रागाई माता मंदिर

चिंचोड्याचा पाडा, कुंभारखाण पाडा, डोंबिवली पश्चिम, जि. ठाणे


ठाणे जिल्ह्यातील सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहराच्या पश्चिमेस असलेले रागाई देवीचे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. डोंबिवलीमध्ये बहुसंख्येने राहत असलेल्या आगरी समाजाची रागाई देवी ही कुलदेवता असून ती नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चिंचोड्याचा पाडा कुंभारखाण पाडा यांचे ग्रामदैवत असलेल्या रागाई देवीचे हे प्राचीन स्थान आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर देवी मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे.

आगरी समाजाच्या इतिहासानुसार हा समाज मूळचा यदुवंशी मानला जातो. इसवी सनाच्या तेराव्या शतकात मुंगीपैठणच्या बिंबराजाने जेव्हा अलिबाग तालुक्यातील सागरगडावर हल्ला केला नंतर चौल, आवास सासवणे ही संस्थाने जिंकून घेतली, तेव्हा त्याच्यासोबत आलेले सैन्य याच भागात स्थायिक झाले. त्यातील काही लोकांना राजाने मिठागरे बांधून दिली मीठ तयार करण्याचा हक्क दिला. त्या काळात मीठ हा अत्यंत किफायतशीर व्यवसाय होता. हा व्यवसाय करणारे लोकच पुढे आगरी या नावाने ओळखले जाऊ लागले, असे सांगण्यात येते. डोंबिवली येथे पूर्वी आगरी समाज मूळ गावठाणाप्रमाणेच बाजूच्या अनेक पाड्यांत राहत असे. एका आख्यायिकेनुसार ही देवी पूर्वी त्यावेळच्या गावठाणात, मोठा गाव परिसरात आपल्या बहिणीसोबत राहत असे. मात्र एके दिवशी तिचे बहिणीशी भांडण झाले ती रागावून या पाड्यांमध्ये आली. त्यामुळे तिला रागाई असे नाव पडले

या मंदिराबाबत असे सांगितले जाते की सुमारे शंभर वर्षांपूर्वी म्हात्रे आडनावाच्या शेतकऱ्याला शेतात देवीची पाषाणमूर्ती सापडली. तेथे त्याने प्रथम छोटे कौलारू मंदिर उभारून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही वर्षांनी ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा येथे लहानसे मंदिर त्यांनी उभारले. आता त्याच जागी भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकापासून दहा मिनिटांच्या अंतरावर गणेशनगर परिसरातील पेट्रोल पंपाजवळ हे मंदिर आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिराची आकर्षक नक्षीकाम असलेली कमान दिसते. या कमानीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. येथून काही पावलांवरच हे मंदिर आहे. मंदिरावरील शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. चार स्तर असलेल्या या शिखरावर देवदेवता, थोर संत तसेच नवनाथांची शिल्पे आहेत. मंदिराच्या समोर सात आसरांचे तांदळे आहेत. आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश असून त्या जलदेवता असतात. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात आसरा म्हणतात. मत्स्यी, कुर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा मकरी अशी त्यांची नावे आहेत. येथील सात आसरांच्या तांदळ्यांना खामदेव असेही बोलले जाते. त्यासमोर देवीच्या नवसाचे कोंबडेबकरे कापण्यात येतात. येथून काही पावलांवर तुळशी वृंदावन तसेच बाजूला दत्ताचे स्थान आहे.

रागाई माता मंदिराची रचना दर्शनमंडप, सभामंडप, गर्भगृह गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग अशी आहे. खुल्या दर्शनमंडपातील दोन स्तंभ एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत. स्तंभ कमानीवर नाजूक असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. मुखमंडपाच्या वरच्या भागात गणेशाची मूर्ती आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावरही गणेशाची मूर्ती आहे. या सभामंडपातील स्तंभांवर भिंतीवर आकर्षक नक्षीकाम आहे

मंदिराचे गर्भगृह सुंदर आहे. त्याचे दर्शनी स्तंभ, त्यावरील महिरपी कमान यांवर पानफुलांचे नक्षीकाम आहे. आत मोठे वज्रपीठ आहे. त्यावर चांदीच्या मोठ्या देव्हाऱ्यात डाव्या बाजूला रागाईची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. ही मूर्ती एका चौकोनी शिळेवर कोरलेली आहे. या उठावशिल्पात पूर्णाकृती देवी आहे. तिच्या दोन्ही बाजूला दोनदोन देवतांच्या लहान मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. रागाईच्या उजवीकडे दुर्गामातेची व्याघ्र अधिष्ठित मूर्ती आहे. दुर्गादेवीच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात त्रिशूल तर चौथ्या हातात कमलपुष्प आहे. वज्रपीठाच्या खालच्या बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी सूर्यप्रतिमा आहे. मागील कमानीवर व्याघ्रमुख आणि त्याच्या वरील बाजूस समृद्धीचे प्रतीक असलेला श्रीफळकलश गज कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर दोन्ही बाजूंना ग्रामदैवतांचे स्थान आहे.

या मंदिरात चैत्र कृष्ण सप्तमी अष्टमीला देवीचा उत्सव होतो. या उत्सवादरम्यान देवीचा गाभारा फुलांनी सजवला जातो. पहिल्या दिवशी देवीची पूजा झाल्यानंतर देवीचा मुखवटा असलेल्या पालखीची कुंभारखाण पाडा, चिंचोड्याचा पाडा, नवापाडा, गरिबाचा वाडा परिसरातून ढोलताशांच्या गजरात, गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात येते. हजारो भाविक यावेळी उपस्थित असतात. वाटेत महिला भाविक पालखीला ओवाळतात. दुसऱ्या दिवशी परिसरात मोठी यात्रा भरते. यावेळी देवीला नवस केले तसेच फेडले जातात. आषाढ महिन्यात दोन्ही एकादशींना देवीला शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो. यावेळी हरिपाठ ज्ञानेश्वरीचे पारायणही होते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे अनेक कार्यक्रम होतात. या उत्सवादरम्यान पारायण, भजन केले जाते. आठव्या दिवशी रात्री वाजल्यापसून सुरू होणारा देवीचा गोंधळ रात्रभर चालतो. दुसऱ्या दिवशी भक्तांसाठी भंडारा असतो. मंदिरात दर मंगळवारी सामुदायिक आरती होते.

उपयुक्त माहिती

  • डोंबिवली रेल्वे स्थानकापासून किमी
  • ठाणे शहरापासून २० किमी अंतरावर
  • रिक्षा तसेच कल्याणडोंबिवली शहर परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home