वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे गणपतीचे स्थान हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षातील केवळ काही महिनेच या मंदिरात असणारा मातीचा गणपती या परिसरात नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा व भाविकांच्या हाकेला धावून जाणाऱ्या या गणपतीला भाविकांकडून तेलाचा नवस केला जातो. येथील वैशिष्ट्य असे की या गणपतीची स्थापना ही दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते व नवसाचे तेल संपेपर्यंत तिचे पूजन होते. तेल न संपल्यास होलिकोत्सवात म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला मूर्तीचे विसर्जन केले जाते.
या मंदिराच्या स्थापनेबाबतची आख्यायिका अशी की उभादांडा परिसरात पूर्वीपासून अनेक तांडेल कुटुंबे राहत आहेत. त्यापैकीच एका कुटुंबात बाबलो नावाचा एक गुराखी होता. हा बाबलो नेहमी स्वतःच्या धुंदीत असे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याला वेडा ठरवला होता. या बाबलोचे मूर्तिकार असलेले मामा येथून जवळच खवणे गावात राहत. गणेशोत्सवासाठी ते पंचक्रोशीतील अनेक भाविकांसाठी मूर्ती बनवत असत. बाबलो एकदा मामाकडे गेला असता त्याने तेथे एक गणेशमूर्ती पाहिली. गणेशोत्सव संपूनही कोणीच विकत न घेतल्याने ती मूर्ती तेथे शिल्लक होती. त्याने ती मूर्ती तेथून उचलून आणली व सध्या जेथे गणपती मंदिर आहे तेथे आणून ठेवली. तो दिवस होता आश्विन अमावस्या म्हणजेच बलीपूजन व लक्ष्मीपूजनाचा.
बाबलोने त्या दिवशी येथे गणपतीचे पूजन सुरू केले. एक वेडा माणूस धर्म करतोय, असे म्हणत ग्रामस्थांपैकी काहींनी त्याला तेथे दिवे लावण्यासाठी तेल, पणत्या व अगरबत्त्या दिल्या. त्याने या गणेशमूर्तीचे काही दिवस पूजन करून नंतर तिचे विसर्जन केले. मागच्या वर्षीप्रमाणे पुढच्या वर्षालाही त्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथे मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून त्याचे पूजन केले व ती विसर्जित केली. मात्र तिसरे वर्ष होण्याआधी हा बाबलो परागंदा झाला. कोणीही त्याची पुढे चौकशी केली नाही. त्यामुळे तिसऱ्या वर्षीपासून हा उत्सव थांबला व गणेश पूजनाचीही प्रथा खंडित झाली. त्यानंतर काही दिवसांनी परिसरातील रहिवाशांना काही त्रास उद्भवू लागले. अनेक जण विविध आजारांनी ग्रासले. कोणाला काही कळत नसल्याने ग्रामस्थांनी देवाचा कौल घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे येथील ग्रामदेवतेला अचानक उद्भवलेल्या त्रासाबद्दल, आजारपणाबद्दल विचारले गेले. तेव्हा गणेशाच्या पूजनाची प्रथा सुरू करून नंतर त्यात खंड पडल्याने हा प्रकार होतो आहे, हे ग्रामस्थांना समजले. त्यानंतर पुढील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्रामस्थांनी येथील गणेशपूजनाची प्रथा पुन्हा सुरू केली व काही दिवसांत या मूर्तीचे विसर्जन केले. त्यासोबतच गावातील आजारपणेही गेली.
असे सांगितले जाते की या गणपतीसमोर तेलाचा नवस करण्यात येत असे. या नवसाच्या तेलाचा दिवा मूर्तीसमोर अखंड तेवत असे. तेल संपले की मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असे. सुरुवातीला एका लहानशा बाकावर गणेशाची मूर्ती पूजली जात होती. त्यानंतर याठिकाणी काही दिवसांसाठी झापांचा आडोसा करण्यात येऊ लागला. अनेक वर्षे हीच प्रथा सुरू होती. त्यानंतर भाविकांकडून या गणपतीसमोरचे नवस वाढू लागले. गणेश विसर्जनानंतर ही जागा मोकळी असायची. त्यातून या जागेवर मंदिर उभारण्याची कल्पना सर्वानुमते मांडण्यात आली. सुमारे १०० वर्षांपूर्वी येथे मंदिराची उभारणी झाली. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. संपूर्ण जांभ्या दगडाचे बांधकाम असलेल्या या मंदिराच्या मुखमंडप व गर्भगृहावर शिखरे आहेत. मुखमंडपातील काही पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला मूषकराजांच्या मूर्ती आहेत. येथील सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा असून भोवताली भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या सभामंडपात कोरीव दगडी स्तंभ आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहातील वज्रपीठावर गणेशमूर्ती विराजमान असते. उर्वरित कालावधीत येथे केवळ गणेशाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.
मूळ वेंगुर्लावासी, पण मुंबईत स्थायिक असलेले चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीचे लोक या गणेशाला मोठ्या प्रमाणावर तेलाचा नवस बोलतात. सध्या या मंदिरात पाच फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तीची आश्विन अमावस्येला प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर कार्तिक, मार्गशीर्ष, पौष व माघ या चार महिन्यांपर्यंत या मंदिरात गणपतीची पूजा होते. पूर्वी काही दिवस पूजली जाणारी येथील मूर्ती नवसाचे तेल वाढत असल्याने सध्या तिचे पूजन लांबते. मात्र तरीही या मूर्तीचे फाल्गुन पौर्णिमेआधी विसर्जन केले जाते. या काळात दररोज सायंकाळी या गणपतीसमोर भजन केले जाते. त्यानंतर होणाऱ्या आरतीच्या वेळी खोबरं व खव्याच्या मोदकांचा प्रसाद दिला जातो. याशिवाय गणेश विसर्जन होण्यापूर्वी ‘म्हामना’ (महाप्रसाद) दिला जातो. यासाठी उभादांडा परिसरातून घराघरांमधून शिधा दिला जातो व सर्व गावकरी या प्रसादाला उपस्थित असतात. माघी जयंतीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपतीची जत्रा असते. त्यावेळी दशावताराचे नाटक सादर केले जाते. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर इतर वेळी या मंदिरात केवळ गणपतीची प्रतिमा ठेवली जाते. या काळातही एकादशी व संकष्टीला येथे भजनाचा कार्यक्रम होतो.