रवळनाथ मंदिर

मातोंड, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

देव रवळनाथ ही दक्षिण कोकणची जागृत देवता समजली जाते. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथे रवळनाथाचे स्थान आहे. येथील रवळनाथाचे मंदिर हे बाह्यतः कोकणी मंदिरशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. रवळनाथ हे महादेवाचे रूप मानले जाते. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण भागात या देवाची मंदिरे अधिक आहेत. सिंधदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांत रवळनाथाची २११ मंदिरे आहेत. येथून लागूनच असलेल्या गोवा राज्यातही या देवाची साधारण ५० मंदिरे आहेत. त्यातीलच मातोंड रवळनाथ हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.

हिरव्यागार वृक्षांच्या गर्दीत हे मंदिर वसले आहे. रस्त्यालगत असलेल्या साध्या वेशीतून मंदिर प्रांगणात जाण्यासाठी छोटी वाट आहे. समोरच एका चौथऱ्यावर दीपस्तंभ उभारण्यात आला आहे. हा दीपस्तंभ गोलाकार असून सप्तस्तरीय आहे. त्याच्या प्रत्येक स्तराच्या वरच्या भागात घटपल्लवाकार आहेत. या स्तंभाचा वरचा भाग घुमटाकार आहे. त्याच्या बाजूलाच छोटेसे जुन्या धाटणीचे तुळशी वृंदावन आहे. समोर मंदिराची मोठी वास्तू आहे. अर्धखुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भागात दोन चौकोनी स्तंभ आणि त्यावर मध्यभागी त्रिकोणाकार दिलेले छत आहे. छताचा वरचा भागही उतरत्या छपराचा त्रिकोणाकृती आहे. त्यामुळे दुरून पाहता या वास्तूस समरूपता प्राप्त झाल्याचे दिसते.

या सभामंडपास बाहेरच्या बाजूने चार चौकोनी स्तंभ आहेत. हे स्तंभ छताच्या बाजूने महिरपी कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. खालच्या बाजूस तीन पायऱ्यांसारखे सलग कक्षासन आहे. त्यापासून काही अंतरावरही दोन्ही बाजूंस चारचार स्तंभ आहेत. त्यांमधून पुढे तीन पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळास लाकडी कोरीवकाम केलेले प्रवेशद्वार आहे. त्यावर स्त्री द्वारपाल, यक्षाचा मुखवटा आणि इतर देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. आत प्रवेश करताच रुंद दगडी चौथऱ्यावर उभारलेले रुंद खांब आणि त्यावरील अर्धगोलाकार कमान दिसते. यामुळे एखाद्या भव्य पुलाखाली असल्यासारखा भास होतो. अंतराळाची भिंत सोडून आत काही अंतरावर हे भक्कम खांब उभारण्यात आलेले आहेत. ते रुंदीला इतके मोठे आहेत की चार माणसांनी एकत्र येऊनच वेढा घालता येतो. अंतराळात जत्रौत्सवात वापरले जाणारे साहित्य, तसेच तीन तरंगकाठ्या ठेवलेल्या आहेत. उजव्या बाजूस एक झोपाळा आहे. या झोपाळ्यावर बसून रवळनाथ झोके घेतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंतराळातून गर्भगृहासाठी प्रदक्षिणामार्ग आहे.

गाभाऱ्यात जाताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला छोट्या कोनाड्यासारख्या देवळ्या आहेत. त्यात विविध देवता आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वरच्या बाजूस मधोमध राक्षसमुख आणि त्याच्या दोन्ही बाजूला फणा उभारलेल्या नागदेवतांची उठावशिल्पे आहेत. प्रवेशद्वारानजीक अश्वपुतळा आहे. गाभाऱ्यात वज्रपीठावर काळ्या पाषाणात कोरलेली रवळनाथाची सुबक मूर्ती आहे. त्याभोवती पाषाणातील महिरपी कमान आहे. त्याच्या वरच्या भागावर यक्षाचा मुखवटा आहे. खाली डावीकडे एक स्त्री सेवेकरी दिसते. रवळनाथाच्या हातात तलवार आहे. मूर्तीच्या वरच्या बाजूला मंदिराच्या कलशासारखी रचना करण्यात आली आहे. गर्भगृहात काही परिवारदेवताही दिसतात. या मंदिराचे शिखर हे द्राविड शैलीतील आहे.

