पूर्वीपासून कौलांच्या कारखान्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेमळे या समृद्ध गावात कलेश्वर मलेश्वर मंदिर आहे. सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराची स्थापना एका जैन सत्पुरुषाने केली होती, असे सांगण्यात येते. मंदिराच्या आवारात मागच्या बाजूला त्यांची समाधी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी किमान सात दिवस आधी मांसाहार किंवा मद्यपान केलेले नसते, अशा व्यक्तींनीच मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करावा, तसेच चामड्याची वस्तू परिधान करून मंदिरात जाऊ नये, असे नियम आहेत. हे नियम न पाळल्यास त्या व्यक्तीस त्रास होतो, असे सांगण्यात येते.
नेमळे गावात दोन्ही बाजूंना झाडांची दाटी असलेल्या एका अरुंद रस्त्याने काही अंतर गेल्यावर कलेश्वर–मलेश्वर मंदिराच्या आवाराची वेस दिसते. या वेशीच्या खांबांवर जय–विजय या द्वारपालांची चतुर्भुज व गदाधारी उठावशिल्पे आहेत. वेशीच्या वर मध्यभागी एका देवळीमध्ये कमळात स्थानापन्न झालेल्या लक्ष्मीची मूर्ती आहे. तिच्या दोन्ही बाजूंना गजराज आणि दोन छोटे कलश आहेत. मंदिराचे आवार प्रशस्त आहे. त्यास चारही बाजूंनी दगडी कुंपण घालण्यात आलेले आहे. मंदिर आवारात एका चबुतऱ्यावर कमळ पाकळ्या, हत्तीमुखांनी सुशोभित केलेले तुळशी वृंदावन आणि सात स्तरीय दीपस्तंभ आहे. या लगतच तीन छोटी दंडगोलाकार पाषाणलिंगे, पादुका व एक वीरगळ आहे. या वीरगळात तीन चित्रपट्टिका आहेत. त्यातील खालच्या भागात वीरासनात बसलेल्या पुरुषाचे एक शिल्प आहे. त्याच्याच शेजारी डमरू वाजवणाऱ्या व एक पाय दुमडून बसलेल्या स्त्रीचे शिल्प आहे. मधल्या पट्टीत नमस्कार करणाऱ्या स्त्री–पुरुषाची शिल्पे आहेत. सर्वांत वरच्या पट्टिकेत शंकराची पिंडी, त्यापुढे नंदी, त्यास नमस्कार करणारा पुरुष आणि त्यावर चंद्र व सूर्य यांची शिल्पे कोरलेली आहेत.
या दीपस्तंभाच्या मागच्या बाजूस जुना पिंपळवृक्ष आहे व त्यास मोठा पार बांधण्यात आलेला आहे, तर दीपस्तंभाच्या समोर मंदिराची प्रवेशकमान आहे. या कमानीच्या बाजूस दोन खांबांच्या मध्ये खालच्या बाजूस जय–विजय या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत. मंदिरास मुख्य सभामंडप आणि छोटा सभामंडप असे दोन सभामंडप आहेत. मुख्य सभामंडप लांबलचक आकाराचा आहे व तो अर्धखुल्या प्रकारचा आहे. तेथे हात–पाय धुऊनच आत प्रवेश करावा, अशी पद्धत आहे. हात–पाय प्रक्षालनासाठी मंदिराबाहेर नळाची व्यवस्था केलेली आहे. या सभामंडपाच्या बाह्यबाजूस कमानीकृती मोठमोठ्या खिडक्या आहेत. खांबांच्या मध्ये कक्षासने आहेत. त्यापासून काही अंतरावर आतल्या बाजूस पाच गोलाकार स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगेतून समोरच्या छोट्या सभामंडपात प्रवेश होतो. त्याच्या भिंतीतही मोठ्या खिडक्या आहेत. तेथेही प्रशस्त कक्षासने आहेत. या सभामंडपाच्या तुळयांना घंटा व लाल कापडी चवऱ्या आहेत.
येथून तीन पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाचे प्रवेशद्वार लाकडी व कोरीवकाम केलेले आहे. बाह्य द्वारशाखेवर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे. दरवाजावर मध्यभागी लाकडातच कोरलेले झरोके ठेवण्यात आले आहेत. अंतराळात आत नंदीची पाषाणमूर्ती आहे. बाजूलाच तरंगकाठ्या मांडलेल्या आहेत. अंतराळाच्या वर पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीसही मोठ्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांच्या खालच्या बाजूस स्थानिक देवतेची व गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या कमानदार दरवाजाच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. आत जमिनीपासून एक फूट खोलवर कलेश्वर–मलेश्वर अशी दोन पाताळ लिंगे आहेत. ही शिवलिंगे जमिनीत रुजल्यासारखी असल्याने त्यांस रूजिव शिवलिंग असेही म्हटले जाते. दोन्ही शिवलिंगांच्या शाळुंका वर्तुळाकार आहेत. तेथील पाणी जाण्यासाठी जो पन्हळीसारखा भाग असतो, तो अगदी छोटासा आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही शाळुंकांमधील भाग पोकळ आहे व त्याच्या आत सुमारे फूटभर खोलीवर आडवा पाषाण आहे. कौल लावताना या आडव्या पाषाणावर कौलाचे तांदूळ क्रमाने मांडले जातात. स्थानिक भाविकांकडून असे सांगण्यात येते की मागितलेल्या कौलाचा तांदूळ वर उडून बाजूला पडतो.
