वेतोबा मंदिर हे आरवली गावचे श्रद्धास्थान व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. कोकणात वेतोबा देवाची एकंदर १४३ मंदिरे आहेत. संरक्षण करणारा व हाकेला धावणारा वेतोबा भाविकांचे लाडके दैवत आहे. वेंगुर्ल्यातील आरवली गावातील हे मंदिर वेताळाचे स्थान मानले जाते. काळाच्या ओघात वेताळमधील ‘ळ’ जाऊन आदरार्थी ‘बा’ हा प्रत्यय लागला व तो वेतोबा या नावाने संबोधला जाऊ लागला. वेतोबा नवसास पावणारी देवता असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नवस फेडण्यासाठी येथे भाविक केळीचा घड तसेच पादुका (चप्पल) अर्पण करतात.
वेताळ वा वेतोबा हा मूळचा शिवगण मानला जातो. शंकराच्या अधीन गण, राक्षस, भूतपिशाच्च, चाळामेळा तसेच वेताळ असतो, अशी श्रद्धा आहे. याबाबत आख्यायिका अशी की आरवली ही शिवाचे अस्तित्व असलेली वस्ती आहे. विजयनगरच्या राजवटीत हरवल्ली म्हणून हे गाव ओळखले जात असे. हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती यावरून हे नाव पडले. त्या काळी गावाबाहेर कोकणेश्वर, सिद्धेश्वर, परमनाथ आणि लिंगेश्वर ही चार शिवमंदिरे होती, असे सांगण्यात येते. हरवल्लीचाच पुढे आरवली असा अपभ्रंश झाला. या देवस्थानाबाबत अशी कथा सांगण्यात येते की सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात भूमैया नामक एका नाथपंथीय साधूने आरवलीनजीक असलेल्या ‘सतानखनाची डोंगरी’ या जंगलातून वेतोबा आणि सातेरी देवी यांच्या मूर्ती आणून त्यांची स्थापना केली. तेव्हापासून वेतोबास ग्रामदेवता आणि सातेरीस ग्रामदेवी म्हणून येथे पूजले जाते.
वेतोबा हा येथील क्षेत्रपाल आहे. शिवपुराण शतरूद्रसंहितेत असे म्हटले आहे की वेताळ हा मूळचा शंकर–पार्वतीचा द्वारपाल होता. एकदा पार्वतीला त्याने दाराबाहेर येण्यास अटकाव केला म्हणून ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप तिने त्याला दिला. कालिकापुराणातील उल्लेखानुसार वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा शिवदूत होता. त्याला महाकाल नावाचा भाऊ होता. पार्वतीने शाप दिल्याने या दोन्ही भावंडांनी पृथ्वीवरील राजा चंद्रशेखराची राणी तारावती हिच्या पोटी वेताळ आणि भैरव या नावाने जन्म घेतला. हे दोन्ही चंद्रशेखर राजाचे औरस पुत्र नव्हते. ते शंकराच्या कृपेने तारामतीच्या पोटी जन्माला आले होते. त्यामुळे चंद्रशेखर राजाने आपल्या मुलांमध्ये औरस पुत्रांना संपत्ती वाटून दिली. भैरव आणि वेताळ यांना काहीच मिळाले नाही. तेव्हा ते तप करण्यासाठी अरण्यात गेले. पुढे वसिष्ठ ऋषींच्या कृपेने त्यांना शंकराचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने शिवगणात स्थान मिळाले. त्या दोघांपैकी वेताळ म्हणजेच देव वेतोबा होय.
सावंतवाडी संस्थानाच्या इतिहासानुसार सावंतवाडीचे राजे लखम सावंत यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने इ.स. १६६४ मध्ये त्यांना आदिलशाहीतील आठ गावे भेट दिली. आरवली हे त्यापैकीच एक होते. तेव्हापासून सावंतवाडीचे राजघराणे वेतोबाची पूजा करू लागले. गोव्यातील पोर्तुगीजांबरोबर झालेल्या इब्रामपूरच्या लढाईपूर्वी सावंतांनी वेतोबाला नवस केला होता. त्या लढाईत त्यांना विजय मिळाला. त्यामुळे त्यांनी देवस्थानला काही जमिनी दिल्या.
