पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानातील म्हणजे आजच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६५ खेड्यांतील चाळ्यांचा प्रमुख व या खेड्यांचा मालक, अशी उपरलकर देवाची मान्यता आहे. सुमारे ३५० वर्षांपासून सावंतवाडी शहराच्या सीमेवर स्थित असलेले हे देवस्थान सावंतवाडी राजघराण्याचे इष्टदैवत होते. भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा देव म्हणून या देवस्थानाची ख्याती संपूर्ण कोकणासह महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांतही पसरली आहे. असे सांगितले जाते की हे देवस्थान स्मशानभूमीत वसलेले आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे लाखो भाविकांचे ते श्रद्धास्थान बनले आहे.
या देवस्थानाची आख्यायिका अशी की सावंतवाडी येथील सावंत-भोसले राजघराण्याकडून राज्याच्या चारही सीमेच्या रक्षणाची जबाबदारी चार रक्षक देवतांवर सोपवली होती. उपरलकर, माठेवड्यातील दिंडीकर, साईलवाड्यातील काजेकर, गरडीतील हेलकर. यापैकी इतर तीन सीमारक्षक उपरलकर देवाच्या अधीन राहून काम करीत. अशी मान्यता आहे की या चारही रक्षकदेवता शंकराचा अवतार आहेत. एकदा सावंतवाडी संस्थांनावर शत्रूने आक्रमण केल्याची बातमी घेऊन सेनापती दळवी हे राजे आबासाहेबांकडे आले. पहाटेची वेळ असल्याने आबासाहेब देवपूजेस बसले होते. त्यावेळी संस्थानाची परिस्थिती नाजूक असल्याने शत्रूचा प्रतिकार करण्याची शक्ती संस्थानात नव्हती; परंतु आबासाहेबांची देव उपरलकरावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी सेनापती दळवी यांच्या हातात एक नारळ देऊन संस्थानाच्या रक्षणासाठी देव उपरलकर यांस गाऱ्हाणे घालून नारळ वाढविण्यास सांगितले.
राजआज्ञेप्रमाणे सेनापती दळवी यांनी देव उपरलकर यास संस्थानावर आलेले संकट परतवून लावण्याची प्रार्थना केली आणि देवासमोर नारळ वाढवला. नारळ वाढवल्याक्षणीच देवाच्या पाषाणामागून गांधील माश्यांचे मोहोळ उठले. लाखोंच्या संख्येत असलेल्या या गांधील माश्या शत्रू सैन्यावर तुटून पडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शत्रूस पळता भुई थोडी झाली. शत्रू सैन्य जेव्हा माघारी फिरले, तेव्हा गांधील माश्यांचे मोहोळ पुन्हा देवस्थानी परतून एका झाडावर बसून शांत झाले. देव उपरलकराच्या कृपेने संस्थानावरील मोठे संकट टळले होते. हा देव जागृत असून संकटकाळी धावून येतो, याची प्रचिती त्यामुळे संपूर्ण संस्थानाला आली. तेव्हापासून कोकणातील व राज्यातील भाविकांची या देवावर अपार श्रद्धा आहे. देव उपरलकरासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना केल्यास तो भक्तांचे रक्षण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देव उपरलकर देवस्थान हे स्मशानभूमीत आहे. असे असले तरी येथील परिसर अतिशय सुंदर व निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. रस्त्यालगत या देवस्थानाची एक मोठी कमान आहे. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात रुढार्थाने कोणतेही मंदिर नाही. अशी मान्यता आहे की देव उपरलकर हा संपूर्ण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भ्रमण करणारा देव असल्याने त्याला मंदिरात बंदिस्त होऊन राहणे मान्य नाही. त्यामुळे येथे मंदिर बांधलेले नाही, तसेच देवाच्या डोक्यावर छप्पर नाही. आकाशाच्या छताखाली जमिनीपासून काहीशा खालच्या बाजूला असलेल्या वज्रपीठावर देव उपरलकराच्या काळ्या पाषाणातील दोन मूर्ती आहे. या मूर्तींच्या तिन्ही बाजूला सुमारे दोन फूट उंचीच्या भिंती आहेत. या मूर्तींच्या मागे एका मोठ्या चौथऱ्यावर नव्याने घडविण्यात आलेली देव उपरलकराची मोठी व सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायाभोवती सात फण्यांच्या विशाल नागाने वेढा घातलेला आहे आणि आपल्या फण्यांचे छत्र या मूर्तीच्या शिरावर धरलेले आहे. या मूर्तीच्या डोक्यावर रुबाबदार फेटा, हातात काठी आणि पायात चप्पल आहे. अंगात उंची वस्त्रे घातलेली व मर्दानी मिशी असलेली ही मूर्ती सजीव भासते.
देव उपरलकर देवस्थानच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीत मृतांचे दाह संस्कार केले जातात व क्रियाकर्मे येथून जवळच असलेल्या आत्मेश्वरी तळीत केले जातात. देव उपरलकर हा ३६५ खेड्यांचा मालक आहे, असे मानले जाते. त्यामुळे या सर्व खेड्यांतील ग्रामदैवत या देवाच्या आधीन आहेत, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या गावांतील प्रमुख गावकरी मंडळी कोंबडे, बकरे, नारळ, विडा घेऊन या देवाला मान अर्पण करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात येथे येत असत. देवाला पशू बळी अर्पण केला जात असे. पूर्वीच्या काळी राजे स्वतः या देव कार्यात पुढाकार घेत असत. पुढे सुधारणांचे वारे घोंगावू लागल्यानंतर येथील पशुबळीची प्रथा बंद झाली.
येथे भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देव उपरलकर वाढदिवस सोहळा दरवर्षी १ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या निमित्ताने येथे मोठी जत्रा भरते. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक देव उपरलकराच्या दर्शनासाठी येतात. याशिवाय दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी येथे भाविकांची गर्दी असते. भाविकांकडून येथे देव उपरलकराला गाऱ्हाणी घातली जातात. गनिमाचा जसा पराभव केला, तसा आपल्या विरोधकांचा पराभव व्हावा व आपला विजय व्हावा, असे साकडे घालण्यासाठीही अनेक राजकीय नेते व उमेदवार या देवासमोर नतमस्तक होतात.