आरेश्वर मंदिर

आरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

साळशी येथील सिद्धेश्वर हा ८४ खेड्यांचा अधिपती मानला जातो. त्याच्या अखत्यारित येणाऱ्या गावखेड्यांतील आरे हे एक गाव आहे. या गावाचा ईश्वर तो आरेश्वर. हे आरे गावचे ग्रामदैवत आहे व ग्रामस्थांची त्यावर अगाध श्रद्धा आहे. येथील ग्रामस्थ कोणत्याही शुभकार्याआधी आरेश्वराचा आशीर्वाद घेतात. आरेश्वराचे हे स्थान अत्यंत प्राचीन असून त्यास शेकडो वर्षांचा इतिहास असल्याचे येथील जुनेजाणते लोक सांगतात. प्राचीन लाकडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या समोरचे सुबक वीरसतीगळ हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य सांगितले जाते.

प्राचीन मोठा बेलवृक्ष, त्या भोवती बांधलेला पार, शांत वातावरण अशा परिसरात हे मंदिर वसले आहे. मंदिर कौलारू व उतरत्या छपराचे आहे. मंदिराची एकूण रचना जुन्या कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. एरवी मंदिरांच्या सभामंडपाच्या समोर दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन असते. मात्र आरेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सभामंडपाच्या समोर एक छोटे मंदिर आहे व त्याच्या मागच्या बाजूस दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे. या मंदिरात देवीची प्राचीन दगडी मूर्ती आहे. देवी चतुर्भुज व शस्त्रधारिणी आहे. तिच्या मस्तकावर उंच किरिटमुकुट आहे. या मूर्तीच्या शेजारीच मांडी घालून नमस्कार मुद्रेत पाटावर बसलेल्या पुरुषाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या चेहऱ्यावर त्रिकोणी दाढी व केस वर बांधलेले आहेत. गळ्यात माळ तसेच जानवे आहे.

या मंदिराची आख्यायिका अशी की शेकडो वर्षांपूर्वी आरे गावच्या मूळ पुरुषाने हे गाव वसविले. त्यावेळी त्याने येथे शिवलिंगाची स्थापना केली. आरेश्वर नावाने हा देव ओळखला जातो. आरेश्वराच्या मंदिरासमोर देवीच्या मूर्तीच्या बाजूला याच मूळ पुरुषाची मूर्ती असावी असा कयास आहे. या देवीच्या व मूळ पुरुषाच्या मूर्तीच्या मागच्या बाजूस, भिंतीस टेकून काही सतीशिळा व देवता मूर्ती आहेत. यामध्ये एक अत्यंत सुबक कोरीवकाम असलेला वीरसतीगळही आहे. गावातील एखाद्या वीरपुरुषाचा लढाईत वा गावासाठी केलेल्या संघर्षात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या चितेवर त्याची पत्नी सती जाते. अशा सतीच्या शिळेमध्ये त्या वीरपुरुषाचीही मूर्ती कोरलेली असते. त्यास वीरसतीगळ असे म्हणतात. या ठिकाणी असलेल्या एका वीरसतीगळामध्ये सर्वांत खालच्या स्तरात सती गेलेली स्त्री व तिचा शस्त्रधारी पती आहे. त्याच्यावरच्या स्तरात नमस्कार मुद्रेतील दोन स्त्रीप्रतिमा आहेत व सर्वांत वरच्या स्तरात शिवलिंगाची पूजा करणारी स्त्री, तसेच चंद्र व सूर्य कोरलेले आहेत. अशाच प्रकारचा आणखी एक वीरसतीगळही येथे आहे. त्यात खालच्या स्तरात युद्धप्रसंग कोरलेला आहे. तेथे अश्वधारी वीर दिसतो. या शिवाय येथे दोन सतीशिळाही आहेत. त्यातील एक सतीशिळा अर्धवर्तुळाकार आहे, हे विशेष.

या देवता व सतीशिळा असलेल्या मंदिराच्या समोर आरेश्वराचे प्राचीन देवालय आहे. हे मंदिर आठ पायऱ्या उंचावर आहे. कोकणी स्थापत्यशैलीतील या मंदिराच्या प्रशस्त सभामंडपामध्येच गर्भगृह आहे. सभामंडपातून गर्भगृहाचा प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपाचा अर्धा भाग अर्धखुल्या पद्धतीचा आहे व त्यात मोठे गोल स्तंभ आहेत. त्यावर लाकडी भक्कम तुळया आहेत व खांबांच्या वर कोरीव काम केलेले तरंगहस्त आहेत. गर्भगृहासमोर नंदीची सुबक पाषाणमूर्ती आहे. गर्भगृह चारही बाजूंनी खुले आहे. त्यास उंच कठडे आहेत. आत मध्यभागी आरेश्वराची पिंडी आहे. ही शिवपिंडी उत्तम प्रकारची म्हणजे उंच गोल वेदीवर असलेली आहे. वेदी, त्यावर शाळुंका आणि मध्यभागी दंडगोलाकार लिंग अशा प्रकारची ही पिंडी आहे.

या मंदिराच्या परिसरातच आदिनाथाचेही मंदिर आहे. आधुनिक पद्धतीने बांधलेल्या या मंदिरात संगमरवरी फरशीच्या तुकड्यांनी तयार केलेल्या दोन शाळुंकांमध्ये पाषाण लिंग आहेत. यातील एका लिंगाचा आकार पिळा घातलेल्या दगडासारखा आहे. या लिंगास दोन डोळेही आहेत. या दोन लिंगांच्या बाजूस स्थानिक देवतेचा पाषाण आहे. या शिवाय मंदिराच्या आवारात, दीपस्तंभाच्या मागच्या बाजूस अलीकडेच हरिनाम सप्ताह व अन्य धार्मिक उत्सवांकरीता मोठा मंडप बांधण्यात आला आहे. या मंदिरात आषाढी एकादशीला अत्यंत उत्साहात हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. त्याच प्रमाणे येथे महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दर श्रावणी सोमवारीही येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून २६ किमी, तर तळेरेपासून ३६ किमी अंतरावर
  • देवगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home