वेतोबा मंदिर

आजगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव हे ऐतिहासिक व निसर्गसंपन्न गाव प्राचीन काळी ‘आद्यग्राम’ या नावाने ओळखले जाई. अमरकोशानुसार ‘अजगव’ म्हणजे ‘पिनाक’ अर्थात शंकराचे धनुष्य. या नावावरून आजगाव या ग्रामनामाची व्युत्पत्ती झाली असावी, असे सांगण्यात येते. अशा प्रकारे शिवशंकराशी संबंधित असलेल्या या गावाची ग्रामदेवताही शिवगणातील म्हणजेच वेताळ किंवा वेतोबा ही आहे. ही देवता जागृत, भक्तांच्या संकटसमयी धावून येणारी आणि नवसास पावणारी, अशी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नवसपूर्तीनंतर भाविक या देवाला केळीचा घड तसेच वहाणा अर्पण करतात.
वेतोबा हा शिवभक्त व भूतपिशाच्चांचा अधिपती मानला जातो. शिवपुराण शतरूद्रसंहितेतील कथेनुसार वेताळ हा मूळचा शंकर-पार्वतीचा द्वारपाल होता. एकदा पार्वतीला त्याने दाराजवळ अटकाव केला म्हणून ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप तिने त्याला दिला. कालिकापुराणातील उल्लेखानुसार वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा शिवदूत होता. त्याला महाकाल नावाचा भाऊ होता. पार्वतीने शाप दिल्याने या दोन्ही भावंडांनी पृथ्वीवरील राजा चंद्रशेखराची राणी तारावती हिच्या पोटी वेताळ आणि भैरव या नावाने जन्म घेतला. हे दोन्ही चंद्रशेखर राजाचे औरस पुत्र नव्हते. ते शंकराच्या कृपेने तारामतीच्या पोटी जन्माला आले होते. चंद्रशेखर राजाने जेव्हा आपल्या मुलांमध्ये संपत्तीचे वाटप केले तेव्हा औरस पुत्र नसलेले भैरव आणि वेताळ यांना काहीच मिळाले नाही. तेव्हा ते तप करण्यासाठी अरण्यात गेले. पुढे वसिष्ठ ऋषींच्या कृपेने त्यांना शंकराचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने शिवगणात स्थान मिळाले.

कालौघात वेताळमधील ‘ळ’ जाऊन आदरार्थी ‘बा’ हा प्रत्यय लागला व वेताळ हा वेतोबा या नावाने संबोधला जाऊ लागला. तो अष्टभैरवांपैकी एक असून त्याला क्षेत्रपाल, ग्रामदेवता वा ग्रामसंरक्षक असेही मानले जाते. भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की वेतोबा त्याच्या सैनिकांसह रात्री गावामध्ये संचार करतो. हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी टाकून तो गावाच्या संरक्षणासाठी फिरतो. या संचारात त्याची पादत्राणे झिजतात. त्यामुळे नवसाप्रीत्यर्थ वा कृतज्ञतेच्या भावनेपोटी भक्तजन त्याला वहाणा अर्पण करतात. वेतोबाच्या आरवली तसेच आजगावच्या मंदिरात भक्तांनी वाहिलेल्या अशा मोठमोठ्या आकाराच्या वहाणा पाहावयास मिळतात.

स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात येणाऱ्या स्थानमाहात्म्यानुसार आजगाव येथील वेतोबाचे मंदिर चौदाव्या ते पंधराव्या शतकातील आहे. पूर्वी येथे वेतोबाचे साधे कौलारू व मातीचे मंदिर होते. या मंदिरात इ. स. १८६१ मध्ये सोनचाफ्याच्या लाकडाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. मात्र त्या काष्ठमूर्तीची झीज झाल्याने पुढे १९ मे १९७६ रोजी त्या काष्ठमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले व त्या ठिकाणी वेतोबाची पंचधातूची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. ही मूर्ती मुंबईतील वांद्रे-कलानगर येथील मूर्तिकार लक्ष्मण राजाराम आजगावकर यांनी साकारली होती. वेतोबाचे मंदिरही जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी त्याचे नूतनीकरण करण्याचे ठरविले. त्याकरीता प्रथेनुसार वेतोबाचा हुकूम घेण्यात आला. एरवी देवतांचा कौल घेण्यात येतो. पण आजगावचा वेतोबा मात्र हुकूम देतो, अशी श्रद्धा आहे. याकरीता वेतोबास तांदूळ लावण्यात येतात. त्याने ‘उजवी शेष’ दिल्यास योजलेले काम करण्यास त्याची संमती आहे, असे मानले जाते. वेतोबाच्या मंदिराच्या नूतनीकरणाबाबतच्या हुकूमाबाबत अशी कथा सांगण्यात येते की ग्रामस्थांनी वेतोबाकडून त्याबाबत हुकूमाची याचना केल्यानंतर बरेच दिवस झाले तरी तसा हुकूम मिळत नव्हता. अखेरीस जेव्हा ग्रामस्थांनी वेतोबास कबूल केले की त्याच्या देवी भूमका, रवळनाथ, आदित्यनाथ, रामेश्वर, सर्वेश्वर, भार्गवराम, नारायण आदी परिवारदेवतांच्या मंदिरांचेही नूतनीकरण, जीर्णोद्धार आदी कामे करू, तेव्हाच वेतोबाने मंदिर नूतनीकरणास परवानगी दिली. त्यानुसार २०१२ मध्ये येथे वेतोबाचे भव्य आणि सुंदर असे मंदिर बांधण्यात आले.

