देवगड तालुक्यातील गढीताम्हाणेनजीक असलेले राटेश्वर हे गाव निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले आहे. ताम्हाणे खाडीकिनारी असलेले हे गाव माडाच्या बनांनी व जगप्रसिद्ध देवगड हापूसच्या बागांनी वेढलेले आहे. या गावातील प्राचीन व जागृत देवस्थान असलेले राटेश्वर मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोकणी स्थापत्य शैलीचे हे कौलारू मंदिर भाविकांशिवाय अभ्यासकांमध्येही प्रसिद्ध आहे ते येथील वैशिष्ट्यपूर्ण काष्ठशिल्पांमुळे. या मंदिरांतील तुळयांजवळील तरंगहस्तांवर कोरलेली गणपती, विष्णू, हनुमंत, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांची शिल्पे हा कोकणातील दुर्मिळ ठेवा मानला जातो.
देवगड तालुक्यातील राटेश्वर, कुणकेश्वर, राजापूर येथील धोपेश्वर, वानिवड्यातील महालक्ष्मी व पेंढरी येथील चौंडेश्वरी ही पाच भावंडे असल्याची मान्यता आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी हे सर्व देव कुणकेश्वरच्या समुद्रावर आंघोळीसाठी जात असत. एकदा राटेश्वर कुणकेश्वरला गेला असताना कुणकेश्वराचा पुढील दरवाजा बंद होता. त्यामुळे कुणकेश्वराने सांगितले की तू मागच्या दाराने ये; परंतु राटेश्वर हा मोठा भाऊ असल्याने त्याला ते अपमानास्पद वाटले व त्याने पुढच्या दरवाजावर जोराने लाथ मारून तो दरवाजा पाडला आणि कुणकेश्वराला भेटायला गेला. तेव्हा अपमान झाल्यामुळे मी यापुढे कुणकेश्वरात आंघोळीसाठी येणार नाही, असे राटेश्वराने सांगितले. त्यावर कुणकेश्वराने सांगितले की यापुढे समुद्राला येणाऱ्या पहिल्या दोन लाटा या राटेश्वराच्या असतील व त्यानंतरच्या माझ्या असतील. तेव्हापासून येथील भाविक हे कुणकेश्वरला जाण्याआधी राटेश्वरात पहिली आंघोळ करतात आणि त्यानंतर कुणकेश्वराच्या दर्शनासाठी जातात.
राटेश्वर महादेवाचे मंदिर हे किती प्राचीन आहे याबाबत निश्चित माहिती नसली तरी ग्रामस्थांच्या मते ते ३५० ते ४०० वर्षांहून प्राचीन आहे. या देवाचे मानकरी असलेले मूळचे तुळजापूरचे कदम घराणे या गावात स्थायिक होऊन ३५० हून अधिक वर्षे उलटली असल्याचे सांगितले जाते. राटेश्वर गावात प्रवेश करताना मुख्य रस्त्यालगतच या मंदिराची मोठी कमान नजरेस पडते. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणाभोवती सीमाभिंत आहे. प्रशस्त प्रांगणाच्या मध्यभागी राटेश्वराचे कोकणी स्थापत्य शैलीतील दुमजली कौलारू मंदिर आहे. मंदिराजवळ एक प्राचीन विहीर आहे. या विहिरीतील पाण्याने हात पाय धुऊन नंतर मंदिरात दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ पाच थर असलेला चौकोनी दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाच्या वरच्या बाजूला कळस आहे व संपूर्ण दीपस्तंभावर नक्षीकाम आहे. या दीपस्तंभाच्या बाजूलाच एक प्राचीन उखळी तोफ आहे.
