दुर्गादेवी मंदिर

खारेपाटण, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग


दुर्गादेवी ही आदिशक्ती असून दुर्ग नावाच्या राक्षसाला तिने मारले म्हणून तिला दुर्गा हे नाव पडले, अशी पौराणिक कथा आहे. मार्कंडेय पुराणात असे म्हटले आहे की शंकर, यम, विष्णू, चंद्र, इंद्र, वरुण, भूमी, सूर्य या देवतांच्या अंशापासून दुर्गेचा जन्म झाला. दुर्गा देवीची रौद्र सौम्य अशी दोन्ही रूपे आहेत. कोलकात्यात ती काली रूपात आहे, तर गोमंतकात शांता स्वरूपात आहे. तिच्या वेगवेगळ्या रूपांतील मूर्ती आढळून येतात. खारेपाटण किल्ल्यातील दुर्गादेवी मंदिरात मात्र देवीची पूजा स्वयंभू तांदळ्याच्या स्वरूपात केली जाते

ऐतिहासिक नोंदींनुसार, खारेपाटण ही प्राचीन महत्त्वाची व्यापारी पेठ होती. आठव्या शतकाच्या द्वितीयार्धात राष्ट्रकूट नृपती पहिला कृष्ण याने दक्षिण कोकण म्हणजेच तळकोकण जिंकून तेथे शिलाहारवंशी सणफुल्ल याची प्रशासक म्हणून नेमणूक केली. शिलाहार घराणे हे स्वतःस विद्याधर जीमूतवाहन याचे वंशज मानत असत. हिंदू धर्मसंस्कृतीनुसार विद्याधर हे गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर यांच्याप्रमाणेच अर्धदेव होते. जीमूतवाहन हा विद्याधर राजपुत्र होता. या घराण्याच्या अकरा पिढ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. दक्षिण गोव्यातील चांदोर (चंद्रपूर) येथे प्रथम त्यांची राजधानी होती. .. ७६५ ते ७८५ या काळात होऊन गेलेला सणफुल्लाचा पुत्र धम्मियर याने तत्कालीन बलिपत्तन म्हणजेच खारेपाटण येथे ही राजधानी हलवली. त्यानेच खारेपाटणचा गिरीदुर्ग उभारला

.. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील आदिलशाही मुलखावर स्वारी केली. त्यावेळी त्यांनी खारेपाटणसह हा किल्लाही जिंकून स्वराज्यात सामील केला होता. समुद्रसपाटीपासून ८० मीटर उंच असलेल्या या गडाच्या बालेकिल्ल्यात शिवाजी महाराजांच्या काळात दुर्गादेवीचे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिराच्या जवळच आज अत्यंत पडझड झालेला बुरूज त्या काळाची साक्ष देत उभा आहे. मुंबईगोवा महामार्गावर खारेपाटण येथून उजव्या बाजूला डोंगररांगामध्ये पाहिले असता, एका मध्यम आकाराच्या डोंगरावरील हा किल्ला आणि त्यावरील हे मंदिर दिसते. अर्थात आता त्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. जुन्या मंदिराच्या जागी सध्याचे मोठे सुंदर मंदिर उभे आहे. किल्ल्यातील सपाट जागेवरील हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर दीपस्तंभ असून त्याच्या शेजारी तुळशी वृंदावन आहे

जमिनीपासून काही फूट उंचीच्या अधिष्ठानावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. प्रशस्त आयताकृती सभामंडप आणि आत प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह, अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोरील बाजूस सभामंडपास चार खांबांदरम्यान बांधलेल्या तीन कमानी आहेत. त्यातील मध्यभागी असलेल्या कमानीत मंदिराचे प्रवेशद्वार आहे. त्यास चौकोनी स्तंभ आणि त्यावरच्या छताकडील बाजूस घटपल्लवासारखा आकार देण्यात आलेला आहे. त्याच्यावर चौकोनी कमी उंचीचा भाग म्हणजेच पलगई आहे. या वैशिष्ट्यपूर्ण खांबांदरम्यान असलेल्या प्रवेशद्वाराच्या पाच पायऱ्या चढून येथील सभामंडपात प्रवेश होतो

येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा आहे. त्यास कोकणातील घरांप्रमाणेच उतरते कौलारू छप्पर आहे. आत उजवीकडे डावीकडे भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात १८ स्तंभ आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून देवीचे गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार वरच्या बाजूस अर्धवर्तुळाकार असून त्याच्या वरील कमानीत व्याघ्रमुख कोरण्यात आले आहे. या ललाटाच्या वरच्या बाजूस ज्याला उत्तररांग म्हणतात त्या भिंतीच्या भागावर महिषासुराचा वध करणाऱ्या कालिमातेचे उठावशिल्प कोरण्यात आलेले आहे. प्रवेशद्वारातून चार पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. आत एका वज्रपीठावर देवीची दंडगोलाकार तांदळ्याच्या स्वरूपातील मूर्ती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार देवीचा तांदळा मुळात लहान आकाराचा आहे. त्यावर भाविकांनी गुंडाळलेल्या नाड्यांमुळे तो तांदळा मोठा दिसत आहे. या मूर्तीच्या मागे भिंतीवर बसक्या दोन स्तंभांवर अर्ध वर्तुळाकार अशा स्वरूपात सुंदर सजावट केलेली आहे

या गर्भगृहावरील उंच शिखर अगदी गडाच्या खालूनही दिसते. पिरॅमिडच्या आकाराचे, एकावर एक लहान होत गेलेले चौकोन आणि त्यावर कोरलेल्या देवळ्या वा प्राचीन छत्र्यांसारखा आकार यांनी युक्त असे हे शिखर आहे. त्यावरील आमलकाच्या जागी उपड्या अर्धघटासारखा आकार आहे. त्यावर उंच कळस आहे. या मंदिरात अत्यंत धामधुमीत धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस येथे भाविकांची गर्दी असते. देवीचे हे स्थान जागृत आणि नवसास पावणारे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अनेक जण देवीस नवस बोलतात. नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी ते फेडले जातात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार येथे देवीस बकरा कापला जातो त्याच्या रक्ताने देवीस स्नान घातले जाते

उपयुक्त माहिती

  • कणकवलीपासून ३७ किमी, तर ओरोसपासून ५८ किमी अंतरावर
  • सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक शहरांतून खारेपाटणसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : ऋषिकेश जाधव, मो. ९८६०६७०८७०