दक्षिण कोकणातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली या गावामध्ये चतुर्भुज महिषासुरमर्दिनी देवीचे मंदिर आहे. ही माऊली देवी नवसाला पावणारी आणि ‘सोनुर्ली बाये, बाये आवशी’ अशी आर्त साद दिल्यानंतर भक्तांसाठी धावून जाणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. स्थानिक लोकइतिहासानुसार, येथे सुमारे पाचशे वर्षांपासून देवीचे ठाणे आहे. या प्राचीन मंदिराचा अलीकडे जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराची आणखी एक ओळख म्हणजे ‘लोटांगणाचे मंदिर’ म्हणूनही ते ख्यातनाम आहे.
सोनुर्ली गावातील जिल्हा परिषद शाळेच्या छोट्या प्रवेशद्वाराशेजारी डावीकडे देवी माऊली मातेच्या मंदिर परिसराची भव्य वेस आहे. येथून काही अंतरावर मंदिराचा उंचच उंच दीपस्तंभ आहे. छोट्या चबुतऱ्यावर उभा असलेला हा दीपस्तंभ दहा स्तरीय व तारकाकृती आहे. त्याच्या शीर्षस्थानी आमलक आणि कळस आहे. त्याच्या बाजूस नेहमीच्या पारंपरिक तुळशी वृंदावनापेक्षा वेगळे असे तारकाकृती तुळशी वृंदावन आहे. कोकणात अलीकडच्या काळात बांधण्यात आलेल्या अनेक मंदिरांप्रमाणेच या मंदिराची स्थापत्यशैली ही आधुनिक कोकणी पद्धतीची आहे. म्हणजे बऱ्याच अंशी येथे जुन्या स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये कायम ठेवून त्यावर आधुनिक बाजाने बांधकाम करण्यात आलेले आहे. कोकणातील मंदिरस्थापत्याचे एक वैशिष्ट्य आहे की ज्यात मुख्य सभामंडपापासून गाभाऱ्यापर्यंत सरळ एका रेषेत दोन्ही बाजूंना मोठ्या खांबांवर मंदिर तोललेले असते. तसेच खांबांच्या मांडणीतूनच सभामंडपाचे दोन विभाग केल्यासारखे दिसतात. लांबलचक मंदिरास बाहेरच्या बाजूला मोठ्या खिडक्या आणि दारे असतात. त्यामुळे मंदिरात भरपूर प्रकाश आणि खेळती हवा राहते. सोनुर्ली माऊली देवीचे मंदिरही असेच जुन्या शैलीचे व नव्या बाजाचे आहे.
मुखमंडप, मुख्य सभामंडप, सभामंडप किंवा चौखंबा, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या मुखमंडपास चार नक्षीदार खांब आहेत. हे खांब छतास जेथे मिळतात तेथे तरंगहस्तांच्या जागी नक्षीदार कपोत आहेत. आतल्या बाजूला दोन्हीकडे असलेल्या खांबांवर तळाकडच्या भागात व्यालमूर्ती कोरलेल्या आहेत. मुखमंडपाचे छत गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आहे. त्यावर दोन लहान व एक मोठे अशी तीन शिखरे आहेत. मुखमंडपाच्या छतावर समोरील दोन्ही बाजूंस सिंहमूर्ती आहेत.
मंदिराचा मुख्य सभामंडप प्रशस्त असा आहे. त्यास दोन्ही बाजूंनी ९–९ खांब आहेत. त्यात कक्षासने आहेत. या मंडपावर कोकणी शैलीचे उतरते छत आहे. या स्थापत्यशैलीत छताच्या तुळयांनी केलेल्या चौकटींमध्ये लाकडी पाट बसवलेले असतात. या मंदिरात असे सिमेंटच्या स्लॅबचे पाट आहेत व त्यावर वर्तुळाकार नक्षीकाम केलेले आहे. सभागृहाच्या मध्यभागी जमिनीत काहीसा खोलगट भाग तयार करण्यात आला आहे. त्यात लाल फरशा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुखमंडपापासून छोट्या सभामंडपाच्या पायऱ्यांपर्यंत लाल गालिचा अंथरला आहे, असा भास होतो. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी गुळगुळीत ग्रॅनाईट आणि संगमरवरी फरशांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. मुख्य सभामंडपानंतर दोन्ही बाजूंनी तीन खांब असलेला छोटा सभामंडप आहे. यास काही ठिकाणी चौखंबा या नावानेही ओळखले जाते. पाच पायऱ्या चढून येथे प्रवेश होतो. येथेही दोन्ही बाजूंनी कक्षासने आहेत.