मुखमंडप, त्यावर नगारखाना, प्रशस्त मुख्य सभामंडप, उप सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या देखण्या मंदिराची संरचना आहे. प्रशस्त आवारामध्ये स्थित असलेल्या मंदिराच्या दोन्ही बाजूंस उंच दीपस्तंभ आहेत. डाव्या बाजूस असलेल्या ११ स्तरीय दीपस्तंभाजवळ तुळशी वृंदावन आहे. मुखमंडपावर दोन मजली नगारखाना आहे. त्यावर कोकणी स्थापत्यशैलीतील उतरत्या छपराचे शिखर आहे. मंदिराचा मुख्य सभामंडप दुमजली व समतल छताचा आहे. हा मंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे मंडपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस असलेली पायऱ्यांच्या आकाराची बैठकव्यवस्था. ही वैशिष्ट्यपूर्ण कक्षासने हे या मंडपाचे विशेष वेगळेपण ठरते. येथेच नवसफेड म्हणून भक्तांनी वाहिलेल्या चपलांचे जोड ठेवलेले आहेत. पूर्णतः संगमरवरी फरशी बसवलेल्या या मंडपातून दोन पायऱ्या उंचावर उप सभामंडप आहे. आकाराने लहान असला, तरी मोठाल्या खिडक्या, दुमजली उंची यामुळे हा मंडपही प्रशस्त भासतो.

येथून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या दर्शनीभिंतीवर डावीकडे नमस्कार मुद्रेतील हनुमानाची, तर उजवीकडे नमस्कार मुद्रेतील गरुडाची मोठी मूर्ती आहे. अंतराळाचे प्रवेशद्वार मोठे आणि लाकडी आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती कोरलेली आहे. दोन्ही बाजूंस किंचित उतरते छत असलेल्या अंतराळात एका बाजूस दोन मोठ्या स्तंभांच्या दरम्यान तीन तरंगकाठ्या ठेवलेल्या आहेत. रवळनाथ, भूतनाथ आणि पावणाई यांच्या या तरंगकाठ्या आहेत. येथेच खाली ओट्यावर ‘मूर्ती रवळनाथ’ आहे. असे सांगण्यात येते की रवळनाथाची ही मूर्ती रेडीजहून एका सिद्धपुरुषाने येथे आणली होती. ही मूर्ती त्यास समुद्रात सापडली होती. आजगावमध्ये सोवळेओवळे व्यवस्थित पाळले जाते, हे पाहून त्याने ही मूर्ती वेतोबा मंदिरात ठेवली. या तरंगकाठ्यांजवळच एका कपाटामध्ये वेतोबाची वस्त्रे ठेवलेली आहेत. ही वस्त्रे खास उत्सवप्रसंगी वापरली जातात. एरवी धोतरजोडी व उपरणे हा वेतोबाचा वेष असतो.

मंदिराच्या गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर काचा बसवण्यात आल्या आहेत. आत वेतोबाची १२ फूट उंचीची उभी मूर्ती आहे. दाढी, मिशा, मस्तकी चंदेरी मुकुट अशा या द्विभुजामूर्तीच्या उजव्या हातात खड्‌ग आणि डाव्या हातात जलपात्र आहे. पायात सर्पाकृती तोडे आहेत. पायाशेजारी गण आहेत. या मूर्तीसमोरच वेतोबाची पंचधातूची मूर्ती आहे.

मंदिराच्या मुख्य सभामंडपास जोडून उजव्या बाजूस भूमिका देवीचे मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर काळ्या पाषाणातील भूमिका देवीची साडीतील व दागिन्यांनी मढवलेली मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे चंदेरी मखर आहे. त्याच्या दोन्ही बाजूस तळाशी हाती चामर घेतलेल्या दोन सेविकांच्या सुबक मूर्ती कोरलेल्या आहेत.

या मंदिराच्या दर्शनीभिंतीजवळ खाली एका ओट्यावर चौखंब्याच्या देवता आहेत. सभामंडपास काही ठिकाणी चौखंबा असे म्हटले जाते. या ठिकाणी असलेल्या देवता या मंदिराच्या कार्यवाही देवता अशा स्वरूपात असतात. या देवतांसमोर बसून देवस्थानच्या कारभाराबद्दल निर्णय घेतले जातात. या देवतांसमोर कोणी खोटे बोलू शकत नाही, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे वेतोबाच्या मंदिरास सर्वत्र चकचकीत संगमरवरी फरशा बसवलेल्या असल्या, तरी या चौखंब्याच्या ठिकाणी मात्र मातीचीच भुई ठेवलेली आहे. मंदिराच्या आवारात देव दांडेकराचेही छोटे मंदिर आहे.

