‘एक गाव, बारा वाड्या आणि बारा मंदिरे’ ही नाधवडे या गावाची ओळख असून उमाळ्यांचे गाव म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. उमाळे म्हणजे जमिनीतून येणारे पाण्याचे बुडबुडे. या पाण्याच्या झिरप्यातूनच येथे गोठणा नदी प्रवाहित झाली आहे. या नदीस येथे गंगा असे म्हटले जाते. तिच्या उगमस्थानानजीक असलेल्या महादेवाच्या मोठ्या मंदिरास त्यामुळेच भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. हे महादेव मंदिर जागृत स्थान असल्याचे मानले जाते. ‘प्रति कुणकेश्वर’ म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते.
मुंबई–गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे या गावातून वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाधवडे हे गाव आहे. वैभववाडी तालुक्यातील सुजलाम, सुफलाम आणि निसर्गसमृद्ध परिसरात गाव वसले आहे. गावाच्या अग्नेय दिशेकडे असलेला भव्य असा सालवा डोंगर हे नाधवड्याचे भूषण मानले जाते. असे म्हटले जाते की या गावात नेहमी कोणता ना कोणता उत्सव सुरू असतो, कारण या गावात मुख्य देवतांची बारा मंदिरे आहेत. कोकणातील अन्य गावांच्या मानाने नाधवडे या गावाचा विस्तार मोठा आहे. गावाच्या सुरुवातीपासून ते गावाच्या वेशीपर्यंतचे अंतर हे पाच किमी आहे. येथील महादेव मंदिरात गोठणा नदीवर बांधण्यात आलेला लहानसा साकव पार करून जावे लागते. या नूतन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नदीवर बांधलेला घाट आहे. त्यावर नदीत उतरण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत.
गोठणा नदीवरील साकव पार करून पुढे आल्यानंतर मंदिराचे छोटेसे दगडी चिऱ्यांनी बांधलेले प्रवेशद्वार लागते. त्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन–दोन दीपस्तंभ आहेत. येथेच मारुतीचे लहानसे देऊळ आहे. पूर्वाभिमुख असलेले महादेवाचे मंदिर हे जमिनीपासून उंच जागतीवर आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या मंडपात आत जाताच दिसते ते त्याचे प्रशस्त स्वरूप. हा सभामंडप आयताकृती आणि अर्धखुल्या प्रकारचा आहे. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. त्यावरच्या भागात चौकोनी खांबांच्या मध्ये मोठ्या महिरपी कमानदार खिडक्या आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी एका लहान चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गुळगुळीत पाषाणात घडवलेल्या या रेखीव मूर्तीच्या गळ्यातील घुंगरमाळ, माथ्यावरून लोंबलेला गोंडा, पाठीवरील झुलीचे गोंडे, त्यावरील वर्तुळाकार नक्षी या कोरीव कामामुळे हा नंदी लक्षणीय झाला आहे.
सभामंडपाच्या पुढच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ संगमरवरी कासवाची मूर्ती आहे. आत पाताळलिंग स्वरूपाची म्हणजे जमिनीपासून खाली खोदलेल्या भागात बसवलेली दगडी शिवपिंडी आहे. तिच्याभोवती चौरसाकृती ओटा आहे. त्यावर संगमरवरी मखरात बसवलेली गणपतीची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहावरील शिखर हे किंचित घुमटाकृती आहे. त्यावर त्रिस्तरीय आमलक व त्याच्यावर सुंदर कळस आहे.
या मंदिराच्या मागील बाजूस रंगमंच आहे. उत्सवकाळात येथे अनेक कार्यक्रम साजरे होतात. देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वराची यात्रा ज्या कालावधीत असते तेव्हाच म्हणजे महाशिवरात्र काळात येथेही मोठा उत्सव होतो. कुणकेश्वराप्रमाणेच येथील यात्रोत्सवही तीन दिवस चालतो. या यात्रेच्या पहिल्या म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी गावातील नवलादेवी मंदिरातून ढोल–ताशांच्या गजरात देवीची पालखी आणण्यात येते. यात्राकालावधीत दिवसातून तीन वेळा आरती होते. रात्रीच्या वेळी पालखी, खांबकाठ्यांसह मानकरी, ग्रामस्थ व भाविक ‘शिव हर हर महादेव’च्या जयघोषात मंदिराला प्रदक्षिणा घालतात. यावेळी येथे गुलाल व चुरमुऱ्यांची उधळण केली जाते. त्यानंतर रात्री उशिरा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. यावेळी अखंड ७२ तास देवाचा जागर सुरू असतो.
नाधवडे गावाच्या परिसरात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत, त्यांपैकी उमाळा (ग्रामस्थ या जागेला उमाळा असेच संबोधतात) हे ठिकाण महादेव मंदिरानजीकच आहे. तेथे ग्रामस्थांनी मोठे कुंड बांधले आहे. परिसरात पाच ते सहा ठिकाणी उमाळे असून त्यांतून बाराही महिने पाणी येत असते. येथूनच गोठणा नदी उगम पावते. सपाट पठारावर उगम पावणारी नदी हा येथील एक नैसर्गिक चमत्कार आहे. या उमाळ्यांमुळे नाधवडेसहित आसपासच्या गावांना कधीही पाणीटंचाई भासत नाही.
उमाळ्यातून बाहेर पडणारे पाणी नाधवडेच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे डोंगरकड्यावरून ८० फूट खाली कोसळते. हा धबधबा ज्या ठिकाणी खाली पडतो ते स्थान नापणे धबधबा म्हणून पर्यटकांमध्ये परिचित आहे. महाराष्ट्रात बारमाही कोसळणारे तीन धबधबे आहेत व ते तिन्ही कोकणातच आहेत. एक ठाणे जिल्ह्यातील दाभोसे येथे, दुसरा संगमेश्वरजवळील धोधावणे धबधबा आणि तिसरा वैभववाडी तालुक्यातील हा नापणे धबधबा होय. या धबधब्यातून पडणारे पाणी कधीही कमी होत नाही. हा प्रवाह एवढा वेगवान असतो की तो थेट अंगावर झेलता येत नाही. लांबूनच तो अनुभवावा लागतो. या धबधब्यामुळे या भागात पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात.