सावंतवाडी तालुक्यातील माजगाव डोंगराच्या पायथ्याशी असलेले देव स्वयंभू महादेवाचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. भक्तांच्या कल्याणासाठी धरतीच्या उदरातून प्रकट झालेला लिंगरूपी महादेव येथे वास करतो, अशी मान्यता आहे. जो स्वतः उत्पन्न झाला आहे किंवा ज्याचा कोणी निर्माता नाही, तो स्वयंभू! भूमीच्या पोटातून आपसूक बाहेर आलेल्या शिवलिंगांना विशेष महत्त्व आहे. अशी शिवलिंगे ऊर्जेचे स्रोत असून मानवी जीवनास ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यास साह्यभूत ठरतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
स्वयंभू महादेवाची आख्यायिका अशी की सुमारे ४०० वर्षांपूर्वी या भागात घनदाट जंगल होते. गावातील गुराखी गुरे चरण्यासाठी या जंगलात सोडीत असत. एकदा एका दुभत्या गाईने दूध देणे बंद केले तेव्हा रानात कुणीतरी गाईचे दूध काढून घेत असावे, असा गुराख्याला संशय आला. त्यामुळे त्यांनी गाईवर पहारा ठेवला, तेव्हा त्याला लक्षात आले की ही गाय रानात एका विशिष्ट ठिकाणी स्वतःहून पान्हा सोडते. त्याने ही गोष्ट इतर गुराख्यांना सांगितली. सर्व गुराख्यांना याचे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या ठिकाणी खोदून पाहिले असता त्यांना जमिनीत शिवपिंडी आढळली. ही गोष्ट वाऱ्यासारखी गावात पसरली व सर्व गाव स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी लोटले. पुढे गावकऱ्यांनी याच ठिकाणी मंदिर बांधले. ते स्वयंभू महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
स्वयंभू महादेव मंदिराची प्रवेश कमान मुख्य रस्त्यावर आहे. या कमानीच्या दोन्ही बाजूला हत्तींचे पुतळे आहेत. वरच्या आडव्या खांबावर दोन्ही बाजूस कळस व मध्यभागी मयूरयुगुल आहे. या कमानीतून पुढे आल्यावर स्वयंभू महादेवाचे कौलारू व प्रशस्त मंदिर नजरेस पडते. या मंदिराजवळ एक तलाव असून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या तळ्यात स्नान करून ओल्या अंगाने देवाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. मंदिराच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूला एका दगडी चौथऱ्यावर सुमारे वीस फूट उंचीचा पाचस्तरीय दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाच्या बाजूस तुळशी वृंदावन आहे. जमिनीपासून अडीच ते तीन फूट उंचीवर हे मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
येथील सभामंडप हा अर्थखुल्या प्रकारचा आहे व त्यात बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात सर्वत्र दगडी खांब आहेत. त्यावर संगमरवरी फरशा लावलेल्या आहेत. यापैकी काही खांब हे कक्षासनांवर तर उर्वरित खांबांच्या दोन रांगा या सभामंडपाच्या मध्यभागी आहेत. कोकणी स्थापत्यशैलीप्रमाणे सभामंडपाच्या जमिनीचा या दोन स्तंभांच्या रांगेमधील भाग काही इंच खोलगट आहे. सभामंडपाच्या छतावर अनेक लहान-लहान झुंबर लावलेले आहेत. सभामंडपाच्या पुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून अंतराळ आहे. अंतराळात एका लहानशा चौथऱ्यावर महादेवाचे वाहन असलेला नंदी आहे. नंदीची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची द्वारपट्टी ही कमानीच्या आकारीची असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव नक्षीकाम केलेले आहे.
अंतराळातून पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दाराची लाकडी चौकट सुमारे एक फूट रुंद व कमानीसारखी बाकदार आहे. या चौकटीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. शिवलिंगावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. सभामंडपासोबतच येथील अंतराळ व गर्भगृहातही काचेचे सुंदर झुंबर लावलेले आहेत. गर्भगृहाच्या वरती चौकोनाकार शिखर आहे व त्यावर कळस आहे. या मंदिर परिसरात अनेक प्राचीन वीरगळही आहेत.
त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी येथे मोठी यात्रा असते. महाशिवरात्रीसही येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. श्रावणी सोमवारी येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देव स्वयंभू महादेवाची यात्रा व उत्सवानिमित्त हजारो भाविक येथे देवाच्या दर्शनाला येतात. मंदिराच्या उजव्या बाजूला रवळनाथ मंदिर आहे. येथे रवळनाथाची काळ्या पाषाणातील मूर्ती व इतर परिवार देवता आहेत. रवळनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला सुतारवस मंदिर आहे. या मंदिराच्या समोर सावंतवस पंचायतन मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला मुलांसाठी बालोद्यान आहे.
स्वयंभू महादेव मंदिराशिवाय माजगावमध्ये असलेले सातेरी देवीचे मंदिरही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची सर्वत्र ख्याती आहे. महिषासुरमर्दिनी रूपातील देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या एका हातात तलवार, दुसऱ्यात ढाल, तिसऱ्या हातात त्रिशूल व चौथ्या हातात महिषासुराचे शिर आहे. या मूर्तीची इ.स. १९०६ मध्ये या मंदिरात प्रतिष्ठापना झाल्याची नोंद आहे. या मंदिराच्या शेजारी बाराचा चव्हाटा, देव वेतोबा, देव म्हारिंगण अशी मंदिरे आहेत. पौष कृष्ण प्रतिपदेला येथे मोठी यात्रा असते. यावेळी तालुक्यातील अनेक भाविक उपस्थित असतात.