दुर्गादेवी मंदिर

दुर्गाडी किल्ला, कल्याण, जि. ठाणे

सातवाहन नृपती यज्ञश्री गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळात बांधण्यात आलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचा जीर्णोद्धार केला त्या कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर श्री भवानी दुर्गामातेचे प्राचीन मंदिर आहे. दुर्गादेवीच्या नावावरून या किल्ल्यास दुर्गाडी असे नाव पडले आहे. शिवरायांनी या प्राचीन किल्ल्याची दुरुस्ती करून तेथे कोटाचे बांधकाम केल्याची नोंद आहे. त्यावेळीच देवीचे मंदिर उभारण्यात आले असावे, असे सांगण्यात येते. गेली अनेक शतके नैसर्गिक तसेच मानवी आक्रमणे झेलूनही इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

कल्याणचा इतिहास .. पूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहन सत्तेच्या उदयापासून सुरू होतो. प्राचीन काळात कल्याण हे एक महत्त्वाचे उत्तम बंदर होते. सातवाहनकालीन पैठण, नाशिक, तगर, जुन्नर यांसारख्या प्रमुख बाजारपेठांशी ते जोडले होते. जुन्नर आणि नाणेघाटातून येणाऱ्या विविध वस्तू कल्याण बंदरातून निर्यात होत असत. .. ८० ते ११० या सातवाहन नृपती शिवस्वातीच्या काळात हा भाग क्षत्रप नहपान याने सातवाहनांकडून जिंकून घेतला. त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा पराभव करून पुन्हा या भागावर सत्ता स्थापन केली. त्याच काळात कल्याणची मोठी भरभराट झाली. पुढे सतराव्या शतकात या भागावर आदिलशाही सत्ता होती. छत्रपती शिवरायांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याणभिवंडी घेतले

जेधे शकावली याबाबतची नोंद अशी आहे – ‘शके १५७९ हेमलंबी संवछरअश्वीन वद्य द्वादसीस कंल्याण भिवडी राजयानी घेतली ते समई लस्कर हाशम दादाजी बापुजीस सुभा सांगोन रवाना केले तेव्हा कान्होजी नाईक जेधे याजपासून दादाजी कृष्ण लोहकरे त्यांचे भाऊ सखो कृष्ण लोहकरे यांस मागोन घेंतले आणि दादाजी पंत यांस कंल्याणचा नामजाद हवाला सखोपंतास भिवडीचा हवाला सागितला.’जेधे करिन्या ही हकीकत देऊन पुढेकल्याणाजवल बंदरी दुर्गाडीचा कोट बांधला ते समई राजश्री स्वामीस कल्याणांत हरजिनस मता द्रव्य सापडले,’ असे म्हटलेले आहे. यावरून असे दिसते की किल्ल्याच्या पायाच्या खोदकामादरम्यान महाराजांना येथे अमाप द्रव्य सापडले. येथील दुर्गादेवीच्या कृपेनेच ही संपत्ती सापडल्याच्या भावनेतून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या ठिकाणावरूनच महाराजांच्या आरमाराचाही शुभारंभ झाला

