नवदुर्गा मंदिर

कनयाळे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

अनेक गौड सारस्वत दैवज्ञ ब्राह्मण घराण्यांची कुलदेवता असलेल्या नवदुर्गा देवीचे सोळाव्या शतकापासूनचे स्थान रेडीपासून जवळ असलेल्या कनयाळे या गावात आहे. महाराष्ट्रगोवा राज्यांच्या सीमेजवळ, तेरेखोल किल्ल्याजवळ, निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर वसलेले आहे. नवदुर्गा देवी हे पार्वतीचे रूप मानले जाते. महिषासुरमर्दिनी या नावानेही ती ओळखली जाते. असे सांगितले जाते की या देवीचे मूळ स्थान गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील गावसी या गावात होते. जगद्विख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकर यांची ही देवी कुलदेवता होय

कनयाळे येथील या मंदिराबाबतची ऐतिहासिक कथा अशी की सोळाव्या शतकामध्ये ही देवी गोव्यातून येथे आली. गोव्यावर पूर्वी विजयनगरची सत्ता होती. नंतर ते अहमदनगरच्या निजामशाही अमलाखाली गेले. निजामशाहीची शकले झाल्यावर विजापूरच्या आदिलशाहाने त्याच्यावर ताबा मिळवला. आदिलशाहा मेल्यानंतर विजयनगरचा दर्यासारंग थिमय्या (तिमोजा) याने गोवा जिंकून तेथे स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने पोर्तुगीजांची मदत घेतली. आफाँस आल्बुकेर्क हा तेव्हा पोर्तुगीजांचा भारतातील गव्हर्नर होता. त्याने २८ फेब्रुवारी १५१० रोजी या गोव्यावर हल्ला चढवून ते जिंकले. तेथील हिंदू पुढाऱ्यांनी आल्बुकेर्कच्या सामोरे जाऊन गोवा शहराची किल्ली त्याच्या हवाली केली. विजापूरच्या सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात त्याला गोवा सोडावे लागले; परंतु २५ नोव्हेंबर १५१० रोजी हल्ला करून त्याने पुन्हा गोवा घेतले येथे पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली

लवकरच पोर्तुगीजांनी येथे आपले खरे रूप दाखवले. त्यांनी धार्मिक अत्याचारांना सुरुवात केली. आल्बुकेर्कने तिसवाडीतील सप्त कोटीश्वराचे मंदिर पाडून तेथे चर्च बांधले. तो मेल्यानंतर गोव्यातील धर्मसमीक्षण (इन्क्विझिशन) संस्था बेताल झाली. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी प्रथम तिसवाडी बेटात धर्मांतराची मोहीम सुरू केली. अल्पावधीत तिसवाडी बेटावरून हिंदू नामशेष झाले. तेथील हिंदूंनी आपला धर्म देव वाचवण्यासाठी सुरक्षितस्थळी पळ काढला. त्या काळात तिसवाडीतील गावसी या गावातील लोकांनी नवदुर्गा देवीची मूर्ती घेऊन पलायन केले होते. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की वेंगुर्ला शहरात देवीची स्थापना करण्याचा त्यांचा मानस होता. दुसऱ्या दिवशी ते सर्व वेंगुर्ला शहरात पोहोचणारच होते, पण रात्र झाली आणि अलीकडल्या गावात त्यांना मुक्काम करावा लागला. सकाळी निघताना ते ती मूर्ती उचलू लागले, तर ती मूर्ती जागची हलेना. ती चुंबकाप्रमाणे तेथेच चिकटून राहिली. अखेर सर्वांनी येथून जवळच असलेल्या रेडी गावातली स्थानिक माऊली देवीचा कौल घेण्याचे ठरवले. देवीने नवदुर्गा मातेला याच ठिकाणी राहायचे आहे, तिला येथेच स्थानस्थ करावे, असा कौल दिला. माऊली देवीचा कौल आणि नवदुर्गा देवीची इच्छा शिरसावंद्य मानून भक्तांनी तेथील जमीन विकत घेतली. ज्या जागी देवीची मूर्ती चिकटून राहिली होती, त्याच जागी मंदिराचे बांधकाम करण्यात आले. तीच ही कनयाळे गावची नवदुर्गा देवी होय.