या शिवलिंगांच्या बाजूला कलेश्वर व मलेश्वर यांचे धातूचे मुखवटे व त्या बाजूलाच फणा उभारलेल्या नागांच्या दोन मूर्ती आहे. त्याच्या मागच्या बाजूला एका वज्रपीठावर कलेश्वर व मलेश्वराच्या पाषाणात कोरलेल्या मूर्ती आहेत. यातील एका मूर्तीत आपल्या वाहनावर स्वार झालेल्या स्वरूपातील देव आहे. त्याच्या एका हातात खड्ग आहे. दोन्ही बाजूला एकेक सेवक आहे. यातील एका सेवकाने देवावर छत्र धरलेले आहे. दुसऱ्या मूर्तीत पालखीत मांडी घालून बसलेला खड्गधारी देव व पालखी वाहणारे सेवक आहेत. या देवाला बिल्वपत्र आणि पांढरी फुले वाहिली जातात. गर्भगृहाच्या भिंतीलगत स्थानिक देवतांचे तांदळे, तसेच दंडगोलाकार लिंगे आहेत. गाभाऱ्याच्या छतास चवऱ्यांसारख्या आकारात दिसणारी वस्रे टांगलेली आहेत. एका बाजूस धातूचा मोठा त्रिशूलही आहे.
नेमळे येथील कलेश्वर–मलेश्वर मंदिरात दरवर्षी माघ शुक्ल एकादशीला म्हणजेच विजया एकादशीला दोन दिवसांचा मोठा जत्रोत्सव साजरा केला जातो. नेमळे गाव हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचा भाग होते. या गावाची तसेच कुडाळ तालुक्यातील आकेरीची आणि झाराप या गावांची गावरहाटी एकच आहे. त्यामुळे कलेश्वर–मलेश्वर ही तीन गावांची देवता मानली जाते. नेमळ्याचा कलेश्वर–मलेश्वर, आकेरीचा रामेश्वर आणि झारापची देवी भावई या देवता एकमेकांच्या बंधू–भगिनी आहेत, असे ग्रामस्थ मानतात. यामुळे वर्षातून एकदा आकेरीचा रामेश्वर भावईच्या आणि कलेश्वर–मलेश्वराच्या भेटीस पालखी तरंगासह येतो. नेमळ्यातील जत्रोत्सवात नेमळे, आकेरी आणि झारप या तिन्ही गावांच्या देवांचे नाव घेऊन गाऱ्हाणे घातले जाते. गावातल्या मानाच्या तरंगकाठ्या येथे मिरवणुकीने येतात. फाल्गुन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच शिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो की त्याची स्थापना एका जैन सत्पुरुषाने (त्यास स्थानिक लोक जैन ब्राह्मण म्हणतात) केली होती. या जैन ब्राह्मणानेच गावआकारणी केली होती. त्यामुळे प्रारंभी मंदिराची व्यवस्था जैनांकडे होती. त्यानंतर ही व्यवस्था ब्राह्मणांकडे आली. स्थानिकांकडून अशी माहिती देण्यात येते की पूर्वी येथील जोशी घराण्याकडे मंदिराची व्यवस्था होती. मात्र कालांतराने जोशी घराण्यातील कोणीही येथे न राहिल्याने मंदिराची व्यवस्था गावडे, परब व दांडेकर यांच्याकडे आली. या ठिकाणी आता दर गुढीपाडव्याला मंदिराचे पुजारी नव्याने नेमले जातात.
या गावाचे वैशिष्ट्य असे की येथील मंदिर परिसरातच नव्हे, तर गावातही जैन धर्मातील अहिंसातत्व कसोशीने पाळले जाते. कलेश्वर–मलेश्वराच्या मंदिरास शुचिर्भूत होऊन जावे, असा नियम आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा असेल, तर किमान सात दिवस सोवळे पाळावे लागते. म्हणजे मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करावा लागतो. त्याचप्रमाणे मंदिरात अभिषेक करायचा असल्यास वा नारळ अर्पण करायचा असल्यास किमान ११ दिवस शुचिर्भूत राहावे लागते. या नियमाचे येथे काटेकोरपणे पालन केले जाते. अहिंसातत्त्वामुळेच मंदिरात कोंबड्या–बकऱ्यांचे बळी दिले जात नाहीत. शिजवलेला भात देवाचा रोजचा नैवेद्य असतो. ब्राह्मण भोजनावेळी डाळ–भात, भाजी–आमटी, वडे व गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. एकादशीला कोरड्या शिध्याच्या रूपात नैवेद्य दाखविला जातो. नेमळे गावच्या डोंगर परिसरात शिकारीसही बंदी आहे.