यक्षिणी देवी मंदिर

माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

दत्तावतार मानले गेलेले वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा मठ तथा दत्त मंदिर यांमुळे पवित्र झालेल्या माणगावात यक्षिणी देवीचे मंदिर आहे. यक्षिणी देवी ही माणगावची ग्रामदेवता आहे. स्थानिक लोक तिला जखुबाई या नावानेही संबोधतात. हे मंदिर किमान काही शतके जुने असून ते धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. याची दोन कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे हे मंदिर कोकणी काष्ठशिल्प परंपरेचा अद्वितीय असा वारसा जपणारे आहे आणि दुसरे म्हणजे या मंदिरात कोरलेल्या ६४ योगिनींच्या प्रतिमा. यामुळे हे मंदिर हा एक धार्मिक-सांस्कृतिक वारसास्थळही बनलेले आहे.

भारतीय पुराणकथांमध्ये यक्ष, यक्षी किंवा यक्षिणी ही अतिमानवी योनी मानण्यात आलेली आहे. पुराणकथांनुसार कश्यप हा यक्षपिता होता. त्याला रवसा, क्रोधा, मुनी (विश्वा) या पत्नींपासून यक्ष झाले. वेदपूर्व काळापासून भारतात यक्षपूजा सुरू आहे. यक्षिणी या जलाच्या तसेच वनस्पतीसृष्टीतील सुपिकतेच्या देवता मानल्या जातात. झाडे, वेली यांत त्यांचा वास असतो. देशात अगदी मोजक्या ठिकाणी यक्षिणीची मंदिरे आहेत. बिहारमधील रोहतास, मध्य प्रदेशातील बाणगंगा, कर्नाटकातील म्हैसूर चामुंडी हिल्स, बेळगाव, तमिळनाडूतील त्रिची तसेच मदुरै येथे यक्षिणीची मंदिरे आहेत. गुवाहाटीतील कामाख्या मंदिर, विजयवाड्यातील (आंध्र प्रदेश) कनकदुर्गा मंदिर, मदुरैतील यक्षिणी-अय्यनार मंदिर, वाराणसीतील भद्रकाली मंदिर, तसेच तमिळनाडूतील तंजावरमधील कुप्पुस्वामी मंदिर येथेही मुख्य देवतेबरोबरच यक्षिणीची पूजा केली जाते. यात माणगावमधील मंदिराचेही अग्रक्रमाने नाव घेतले जाते.

माणगावाच्या मध्ये एका प्रचंड मोठ्या पिंपळ वृक्षाच्या समोर देवी यक्षिणीचे प्राचीन, कोकणातील स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण असलेले हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर एका उंच व मोठ्या जगतीवर उभारलेले आहे. जमिनीपासून पाच पायऱ्या चढून या मंदिराच्या जोत्यावर येता येते. तेथेच प्रशस्त ओट्यावर बांधलेल्या उंच चौथऱ्यावर पाच स्तरीय दीपस्तंभ आहे. त्यावर अष्टविनायकाची उठावशिल्पे आहेत. तसेच अन्य देवतांच्या प्रतिमा आणि पुष्पनक्षी कोरलेली आहे. त्याच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. या ओट्यावर पत्र्याचा भलामोठा मंडप आहे. समोरच मंदिराचा रुंद-आडवा व अर्धखुल्या प्रकारचा प्रशस्त सभामंडप आहे. मंडपात खालच्या बाजूस कक्षासने आहेत, तर येथे असलेल्या खांबांनी वरील उतरत्या छतास आधार दिलेला आहे. त्यापासून काही अंतर सोडून आतल्या बाजूस चार गोल काष्ठस्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरच्या बाजूस घटकमल कोरलेले आहेत. सभामंडपात गर्भगृहाकडील बाजूला स्टीलच्या सळया लावलेला एक पिंजरा आहे. त्यात भिंतीवरील कोरीव नक्षी असलेल्या काष्ठचौकटींत बसवलेल्या विविध देवतांच्या प्रतिमा आहेत. त्यास खेटूनच सहा पायऱ्या आहेत व त्यांच्या बाजूस दुर्गामातेची अष्टभुजा व सिंहारूढ चित्रप्रतिमा आहे. पायऱ्यांवरून मंदिराच्या दुसऱ्या सभामंडपात प्रवेश होतो. तेथे चारी बाजूंनी उंच दगडी कक्षासने आहेत. येथेही लाकडी गुळगुळीत स्तंभ आहेत. समोर अंतराळाच्या दर्शनीभिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस हनुमानाची, तर डाव्या बाजूस शंकर-पार्वतीची प्रतिमा चितारलेली आहे. येथून तीन पायऱ्या चढून लाकडी प्रवेशद्वारातून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो.

