मोदी गणपती मंदिर

नारायण पेठ, पुणे, ता. जि. पुणे

पुण्यातील नारायण पेठ भागात स्थित मोदी गणपती मंदिर दोनशे वर्षांहून अधिक जुने आहे. पेशवे काळातील दुभाषी खुश्रूशेठ मोदी यांच्या बागेत ही मूर्ती सापडल्यामुळे हे देवस्थान ‘मोदी गणपती’ म्हणून प्रसिद्ध झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील भट घराण्याने या स्वयंभू गणेशाची प्रतिष्ठापना करून हे कौलारू मंदिर उभारले. पेशवे दप्तरातील अधिकृत कागदपत्रांमध्ये १८११ सालापासून या देवस्थानाचे स्पष्ट उल्लेख सापडतात. पारंपारिक पुणेरी वाड्याच्या धाटणीचे हे मंदिर उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायक मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा व वैशिष्ट्यपूर्ण वास्तूरचनेमुळे पुणे महानगरपालिकेने या मंदिराचा समावेश ‘अ’ दर्जाच्या वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. या पुरातन वास्तूत १८६९ ते १८७२ या काळातील पुण्याचा ऐतिहासिक नकाशा जतन केलेला आहे.

नारायण पेठेतील मुख्य रस्त्यावरून नदीपात्राकडे जाणाऱ्या मार्गावर हे मंदिर आहे. मंदिराचा इतिहास पेशवे काळातील महत्त्वाच्या नोंदींशी जोडलेला आहे. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातील १७७४ च्या अधिकृत यादीत या मंदिराचा उल्लेख सापडत नाही. मात्र १८११ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना पुत्रप्राप्ती झाली तेव्हा पुण्यातील ज्या निवडक मंदिरांना निमंत्रणाच्या अक्षता व दक्षिणा देण्यात आली त्यामध्ये या मंदिराचा समावेश होता. खुश्रूशेठ मोदी नावाचा एक पारशी गृहस्थ पेशवे दरबारात दुभाषी म्हणून काम करत असे. तो इंग्रज रेसिडेंट आणि पेशवे यांच्यामधील संवादाचे मुख्य माध्यम होता. पेशव्यांनी त्याला अनेक गावे बक्षीस म्हणून दिली होती.

खुश्रूशेठ मोदी यांचे निवासस्थान व बाग नारायण पेठेच्या याच मध्यवर्ती भागात होती. सुरुवातीच्या काळात या बागेत गणपतीची ही मूर्ती सापडली. त्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथून भट नावाचे एक ब्राह्मण कुटुंब उपजीविकेसाठी पुण्यात आले होते. त्यांनी या गणपतीची रीतसर स्थापना करून छोटे मंदिर उभारले. या देवाला आपले कुलदैवत मानून त्यांनी त्याची उपासना सुरू केली. तेव्हापासून या मंदिराचे व्यवस्थापन भट घराण्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आले आहे.

पेशवाईच्या काळात या मंदिराच्या परिसरात माशांचा मोठा बाजार भरत असे. तेथे बोंबील विक्रीसाठी येणारे मच्छिमार मोठ्या संख्येने बसत असल्यामुळे स्थानिक लोक या गणपतीला बोंबल्या गणपती या टोपणनावाने ओळखू लागले.                                                                                                                                                                                                          खुश्रूशेठ मोदी यांचा १८१५ मध्ये गूढ मृत्यू झाला व त्यानंतर त्यांची ही बाग सरदार नातू यांच्याकडे सोपवण्यात आली. इंग्रज राजवटीत या मंदिराला दरसाल एकोणचाळीस रुपये इतके वर्षासन मिळत असे.

पारंपारिक पुणेरी वाड्याच्या धाटणीची ही वास्तू अत्यंत साधी व कौलारू स्वरूपाची आहे. मुख्य प्रवेशद्वारापाशी मारुतीचे एक छोटेखानी मंदिर आहे. प्रवेशद्वारातून मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. येथे एक प्राचीन झाड आहे. भाविक याला शमीचे झाड समजून त्याची पूजा करतात. वनस्पती तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार हे झाड दुरंगी बाभळीचे एक दुर्मिळ झाड आहे.

