सातेरी भद्रकाली मंदिर

आरोंदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

प्राचीन काळापासून अरबी समुद्रात चालणाऱ्या व्यापाराचे केंद्र असलेल्या बंदराचे गाव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील अरोंदा या गावाची ओळख आहे. पूर्वी या गावात भरपूर लाल कमळे फुलत असत. कमळ फुलाला ‘अरविंद’ असेही म्हटले जाते. त्यावरून या गावाचे नाव अरविंद व पुढे त्याचा अपभ्रंश होऊन आरोंदा असे झाल्याचे सांगितले जाते. अशा या निसर्गसमृद्ध आरोंदा गावची स्वयंभू देवी सातेरी व देवी भद्रकाली हे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवी भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या आहेत, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा हे गाव देवी सातेरी व देवी भद्रकाली यांच्या मंदिरांमुळेही प्रसिद्ध आहे. या गावाला लागून असलेली खाडी ही महाराष्ट्र व गोवा या राज्यांची नैसर्गिक सीमारेषा ठरली आहे. हे गाव येथे पिकणाऱ्या नारळ, आंबा, काजू, फणस, कोकम व तांदूळ यासाठी प्रसिद्ध आहे. गावाच्या शेजारी असलेल्या प्राचीन व्यापारी बंदरामुळे गावाची गणना पूर्वीपासून श्रीमंत गावांत केली जात असे. गावातील देवी सातेरी व देवी भद्रकाली यांचे मोठे मंदिर संकुल पाहून त्याची प्रचिती येते. ही मंदिरे ३०० ते ३५० वर्षे प्राचीन असली तरी २००० मध्ये झालेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणानंतर या मंदिरांना सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. सन २००० पासून १० मे हा दिवस येथील मंदिर संकुलाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

रस्त्यालगत असलेल्या देवी सातेरी भद्रकाली देवस्थानाच्या तीन मजली प्रवेशद्वारातून या मंदिर संकुलाच्या प्रांगणात प्रवेश होतो. कमानीकृती असलेल्या येथील प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे व त्याच्या दोन्ही बाजूला चवऱ्या ढाळणाऱ्या गजराजांच्या प्रतिमा आहेत. या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराला लागून एक दुमजली धर्मशाळा आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या बाजूला देवी भद्रकाली तर समोरील बाजूस देवी सातेरी यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. अनेक देव-देवतांचा वास असलेला मंदिर परिसर विस्तीर्ण आहे. चहुबाजूने उंचच उंच असणाऱ्या अनेक नारळांच्या झाडांमुळे हा परिसर आणखी खुलून दिसतो.

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी देवी भद्रकाली मंदिराची रचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. मुखमंडपातून मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे सभामंडप, तर डावीकडे अंतराळ व गर्भगृह आहे. कौलारू असलेल्या या सभामंडपात दगडी खांब आहेत. हा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा असून त्याभोवती बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. आयताकृती सभामंडपात दगडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. दोन्ही हातांच्या कवेत बसतील अशा रुंदीचे हे स्तंभ आहेत. कोकणी स्थापत्यशैलीप्रमाणे सभामंडपाच्या जमिनीचा या दोन स्तंभांच्या रांगेमधील भाग काही इंच खोलगट आहे. मुखमंडपाच्या डावीकडील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून अंतराळ व गर्भगृह आहे. येथील अंतराळातील सर्व खांब हे एकमेकांशी कमानीकृती कलाकुसरीने जोडलेले आहेत. अंतराळाच्या छताचा आकार हा गजपृष्ठाकार (हत्तीच्या पाठीसारखा) आहे.

गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर संगमरवरी कलाकुसर केलेली असून दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी एका वज्रपीठावर देवी भद्रकालीची काळ्या पाषाणातील तांदळा स्वरूपातील पूर्वाभिमुख मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे, भुवया, कपाळावरील गंध, नाक व त्यावरील नथ तसेच ओठ चांदीचे आहेत. या मूर्तीच्या मागील बाजूस असलेल्या धातूच्या त्रिकोणी मखरावर वरच्या बाजूला कीर्तिमुख व त्यावरील बाजूस पाच फण्यांचा पितळी नाग आहे. या मखराच्या दोन्ही बाजूला पाच-पाच असे दहा धातूंचे फणा काढलेले नाग आहेत. या देवीच्या मूर्तीसह येथे देव परब वस, देव गावडे वस, देव पूर्वज, देवीची उत्सव मूर्ती व इतर परिवार देवता आहेत. या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर हे घुमटाकार असून त्या शिखराच्या खालील थरामध्ये देवीच्या विविध रूपांची शिल्पे आहेत.

देवी भद्रकाली मंदिराला लागून शेजारी देवी सातेरीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर दोन चौथरे आहेत. त्यापैकी एकावर सातस्तरीय दगडी दीपस्तंभ व दुसऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. सातेरी मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात भोवताली कक्षासने आहेत. येथील अंतराळ हा सभामंडपापासून काहीसा वरच्या बाजूला आहे. सभामंडपापासून चार पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळ बंदिस्त असून त्याच्या बाजूनेही भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळाच्या मध्यभागी असणारे स्तंभ हे कमानीसदृश्य कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी वारूळरूपी देवी सातेरीची उत्तराभिमुख मूर्ती आहे. मुख्य मूर्तीसोबत गर्भगृहात देव नाथपंत, देव जयनाथ व देव पूर्वज यांच्याही मूर्ती आहेत. या गर्भगृहावर अष्टकोनी शिखर असून त्याखाली भद्रकाली मंदिराच्या शिखराप्रमाणे देवींच्या विविध रूपांतील मूर्ती आहेत. या गर्भगृहाबाहेर मंदिर संकुलात देव मुळनाथ, देव दांडेकर, तर समोरील बाजूस जन्मदेव, ब्राम्हण देव, लिंग देव यांची स्थाने आहेत. याशिवाय मंदिर परिसरात अकारी, निराकारी, जाखरनाथ, गुरुनाथ, बाबर पीर व इतर देवतांची पाषणे आहेत.

मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीस येथे दोन दिवसांची मोठी यात्रा भरते. पहिल्या दिवशी येथील सर्व देवतांचा अभिषेक व साग्रसंगीत पूजा केली जाते. ब्राम्हणभोज तसेच भाविकांना महाप्रसाद वाटप केले जाते. रात्री देवतांची पालखी काढली जाते. रात्री एकच्या सुमारास पालखी सोहळा संपल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यानंतर पहाटेपर्यंत दशावतारी नाटक सादर केले जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे देवतळ्यात देवतांच्या आंघोळीने जत्रेची सांगता होते. नवस फेडण्यासाठी तसेच नवसाच्या तुला करण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. देवीची मानाची ओटी भरण्यासाठीही येथे माहेरवाशिणी (या गावातून लग्न होऊन सासरी गेलेल्या स्त्रिया) मोठ्या प्रमाणावर येतात. याशिवाय दरवर्षी १० मे रोजी होणारा वर्धापन दिन सोहळाही येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. यावेळीही मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येते.

उपयुक्त माहिती

  • सावंतवाडीहून २७ किमी, तर वेंगुर्ल्याहून २३ किमी
  • सावंतवाडी व वेंगुर्ला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home