पुढे पेशवाईत वसईच्या रणसंग्रामानंतर .. १७४० ते १७५१ या काळात वासुदेव जोशी मुरुडकर यांच्याकडे बाजीराव पेशवे यांनी कल्याणची सुभेदारी सोपवली. त्यांनी १७४९ मध्ये दुर्गादेवी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी येथे मोठा उत्सवही झाला. त्यावेळी सुमारे १०० ब्राह्मणांना निरनिराळ्या ठिकाणी दान दिले कल्याण येथे वस्ती करून असलेले श्री वेदमूर्ती महादेवभट गोडबोले यांची दुर्गामाता पूजा नैवेद्य वगैरेसाठी नेमणूक केली. कल्याण कोठीतून त्यांना साल दरसाल दोन खंडीहून अधिक भात रोख वीस रुपये असे उत्पन्न इनाम नेमून दिले, अशी नोंद पेशवाई दफ्तरात आहे. .. १८७६ मध्ये मंदिरातील मूर्तीची चोरी झाल्याचा उल्लेख ठाणे गॅझेटिअरमध्ये आहे. त्यानंतर गोडबोले यांच्या वंशजांनी येथे एका तांदळ्याची प्रतिष्ठापना करून देवीची पूजा करणे सुरू ठेवले. या ऐतिहासिक मंदिराचा कायापालट व्हावा, या हेतूने १९७० च्या दशकात कल्याणचे तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव काशिनाथ आहेर यांनी आपल्या कारकीर्दीत नगरपालिकेकडून आर्थिक मदत घेऊन मंदिरात देवीची पंचधातूची नवीन मूर्ती बसवली मंदिराचा जीर्णोद्धार केला. शिवराज्याभिषेक त्रिशतसांवत्सारिक महोत्सवादरम्यान, १५ डिसेंबर १९७४ रोजी ठाणे येथील . पू. गजानन महाराज ऊर्फ आण्णासाहेब पट्टेकर यांच्या हस्ते हा जीर्णोद्धार करण्यात आला. या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. असा हा ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला कल्याणभिवंडी मार्गावर कल्याणच्या खाडीकिनारी लहानशा टेकडीवर आहे. या किल्ल्याच्या जुन्या वेशीचे बुरूज अद्यापही शाबूत आहेत. पूर्वी किल्ल्याचे प्रवेशद्वारगणेश दरवाजाम्हणून ओळखले जात असे. प्रवेशद्वारातून किल्ला परिसरात आल्यावर पायऱ्यांजवळ डावीकडे गणपतीचे लहानसे मंदिर दिसते. तेथून काही पायऱ्या चढून आल्यावर डाव्या बाजूला दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या आवारात फरसबंदी केलेली आहे. मंदिरासमोर यज्ञकुंड आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस आकर्षक कलाकुसर असून वर दोन्ही बाजूला सोंड उंचावलेल्या गजराजांची शिल्पे आहेत. त्यांच्या बाजूलाच शिवमुद्रा कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारानजीक मंदिराच्या दर्शनी भागातील देवळ्यांमध्ये गणपती, लक्ष्मी, राधाकृष्ण, दत्त, हनुमान तसेच विवेकानंदांच्या मूर्ती आहेत.

सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. जमिनीपासून उंचावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात येण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. येथील सभामंडपाच्या पुढच्या बाजूला गर्भगृह आहे. या संपूर्ण गर्भगृहात सोनेरी मुलामा दिलेल्या धातूच्या पत्र्यावर आकर्षक कलाकुसर आहे. येथे दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मध्यभागी नक्षीदार कलाकुसर असलेल्या मखरात दुर्गामातेची पंचधातूची नवीन मूर्ती आहे. साडेतीन फूट उंचीच्या मुकुटधारी मूर्तीला चार हात असून तीन हातांमध्ये आयुधे तर एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मूर्तीच्या मागे सिंह आहे. या मूर्तीच्या उजवीकडे जुन्या दुर्गादेवीचा तांदळा आहे त्यावर देवीचा मुखवटा आहे. गर्भगृहात गणपती तसेच इतर देवतांच्या मूर्ती आहेत. दुर्गादेवीचे हे मंदिर चौरसाकृती आहे. त्यावर घुमटाकृती कळस आहे. मंदिराच्या गर्भगृहामागील भिंतीवर वरच्या भागात मंदिराचा इतिहास असलेला शिलालेख आहे.

या मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध नवमीपर्यंत नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या कालावधीत अनेक महिला देवीची खणनारळाने ओटीही भरतात. नऊही दिवस काकड आरती, महाआरती, भजन, कीर्तन, व्याख्याने आदी कार्यक्रम होतात. या काळात नवचंडीयाग होतो. या उत्सवानिमित्त दुर्गाडी किल्ला रोषणाईने उजळून निघतो. दररोज सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत सायंकाळी ते रात्री वाजेपर्यंत या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • कल्याण रेल्वे स्थानकापासून . किमी, तर ठाणे शहरातून २४ किमी अंतरावर
  • कल्याणडोंबिवली शहर परिवहनच्या बसची सुविधा
  • राज्यातील अनेक शहरांतून कल्याणसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home