कलेश्वर म्हणजे कलेचा ईश्वर. देशात अनेक ठिकाणी भगवान शंकराची कलेश्वर रूपात मंदिरे आहेत. कोकणातही कलमठ, नेवळे, नेरूर अशा काही ठिकाणी कलेश्वराची मंदिरे आहेत. त्यातीलच एक सुप्रसिद्ध मंदिर सावंतवाडीनजीकच्या कोलगाव येथे आहे. येथील कलेश्वर हा लोकदैवत स्वरूपातील आहे. तो नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेस धावून येणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव या गावांतील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या कलेश्वराच्या जत्रोत्सवास दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते.
डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य अशा वातावरणात कलेश्वराचे हे भव्य मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा इतिहास अज्ञात असला तरी ते खूप प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी पूर्वी कोकणी पद्धतीचे मोठे कौलारू मंदिर होते. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येत या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आज येथे दोन शिखरे असलेले भव्य मंदिर उभे आहे. विस्तीर्ण अशा आवारात हे मंदिर स्थित आहे. आवारास मोठे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही स्तंभांवर जय-विजय या वैष्णव द्वारपालांच्या उंच मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वर मध्यभागी श्रीफळाच्या आकाराच्या घुमटीमध्ये गणेशाची मूर्ती विराजमान आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस गजराज आहेत. येथून आत जाताच समोरच एका उंच दगडी चबुतऱ्यावर पाच स्तरीय दीपस्तंभ आहे. मुख्य सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ, गर्भगृह, दोन उंच शिखरे अशी मंदिराची रचना आहे. मंदिर उंच जोत्यावर उभे आहे.
दीपस्तंभाच्या चबुतऱ्यास खेटून मंदिराच्या सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूने पायऱ्या आहेत. या मुख्य सभामंडपाच्या प्रवेशस्थानी छतावर छोटे घुमटाकार शिखर आहे. सभामंडप दुमजली व प्रशस्त आहे. त्यास बाहेरच्या बाजूने दहा गोल खांब आहेत. बाह्य बाजूपासून आत कोकणी स्थापत्यशैलीनुसार काही अंतरावर दोन्ही बाजूंस गोलाकार खांब आहेत. त्यामध्ये काही इंच खोलगट जमीन आहे. उपसभामंडप आकाराने छोटा व अर्धखुल्या पद्धतीचा आहे. तेथे भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंदिराच्या सभामंडप आणि अंतराळाच्या छतावरही शिखरे आहेत. ही दोन्ही शिखरे भिन्न स्थापत्यशैलीतील आहेत. सभामंडपावरील शिखर हे खालच्या बाजूस अष्टकोनी व ते वर निमुळते होत गेलेले आहे. त्याच्या मधल्या दोन स्तरांवर देवकोष्ठके आहेत. त्यात देवप्रतिमा विराजमान आहेत. या शिखरास वर गोलाकार आमलक व त्यावर कळस आहे. अंतराळावरील शिखर हे अर्ध्वोधर प्रकारचे म्हणजे वरपर्यंत सरळ; परंतु शीर्षस्थानाकडे अचानक आतील बाजूस वळलेले असे आहे.
मंदिराच्या अंतराळाचा दरवाजा रुंद व लाकडाचा आहे. त्यावर पानाफुलांची नक्षी, तसेच सूरसुंदरी व द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अंतराळातून गर्भगृहास प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग आहे. मंदिराचे गर्भगृह हे एखाद्या छोट्या देवळासारखे आहे. त्याच्या दर्शनीभिंतीलगत जय-विजय या वैष्णव द्वारपालांच्या उंच रंगीत मूर्ती आहेत. प्रवेशद्वार उंचीने लहान व दंडगोलाकार आहे. गर्भगृहावर पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे. आत पंचधातूच्या मखरात प्रतिष्ठापित केलेली कलेश्वराची काळ्या पाषाणातील उंच उभी मूर्ती आहे. मूर्ती चतुर्भुज असून, तलवार, त्रिशूल अशी शस्त्रधारी आहे. मूर्तीच्या एका हातात पात्रही आहे. मूर्तीच्या पायानजीक अश्वधारी सेवकाची, तसेच सेविकेची मूर्ती आहे.
कलेश्वर मंदिरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जत्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी कलेश्वरास भरजरी वस्त्रप्रावरणे व अलंकारांनी मढविले जाते. कलेश्वर देवाची तरंग-काठी, पालखी वाजत-गाजत मंदिरापर्यंत आणली जाते. या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जत्रेत लावले जाणारे दारूसामान. हे दारूसामान देवाची सेवा म्हणून दिले जाते. या यात्रोत्सवानिमित्ताने येथे कोकणची पारंपरिक नाट्यकला असलेल्या दशावताराचे खेळही आयोजित केले जातात.