अंतराळाची दर्शनी भिंत नक्षीकाम केलेल्या फरशांनी सजवण्यात आली आहे. येथील लाकडी प्रवेशद्वार द्विशाखीय आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस अर्धस्तंभ आणि वरच्या बाजूस महिरप आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस गदाधारी चतुर्भुज द्वारपालांच्या मूर्ती आहेत. अंतराळात आतल्या बाजूने अतिशय रुंद असे चौरसाकार स्तंभ आहेत. ते वरील कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. या स्तंभांच्या मधून, छोट्याशा दारातून गर्भगृहात प्रवेश होतो. या दाराच्या ललाटबिंबावर गजाननाची मूर्ती आहे. आत वज्रपीठावर काळ्या पाषाणातील सोनुर्ली माऊली देवीची मूर्ती आहे. ती चतुर्भुज महिषासुरमर्दिनीच्या रूपात ठाकलेली आहे. तिच्या हातांत वज्र, खड्ग, त्रिशूल आणि ढाल अशी शस्त्रास्त्रे आहेत. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे आणि उजव्या हातातील खड्गाने ती त्याचा वध करते आहे. या मूर्तीचा सारा जिवंतपणा तिच्या चांदीच्या डोळ्यांत आहे. चांदीच्या महिरपीमध्ये स्थानापन्न असलेल्या सोनुर्ली देवीच्या चेहऱ्यावरील भाव हे वीररसाचे दर्शन घडविणारे आहेत. गर्भगृहात देवीच्या मूर्तीच्या बाजूलाच स्थानिक लोकदेवतांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या गर्भगृहावर वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे शिखर आहे. मंदिर परिसरात बाहेरच्या बाजूला एक छोटे मंदिर दिसते. त्यात काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. इतर देवदेवता शिळेच्या रूपात येथे ठेवण्यात आल्या आहेत. तशाच प्रकारचे दुसरे मंदिर आहे, त्यात श्री रवळनाथ, श्री पवनादेवी, श्री लिंगायत या देवतांचे दर्शन घडते. मंदिराच्या आवारात एक मोठी विहीर आहे. येथे गिरोबा देवाचे एक स्थान आहे. गोलाकार असलेली व मध्यभागी दगडी शिवलिंगाच्या आकाराची ही समाधी आहे.
माऊली देवी ही सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावांची आद्यदेवता आहे. ही देवी जागृत आणि नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेला होणारी येथील लोटांगणाची यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यासाठी गोवा, कर्नाटक, मुंबई या भागांतूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. मंदिराचा उत्सव कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होतो. देवाला चुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवून ग्रंथवाचन केले जाते. हे वाचन त्रिपुरारी पौर्णिमेपासून ते जत्रेच्या दिवसापर्यंत चालू असते. जत्रेच्या दिवशी देवीचे दर्शन आणि नवस करणे व पूर्ण झालेला नवस फेडणे, असा मुख्य भाग असतो.
ज्यांना देवीचा नवस फेडण्यासाठी लोटांगण घालायचे आहे, त्यांना जत्रेच्या आदल्या दिवसापासून उपवास करावा लागतो. हा उपवास व्रतस्थ व निराहार असतो. लोटांगण घालू इच्छिणारे स्त्री–पुरुष जत्रेच्या दिवशी रात्री दहानंतर मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीतील पाण्याने स्नान करून देवदर्शन करतात. नंतर वाद्यांच्या गजरात माऊली देवीची पालखी मंदिराबाहेर आणून भजन आणि देवीनामाचा गजर करण्यात येतो. मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणास प्रारंभ होतो. पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून ते पूर्ण करावे लागते. स्त्री भाविक उभ्याने केस मोकळे सोडून, तर पुरुष भाविक उघड्या अंगाने जमिनीवर लोटांगण घालतात. जेथून सुरुवात केली होती, तेथे येऊन पुन्हा स्नान करून, त्याजागी नारळ वाढवला जातो व अशा प्रकारे देवीचा नवस फेडला जातो. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी तुलाभार विधी असतो. त्यात नारळ, केळी, तांदूळ, गूळ, साखर या गोष्टींचा समावेश असतो. हा कार्यक्रम दुपारपर्य़ंत चालतो. कार्यक्रम चांगला पार पडल्याचा देवीचा कौल घेतला जातो. मग तरंगकाठीची मिरवणूक काढली जाते.
जत्रोत्सवाप्रमाणेच नवरात्र, कोजागरी पौर्णिमा, दीपावली, देवदिवाळी, होळी, तुळशी विवाह येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. येथील हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या श्रद्धेने येत असतात.
या लोटांगणाच्या यात्रेप्रमाणेच सोनुर्ली गावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सर्व घरे कौलारू आणि विटांची आहेत. गावात भिंतीसाठी चिऱ्याचे दगड वापरले जात नाहीत. एवढेच नव्हे, तर येथे छपरावर नळेच असावेत, याची आवर्जून काळजी घेतली जाते. दगड कापून घरे बनविली जाऊ नयेत, देवी माऊलीची आधुनिक पद्धतीच्या घरांना मान्यता नाही, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.