अंतराळात मध्यभागी मंदिराचे गर्भगृह आहे. अंतराळातूनच त्यास प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे. या अंतराळामध्ये प्राचीन काष्ठकलेचे अनेक उत्तम नमुने पाहावयास मिळतात. या ठिकाणी बाह्यभिंतीपासून काही अंतरावर आतल्या बाजूने चार रुंद गोलाकार स्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरच्या बाजूस गोलाकार पलगईसारखा आकार आहे. त्यावर खांब छताला मिळतो तेथे खांबाच्या आकारापेक्षा मोठा वर्तुळाकार असून त्यावर अनेक सर्पमुखे कोरलेली आहेत. हे सर्व सर्प जणू खांबातूनच बाहेर येऊन डोकावत आहेत, असा भास निर्माण करण्यात आलेला आहे. वरचे छत या सर्पांनी आपल्या मस्तकावर पेलल्यासारखे दिसते. या स्तंभांवर कोरीव काम केलेले तरंगहस्तही आहेत. यात हुक्का ओढणारा योगी, हनुमान, व्याल आदींच्या प्रतिमा आहेत.

अंतराळात छतांच्या पाटांवर शिल्पे कोरलेली आहेत. कोकणातील स्थापत्यशैलीत वरच्या बाजूस तुळयांची जी चौकट तयार होते, त्यावर छताचे लाकडी पाट टाकले जातात. या पाटांवर खालच्या बाजूने अनेकदा शिल्पे कोरलेली असतात. येथे त्यात अग्नीसारख्या देवता आहेत. अष्टदिग्पाल (आठ दिशांच्या देवता) आहेत. त्याचप्रमाणे अतिमानवी यक्षप्रतिमाही आहेत. यात सहा शिरे, १८ हात, तीन पाय; दोन शिरे आणि चार हात; १८ शिर, ३६ हात, नऊ पाय; पाच शिर, पाच पाय व दहा हात असलेल्या प्रतिमा आहेत.

येथील धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अंतराळाच्या छतालगतच्या वितानावर कोरण्यात आलेल्या चौसष्ट योगिनींच्या प्रतिमा. भारतात इसवी सनाच्या सातव्या शतकात योगिनी संप्रदायाची स्थापना झाल्याचे अभ्यासक मानतात. योगिनी संप्रदायात आदिशक्तीच्या अंशात्मक रूपांना योगिनी मानले जाते. त्याचप्रमाणे ही संज्ञा योगावर प्रभुत्व मिळविलेल्या स्त्री उपासिकांनाही वापरली जाते. मात्र योगिनी हा शाक्त संप्रदाय आहे व तांत्रिक साधना या संप्रदायाचा मूळ पिंड आहे. या संप्रदायाचा संबंध नेहमीच शैव संप्रदायाशी जोडला जातो. राजा रामदेवरायाचे प्रधान व महाराष्ट्रातील भूमीज शैलीच्या मंदिर स्थापत्याशी ज्याचे नाव जोडले गेले आहे त्या हेमाद्री ऊर्फ हेमाडपंतांनी रचलेल्या `चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथातही योगिनी संप्रदायाचा व त्यांच्या साधनेचा उल्लेख येतो. दहाव्या शतकातील कालिका पुराणात अर्थ व काम यांच्या प्राप्तीसाठी ६४ योगिनींची पूजा सांगितली आहे. योगिनी साधनेत तंत्रोपासनेवर भर दिला जातो म्हणून तेथे पंच‘म’कार महत्त्वाचे असतात. या पंचमकारांत मद्य, मांस, मत्स्य, मैथुन व मुद्रा यांचा समावेश होतो. देशात पंधराव्या शतकानंतर या संप्रदायाची पीछेहाट झाली व आज तो नामशेष झालेला आहे. मात्र योगिनींची अनेक ठिकाणी ग्रामदेवता म्हणून पूजा केली जाते. भारतात ओडिशातील हिरापूर व राणीपूर, तसेच मध्य प्रदेशातील खजुराहो व भेडाघाट येथील योगिनी मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. माणगावातील यक्षिणी मंदिरातही कोरलेल्या मूर्ती या ६४ योगिनींच्या असल्याचे २०१५ मध्ये झालेल्या एका अभ्यासातून जगासमोर आले. ‘कल्ट इमेजेस ऑफ कोंकन – ए स्टडी थ्रू ट्रॅडिशन्स, रिलिजियस बिलिफ्स अँड आयकॉनोग्राफी’ असे या अभ्यास प्रबंधाचे शीर्षक असून तो शिल्पा हडप या संशोधिकेने पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठास पीएचडीसाठी सादर केला होता.

अंतराळातील वितानावरील या सर्व मूर्ती साधारणतः २५ सेंटीमीटर आकाराच्या आहेत. यात माशावर आरुढ व बेडकीचे मुख असलेली, अश्वाचे मुख असलेली, गाढव वाहन व बकरीच्या मुखाची, गर्दभाचे मुख असलेली अशा अनेक रूपांत या योगिनी आहेत. त्यातील वेताळी, सूर्यपुत्री, गांधारी, कुमारी, जसा किंवा चंद्रकांती, ककराली, चंडिका, तारा, यमुना, पद्मावती, अघोरा, अग्निहोत्री व खेमुखी या योगिनींची ओळख मूर्तिशास्त्रीय अभ्यासातून पटलेली आहे.

या मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार व त्याच्या कडेच्या लाकडी महिरपवजा भिंतीवरही अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. चंदेरी रंगात रंगविलेले हे प्रवेशद्वार त्रिशाखीय आहे. या तिन्ही द्वारशाखांच्या तळाशी सूरसुंदरींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यावर हत्ती, हंस, व्याल (भिन्न प्राण्यांचे अवयव असलेला मिश्र प्राणी), सिंह, घोडा, मोर यांची शिल्पे आहेत. यातील मधल्या द्वारशाखेच्या तळाशी असलेल्या सूरसुंदरी डोक्यावर घागरी घेतलेल्या दिसतात. त्या नद्यांचे प्रतीक असल्याचे अभ्यासक सांगतात.

द्वारशाखांच्या बाहेरच्या बाजूस दोन्हीकडे नक्षीकाम केलेले लाकडी खांब आहेत. त्यांवरही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यातील एक पक्ष्याचे मुख असलेली देवी ही कामाक्षी असल्याचे अभ्यासक सांगतात. या मखरद्वाराच्या ललाटबिंब स्थानी विष्णूची प्रतिमा आहे. येथे विष्णू हा शेषशायी असून त्याची सेवा करणारी लक्ष्मी, गरुड आणि बाजूस ब्रह्मदेव यांच्या प्रतिमाही येथे कोरलेल्या आहेत. द्वारललाटबिंबावरील भागात म्हणजेच उत्तररांगेत दशावतार कोरलेले आहेत. या प्रवेशद्वारास मंडारक म्हणजे उंबरठा नाही, हे विशेष. प्रवेशद्वाराच्या बाजूस भिंतीवर मोठ्या आकारात द्वारपालांच्या उभ्या मोठ्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्रिशूल, बाण, डमरू, गदा धारण केलेल्या या द्वारपालांना दाढी-मिशा आहेत. गर्भगृहात दगडी वज्रपीठावर यक्षिणी मातेची मूर्ती आहे. ही मूर्ती पाषाणाची व साधारणतः एक मीटर उंचीची आहे. तिच्या उजव्या हातात खड्‌ग आहे. वज्रपीठालगत डाव्या बाजूस ध्यानमुद्रेतील योग्याची उंच दगडी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मागच्या बाजूस प्रदक्षिणा मार्गात काही स्थानिक देवतांच्या पाषाणमूर्ती आहेत. तेथेच तरंगकाठ्याही ठेवण्यात आलेल्या आहेत. अंतराळाच्या छताखालीच असलेल्या या गर्भगृहाचा जीर्णोद्धार अलीकडच्या काळात करण्यात आला असावा असे दिसते. त्यास बाहेरून संगमरवरी फरशा लावलेल्या आहेत. गर्भगृहाच्या वर सोनेरी कळस आहे. या मंदिराच्या बांधकामात लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यातील कलात्मकतेचे दर्शन होते. येथील वासेही एकसारखे विशिष्ट आकार दिलेले आहेत.

माणगावातील या मंदिराचा दत्तावतार असलेल्या वासुदेवानंद सरस्वतींशीही संबंध आहे. याबाबत अशी कथा सांगण्यात येते की दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या सेवेत काही योगिनी होत्या. त्यांपैकी यक्षिणी देवी ही एक प्रमुख देवता होती. नृसिंह सरस्वती यांनी पुढचा अवतार घेण्यापूर्वी तिला सांगितले की माझा पुढचा अवतार माणगाव येथे होणार आहे. तेव्हा तू आधी तेथे जाऊन गाव वसव. त्यांच्या इच्छेनुसार यक्षिणी ही माणगावची ग्रामदेवता झाली. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांच्यारूपाने येथे नृसिंह सरस्वती व पर्यायाने दत्तगुरूंनी अवतार घेतला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराजवळच टेंब्ये स्वामी यांचे जन्मस्थान आहे.

यक्षिणी मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतीलच नव्हे, तर गावाबाहेर नोकरी-धंद्यानिमित्ताने गेलेले चाकरमानीही या यात्रेसाठी माणगावी येतात. याच प्रमाणे मंदिरात रामनवमी, विजयादशमी या दिवशीही मोठा उत्सव असतो. माघ वद्य अष्टमी हा मंदिराचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.

उपयुक्त माहिती

  • कुडाळ येथून १७ किमी, तर सावंतवाडी येथून २४ किमी अंतरावर
  • सावंतवाडी ते कुडाळ या मार्गावर असलेल्या माणगाव फाटा येथून ७ कि.मी.
  • सावंतवाडी येथून एसटी बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
  • संपर्क : शेखर धुरी, अध्यक्ष, मो. ९४२०२ ६१५३९,
  • रुपाजी धुरी, सदस्य, मो. ९४०५७ ६१६९१
Back To Home