काळंबादेवी मंदिर

वारगाव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग


भक्तांच्या हाकेला धावून येणारी नवसाला पावणारी देवी, अशी जिच्यावर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे, त्या काळंबादेवी मातेचे देखणे मंदिर वारगाव येथे आहे. निर्मल ग्राम तसेच पर्यावरण संतुलित समृद्ध गाव यांसारखे राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळविलेले वारगाव हे मुंबईगोवा महामार्गावरील तळेरे या गावापासून दोन किमी अंतरावर आहे. काळंबादेवी ही अकरा वाड्यांमध्ये विखुरलेल्या या गावाची ग्रामदेवता आहे. येथे नवरात्रोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, तसेच शिमगोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घराजवळ देवीची पालखी फिरवली जाते

कोकणातील अनेक गावांमध्ये काळंबादेवीची मंदिरे आहेत. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची काळंबादेवीवर असीम श्रद्धा होती. आंग्रे घराण्याची कुलदेवता असलेली काळंबादेवी अलिबागचीही ग्रामदेवता आहे. काळंबादेवी हे आदिशक्ती दुर्गेचेच रूप मानले जाते. पुराणांनी दुर्गेची रौद्र सौम्य अशी दोन रूपे वर्णिली आहेत. चंडी या स्वरूपात ती चतुर्भुजा, अष्टभुजा, दशभुजा अष्टादशभुजा अशा स्वरूपातही आढळते. तिच्या हातात चक्र, पाश, खड्ग, शूल, खेटक (गदा) इत्यादी आयुधे दाखविलेली असतात. वारगावमधील काळंबादेवीची मूर्ती आसुरमर्दिनी दुर्गेच्या रूपातील आहे. येथे शक्तिरूप नऊ दुर्गांचाही वास आहे

सर्व बाजूंनी जांभ्या दगडांनी बांधलेली तटबंदी, आत विस्तीर्ण प्रांगण आणि त्यात वसलेली काळंबादेवी महादेव यांची मंदिरे, तटबंदीबाहेर मोठा वाहनतळ असा हा परिसर आहे. उंचावर बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या प्रांगणात येण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. तटबंदीस असलेल्या भौमितिक आकारांतील कमानीसदृश्य वेशीतून प्रांगणात प्रवेश होतो. येथे सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. त्यात अनेक फुलझाडे शोभेची झाडे आहेत. येथे प्रथम पांढऱ्या रंगात बांधलेल्या महादेवाचे आणि त्याच्या मागे प्रशस्त अशा काळंबादेवी मंदिराचे दर्शन होते

दर्शनमंडप, सभामंडप, गर्भगृह आणि त्यावर उंच शिखर असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या समोरील भागात तीन चौथरे आहेत. त्यातील दोन चौथऱ्यांवर दगडी दीपस्तंभ, तर बाजूच्या एका चौथऱ्यावर छोटे तुळशी वृंदावन आहे. या चौथऱ्यांपुढील आठ पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. या दर्शनमंडपास तिन्ही बाजूने पायऱ्या आहेत. त्यास दोन जाडजूड वर्तुळाकार स्तंभ आहेत. त्यांच्या खालचा भाग चौरस, तर स्तंभशीर्षावर उमललेल्या फुलासारखा आकार आहे. त्यावर चौकोनी आकाराची पलगई आहे. चोल परंपरेतील मंदिरांची पलगई ही खांबाहून मोठ्या आकाराची, तसेच पातळ असते. या परंपरेचे दर्शन या मंदिरांतील सर्वच स्तंभांमध्ये होते. या स्तंभांवर छतास आधार देणाऱ्या तरंगहस्तांच्या जागी हस्तीमुखाकार कोरलेला आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार लाकडी आहे. त्याच्या रुंद चौकट शाखेवर दोन्ही बाजूंना हातात पुष्पमाला घेतलेल्या सेविकांच्या उठाव प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराची संपूर्ण चौकट सुरेख नक्षीदार आहे. या प्रवेशद्वारातून संगमरवरी फरसबंदी असणाऱ्या सभामंडपात प्रवेश होतो. येथे येताच नजरेत भरतात ते आतील चार स्तंभ त्यावरील सोंडेत कमलपुष्प धारण केलेली गजमुखे. हे स्तंभ दर्शनमंडपाच्या स्तंभांसारखेच आहेत. सभामंडप बंदिस्त असला तरी त्याच्या भिंतीस ठेवण्यात आलेल्या मोठमोठ्या खिडक्यांमुळे तेथे खुलेपणाचा आभास निर्माण होतो. या भिंतींपासून आतल्या बाजूने काही फूट अंतरावर स्तंभ आहेत. सभामंडपाचे छत समतल वितान स्वरूपाचे असून त्याच्या कडेस चारही बाजूंना शेजारीशेजारी बसवलेल्या छोट्या देवळ्यांमध्ये विविध देवदेवता ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत.

