छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड (प्राचीन शिवनीतापूर) तालुक्यातील आमसरी येथील अंबऋषी महादेवाचे मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १५० फूट खोल दरीत, डोंगराच्या कपारीत, प्राचीन गुंफेत असलेले येथील पुरातन शिवलिंग जागृत असल्याच्या श्रद्धेतून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिरासमोर धबधबाही आहे. मंदिराच्या शेजारी महंत कैलासगिरी महाराजांचे समाधी मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांवर असणारी भाविकांची श्रद्धा व येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार राज्य सरकारनेही या परिसराचा तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन गौरव केला आहे.
खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर अजिंठा डोंगररांगेत वसलेल्या आमसरी येथे हे प्राचीन मंदिर आहे. अजिंठा ते शिवना या मार्गावर शिवनापासून तीन किमी अंतरावर आमसरी हे गाव आहे. या गावातून आणखी तीन किमी अंतरावर अंबऋषी महादेवाचे देवस्थान आहे. असे सांगितले जाते की येथे अंबरीश राजाने तपश्चर्या केल्यामुळे त्याच्या नावावरून या मंदिराला अंबऋषी हे नाव पडले आहे. श्रीसरस्वती गंगाधर विरचित ‘श्रीगुरुचरित्रा’च्या दुसऱ्या अध्यायात या अंबरीश राजाची कथा देण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की ‘अबरीष म्हणिजे द्विज। एकादशीव्रताचिया काज।। विष्णूसी अवतार करविले।।’ या राजाने विष्णूचे एकादशी व्रत केले होते. दुर्वासऋषींनी या राजाला असा शाप दिला होता की त्याला सर्व योनींत जन्म घ्यावे लागतील. त्यावेळी अंबरीशास दुःख झाले व त्याची ती अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले व हा शाप आपण भोगू, असे त्यांनी सांगितले. या राजाने येथे तपश्चर्या केली होती, अशी कथा आहे.
एका गुंफेत असलेल्या या मंदिरात काही पायऱ्या उतरून जावे लागते. पायऱ्या उतरल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर प्रांगणात इंग्रजी ‘टी’ आकाराचे कातळात कोरलेले पाण्याचे कुंड आहे. या कुंडामध्ये वरून कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी पडते. निसर्गसमृद्ध वातावरण, त्यासोबतच वरून कोसळणारा धबधबा व येथील स्वच्छता यामुळे हा परिसर आणखी खुलून दिसतो. भाविक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धबधब्याजवळ कुंडाभोवती स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहेत. धबधब्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या गुंफेत अंबऋषी महादेवाचे मंदिर आहे. धबधब्यापासून मंदिर असलेल्या गुहेत जाण्यासाठी नऊ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढल्यावर या गुहा मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो.
सभामंडपाच्या सुरुवातीला डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर उंच पाषाणलिंग, तसेच पार्वतीची व नंदीची अशा दोन प्राचीन मूर्ती आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. ही गुहा कमी उंचीची असल्याने सभामंडपाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या येथील स्वयंभू शिवलिंगाजवळ कमरेत वाकूनच जावे लागते. येथील शिवलिंगाभोवती अष्टकोनी आकाराचा संगमरवरी ओटा आहे. त्याच्या मध्यभागी तुलनेने उंच असे शिवलिंग आहे. या ओट्याभोवती स्टीलचे रेलिंग बसविण्यात आलेले आहेत. याशिवाय या गुहेच्या भिंतींमध्ये काही मूर्तीही कोरलेल्या आहेत. असे सांगितले जाते की ही गुहा शंभर फुटांहून अधिक आत आहे. मात्र त्यातील शिवलिंग असलेला भागच खुला असून उर्वरित भाग बंद ठेवण्यात आला आहे. येथे अशी दंतकथा आहे की आमसरीनजीक असलेल्या नाटवी या गावामध्ये नटेश्वर महादेव मंदिर आहे. ते मंदिर अंबऋषी महादेव मंदिराशी भुयाराने जोडलेले आहे. नाटवीतील नटेश्वर महादेव मंदिरात ‘पंच दसनाम जुना आखाडा तेरा मढी’ आहे. हिंदू साधूंचे एकूण जे १३ आखाडे आहेत, त्यात शिवसंन्यासी संप्रदायातील सात आखाडे आहेत. त्याच आखाड्यांतील हा एक आखाडा असून त्याची स्थापना इ.स. १२५९ मध्ये झाली होती. वाराणसी हे त्याचे मुख्य स्थान आहे.
या आखाड्याशी संबंधित असलेल्या ब्रह्मलीन महंत कैलासगिरी महाराजांचे समाधीस्थळ अंबऋषी महादेव मंदिरानजीक आहे. या समाधीमंदिराचे वैशिष्ट्य असे की त्याचे बांधकाम हे पूर्ण ओढ्यावर केलेले आहे. वरच्या बाजूला मंदिर व खालून वाहता ओढा, अशी या मंदिराची रचना आहे. महंत कैलासगिरी महाराजांनी आपल्या हयातीत अनेक भक्तांना सुखी जीवनाचा मार्ग दाखविला. विविध वनौषधींचा वापर करून त्यांनी या भागातील नागरिकांच्या आजारांवर उपचार केले होते. त्यामुळे पंचक्रोशीतील त्यांचे अनेक भक्त त्यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी येथे नियमित येतात.
या समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला हातात भाला घेतलेल्या द्वारपालांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्या वरील भागात गणेशाची मोठी मूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर प्रथम अंबिका मातेचे गर्भगृह लागते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारपट्टीच्या वरील भागात कमळावर बसलेली देवीची मूर्ती आहे. गर्भगृहात अंबिका देवीची तांदळास्वरूपातील शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या शेजारी महंत कैलासगिरी महाराजांची नेहमीची बसण्याची जागा आहे. भाविकांना ते या जागेवरून मार्गदर्शन करीत असत. येथील एका सिंहासनावर त्यांच्या प्रतिमा व त्यांच्या बसण्याच्या जागी त्यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. येथून मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी मार्ग आहे. प्रशस्त अशा सभामंडपाच्या एका बाजूला कैलासगिरी महाराजांचे समाधीस्थळ आहे. कैलासगिरी महाराजांनी १४ एप्रिल २००४ रोजी येथे जिवंत समाधी घेतली होती. या समाधीस्थळाच्या वरच्या बाजूला एका संगमरवरी चौथऱ्यावर शिवपिंडी आहे. समाधीस्थळाभोवती लाकूड व काचेची भिंत आहे. दरवर्षी १४ एप्रिलला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यावेळी येथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, विसाव्यासाठी विश्रामगृह व प्रसादाची सोय करण्यात येते.