मुंबई–गोवा महामार्गावर खारेपाटणपासून काही अंतरावर असलेल्या तळेरे गावातील प्राचीन गांगेश्वर महादेव मंदिर हे येथील ग्रामदैवत आहे. कणकवली तालुक्यातील मोठ्या व प्रसिद्ध देवस्थानांपैकी ते एक मानले जाते. येथे होणाऱ्या उत्सवांमध्ये परिसरातील १५ ते २० गावांतील ग्रामस्थ सहभागी होतात. कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेला येथे साजरा होणारा वार्षिक उत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवात ओटी भरण्यासाठी माहेरवाशिणींची (या गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या स्त्रिया) मांदियाळी असते. येथील गांगेश्वर आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करतो, अशी परिसरातील माहेरवाशिणींची श्रद्धा आहे.
मुंबई–गोवा महामार्गावर तळेरे फाट्यापासून साधारणतः दोन किमी अंतरावर गांगेश्वर महादेवाचे मंदिर आहे. प्रशस्त प्रांगणात असलेल्या मंदिराभोवती तटभिंती आहेत. या तटभिंतीमध्ये असलेल्या प्रवेशद्वारापासून काहीसे खाली उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील प्रवेशद्वार चारखांबी व कौलारू रचनेचे आहे. प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस होमकुंड व तुळशी वृंदावन आहे. कौलारू व दुमजली असणाऱ्या या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. हे देवस्थान प्राचीन असले तरी २०१८ मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मंदिराच्या समोरील बाजूस तीन कमानी आहेत. त्यापैकी मधल्या कमानीसमोर बाहेरील बाजूने मुखमंडपाची कमान आहे. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील मुखमंडप व सभामंडपाची रचना अर्धखुल्या स्वरूपाची आहे. त्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.
मंदिराच्या अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर लाकडी मखरांत उजवीकडे गणपतीची व डावीकडील मखरात सरस्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार लाकडी व वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेले आहे. येथील द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर शिवलिंग कोरलेले आहे. या शिवलिंगावर शेषाने छत्र धरलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूला चवऱ्या ढाळणारे गजराज आहेत. गर्भगृहाच्या लहानशा कमानाकृती दारावर अंतराळातून शिवलिंगाचे दर्शन व्हावे, यासाठी स्टीलची जाळी बसविण्यात आलेली आहे. या जाळीच्या सभोवती सुंदर नक्षीकाम आहे. त्यात दोन्ही बाजूला मयूर कोरलेले आहेत. गर्भगृहात मध्यभागी एक सयोनी शिवपिंडी (सर्वसाधारणतः नेहमी पाहतो ती) आहे. त्यामागे अयोनी शिवपिंडी (केवळ दंडगोलाकार उंचवटा) आहे. उत्सवकाळात या अयोनी शिवलिंगावर देवाचा मुखवटा लावला जातो. मंदिराच्या सभामंडपावर एक लहानसे घुमटाकार शिखर आहे, तर गर्भगृहावर उंच व मोठे शिखर आहे. या शिखरामध्ये अनेक लहान–लहान शिखरांच्या प्रतिकृती असून त्यावर आमलक व कळस आहे.
गांगेश्वर या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल असे सांगितले जाते की गंगा आणि ईश्वर यावरून गंगेश्वर हे नाव पडले. याचा अर्थ गंगेचा स्वामी, असा समजला जातो. गंगा ही शंकराशी संबंधित आहे. जेव्हा गंगा पृथ्वीवर उतरत होती, तेव्हा पृथ्वीला तिच्या तीव्र प्रवाहापासून वाचवण्यासाठी शंकराने तिचे पाणी आपल्या जटांमध्ये साठवले. तेव्हापासून शंकराला गंगाधर किंवा गंगेश्वर असे म्हटले जाते. या गंगेश्वर शब्दाचा अपभ्रंश होऊन या देवाला गांगेश्वर हे नाव रूढ झाले असावे.
त्रिपुरारी पौर्णिमेला होणाऱ्या वार्षिक मोठ्या उत्सवाबरोबरच मार्गशीर्ष शुक्ल एकादशीपासून (मोक्षदा एकादशी) येथे होणारा हरिनाम सप्ताह तालुक्यात प्रसिद्ध आहे. यावेळी तालुक्यातील १५ ते २० गावांतील भजनी मंडळी येथे भजन सादर करतात. त्यानंतर रात्री बारा वाजता देवाची पालखी काढण्यात येते. याशिवाय महाशिवरात्रीला येथे महाअभिषेक होतो. यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
आषाढी पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू होण्याआधी कोणताही एक दिवस ठरवून तळेरे येथे देसरूढ विधी केला जातो. देसरूढचा जो दिवस ठरेल त्या दिवशी गावातील प्रत्येक घर झाडूने साफ केले जाते व तो कचरा गावाबाहेर टाकला जातो. त्या कचऱ्यातून घरातील क्लेश बाहेर जावा, असा उद्देश असतो. त्यासोबतच येथील प्रत्येक घराची दृष्ट काढली जाते. त्याद्वारे कुटुंबावर आलेली संकटे सीमेबाहेर घालवून देण्याचा हा उत्सव असतो. यावेळी संपूर्ण गावातील रहिवासी मंदिरात उपस्थित असतात.
गांगेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला खर्जादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या खुल्या सभामंडपातच मध्यभागी खर्जादेवीची मूर्ती आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या नऊ रात्रींमध्ये येथे हजारहून जास्त लोक दांडियाच्या खेळात सहभागी होतात. तालुक्यातील मोठ्या गरबांपैकी हे एक ठिकाण मानले जाते.