सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘उमाळ्याचे गाव’ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या नाधवडे या गावाची ग्रामदेवता म्हणून नवलादेवीची ख्याती आहे. उमाळे म्हणजे जमिनीतून येणारे पाण्याचे बुडबुडे. त्या उमाळ्यातून बाराही महिने पाणी येत असते. त्यातूनच गोठणा नदीचा उगम झाला आहे. या नदीच्या काठी जागृत महादेवाचे स्थान असल्यामुळे नदीस नाधवड्याची गंगा असे म्हटले जाते. नाधवडे हे बारा वाड्यांचे गाव आहे, तसेच गावात बारा मंदिरे आहेत. त्यातील नवलादेवीचे मंदिर हे लोकवस्तीपासून थोडे दूर वसलेले आहे. या मंदिराच्या मागील बाजूस नागेश्वर मंदिर आहे.
स्थानिक समाज–इतिहासानुसार नाधवडेची ग्रामदेवता असलेली नवलादेवी ही येथील ‘पूर्वसत्ता’ देवता आहे. गावातील समाज, गावाचा कारभार, तेथील संस्कृती, रूढी–परंपरा यांच्या नियंत्रणाचे नियम गावरहाटीमध्ये अंतर्भूत असतात. त्या गावरहाटीवर पूर्वी ज्यांची सत्ता होती त्यांना पूर्वसत्ता असे म्हटले जाते. नवलादेवी ही अशा प्रकारे येथील पूर्वसत्ता देवता मानली जाते. कोकणात आंगणेवाडीसारख्या स्थानांमध्ये देवीचा कौल लावून डुकराची शिकार करण्यात येते. शिकारीनंतर डुक्कर वाजत–गाजत मंदिराजवळ आणला जातो. सुवासिनींकडून पारध करणाऱ्यांना ओवाळले जाते, तसेच डुकराचीही पूजा केली जाते. त्यानंतर मंदिराजवळील विशिष्ट स्थळी डुक्कर कापला जाते. त्या स्थळास पातोळी असे म्हणतात. नाधवडेमधील नवलादेवी स्थानाचे वैशिष्ट्य असे की देवीने गावच्या हद्दीपर्यंत डुक्करच नव्हे, तर अन्य प्राण्यांची शिकार करण्यासही मनाई केलेली आहे. नवलादेवीच्या मंदिर आवारात एक कोरडी विहीर असून त्यात एखादा डुक्कर पडला तर त्याचे मांस संपूर्ण गावात देवीचा प्रसाद म्हणून वाटले जाते.
नवलादेवीचे हे मंदिर संथ वाहणाऱ्या गोठणा नदीच्या पात्राजवळच आहे. येथील पुरातन मंदिराचे नूतनीकरण २०११ मध्ये करण्यात आले. उंच जागतीवर उभारलेला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. या मंदिराच्या पुढच्या बाजूला उजवीकडे व डावीकडे भाविकांच्या सुविधेसाठी पत्र्याच्या शेड उभारण्यात आलेल्या आहेत. सभामंडपासमोर दोन दीपमाळा आहेत. एखाद्या चार मजली चौकोनी इमारतीची छोटी प्रतिकृती भासाव्यात, अशा या पाच स्तरीय दीपमाळा आहेत. यातील मधल्या तीन स्तरांवर चारी बाजूंना एकेक देवळी असून त्यात दिवे लावले जातात.
सहा अर्धगोलाकृती पायऱ्या चढून मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. आयताकृती आकाराचा हा सभामंडप खुल्या प्रकारचा आहे. आत संगमरवरी फरसबंदी असून भिंतीलगत कक्षासने आहेत. येथील अंतराळात डाव्या बाजूला एका दगडी चौथऱ्यावर देवीची पालखी आहे. उत्सवाच्यावेळी ही पालखी गावात फिरविली जाते. या पालखीच्या बाजूला चार खांबकाठ्या मांडून ठेवलेल्या आहेत. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून मध्यभागी गर्भगृह आहे. गर्भगृहात वज्रपीठावर मध्यभागी नवलादेवीची सुबक मूर्ती आहे. काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती चतुर्भुज व समपद आहे. तिच्या एका हातात खड्ग, तर एका हातात त्रिशूल आहे. नवलादेवीच्या बाजूला रवळनाथाची परशू, त्रिशूल आणि खड्ग धारण केलेली मूर्ती आहे. रवळनाथ हे कोकणातील एक प्रधान दैवत असून तो शिवस्वरूप असल्याचे मानले जाते. देवी ही आदिशक्ती आदिमाया असल्यामुळे तिच्या जोडीला शिव असतो. येथे तो रवळनाथ स्वरूपात आहे. वज्रपीठावर देवीच्या बाजूस गणेशासह आठ देवतांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर कौलारू असले तरी सभामंडप व गर्भगृहावर वैशिष्ट्यपूर्ण उंच शिखरे आहेत. या शिखरांवरील देवळ्यांमध्ये मंगलकलश व शिखरांच्या लहान प्रतिकृती आहेत.
नवलादेवी मंदिरात दर मंगळवारी राज दरबार भरतो. पंचक्रोशीतील भक्त गाऱ्हाणी घेऊन देवीच्या दर्शनाला येतात. येथे होलिकोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. या उत्सवात देवीची पालखी वाजतगाजत प्रत्येकाच्या घरी जाते. या मंदिरात नवरात्रोत्सव व देवदिवाळीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्रीस गावात होणाऱ्या यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी येथून नवलादेवीची पालखी, खांबकाठी, निशाण व अब्दागिरी यांसह वाजतगाजत गावातून आणली जाते.
नवलादेवी मंदिराच्या मागच्या बाजूला उंच जागतीवर नागेश्वर महादेवाचे मोठे मंदिर आहे. नवलादेवीच्या अंतराळातून बाहेर पडून या मंदिराकडे जाता येते. जमिनीपासून १० पायऱ्या चढून नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या समोरील बाजूस एका आयताकृती चौथऱ्यावर चार दीपस्तंभ आहेत. त्याच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून चार पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपातून पुढे जाताना सभामंडपाचे लाकडी कोरीव काम केलेले प्रवेशद्वार नजरेस पडते. या प्रवेशद्वारावर सुबक नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर लाकडांत कोरलेली गणेशमूर्ती आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. त्याच्या मध्यभागी एका लहान चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. त्यासमोरच शुभ्र संगमरवरी कासवाची मूर्ती आहे. येथील गर्भगृहाचे प्रवेशद्वारही मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणे लाकडी व आकर्षक कोरीव काम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लहान चौथऱ्यांवर गणपती व श्रीकृष्ण यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी अखंड पाषाणातील पाताळलिंगी शिवपिंडी आहे. नवलादेवी मंदिराप्रमाणे हे मंदिरही कौलारू असून दर्शनमंडप व गर्भगृहावर शिखरे आहेत. दर सोमवारी नागेश्वर मंदिरात अभिषेक व महानैवेद्य केला जातो. (संपर्क : पुजारी, जनार्दन गुरव (लिंगायत), मो. ९९२३३५१४९८)