येथे आज उभे असलेले मंदिर १६६० मध्ये प्रथम बांधण्यात आले, तर मंदिराचा सभामंडप हा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आला. ग्रामस्थांनी १९९६ मध्ये या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण करून त्यास भव्यत्व दिले आहे. एका उंच महिरपी कमानदार वेशीतून मंदिर परिसरात प्रवेश होतो. या वेशीच्या दोन्ही बाजूंना पायाशी द्वारपालांची उठावशिल्पे आहेत़, तर ललाटबिंबस्थानी एका घुमटीत गणेशाची मूर्ती आहे. वेशीच्या आतल्या बाजूस मंदिर प्राकारात पूजासाहित्याच्या, तसेच वेतोबासाठीच्या चपलांची दुकाने आहेत. काही अंतरावर नगारखान्याची तीन मजली इमारत आहे. येथे रोज सकाळी, दुपारी व सायंकाळी नौबत वाजविली जाते. नगारखान्याच्या पहिल्या मजल्यावर आरवली ग्रामपंचायतीचे वाचनालय आहे. नगारखान्याच्या महिरपी कमानदार प्रवेशद्वारातून आत येताच काही अंतरावर मुख्य मंदिर आहे. एका बाजूस दोन मोठ्या चौथऱ्यांवर तुळशी वृंदावन आणि दीपस्तंभ आहे. या सहा स्तरीय दीपस्तंभाच्या शीर्षस्थानास कमळपाकळ्यांतील घटाचा आकार देण्यात आलेला आहे.
या मंदिराला दोन सभामंडप आहेत. त्यापुढे अंतराळ व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. मंदिराची इमारत दोन मजली असून पहिला सभामंडप हा साधारण दोन ते अडीच हजार लोक एकावेळी बसू शकतील एवढा मोठा आहे. तो आयताकार व अर्धखुल्या पद्धतीचा आहे. त्यास बाहेरच्या भागात गोल खांबांच्या मधल्या जागेत कक्षासने आहेत. आतल्या बाजूला काही अंतरावर रुंद असे गोल खांब व दोन खांबांना जोडणारी कमान आहे. सभामंडपाच्या भिंतींवर विष्णूच्या अवतारांची चित्रे रंगविलेली आहेत. या सभामंडपातून सहा पायऱ्या चढल्यावर पुढच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातही कक्षासने आहेत. त्यापुढे तीन पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो.
अंतराळाचे प्रवेशद्वार जुन्या वाड्यातील दरवाजांसारखे आहे. त्याच्या बाह्यशाखेच्या वर ललाटबिंबावर पुष्पाकार नक्षी आहे, तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस व्यालमुखे आहेत. सभामंडपास गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचे छत आहे. हे छत व प्रवेशद्वार यांच्या मधल्या जागेत शंकराचे उठावशिल्प कोरलेले आहे. वरदहस्त असलेला शंकर, समोर शिवपिंडी आणि दोन्ही बाजूंस नागदेवता, असे हे शिल्प आहे. वेतोबाला मोठ्या श्रद्धेने भाविक मोठ्या आकाराच्या चपला वाहतात. त्यातील काही जुन्या काळातील चपला येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत.