चारही भिंतींवर सिद्धिविनायक, लक्ष्मी, सरस्वती, तसेच दुर्गेच्या नऊ रूपांची शिल्पे आहेत. नंदीवर बसलेली श्रीशैलपुत्री, हाती कमंडलू रुद्राक्षमाला धारण केलेली श्रीब्रह्मचारिणी, दशभुजा श्रीचंद्रघंटा, व्याघ्र वाहनावर आरूढ अशी श्रीकुष्मांडा, शुभ्रवर्णी श्रीस्कंदमाता, सिंहारूढ श्रीकात्यायनी, कृष्णवर्णीय, त्रिनेत्रधारी आणि गर्दभ वाहन असलेली श्रीकालरात्री, गौरवर्णीय श्रीमहागौरी, सर्व सिद्धी देणारी श्रीसिद्धदात्री अशी ही देवीची नऊ रूपे येथे शिल्पांकित केलेली आहेत. सभामंडपात गर्भगृहाजवळ देवीची लाकडी, कोरीव काम असलेली पालखी ठेवण्यात आलेली आहे.

सभामंडपाच्या उत्तर दिशेस प्रदक्षिणामार्ग मध्यभागी गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर, एरवी जेथे कासवमूर्ती असते तशा एका छोट्या चौथऱ्यावर देवीस भजणाऱ्या कन्येची छोट्या बाहुलीसारखी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास लाकडी कलाकुसर आहे. यामध्ये द्वारपट्टीच्या वरील बाजूस शेषशाही विष्णू त्याच्या दोन्ही बाजूला सूर्यप्रतिमा आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन्ही हातात कमलपुष्पे धारण केलेल्या देवींची उठावशिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशद्वारावर मध्यभागी स्टीलची जाळी तर त्याच्या खालच्या बाजूस दोन्ही दारांवर कोरलेले दोन मंगल कलश आहेत

आत संगमरवरी कक्षासनासारख्या वज्रपीठावर काळंबादेवीची प्राचीन काळी पाषाणमूर्ती विराजमान आहे. चतुर्भुज देवीच्या पायदळी असुर, अशा स्वरूपातील ही मूर्ती उंचीने लहान आहे. या मूर्तीच्या एकाच पाषाणशिळेत उठावशिल्पेही कोरलेली आहेत. देवीच्या उजवीकडे गावणादेवी विठलादेवी या लोकदेवतांच्या मूर्ती, तर डावीकडे गांगोदेव गणेश यांच्या मूर्ती आहेत. वज्रपीठाच्या खालच्या स्तरावर स्थानिक देवताही आहेत. मुख्य मंदिराच्या गर्भगृहावर वर निमुळते होत जाणारे शिखर आहे. या शिखरावर सर्व बाजूंनी असलेल्या देवकोष्ठकांत विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत.

काळंबादेवी मंदिरालगतच पूर्वेकडे महादेवाचे पांढरेशुभ्र मंदिर आहे. खुला सभामंडप खुले गर्भगृह असलेल्या या मंदिरात काळ्या संगमरवराची शिवपिंडी आहे. ती पाताळलिंग स्वरूपाची म्हणजे सभामंडपाच्या भुईपासून खालच्या पातळीवर आहे. गर्भगृहाबाहेर काळ्या पाषाणात कोरलेला नंदी गणेशाची मूर्ती आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूच्या भिंतीजवळ असलेल्या चौथऱ्यावर पार्वतीची मूर्ती आहे

काळंबादेवीच्या या भव्य देखण्या मंदिराचा वर्धापन दिन दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्यावेळी येथे मोठी यात्रा भरते. यावेळी देवीची पालखी मिरवणूक निघते. याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. वारगावच्या सर्व ११ वाड्या या उत्सवात सहभागी होत असतात

उपयुक्त माहिती

  • कणकवलीपासून ३० किमी, तर सिंधुदुर्गपासून ११ किमी अंतरावर
  • सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक शहरांतून एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : रवि लिंगायत, गुरव, मो. ९८६०३२७०११, बाबा लिंगायत, मो. ८७९३७२८७२७
Back To Home