सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामधील मातोंड आणि पेंडूर या गावांच्या सीमारेषेवर एका डोंगरावर साधारण ८०० ते ९०० फूट उंचीवर घोडेमुख देवस्थान आहे. मार्तंड भैरव हे या देवाचे मूळ नाव आहे. गिरोबा देवस्थान या नावानेही हे प्रसिद्ध आहे. सरसेनापती, ३६० चाळ्यांचा अधिपती या नावानेही त्याचा उल्लेख केला जातो. सावंतवाडी–माळेवाड या रस्त्यावरून जाणारे पांथस्थ येथे नतमस्तक होतात. या डोंगराच्या चारी बाजूला असणाऱ्या मातोंड, पेंडूर, माळेवाड, न्हावेली या गावांचे रक्षण घोडेमुख देव उंचावरून करतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की सावंतवाडी संस्थानात सेवा करणारे एक सरदार न्हावेली गावातील सीमा ओलांडून मातोंड–पेंडूर या गावात जेव्हा प्रवेश करीत, तेव्हा त्यांचा घोडा अडून राही. जेव्हा ते सरदार पायउतार होत, तेव्हाच तो अश्व चालू लागे. असे त्या भागातच आणि वारंवार होऊ लागले. तेव्हा त्या सरदाराने एका आचार्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या सत्पुरुष सरदाराला शंकराच्या रूपाबद्दल दृष्टांत झाला. त्यांनी शोध घेतला असता त्या घनदाट वनराईत घोडेमुखाचा लिंगरूपी पाषाण सापडला. त्यांनी त्याच ठिकाणी त्याची स्थापना केली. या भागाला ‘युवराचे रान’ असे नाव होते; परंतु घोडेमुखाच्या स्थापनेपासून या परिसराला घोडेमुख देव हे नाव पडले. अजूनही मातोंड–पेंडूर भागात घोड्यावर आरूढ होणे निषिद्ध आहे. तसे करणे हा देवाचा अवमान समजला जातो. काहींच्या मते, देवीमातेने या देवाचा घोडाच काढून घेतला आणि लोकांच्या कल्याणासाठी त्याने येथेच कायमचे राहावे, अशी विनंती केली. तेव्हापासून घोडेमुखाच्या रूपाने देव इथे वास्तव्यास राहिला.
पेंडूर गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वेशीतून घोडेमुख मंदिराकडे जाणारा मार्ग लागतो. डोंगरावर चढणीच्या, गर्द झाडीतून जाणाऱ्या या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. तीव्र चढ असल्यामुळे मंदिरापर्यंत येईस्तोवर भाविकांची दमछाक होते. झाडाझुडपांनी वेढलेल्या या डोंगरावरील सपाटीवर घोडेमुख देवाचे छोटे मंदिर उभे आहे. मंदिराच्या प्राकारास रेलिंग लावलेले आहे. प्राकाराच्या मध्यभागी एका उंच जोत्यावर षटकोनी आकाराचे सहा खांब लावलेले, अर्धखुल्या सभामंडपासारखे हे छोटे मंदिर आहे. त्यात मध्यभागी गर्भगृह असून त्यावर गोलाकार शिखर आहे. सभामंडपावरही शिखर आहे. या शिखरावर चारही बाजूंनी छोटी शिखरे आहेत. त्यामुळे अनेक शिखरांचा हा समुच्चय दिसतो. या सर्व शिखरांवर आमलक आणि कळस आहे. गर्भगृहात एका स्थानावर घोडेमुख देवाचे दंडगोलाकार पाषाण लिंग आहे.
घोडेश्वर हे पेंडूर गावचे ग्रामदैवत आहे. या देवाच्या जत्रेचा प्रारंभ सातेरी देवीच्या मंदिरापासून सुरू होतो. सलग चार दिवस मंदिरात जागर होत असतो. पाचव्या दिवशी म्हणजेच देवदीपावलीच्या दिवशी घोडेश्वराचा जत्रोत्सव असतो. त्या दिवशी रवळनाथ, सातेरी देवी, पावनाई देवी यांच्या तरंगकाठ्या सातेरी देवीच्या मंदिरात एकत्र येतात. त्यानंतर ही मिरवणूक दहा किलोमीटर प्रवास करत गावातील इतर मंदिरांचे दर्शन घेत वाजत–गाजत घोडेमुख देवस्थानात पोहोचते. तेथे देवतांच्या तरंगकाठ्यांची विधीवत पूजा केली जाते. केळीच्या पानावर देवाला गोडाचा नैवेद्य देऊन मग कोंबड्यांचा मान देण्याचा म्हणजेच बळी देण्याचा विधी सुरू केला जातो. हा देव ३६० चाळ्यांचा अधिपती मानला जातो. चाळा हा शंकराच्या अधीन असतो. गावावर येणाऱ्या संकटांपासून मुक्ती देण्याचे काम चाळा करतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. वाईट शक्तींपासून गावाचे रक्षण करणे, गावाची मर्यादा शाबूत ठेवणे हे त्याचे काम असल्याचे मानले जाते. त्यासाठी या चाळ्यास वर्षातून एकदा परंपरेनुसार त्याचा मान दिला जातो. त्याचाच भाग म्हणून त्यास कोंबड्यांचा बळी दिला जातो. जत्रेच्या दिवशी साधारणतः साडेतीन ते चार हजार एवढ्या कोंबड्यांचा बळी येथे दिला जातो. या नवसाच्या कोंबड्या असतात. त्यामुळे या जत्रेला कोंब्याची वा कोंबड्यांची जत्रा असे म्हटले जाते. घोडेमुख देव मात्र पूर्णतः शाकाहारी असल्याचे मानले जाते व त्याला केळी, नारळ तसेच गोडाचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी हा कार्यक्रम आटोपल्यावर देवांच्या तरंगकाठ्या डोंगरावरून खाली येतात. जत्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.
या जत्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जत्रेच्या दिवशी घोडेमुखाला मानवी अवयवांच्या मातीच्या प्रतिकृतींचे दान केले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की आपल्या ज्या अवयवास व्याधी झालेली असेल त्या अवयवाची मातीची प्रतिकृती देवास दान केल्यास ती व्याधी बरी होते. देवास तसा नवस बोलला जातो. या जत्रेसाठी सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक या ठिकाणांवरून भाविक येतात. मंदिराचा परिसर खाद्यपदार्थ आणि खेळणी, प्रसाद व संसारोपयोगी वस्तू यांच्या दुकानांनी गजबजलेला असतो. मानवी अवयवांच्या मातीच्या प्रतिकृतींची येथे मोठ्या प्रमाणावर विक्री होते.