असे सांगण्यात येते की रवळनाथ हे गोव्यातील एक प्रमुख दैवत आहे. त्याचे मूळ नावरवळूअसे आहे. ते प्राचीन काळापासून चालत आलेले प्रेमाचे नाव आहे. गोव्यात नागपंथीयांचे आगमन झाल्यावर त्यांनी देवाचे नाव बदलून देव रवळनाथ असे ठेवले. रवळनाथ हे दैवत शंकराच्या गणांपैकी एक असल्याचे मानले जाते. रवळनाथाला कोकणात पिसो रवळू असेही म्हटले जाते. ‘भारतीय संस्कृती कोशकार पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या मते, सर्पांचे विष उतरवणे हे रवळनाथाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. दक्षिणेतल्या कारवारपासून उत्तरेकडे कमी प्रमाणात रवळनाथाची मंदिरे दिसतात. ती केदारलिंग देवता स्वरूपात दिसतात. रवळनाथ यांची मंदिरे चंदगड, आजरा या भागात आहेत, त्यामुळे दक्षिणेकडून याचा प्रवेश कोकणात झाला, असे साहित्यिकअभ्यासक पु. रा. बेहरे यांचे मत आहे.

रवळनाथाची सत्ता सागरावर चालते. मच्छीमार बांधव या देवापुढे नतमस्तक होऊन कामाची सुरुवात करतात. मातोंडच्या रवळनाथ मंदिरात दसरा आणि कवळास असे पारंपरिक सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. दसऱ्याच्या दिवशी येथून वाजतगाजत तरंगकाठ्यांची मिरवणूक काढली जाते. यावेळी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे गाव येथील ग्रामदेवता सातेरी देवी रवळनाथ मंदिराशिवाय एका आगळ्यावेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे या गावात चहाचे दुकान सुरू करणे वा चहाची विक्री निषिद्ध मानली जाते. परंपरेने चहाच्या दुकानावर बंदी आणलेले हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे, असे सांगितले जाते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात चहाचे दुकान कुणी सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला यश येत नाही. येथे चहाच्या दुकानाला जशी अलिखित बंदी आहे, त्याप्रमाणेच दारूच्या दुकानासही आहे. एवढेच नव्हे तर दारूची बाटली गावात आणण्यासही निर्बंध आहेत. मागील १०० वर्षांपासून येथे हा रिवाज आहे

याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की १०० वर्षांपूर्वी गावात चहावरून भांडण झाले होते. हा वाद ग्रामदेवतेच्या चव्हाट्यावर आणण्यात आला होता. त्यावेळी ग्रामदेवतेने दिलेल्या कौलानुसार गावात चहाच्या विक्रीवर अलिखित बंदी घालण्यात आली. असे सांगितले जाते की अलीकडे काही वर्षांपूर्वी गावातील एका तरुणाने चहाविक्री बंदीची ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्याने येथे चहाचे दुकान सुरू केले; परंतु दुकान सुरू झाल्यापासून तो आजारी पडला. आजार बळावल्याने काही दिवसांतच त्याचे निधन झाले. यामुळे येथील ग्रामस्थांची ही श्रद्धा आणखीनच दृढ झाली. काही वर्षांपूर्वी मातोंड गावचे विभाजन होऊन पेंडूर हे गाव निर्माण झाले आहे. पेंडूर येथील घोडेमुख देवस्थान महाराष्ट्रासह गोवा कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. या देवस्थान परिसरातही चहाचे दुकान नाही. गाव जरी नवीन असले तरी गावची परंपरा मात्र कायम आहे, असे पेंडूरच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या मंदिराशिवाय येथून जवळच असलेल्या खानोली गावात असलेले रवळनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर जुन्या पद्धतीचे कोकणी स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर कौलारू, उतरत्या छपराचे दुमजली आहे. मंदिराबाहेर एका चबुतऱ्यावर पाच स्तरीय दीपस्तंभ आहे. त्यापुढे अर्धखुला सभामंडप असून त्यात बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने बांधण्यात आलेली आहेत. येथून तीन पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या या अंतराळात बाह्यभिंतीपासून काही अंतरावर आत मोठे दगडी जुने खांब आहेत. मंदिराच्या बांधकामात लाकडाचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला आहे. तेथील लाकडी वाशांवर देवतांची चित्रे लावलेली आहेत. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीलगत काळ्या पाषाणातील परिवारदेवता आहेत. गाभाऱ्यात वज्रपीठावर रवळनाथाची पाषाण मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे मोठे असल्याने ती उग्र प्रकृतीची भासते. महाशिवरात्रीच्या दिवशी या क्षेत्रपाल देवतेची मोठी यात्रा भरते. या वेळी ग्रामस्थ चाकरमानी मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात.

खानोलीच्या रवळनाथाबद्दल एक गमतीशीर पौराणिक कथा सांगण्यात येते की तेंडोली गावात आंधळीदेवी नावाची देवी असून तिच्यावरून खानोलीचा रवळनाथ तेंडोलीचा रवळनाथ यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी खानोलीच्या रवळनाथाने तेंडोलीच्या रवळनाथाच्या मंदिराची तटबंदी मोडली. तेव्हापासून तेथील तटबंदी दुरुस्त होत नाही, असे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती

  • वेंगुर्ल्यापासून १६ किमी अंतरावर
  • वेंगुर्ला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • मंदिर लोकेशन :
  • https://maps.app.goo.gl/DMi237xcNKhY7Cte7
Back To Home