रासाई देवी मंदिर

आचिर्णे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग


वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे या बारा वाड्यांच्या गावाच्या परिसरात एकदा मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे येथे धनधान्ये भाजीपाला असे काहीही उगवत नव्हते. त्यावेळी सर्व लोकांनी देवीला साकडे घातले. देवीने त्यांच्या हाकेला देऊन त्यांच्यावरील संकटाचे निवारण केले. परिसरात पुन्हा भाजीपाला पिकला, धनधान्य मुबलक झाले. तेव्हा गावकऱ्यांनी पौष पौर्णिमेच्या दिवशी गावात देवीची स्थापना केली आणि धनधान्याच्या राशीवर बसलेली देवी म्हणून तिचे नाव रासाई ठेवले. अशी लोककथा असलेली ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

रासाई देवी ही देवगिरीच्या यादवांची कुलदेवता. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एका गुहेमध्ये रासाईचे स्वयंभू मंदिर आहे. देवगिरीचा डोंगर रासाई देवीने करंगळीवर उचलला होता, अशी पौराणिक कथा तेथे सांगण्यात येते. या देवीबाबत एक कथा अशीही आहे की देवगिरीतील यादव साम्राज्य नष्ट झाल्यानंतर हरिहर बुक्क बंधूंनी स्थापन केलेल्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीत रासाईचे भव्य मंदिर होते. ही देवी विजयनगरच्या राजांची कुलस्वामिनी होती. महिपतीच्याभक्तिविजयग्रंथात (अध्याय ४२४६) या रासाई देवीचा उल्लेख आहे. तेथे असे म्हटले आहे की जेव्हा पंढरपूरचा एक ब्राह्मण द्रव्येच्छा मनी धरून विद्यानगरास म्हणजेच विजयनगरास गेला, तेव्हा तेथील कृष्णराजाने त्याला रासाई (राजाई) मंदिराची माहिती दिली. ‘राजाई ऐसे दैवत पाही। धुंडिता त्रिभुवनी नाहीं। आम्ही ऐकिलें देखिलें नाहीं। कृष्णराजा बोलतसें।।असे तेथे म्हटले आहे. ‘देवीकोशा असे म्हटले आहे की शितळा अथवा ज्येष्ठा देवीप्रमाणे रासाई देवीचे स्वरूप असावे

रासाई देवी या दैवताची पूजा महाराष्ट्रात तसेच कर्नाटकातही केली जाते. पुणे जिल्ह्यात वडगाव रासाई (ता. शिरूर), नानगाव (ता. दौंड) तसेच भीमा नदीवरील धरणाच्या पाण्यात रासाई देवीची मंदिरे आहेत. त्याचप्रमाणे असंडोली (ता. गगनबावडा), शेंडूर (ता. कागल), सावर्डी (ता. अमरावती), चाफेड (ता. देवगड), केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) तसेच कर्नाटकातील रासाई शेंडूर या गावांतही रासाईची मंदिरे आहेत. ही देवी आचिर्णे गावची ग्रामदेवता आणि जागृत देवस्थान म्हणून मानली जाते. येथे देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. एका मोठ्या मैदानासारख्या जागेमध्ये हे मंदिर आहे.

मंदिरास चारी बाजूंनी आवारभिंत घालण्यात आलेली आहे. सिमेंट काँक्रिटने बांधलेल्या एका उंच प्रवेश कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर प्राचीन अश्वत्थ वृक्ष असून त्यास मोठा पार बांधलेला आहे. तेथून काही अंतरावर दोन चौथऱ्यांवर उभारलेले चार स्तरीय दीपस्तंभ आहेत. त्यांच्या मध्यभागी छोटेसे तुळशी वृंदावन आहे. त्यासमोर भक्तभाविकांना सावली मिळावी, तसेच विविध कार्यक्रम, उत्सव यांकरीता मोठी पत्र्याची शेड बांधण्यात आलेली आहे. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे

सभामंडप अर्धखुल्या प्रकाराचा आहे. त्यास महिरपी कमानीचे प्रवेशद्वार मोठ्या खिडक्या आहेत. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना कक्षासने आहेत. येथेच डाव्या बाजूस एका स्तंभाच्या खालच्या बाजूला जमिनीपासून उंचावर असा पिंडीसारखा आकार दिसतो. त्यासबाराचा चव्हाटाअसे म्हणतात. गावात काही चुकीचे घडले, अनैतिक कृत्ये वा गुन्हे घडले तर त्याबाबतचे न्यायदानाचे काम जेथे केले जाते, त्यास चव्हाटा म्हणतात. हा चव्हाटा स्थापन करताना गावातील सर्व जातींच्या लोकांनी एकत्र येऊन, येथे ठरलेल्या गोष्टींचे पालन करण्याचे वचन दिलेले असते.

