कोकणात गावोगावी खास कोकणी शैलीतील कौलारू, प्रशस्त सभामंडप, उंच शिखरे असलेली मंदिरे पाहावयास मिळतात. मात्र, याच कोकणात एक असे मंदिर आहे ज्यास गाभारा नाही आणि मूर्तीही नाही. हे आहे वेंगुर्ला–शिरोडा रस्त्यावरील, खाडीपरिसरात असणाऱ्या, मानसी पुलालगतचे मानसीश्वर मंदिर. या देवस्थानाचे वैशिष्ट्य असे की या मंदिराच्या परिसरातून जाताना शांतता पाळली जाते. गाडीचा हॉर्न, लाऊडस्पीकर, वाद्ये, एवढेच काय कोणत्याही प्रकारचा आवाज येथे केला जात नाही. गावातील सर्वधर्मीय लोक आवर्जून ही गोष्ट पाळतात.
मानसीश्वर हे जागृत देवस्थान मानले जाते. पारंपरिक समजुतीनुसार हा देव ब्राम्हण असून डोक्याला फेटा, कमरेला पंचा, हातात उपरणे आणि कंदील असे त्याचे रूप आहे. असे सांगितले जाते की रात्रीच्या वेळी एकट्या जाणाऱ्या भाविकांना या देवाने वाट दाखवून सोबत व मदत केली आहे. वेंगुर्ला–शिरोडा रस्त्यावर वेंगुर्ल्याची हद्द संपते तेथेच हे मंदिर आहे. मुख्य रस्त्यालगत मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर नव्याने बांधलेली वेस आहे. पुढे काही अंतरावर खाडीच्या पुलावर एका टोकाला हे देवस्थान आहे. दोन वाहने जातील एवढ्या रुंद असलेल्या या पुलाच्या एका बाजूस मानसीश्वर देवस्थानाची उंच वेस आहे. या वेशीलाच अनेक घंटा टांगलेल्या आहेत. त्यापुढे चार खांबी अर्धखुला सभामंडप आहे. त्याच्या बाजूला कक्षासने आहेत. सभामंडपावर पिरॅमिडच्या आकाराप्रमाणे शिखर असून त्यावर आमलक व कळस आहे.
सभामंडपाच्या बाहेर काही अंतरावर, खाडीच्या पाण्यात बांधलेला एक मोठ्या आकाराचा चौथरा आहे. त्यावर भगव्या रंगाचा एक घुमटाकार भाग आहे. त्यालाच मानसीचा देवचार म्हणतात. या घुमटाकार भागावर असंख्य भगवे झेंडे रोवलेले आहेत. बांबूला वरच्या टोकास बांधलेली भगव्या रंगाची कापडी छोटी शिडे, असे त्यांचे स्वरूप असते. चौथऱ्यानजीक एक मोठा चौकोनी उथळ हौदासारखा भाग आहे. त्यातही असंख्य शिडे रोवून ठेवलेली आहेत. अशीच भगवी शिडे परिसरात सर्वत्र मोठ्या संख्येने दिसतात. या पुढे केवळ पाणीच पाणी आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की हा देव मूळचा घाटावरचा आहे. त्यानंतर मालवण तालुक्यातील गोळवण येथे तो आला. या गावाच्या सीमेवरील एका आंब्याच्या झाडावर त्याचे स्थान होते. त्या मार्गातून येणाऱ्या जाणाऱ्या देवदेवतांना तो देव आपल्या दोन्ही पायांच्या मधून जाण्यास भाग पाडे. जेव्हा वेंगुर्ला पंचायतनाला म्हणजे रवळनाथ, भराडी देवी, सातेरी देवी, रामेश्वर, भुतनाथ यांना हे समजले तेव्हा त्यांनी या देवास रवळनाथ मंदिराजवळील एका आंब्याच्या झाडावर स्थान दिले. हे देवस्थान शिवगणातले असल्याने त्याच्यासोबत चाळा आहे असे म्हणतात. शंकराच्या अधीन गण, वेताळ, राक्षस, भूतपिशाच्च, तसेच चाळा असतो, अशी श्रद्धा आहे. एकदा गावातील लोकांच्या वस्तू, धान्य अशा गोष्टी अचानक नाहीशा होऊ लागल्या. तेव्हा रवळनाथ आणि रामेश्वर यांनी या देवास विचारले असता, पाण्याच्या ठिकाणी माझी स्थापना करावी, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याची स्थापना मानसी पुलाजवळ उभादांडा येथे करण्यात आली. मानसी पुलामुळे त्याचे नाव मानसीश्वर असे पडले.
सोमवती अमावस्येच्या दिवशी येथून जवळच असलेल्या सागरेश्वर किनारी तीर्थस्नान करण्यासाठी अनेक देवदेवता आणि तरंगदेवता या ठिकाणावरून जातात. मात्र त्यात गावचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वराचा समावेश नसतो. रामेश्वर हा मात्र परबवाडा मार्गे सागरेश्वरी जातो. याबाबत अशी आख्यायिका आहे की एका अभ्यंगस्नानाच्या वेळी मानसीश्वर देवाने आपले अक्राळविक्राळ रूप पसरून तेथून जाणाऱ्या सर्व देवादिकांना आपल्या पायाखालून जाण्यास सांगितले. रामेश्वरास मात्र ते अपमानास्पद वाटले. मानसीश्वराने अडवल्यावर रामेश्वराने त्याला आश्वासन दिले की मी तुझ्यासाठी एक अद्भुत भेट म्हणून दहा पायांचा घोडा आणतो. प्रत्यक्षात मात्र येताना रामेश्वराने त्याला एक कुर्ली म्हणजेच खेकडा भेट दिला. त्यामुळे मानसीश्वर संतापला आणि जायचे असेल तर पायाखालून, अन्यथा जाता येणार नाही, अशी ताकीद त्याने दिली. तेव्हापासून आजतागायत रामेश्वर यामार्गे जात नाही. या देवाचा दरारा आजही भाविकांमध्ये आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचा आवाज केला जात नाही. मंदिराच्या या भागातून जाताना शांतता पाळली जाते. वाहनांचा हॉर्नही वाजवला जात नाही. ही प्रथा गावातील सर्व धर्माचे लोक पाळतात. त्यामुळे यात्रेच्या काळात गर्दी होत असूनही या देवस्थान परिसरात कोणताही झगमगाट वा कलकलाट नसतो.
या देवाची वार्षिक यात्रा माघ शुक्ल अष्टमीला असते. या यात्रेसाठी गोवा, कोल्हापूर, कर्नाटक या राज्यांतून भाविक य़ेतात. देवासाठी खास चुरमुऱ्याचे आणि शेंगदाण्याचे लाडू, केळी, नारळ, तसेच घंटी, पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, बांबूच्या काठीला भगवा झेंडे लावलेले निशाण, अशा वस्तू अर्पण केल्या जातात. काहीजण या देवाला खेकडेही अर्पण करतात. येथे श्रद्धाळू भगवे शीड अर्पण करण्याचा किंवा रात्रभर पेट्रोमॅक्सची बत्ती लावून ठेवण्याचा नवस करतात. नवस फेडण्यासाठी भगवी निशाणे तेथील घुमटावर किंवा बाजूला असलेल्या झाडावर खोचली जातात. जत्रेच्या दिवशी अशी किमान पाच ते सहा हजार निशाणे येथे लावली जातात. त्यामुळे या जत्रेला शिडाची वा बत्तीची जत्रा असेही म्हणतात. जत्रेच्या रात्री बत्त्यांच्या उजेडात दशावताराचे प्रयोग रंगतात.