रेडी गणपती मंदिर

रेडी, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग

पूर्वीच्या काळी अरबी समुद्रातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून रेडीपट्टणमची ओळख होती. ते बंदर म्हणजेच सध्याचे रेडी बंदर होय. कोकणातील शेवटचे बंदर म्हणून ओळख असलेल्या रेडीमध्ये समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर कोकणी मंदिरशैलीतील मोठे गणपती मंदिर आहे. कोकणाच्या मातीतच गणेशभक्ती असल्याने या मंदिरात सतत भाविकांची गर्दी असते. हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जात असल्याने अनेक भाविक येथे आपल्या कामनापूर्तीसाठी नवसही करतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भव्य गणपतीची मूर्ती ही द्विभुज स्वरूपात आहे.

रेडीतील लाल मातीच्या रस्त्यावरील कमानदार प्रवेशद्वारातून आत गेल्यावर काही प्रसादाची आणि फुलांची दुकाने लागतात. तेथून पुढे सुमारे २५ पायऱ्या उतरून या गणेश मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मुखमंडप सभामंडपास उतरत्या छपराचे कौलारू छत आहे, तर गर्भगृहावर वर निमुळते होत जाणारे शिखर आहे. शिखराच्या चारही बाजूंना एकावर एक अशी दोन शिखरे कोरलेली आहेत. त्यावर ग्रीवा म्हणजे शिखराच्या मानेचा भाग, आमलक आणि कळस आहे. मंदिर परिसरात जांभ्या दगडातील तुळशी वृंदावन त्या समोरच काही अंतरावर खुला मुखमंडप आहे. त्यात सुंदर नक्षीकाम केलेले दोन कोरीव स्तंभ आहेत. तीन पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश होतो

सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूसही दोन कोरीव खांब आहेत. त्यावर कमलशीर्ष म्हणजे खांबाच्या वरच्या भागात उलट्या कमळाप्रमाणे कोरलेल्या पाकळ्यांची नक्षी आहे. या प्रशस्त सभामंडपाच्या जमिनीवर ग्रँनाइटची फरशी बसवलेली आहे. सभामंडपात खालच्या बाजूस चौरसाकृती आणि त्यावर गोलाकार असे स्तंभ आहेत. या स्तंभांवर कमलशीर्ष तसेच घटपल्लव कोरलेले आहेत. त्याच्या वरच्या भागात पलगई म्हणजे खांबाच्या आकारापेक्षा मोठा फरशीसारखा चौरसाकार सपाट कमी उंचीचा भाग आहे. हे खांब नक्षीदार कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. या सभामंडपात बसूनही गणरायाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेता येते.

अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोरही दोन गोलाकृती स्तंभ आहेत. हे प्रवेशद्वार लाकडी द्विशाखीय आहे. त्यावर सुंदर नक्षी कोरलेली आहे. अंतराळात पालखी इतर यात्रेकरीता लागणारे सामान ठेवलेले आहे. मोठमोठ्या खिडक्यांमुळे अंतराळ सभामंडपाप्रमाणेच हवेशीर आहे. मंदिराचे गर्भगृह एकामागे एक अशा तीन महिरपी कमानींनी सजलेले आहे. आत छोट्या वज्रपीठावर द्विभुज गणेशाची मूर्ती विराजमान आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. एका हातात मोदक दुसरा वरदहस्त आहे. या कमानींमुळे ही मूर्ती एखाद्या भव्य देव्हाऱ्यात बसवल्यासारखी भासते. मूर्तीसमोर एका बाजूस गणरायाचे वाहन मूषक आहे. गर्भगृहाच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे

या मंदिराबाबत आख्यायिका अशी की रेडी किनाऱ्याजवळ लोह खनिजाच्या खाणी आहेत. तेथे वाहनचालक म्हणून रेडीच्या नागोळावाडीतील सदानंद नागेश कांबळी हा तरुण कामास होता. एकदा लोह खनिजांनी भरलेला त्याचा ट्रक एका विशिष्ट जागी बंद पडला. रात्र झाल्यामुळे सदानंद तेथेच झोपला. पहाटे त्याच्या स्वप्नात साक्षात गणराय आले. या ठिकाणी माझे अस्तित्व आहे, मला बाहेर काढा, असा दृष्टांत त्याला झाला. ती तारीख १८ एप्रिल १९७६ अशी होती. सदानंद याने ही हकीकत सर्वांना सांगितल्यावर काही लोकांनी पुढाकार घेऊन खाणीतील काही मजुरांच्या मदतीने तेथे खोदकाम सुरू केले. थोडे खोदल्यानंतर गणपतीच्या कानाचा आणि मुखाचा भाग दिसू लागला. ते पाहून सगळे जण चकित झाले. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेत जांभ्या दगडापासून तयार केलेली होती. मे १९७६ रोजी पूर्ण मूर्ती दिसायला लागली. मूर्ती द्विभुज सुबक होती. मूर्तीची उंची फूट रुंदी फूट होती. खोदकाम सुरू असताना तेथे काही प्राचीन अवशेषही मिळाले. सव्वा महिन्यानंतर त्याच परिसरात दगडांत कोरलेली मोठी मूषकमूर्ती सापडली. येथील ग्रामदैवत माऊली देवीच्या कौलानुसार याच ठिकाणी मंदिर बांधण्यात यावे, असे ठरले. त्यानुसार १९७८ मध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले. अलीकडेच या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नवसाला पावणारा, अशी या गणपतीची ख्याती आहे.

असे सांगितले जाते की या परिसरात असलेल्या यशवंतगडाच्या द्वारपट्टीवर कोरलेली गणेश मूर्ती रेडीच्या या गणपतीच्या मूर्तीमध्ये विलक्षण साम्य आहे. हे मूर्तीसाधर्म्य पाहता, ही मूर्ती ३०० वर्षांपूर्वीपासून येथे पुजली जात होती. परकीय आक्रमकांच्या हल्ल्यापासून ही मूर्ती वाचावी, यासाठी तिला जमिनीखाली ठेवली असावी.

या मंदिरात माघी गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी या दिवशी भाविकांची अधिक गर्दी असते. येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या मंदिराजवळच रेडीचा प्रसिद्ध समुद्र किनारा असल्याने तेथे बोटिंगची मजा लुटण्यासाठी अनेक पर्यटक येतात

उपयुक्त माहिती

  • वेंगुर्ला येथून २० किमी, तर सावंतवाडीवरून ४३ किमी अंतरावर
  • वेंगुर्ला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : विनायक कांबळी, विश्वस्त, मो. ९४२३१६६५४५
Back To Home