मंदिराचा सभामंडप हा नव्याने बांधलेला व अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. त्यात बाजूने कक्षासने आहेत. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या दोन देवकोष्टकांमध्ये पिठाई व मिठाई या देवींच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की अंगावरील खरूज व इतर त्वचाविकार बरे होण्यासाठी या दोन देवींना भाविकांकडून नवस बोलले जातात. नवसपूर्तीनंतर पिठाई देवीला पीठ व मिठाई देवीला मीठ देऊन नवसपूर्ती केली जाते. येथून अंतराळात प्रवेश केल्यावर ठिकठिकाणी शेकडो पितळी घंटा पाहायला मिळतात. नवसपूर्तीनंतर भाविकांकडून त्या येथे लावल्या जातात. अंतराळाच्या मध्यभागी एक कासवमूर्ती आहे. तेथून पुढे एका मखरात महालक्ष्मीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या उजवीकडील वरच्या हातात तलवार व खालच्या हातात दंड आहे, तर डावीकडील वरच्या हातात चक्र व खालच्या हातात नरमुंड धरलेले आहे. पायाजवळ देवीचे वाहन असलेला वाघ आहे. या मूर्तीच्या बाजूलाच बाराचे पूर्वस आहेत. याशिवाय येथे सहा तरंगहस्त (म्हणजे खांबांवरील तुळयांना आधार देण्यासाठी जो अधिकच्या खुणेसारखा आकार असतो तो) आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. या मूर्तीवर कोरलेली घुंगरमाळ वैशिष्ट्यपूर्ण आहे.
या मंदिराचे सर्वोत्तम वैशिष्ट्य म्हणजे येथील काष्ठशिल्पे. अंतराळातील मोठ्या षटकोनी खांबांच्या वरील लाकडी तरंगहस्तांवर ही शिल्पे व पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. या शिल्पांमध्ये श्रीकृष्ण, गणेश, हनुमान, वनातून चाललेले राम-लक्ष्मण, शेष, व्याघ्रमुख, सिंह यांच्या प्रतिमा आहेत. याशिवाय येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ उठावशिल्पही आहे. याचप्रमाणे येथील संत तुकाराम महाराजांची प्रतिमा खास उल्लेखनीय आहे. ही सर्व शिल्पे खास मराठी शैलीतील आहेत. त्यांना रंगकाम करून उठाव देण्यात आला आहे व गावकऱ्यांनी त्यांची जपणूक केल्याचे दिसत आहे.
अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून काहीसे खोलवर गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या मध्यभागी अखंड काळ्या पाषाणातील राटेश्वर महादेवाची पिंड आहे. शिवपिंडीच्या मागील भिंतीवरील देवकोष्टकात उत्सव काळात पालखीत ठेवली जाणारी नाग छत्रधारी शिवपिंडीची प्रतिकृती आहे. मंदिराच्या प्रांगणात एका झाडाखाली गवळ देवाचे स्थान आहे. येथे दरवर्षी देवदिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. याशिवाय प्रांगणात मंदिराच्या समोरच्या बाजूला होळीचा खांब म्हणजेच देव होळीचे स्थान आहे. एका उंच झाडाखाली महापुरुषाचेही स्थान आहे.
महाशिवरात्री हा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या मंदिरात केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच गर्भगृहात जाऊन राटेश्वराचे दर्शन घेता येते. त्यानिमित्त येथे तीन दिवसांची यात्रा असते. या यात्रोत्सवात भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण, दशावतारी नाटक, महाप्रसाद आदींचे आयोजन केले जाते. तालुक्यातील हजारो भाविक यावेळी राटेश्वराच्या दर्शनाला येतात. या गावातून लग्न होऊन गेलेल्या स्त्रिया (माहेरवाशिणी) आवर्जून या काळात महालक्ष्मी देवीची खणानारळाने ओटी भरण्यासाठी येतात. अशी आख्यायिका आहे की महाशिवरात्रीच्या पर्वात राटेश्वर देवाच्या आंघोळीसाठी कुणकेश्वर समुद्राच्या दोन लाटा पाठवतो. या लाटांच्या पुजनाने राटेश्वर देवाच्या महाशिवरात्री पर्वाची सांगता होते. ही परंपरा ३५० ते ४०० वर्षांपासून सुरू असल्याचे येथील जुने जाणते ग्रामस्थ सांगतात. श्रावण महिन्यातही राटेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.