मंदिरातील लाकडी सभामंडपाचे बांधकाम १८६८ मध्ये करण्यात आले होते. या सभामंडपातील लाकडी खांबांवर विविध लिपींत ओम हे अक्षर कोरलेले आहे. भिंतींवर चार युगांमधील गणपतीची चित्रे व त्यांची सविस्तर माहिती लावलेली आहे. या सभामंडपात १८६९ ते १८७२ या कालखंडातील पुणे शहराचा एक दुर्मिळ नकाशा जतन केलेला आहे. त्यामध्ये जुन्या पुण्यातील पेठांच्या रचना स्पष्ट दिसते. मंदिराचे मुख्य गर्भगृह विटांच्या बांधकामाचे आहे. येथील पितळी मखरामध्ये उजव्या सोंडीची चतुर्भुज गणेशमूर्ती विराजमान आहे. सुमारे साडेतीन फूट उंचीची ही शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मांडीवर एक हात असलेल्या या मूर्तीच्या दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे. ही मूर्ती स्वयंभू असल्याची मान्यता आहे. मंदिराच्या लाकडी छतावर पन्हाळी कौले घातलेली आहेत. त्यावर पेशवेकालीन स्थापत्यशैलीतील उंच शिखर आहे. या शिखराच्या चारही बाजूने छतावर चार लहान शिखरे आहेत. मुख्य शिखराच्या दोन्ही स्तरांवर देवकोष्टके आहेत. या देवकोष्टकांच्या वरील भागात कळस आहेत. शिखराच्या शिरोभागी दोन आमलक व त्यावर कळस आहे.

मोदी गणपती मंदिरात १८६९ पासून पुराण वाचनाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा अखंडपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत येथे धार्मिक ग्रंथांचे व पुराणांचे वाचन केले जाते. ही परंपरा तब्बल चार पिढ्यांपासून निष्ठेने जपली आहे. आजही अनेक ज्येष्ठ नागरिक व भाविक या पुराण श्रवणासाठी मंदिरातील सभामंडपात नित्यनियमाने उपस्थित राहतात. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघ महिन्यातील गणेश जन्मोत्सव पाच दिवस अतिशय उत्साहात साजरा होतो. या काळात सहस्रावर्तने, कीर्तने व विशेष पूजाविधींचे आयोजन केले जाते. १८८७ च्या मोठ्या दुष्काळानंतर आषाढ शुद्ध प्रतिपदेला गणपतीवर संततधार धरण्याची एक वेगळी प्रथा येथे सुरू झाली. ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. प्रत्येक विनायकी चतुर्थीला येथे शास्त्रीय संगीताच्या मैफली आयोजित केल्या जातात व अनेक प्रसिद्ध कलाकार येथे आपली सेवा रुजू करतात.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी सुद्धा या मंदिराचा एक विशेष ऐतिहासिक संबंध जोडलेला आहे. १९४८ मध्ये पुण्यात आयोजित केलेल्या एक कोटी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठानाची सांगता याच मंदिराच्या प्रांगणात झाली होती. पंडित पटवर्धन यांच्या हस्ते पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याची साक्ष हे मंदिर आजही देते. पुणे महानगरपालिकेने या मंदिराचा समावेश ‘अ’ दर्जाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वास्तूंमध्ये केला आहे. हे मंदिर खासगी मालकीचे आहे. तरीही सर्व सामान्य भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी सात ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत ते खुले असते. विवाह विनायक या नावाने सुद्धा या गणपतीची ओळख आहे. अनेक नवदाम्पत्य आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात.

उपयुक्त माहिती

  • पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • स्वारगेट एसटी स्थानकापासून ३.५ किमी अंतरावर
  • देशभररातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home