येथील रेडी सरोवराच्या परिसरात, नारळीपोफळीच्या बागांमधील प्रशस्त प्राकारात हे नवदुर्गेचे मंदिर आहे. जुन्या मंदिराचा फेब्रुवारी १९६३ रोजी जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्राकारास उंच प्रवेशद्वार आहे. त्याच्या महिरपी कमानीच्या वरच्या बाजूस मधोमध महिषासुराचे उठावशिल्प आहे. आत काही अंतरावर एका चौथऱ्यावर सप्तस्तरीय दीपस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याच्या बाजूला जुन्या पद्धतीचे तुळशी वृंदावन आहे. देवीचे मंदिर कौलारू असून ते खास कोकणी स्थापत्यशैलीत बांधण्यात आलेले आहे. दीपस्तंभानजीक असलेल्या पाच पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप खुल्या स्वरूपाचा प्रशस्त आहे. चौदा खांबांच्या या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपाच्या छतावर, भिंतीवर आता लुप्त होत चाललेल्याकावी कलेतून साकारलेली नक्षी हे या नवदुर्गा मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. या नक्षीमध्ये खास करून फुले आणि मंडालाकार दिसतो. कावी कला ही गोव्यातील चित्रकलाशैली आहे. असे सांगण्यात येते की या शैलीला सुमारे ६०० वर्षांचा इतिहास असून तिची उत्पत्ती गोव्यातच झाली होती. पूर्वीच्या काळी अनेक समाजात लोक भिंतींचा वापर चित्रे काढण्यासाठी करीत असत. वारली समाजामध्येही ही परंपरा आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील लोकही भिंतीवर त्यांच्या विशिष्ट शैलीतून चित्रे रंगवित असत. त्याकरीता प्रथम शिंपल्यांचे पीठ करून त्यात गूळ रेती मिसळत असत. त्या मिश्रणाची पुट्टी भिंतीवर लावून त्यावर लाल मातीचा (काव) लेप लावत असत. त्यात नैसर्गिक डिंक मिसळलेला असे. नंतर धातूच्या अवजारांनी त्यावर नक्षीकाम केले जात असे. ही कला गोव्यातील मंदिरांत, जमीनदारांच्या घरांत तसेच काही गिरिजाघरांतही पाहावयास मिळते

मंदिरास मोठे अंतराळ असून त्याच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूने दोन मोठी भित्तीचित्रे रंगवण्यात आलेली आहेत. दोन्ही चित्रे श्रीकृष्णाची आहेत. त्यातील एक चित्र कुरुक्षेत्रावर गांडीव धनुष्य त्याग केलेल्या अर्जुनास गीतोपदेश देणाऱ्या श्रीकृष्णाचे, तर दुसरे चित्र अर्जुनास आपले विराट रूप दाखवणाऱ्या श्रीकृष्णाचे आहे. या चित्रांच्या खालच्या बाजूस, तसेच अंतराळाच्या आतील भिंतींनाही कक्षासने आहेत. तेथेही कावी कलेचा आविष्कार पाहावयास मिळतो

मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला शंख, गदाधारी चतुर्भुज स्त्री द्वारपालांची उंच शिल्पे आहेत. आत वज्रपीठावर नक्षीदार मखरात देवीची मूर्ती आहे. १९७१ साली येथील मूळ मूर्तीला चीर गेल्याचे एका पुजाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी ते ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या मूर्तीचे समुद्रात विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले येथे तशीच नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. ही नवदुर्गा महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. तिला अष्टभुजा आहेत. तिच्या हातांत शंख, चक्र, गदा, कमळ, भाला, त्रिशूल आहे. एका हाताने तिने महिषासुराचे शिर पकडले आहे. देवीचा एक पाय महिषासुराच्या पाठीवर दुसरा पाय भूमीवर आहे. पायांजवळ सिंह आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काशी कल्याणी ब्राम्हण, जैन ब्राम्हण, भावनाथ आणि देवभाराचा पूर्वस (पूर्वज) या देवता आहेत.

या मंदिरात दरवर्षी दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. अश्विन मासातील नऊ दिवस नवरात्रोत्सव आणि माघ शुद्ध नवमीला देवीची यात्रा असते. उत्सवकाळात मंदिर फुलांनी, विजेच्या रोषणाईने सजविले जाते. यात्रेच्या दिवशी अभिषेक, नैवेद्य, कुंकुमार्चन, तुलाभार, एकादशणी लघुरूद्र असे विधी केले जातात. तुलाभार विधीत साखर, नारळ आदींनी एखाद्या व्यक्तीची तुला केली जाते त्या वस्तुंचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. ब्राह्मण भोजन महापूजा करण्यात येते. यात्रेच्या दिवशी रात्री दशावताराचा कार्य़क्रम होतो. देवीचा चार वेळा पालखी सोहळा करण्यात येतो. कामत, गावसकर, तारकर, दलाल हे या देवीचेमहाजनआहेत. म्हणजेच ही देवी या आडनावाच्या मंडळींची कुलदेवता आहे. ते या जत्रेस पुणे, मुंबई, मंगळूर, उडुपी अशा विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने येतात. जत्रा झाल्यावर देवीच्या साड्यांचा लिलाव करण्यात येतो. भाविक या साड्या ५००० पासून ते २१००० रुपयांपर्यंत श्रद्धेने घेतात

उपयुक्त माहिती

  • वेंगुर्ला येथून २० किमी अंतरावर
  • वेंगुर्ला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • मंदिराच्या भक्त निवासातही भोजन निवासाची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३६६ २६८५८८, रानडे गुरुजी, मो. ९४२०२५८७७२
Back To Home