प्रशस्त सभामंडपातून सात पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. मंदिराचे अंतराळही मोठे आहे त्याला मागच्या बाजूने दरवाजा आहे. अंतराळात बाजूने प्रदक्षिणा मार्ग सोडून मधल्या भागात देवीचा दगडी गाभारा आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार लाकडी बाजूची चौकट दगडी आहे. ही चौकट एक शाखीय आहे. द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. आत मध्यभागी एका वज्रपीठावर छोट्या पाषाणशिळा रूपातील देवींसह रासाई देवीची चतुर्भुज उभी समपाद मूर्ती आहे. तिच्या बाजूला एका दगडी वज्रपीठावरही देवीचा तांदळा आहे. अंतराळातच एका बाजूस सहा दैवतांच्या सहा काठ्या एक अब्दागिरी, तसेच पालखी ठेवण्यात आलेली आहे. देवीची पालखी काढतात तेव्हा या काठ्या अब्दागिरी नाचवण्यात येतात

अंतराळाच्यावर निमुळते होत गेलेले शिखर आहे. त्याच्या खालच्या स्तरावर चारही बाजूंनी छोट्या देवळ्या आहेत. शिखराच्या वरील भागातही कलाकुसर करण्यात आलेली आहे. त्यावर द्विस्तरीय आमलक आणि वर कळस आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीस खेटून एक सतीशिळा ठेवलेली आहे. या शिळेवर तीन चौकटी आहेत. त्यातील खालच्या चौकटीत दोन स्त्रियांच्या आकृत्या सर्वांत वरच्या चौकटीत पतीपत्नी शिवलिंगाची पूजा करताना दाखविले आहे. त्याच चौकटीत सतीचा कोपरापासून दुमडलेला हातही आहे. या मंदिर परिसरात एक रंगमंचही आहे. येथे यात्रा काळात दशावतारी नाटके इतर कार्यक्रम होतात. या ठिकाणी काही अंतरावर एक प्राचीन दगडी बांधकामातील विहीरही आहे.

दरवर्षी पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला देवीची यात्रा होते. वैभववाडी तालुक्यातील मोठ्या यात्रांपैकी ती एक मानली जाते. यात्रेस नोकरीधंद्यानिमित्ताने बाहेरगावी स्थायिक झालेले, तसेच माहेरवाशिणी (गावातील मुली ज्या लग्न करून दुसऱ्या गावात गेलेल्या असतात) आवर्जून येत असतात. या काळात देवीस केलेले नवस फेडले जातात. माहेरवाशिणी देवीची खणानारळाने ओटी भरतात. ही यात्रा तीन दिवस चालते. तिसऱ्या दिवशी गावापासून दूर डोंगरात असलेल्या देवराईत देवीची पालखी नेली जाते. या देवराईत रासाई देवीचे मूळ स्थान असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. जंगलातून गेलेल्या पायवाटेने या देवराईत जावे लागते. येथे आकाशाच्या घुमटाखालीच देवस्थान आहे. या ठिकाणीश्री देव गांगो हंगो ब्राह्मण रामेश्वर नंदी प्रसन्नअशी पाटी असलेली कमान आहे. त्या प्रवेशद्वारानजीक एक मोठे जुने वारूळ आहे. पुढे एका दगडी ओट्यावर देवीचे गोलाकार दगड म्हणजे तांदळे आहेत. या देवस्थानच्या मागे काही सतीशिळा आहेत.

उपयुक्त माहिती

  • वैभववाडीपासून किमी, तर ओरोसपासून ५६ किमी अंतरावर
  • वैभववाडी, फोंडा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या आवारात येऊ शकतात
  • येथून जवळच असलेल्या वैभववाडी शहरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : सचिन गुरव, पुजारी, मो. ९३०७१९९०९१, राजू गुरव, मो. ७०५७३०४८११
Back To Home