सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील नारकरवाडीत असलेले सुमारे २०० वर्षे प्राचीन अंबाबाई मंदिर हे ‘वतनदारांचे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर येथे होणाऱ्या उत्सवांसाठीही प्रसिद्ध आहे. याशिवाय या मंदिराला मिळणाऱ्या देणग्यांचा वापर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो. मंदिरातर्फे चालविली जाणारी नारकरवाडीतील ही शाळा ‘ई–लर्निंग’ प्रणालीचा वापर करणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. याशिवाय येथील मुलांना ‘फिनलँड पॅटर्न’चे इंग्रजी शिक्षण शिकविले जाते.
असे सांगितले जाते की येथील वतनदार असलेले नारकर यांनी कोकिसरे हे गाव वसविले. गाव वसविताना त्यांनी येथे गावरहाटी तयार केल्या. या मंदिरापासून कोकिसरे गाव तीन किमी अंतरावर आहे. या कोकिसरे गावात ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरासह एकूण १२ मंदिरे आहेत. नारकरवाडी येथे राहणाऱ्या वतनदारांना प्रत्येक वेळी कोकिसरे गावातील महालक्ष्मी मंदिरात जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी तेथील महालक्ष्मीचा कौल घेऊन नारकरवाडीत अंबाबाईचे मंदिर बांधले. तेव्हापासून हे वतनदारांचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील देवी अंबाबाईच्या मूर्तीचे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीशी साधर्म्य आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात होणाऱ्या सर्व उत्सवांप्रमाणेच येथेही उत्सव साजरे होतात. पूर्वीपासून नारकरवाडीत हे उत्सव साजरे होतात.
नारकरवाडीतील अंबाबाई मंदिर हे कोकणी पद्धतीचे कौलारू व दुमजली आहे. या मंदिराच्या बाहेरील भिंती चिऱ्यांच्या दगडांच्या, तर आतील सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे. मंदिरासमोर मोकळे प्रांगण आहे. या प्रांगणात तुळशी वृंदावन आहे. हे मंदिर जमिनीपासून तीन फूट उंचीवर आहे. चार पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्यात बाह्यभिंतींपासून आत काही अंतरावर दोन्ही बाजूंस लाकडी चौकोनाकार खांब व त्यावर भक्कम तुळया आहेत. कोकणी स्थापत्यशैलीनुसार सभामंडपाचा मधला आयताकृती भाग हा बाजूच्या जमिनीपासून काही इंच खोलगट आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. हे गर्भगृह एखाद्या उत्तम लाकडी देव्हाऱ्यासारखे आहे. चारही बाजूंनी कोरीव काम केलेले खांब आणि त्यामध्ये जाळीदार गवाक्षे असे या गर्भगृहाचे स्वरूप आहे. त्याचे प्रवेशद्वार एकशाखीय असून द्वारपट्टीवर वेलबुट्टीचे नक्षीकाम आहे. द्वारपट्टीवर ललाटबिंबस्थानी बटूची मुखप्रतिमा आहे, तर तळाशी दोन्ही बाजूला जय–विजय हे द्वारपाल आहेत. द्वारपट्टीच्या वरील बाजूस मखरासारखा आकार दिलेला आहे. त्यात मध्ये एका वर्तुळात ‘श्री अंबाबाई देवालय’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूंस चवऱ्या ढाळणारे गजराज लाकडांत कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंस उंच गवाक्षे आहेत व त्यात लाकडी जाळी आहे. या गर्भगृहाचे नाजूक काष्टस्तंभ अत्यंत देखणे आहे. त्यावर वरच्या बाजूस दोन पायांवर उभ्या असलेल्या सिंहाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे संपूर्ण गर्भगृह म्हणजे काष्ठशिल्पाचा उत्तम नमुना आहे.
गर्भगृहात वज्रपीठावर अखंड पाषाणातील अंबाबाई देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. ही मूर्ती कोल्हापूरच्या अंबादेवीच्या मूर्तीशी साधर्म्य दाखविणारी आहे. मूर्तीच्या मस्तकावर शंकराची पिंडी व त्यावर शेषनाग आहे. देवीच्या हातांत ढाल, गदा, कोहळासदृश्य फळ आणि पानपत्र आहे. मूर्तीच्या मागे वेलबुट्टी कोरलेली लाकडी प्रभावळ आहे. या प्रभावळीच्या वर मध्यभागी कळस आहे.
या मंदिरात होणारे उत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. गुढीपाडव्याला येथील उत्सव सुरू होतात व होळी पौर्णिमेला त्यांची सांगता होते. गुढीपाडव्याला गुढी उभारल्यानंतर श्रावणातील प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी व शनिवारी येथे भजनांचे कार्यक्रम होतात. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या मंदिरातील हा सर्वात मोठा उत्सव असतो. या सप्ताहात परिसरातील ३० ते ३५ गावांतील भजनी मंडळी सहभागी होतात. यामध्ये वारकरी भजन, दिंडी भजन होते. हा सप्ताह रात्रंदिवस सुरू असतो. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होते. त्यावेळी आलेल्या भाविकांना व ग्रामस्थांना महाप्रसाद दिला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे हजारो दिव्यांची आरास केली जाते. प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी देवीची महाआरती होते व त्यात शेकडो ग्रामस्थ सहभागी होतात.
या मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकिसरे नारकरवाडीतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व अंगणवाडी या मंदिराशी जोडलेल्या आहेत. या अर्थाने अंबाबाई आणि सरस्वती यांचे नाते येथे दिसते. मंदिरासाठी आलेल्या देणग्यांचा वापर या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केला जातो. शाळेमध्ये प्रोजेक्टर, मोठा पडदा असलेले एलईडी, दूरचित्रवाणी संच, आधुनिक लॅपटॉप व संगणक आहेत. याशिवाय येथील विद्यार्थ्यांना ‘फिनलॅंड पॅटर्न’चे इंग्रजी शिक्षण दिले जाते. फिनलँडमधील शिक्षण व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम मानली जाते. या पद्धतीमध्ये मुलांना लहानपणापासून, म्हणजे औपचारिक शिक्षणास प्रारंभ होण्याच्या आधीपासूनच शैक्षणिक कौशल्यांची ओळख करून दिली जाते. यात शिशुवर्गातील मुलांसाठी ‘डे केअर’ कार्यक्रम असतो. वयाच्या सहाव्या वर्षी त्यास पूर्वप्राथमिक शाळेत घातले जाते आणि पुढे ११ वर्षे कालावधीचे सक्तीचे सर्वंकष पायाभूत शिक्षण दिले जाते. यात मुलांच्या आत्ममूल्यांकनावर भर असतो व शाळेतील वातावरण अत्यंत मोकळे आणि अनौपचारिक ठेवलेले असते. या शिक्षण पद्धतीचा वापर करून शाळेमध्ये मुलांना परीक्षार्थी बनवण्याऐवजी विद्यार्थी बनवले जाते. या शाळेत ई–लर्निंग सुविधा आहे. अशी सुविधा देणारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. संगणकावर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, पीपीटी बनविणे याचे शिक्षण मुलांना येथे चौथी–पाचवीतच दिले जाते. या शाळेतील लहान मुले सहजरित्या लॅपटॉप व संगणक हाताळतात. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना या शाळेमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी अनेक मुले प्रतीक्षा यादीवर आहेत.
मंदिरातर्फे या शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या आवडीप्रमाणे विविध उपक्रम व कार्यशाळा घेण्यात येतात. त्यामध्ये रेडिओ जॉकी बनविण्याची कार्यशाळा, कॅमेरामन प्रशिक्षण, निवेदनात करीअर करण्यासाठी निवेदनाची कार्यशाळा अशा प्रकारच्या विविध कार्यशाळा घेतल्या जातात. त्यासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे शाळेत उपलब्ध आहेत. मुलांमध्ये जगण्यास आवश्यक असलेली कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी शाळा व मंदिर प्रशासन प्रयत्नशील असते. येथे शिक्षण घेणारी सर्व मुले शेतकऱ्यांची आहेत. या सर्वांसाठी लागणारा पैसा हा नारकरवाडीतील स्थानिक मंडळी व नोकरी–व्यवसायासाठी येथून बाहेरगावी गेलेल्या चाकरमान्यांकडून पुरविला जातो. नारकरवाडीतील सर्व ग्रामस्थ हे जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी ते आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा या धार्मिक व शैक्षणिक कामांसाठी देतात. यामुळे हे गाव अन्य गावांसाठी आदर्शवत आहे.
कोकिसरे गावाचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर व नारकरवाडीतील अंबादेवी मंदिर याशिवाय कोकिसरे गावाची ओळख ही वैभववाडी तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा गाव अशी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना असलेल्या ऐतिहासिक सालवा डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसलेले आहे. वैभववाडीचे भूषण ठरलेला व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मैदानी डोंगरांपैकी सर्वात उंच डोंगर म्हणून सालवा डोंगराची ओळख आहे. कोकिसरेसह सहा गावांच्या सीमेवर दीमाखदारपणे उभ्या असलेल्या या डोंगराला ‘पालखीचा डोंगर’ असेही म्हटले जाते. कोकिसरे गावात बांबरवाडी, बौद्धवाडी, गावठणवाडी, सुतारवाडी, पालकरवाडी, सोनारवाडी, गुरववाडी, कोकिसरे–नेवरेकरवाडी, कुंभारवाडी, कुडाळकरवाडी, मोरेवाडी, झोरेवाडी, ओझरवाडी, नारकरवाडी, खांबलवाडी, बोरचीवाडी, बांधवाडी, खांबलवाडी–नेवरेकरवाडी व बेळेकरवाडी अशा विविध वाड्या आहेत.