मंदिराच्या उत्तराभिमुखी गर्भगृहात वेतोबाची नऊ फूट दोन इंच उंचीची भव्य मूर्ती आहे. या देवाच्या मूर्तीची प्रत्येक शंभर ते सव्वाशे वर्षांनी पुनर्स्थापना करण्यात येते. वेतोबाच्या मूर्तीची दुसरी पुनर्स्थापना १७०० ते १७२० या काळात करण्यात आली असावी, असे सांगण्यात येते. ती मूर्ती फणसवृक्षाच्या लाकडापासून बनविण्यात आली होती. त्यामुळे या झाडाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावात हे झाड कापले जात नाही व त्याचा वापर वस्तू बनविण्यासाठी होत नाही. तसेच ज्यांना देवळात जाणे शक्य होत नाही, ते या झाडालाच देव मानून त्याची पुजा करतात. तिसरी पुनर्स्थापना १८८३ मध्ये व चौथी २३ एप्रिल १९२० मध्ये झाली. त्या सर्व मूर्ती फणसकाष्ठापासून निर्मिलेल्या होत्या. पाचवी पुनर्स्थापना २२ एप्रिल १९९६ रोजी करण्यात आली. त्यावेळी पंचधातूची नऊ फूट दोन इंच उंचीची वेतोबाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. उत्तिष्ठावस्थेतील वेतोबाच्या एका हातात दुधारी तलवार आणि दुसऱ्या हातात अग्निपात्र आहे. मस्तकावर शेष स्वरूप आणि कानामध्ये रुद्राक्ष मुद्रिका दिसतात. कमरेभोवती दगडांनी विणलेला गोफ आहे. गळ्यात पवित्र वारुंड माळा व दगडी पद्महार आहेत. डोळे आणि कल्ले चांदीचे असून पायामध्ये चांदीच्या पादुका आहेत. गर्भगृहात वेतोबाच्या मूर्तीच्या बाजूला भूम्मैया, पुरवास, रामपुरुष, निराकारी व भावकाई अशा देवताही आहेत. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे.
येथे वेतोबास सात्विक नैवेद्य दाखवला जातो. साखर, लाडू, केळीचा घड दिला जातो. नवस फेडण्यासाठी धोतर जोड, चामड्याच्या चपलांचा जोड अर्पण करण्यात येतो. आपल्या रक्षणाकरीता देव सतत फिरत असतो, चपला झिजतात, त्यासाठी त्याला त्रास होऊ नये म्हणून चपला वाहिल्या जातात. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की त्या चपला वेतोबाकडून वापरल्या जातात. काही काळानंतर झिजतात. पूर्वी या चपला हरणाच्या कातड्याच्या केल्या जात. देवापुढे चांदीच्या मोठ्या चपला पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी वेताबा देवाला कौल लावला जातो. सालई नावाच्या झाडाची ३३ पाने मूर्तीवर विशिष्ट जागी लावली जातात. त्या वेगवेगळ्या जागांना अर्थ आहे. भक्त त्याप्रमाणे कौलाचा अर्थ समजून घेतात आणि होकार की नकार समजावून घेतात.
कार्तिक पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा अशा दोन दिवशी या देवाची यात्रा असते. मार्गशीर्षातील यात्रा मुख्य व मोठी असते. या यात्रेच्या दिवशी ‘अन्नशांती समाराधना’ म्हणजेच अन्नदान केले जाते. हजारोंच्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. या दिवशी मंदिर फुलांनी आणि विजेची रोषणाई करून सुशोभित केले जाते. मंदिरात दर महिन्यातील पौर्णिमेस जागर कार्यक्रम असतो.
योगीराज बापूमामा केणी हे वेतोबा देवाचे परमभक्त होते. आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी वेतोबा देवाचा प्रसार केला. त्यांच्या वाढदिवशी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला ‘बापूमामांचा पाडवा’ या नावाने दरवर्षी मंदिरात कार्य़क्रम केला जातो. आषाढ शुद्ध पंचमीस येथे ११ दिवसांचा महारूद्र असतो. तो पूर्ण झाल्यावर बाराव्या दिवशी तेथे समाराधना (प्रसाद) कार्यक्रम केला जातो. त्याचप्रमाणे श्रावणात एक शुभ दिवस शोधून वेतोबा मंदिरात ‘नवन्न ग्रहण‘ विधी आयोजित केला जातो. या दिवशी परंपरेनुसार हंगामातील नवीन धान्य किंवा तांदूळ विधीपूर्वक कापून मंदिरात आणले जाते. मग कापणीला आशीर्वाद देण्यासाठी वेतोबा आणि सातेरी मंदिरात तांदळाची पूजा केली जाते. येथे महाशिवरात्रही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मंदिरालगत एक मोठे सभागृह आहे. यात्रेच्या वेळी वा इतर सण–उत्सवांनिमित्ताने सभागृहात कार्यक्रम होतात. मंदिर संस्थानातर्फे येथे अन्नछत्र चालवले जाते. येथे अल्पशः शुल्कात दुपारचे जेवण उपलब्ध असते. याशिवाय भाविकांना राहण्यासाठी सुखनिवास (धर्मशाळा) आहे.