्यातील मंदिरासाठी राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांची दगडी मूर्ती तयार करविली होती. तसेच मौनीस्वामींची दगडी मूर्तीही तयार करविली होती. राजवाडे सांगतात की मौनीस्वामींच्या एकंदर तीन मूर्ती आहेत. एक शिवाजी महाराजांच्या देवळांत गाभाऱ्याच्या उंबरठ्याच्या बाहेर उजव्या बाजूस असलेली. ही मूर्ती पूर्वी शिवाजी महाराजांच्या मंदिरात जय-विजयांच्या स्थळी सुटी बसवण्यात आली होती. ‘त्याचे कारण असें कीं, कोंकणांत शिवाजी महाराजांचा अंमल बसविण्यास मौनीस्वामी पाटगांवकर व बाबा याकुब रत्नागिरीकर असे दोन पुरूष कारण झालें. या दोघांचेंहि अत्यंत प्रेम शिवाजी राजावर असे. ह्यांच्या सांगण्यावरून कोंकणांतील लोक शिवाजी राजाच्या अमलाला राजी व रूजू झाले. मौनीस्वामींचे वजन गोव्यापासून राजापूरपर्यंत असे व बाबा याकुब यांचें वजन राजापूरपासून दाभोळपर्यंत असे.’ मौनीस्वामींच्या आणखी दोन मूर्ती होत्या. एक मूर्ती पाटगावच्या मठांत, तर एक मूर्ती मालवणमधील मंदिरात आहे.

मेढा मालवणमध्ये वृक्षराजीने वेढलेल्या प्रशस्त आवारामध्ये हे ‘श्रीदेव मौनीनाथ मंदिर’ उभे आहे. मंदिराच्या आवारास सीमाभिंत असावी असे तेथील पडझड झालेल्या दगडी अवशेषांवरून दिसते. या आवारात प्रवेश करताच डाव्या बाजूस कोकणी पद्धतीचा, दगडी चिऱ्यांत बांधलेला प्राचीन पाच स्तरीय दीपस्तंभ आहे. त्याच्या लगत छोटीशी चौकोनी देवळी आहे. हे समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे देऊळ आहे. त्यापासून काही अंतरावर नाभानाथाची देवळी आहे. समोरच मौनीनाथांचे लालसर दगडी चिऱ्यांत बांधलेले, कोकणी पद्धतीचे कौलारू छत असलेले दुमजली मंदिर आहे. इ.स. २०११ मध्ये येथील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. या जीर्णोद्धारित मंदिराच्या दर्शनी भिंतीलगत प्रवेशद्वारानजीक मोठा संगमरवरी ओटा आहे. ही कांदळगावातील रामेश्वराची गादी आहे. मंदिराच्या दर्शनीभिंतीवर द्वाराच्या दोन्ही बाजूस दोन मोठ्या दंडगोलाकार खिडक्या आहेत. वरच्या मजल्यासही दोन छोटी गवाक्षे आहेत. प्रवेशद्वार दंडगोलाकार आहे. सभामंडप आणि त्यात असलेले गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे व त्यात लाल चौकोनी खांबावर उभा असलेला लाकडी सज्जा आहे. सभामंडपाच्या भिंतींवर रायगडमधील ऐतिहासिक गडकिल्ल्यांची, वास्तूंची माहिती देणारी मोठी छायाचित्रे आहेत. गर्भगृह छोट्या चौकोनी देवळासारखे आहे. त्यावर बसक्या पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे. त्यावर कळस आहे. आत पीठासनावर मौनीस्वामींची मांडी घालून बसलेली व दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून मांडीवर ठेवलेली ध्यानमग्न मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे ओट्यावर धातूचा नक्षीदार महिरप आहे.मौनी महाराजांनी इ.स. १६८६ मध्ये पाटगाव येथे माघ शुद्ध एकादशीस जिवंत समाधी घेतली. त्यांच्या पुण्यतिथीचा पुण्योत्सव मालवण येथील मंदिरात धार्मिक वातावरणात साजरा केला जातो.

उपयुक्त माहिती

  • मालवण बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांतून मालवणसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मालवणमध्ये निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home