वेतोबा मंदिरात दर सोमवारी दुपारी भाविकांसाठी मोफत अन्नदान केले जाते. दररोज नित्यपूजेबरोबर विशेष सणांच्या दिवशी खास उत्सव साजरे केले जातात. येथे दरवर्षी वैशाख कृष्ण षष्ठीला वेतोबाचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो. त्या वेळी येथे लघुरुद्र, महाप्रसाद, तसेच रात्री पालखीचा सोहळा असतो. त्या दिवशी दशावतारी नाटकही सादर केले जाते. याच दिवशी अनेक जण नवस फेडण्यासाठी येथे येत असतात. या देवास सात्विक नैवेद्य अर्पण केला जातो. केळीचा घड, साखर, नारळ वाहिले जातात. त्यासोबत येथे वड्याचा नैवेद्यही अर्पण केला जातो. वडे, गुळवणी व वाटाण्याची आमटी असा हा नैवेद्य असतो. देवाच्या या जत्रोत्सवास भाविकांची अलोट गर्दी होते. पंचक्रोशीतील भाविकांप्रमाणेच अगदी मुंबई, पुण्यातून एवढेच नव्हे, तर परदेशातूनही येथे भाविक येतात.

आजगावमध्ये वेतोबाच्या मंदिराप्रमाणेच अग्निवेताळाचे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की देशभरात व कोकणातही वेताळाची अनेक मंदिरे असली, तरी आग्यावेताळाची मंदिरे मात्र दुर्मीळ आहेत. आजगावचा आग्यावेताळ हा नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. विशिष्ट कार्याकरीता येथे भाविक या मंदिरात येऊन अग्निवेताळास कौल लावतात.

वेताळाचे भूतनाथ हे एक पर्यायी नाव आहे. त्याच प्रमाणे तो आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ या नावांनीही ओळखला जातो. या नावांतून त्याचे उग्र गुणविशेष दिसतात. महाभारत, पुराणे यांतून व लोकवाङ्मयातून वेताळाची जी वर्णने आढळतात, त्यानुसार तो डोळ्यांत क्रौर्य असलेला आणि महाकाय असतो. तो रक्तमांस खातो व सदैव शस्त्रसज्ज असतो. या वेताळाचे वर्णन ‘विक्रम आणि वेताळ’ या कथांमध्येही येते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्रतिष्ठानच्या सातवाहन राजाच्या पदरी मंत्री असलेल्या गुणाढ्याने पैशाची भाषेत ‘बृहत्कथा’ हा महाग्रंथ लिहिला होता. अकराव्या शतकात काश्मीरमधील अनंतराजाची राणी सूर्यावती हिने सोमदेवभट्ट या कवीकडून ‘बृहत्कथे’वरून संस्कृतात ‘कथासरित्सागर’ हा ग्रंथ लिहून घेतला. याच कथासरित्सागर ग्रंथात विक्रम आणि वेताळाच्या पंचवीस कथा आहेत. त्यातील वर्णनानुसार वेताळ हा स्मशानात वास्तव्य करणारा आहे व तो प्रेतांमध्ये वास करतो. कोकणात मात्र वेताळास ग्रामसंरक्षक देवता मानले जाते व तो हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन मध्यरात्री गावातून फिरतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. अग्निवेताळ हे त्याचे भयकारक उग्र रूप असल्याचे मानले जाते.

या देवाचे मंदिर आजगावमधील पांढरेवाडी येथे आहे. मंदिरात वेताळाची पाषाणाची उभी मूर्ती आहे. तिच्या एका हातात अग्नी व एका हातात तलवार आहे. डोईवर मंदिल आणि कानात मोठी कुंडले आहेत. चेहऱ्यावर दाढी आणि मिशा आहेत. विशेष म्हणजे हे मंदिर आग्यावेताळाचे असले तरी येथील मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव सौम्य आहेत. मूर्तीशास्त्रानुसार वेताळाच्या मूर्तीच्या गळ्यात मुंडमाला असते. येथील मूर्तीच्या गळ्यात तशी मुंडमाला नाही. मंदिराच्या उजव्या बाजूस मोठा अग्निमंडप उभारण्यात आला आहे. त्यात तीन ते चार फूट खोल अग्निकुंड आहे. त्याच्या बाजूस गोलाकारात बसवलेल्या फरशांमध्ये तांत्रिक पद्धतीचे अग्नियंत्र तयार केलेले आहे.

आजगावचा हा अग्निवेताळ नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्याला भाविकांकडून वडाच्या पानांचा कौल लावण्यात येतो. या मंदिरात नेहमीच भाविकांची ये-जा असते. येथे पंचक्रोशीतील भाविकांप्रमाणेच, गोवा, तसेच मुंबई, कोल्हापूर येथूनही भाविक येतात.

उपयुक्त माहिती

  • सावंतवाडीपासून २४ किमी तर ओरोसपासून ५१ किमी अंतरावर
  • सावंडवाडी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : सुधाकर आपटे, मो. ९४२३११३४८८
Back To Home