भारतीय आध्यात्मिक परंपरेत बारा ज्योतिर्लिंगांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान शंकराच्या अनंत तेजाचे आणि दिव्य ऊर्जेचे स्रोत असलेल्या या बारा जागा कोट्यवधी भक्तांसाठी पूजनीय आहेत. देशाच्या विविध भागांत पसरलेली ही ज्योतिर्लिंगे देशाला एका आध्यात्मिक सूत्रात जोडण्याचे काम करतात. या पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेले भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे. भगवान शंकराचा निवास आणि भीमा नदीचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राला आध्यात्मिक व ऐतिहासिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
पौराणिक माहितीनुसार, भगवान विष्णू व ब्रह्मदेव यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद मिटवण्यासाठी महादेवांनी एका मोठ्या प्रकाशस्तंभाचे रूप धारण केले. या तेजस्वी ज्योतीचे मूळ व टोक शोधण्यात अपयशी ठरलेल्या दोन्ही देवांनी महादेवांचे श्रेष्ठत्व मान्य केले आणि या स्तंभाची मनोभावे स्तुती केली. भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीच्या विविध भागांत स्थिरावलेल्या या दैवी प्रकाशपुंजांना ‘ज्योतिर्लिंग’ या नावाने ओळखले जाते. प्राचीन काळापासून चालत आलेली ही बारा पवित्र स्थाने भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ व आध्यात्मिक ऊर्जेची मुख्य केंद्रे मानली जातात.
सौराष्ट्रातील सोमनाथपासून सुरू होणारा हा प्रवास हिमालयातील केदारनाथ व दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत पसरलेला आहे. विंध्य पर्वतावरील ओंकारेश्वर आणि गोदावरीकाठच्या त्र्यंबकेश्वरसह ही सर्व बारा स्थाने देशाच्या विविध भागांत आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची स्वतंत्र कथा व वैशिष्ट्य असले तरी ही सर्व स्थाने एकाच तत्त्वाशी जोडलेली आहेत.
‘शिवपुराण’ या प्राचीन ग्रंथातील ‘शतरुद्र संहिते’मध्ये ‘डाकिनीचे वन’ असा उल्लेख असलेले हे पवित्र क्षेत्र अधर्माचा नाश व ईश्वरी शक्ती प्रकट होण्याचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या ग्रंथातील वर्णनानुसार, सह्याद्रीच्या दुर्गम आणि घनदाट अरण्यात राहणारा कुंभकर्णाचा मुलगा भीम राक्षसाला जेव्हा श्रीरामाने आपल्या कुळाचा नाश केल्याचे समजले, तेव्हा त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. या बलाढ्य राक्षसाने ब्रह्मदेवाची अत्यंत खडतर तपश्चर्या करून तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याच्या शक्तीचे वरदान प्राप्त केले. या शक्तीच्या जोरावर उन्मत्त झालेल्या भीमाने पृथ्वीवरील मानवांसह स्वर्गातील देवांना छळण्यास सुरुवात केली.
या क्रूर राक्षसाने शिवभक्त असलेल्या कामरूपच्या सुदक्षण राजाला बंदी बनवले आणि त्याच्याकडून भगवान शिवाच्या उपासनेचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. राजाने मनोभावे पूजलेल्या मातीच्या शिवलिंगावर जेव्हा भीमाने तलवारीने प्रहार केला, तेव्हा त्यातून प्रत्यक्ष महादेव प्रकट झाले.
भगवान शंकरांनी आपल्या त्रिशुळाने भीमाचा नाश करून पृथ्वीला या राक्षसाच्या छळातून मुक्त केले. या विजयानंतर सर्व देवता व ऋषींनी भक्तांच्या कल्याणासाठी याच ठिकाणी महादेवांनी कायमचे राहावे, अशी विनंती केली. या विनंतीचा मान राखून महादेव येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग स्वरूपात कायमचे स्थिरावले. भीषण युद्धानंतर शंकराच्या शरीरातून निघालेल्या घामाच्या धारांपासून पुण्यवाहिनी भीमा नदीचा उगम झाला. भगवान शंकराच्या घामातून जन्मलेली ही ‘भीमरथी’ नदी मुख्य मंदिराच्या काही अंतरावर ‘गुप्त भीमाशंकर’ या नावाने पुन्हा प्रकट होते. या नदीचे उगमस्थान प्रत्यक्ष ज्योतिर्लिंगातच असल्याची मान्यता आहे. याशिवाय ‘स्कंदपुराण’ अंतर्गत येणाऱ्या ‘सह्याद्री खंड’ या भागात आणि आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या ‘द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रा’मध्येही या स्थानाचा स्पष्ट उल्लेख येतो.
संत नामदेवांच्या ‘नामदेव गाथा’ या ग्रंथातील अभंगांमध्येही या पवित्र स्थानाचे दर्शन घेतल्याच्या नोंदी आढळतात. पेशवे काळातील ऐतिहासिक घडामोडींची माहिती देणाऱ्या ‘पेशवे दप्तर’ या साधनामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नाना फडणवीस यांच्या योगदानाचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत.
भीमाशंकर मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराच्या गर्भगृहाचे मूळ बांधकाम सुमारे तेराव्या शतकातील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यादव काळात बांधलेल्या या प्राचीन मंदिराचा विस्तार आणि दुरुस्ती पुढील अनेक शतकांत विविध राजवटींच्या काळात होत राहिली. विशेषतः मराठा साम्राज्याच्या काळात या मंदिराला विशेष राजाश्रय मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती राजाराम महाराज यांनी या स्थानाला भेटी दिल्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात. अठराव्या शतकात पेशवे काळात या मंदिराचे सध्याचे भव्य स्वरूप साकारले गेले. नाना फडणवीस यांनी १७८६ च्या सुमारास या मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे सभामंडप व उंच शिखर उभारले.
पेशवे काळातील मराठा स्थापत्यशैलीचा प्रभाव या संपूर्ण बांधकामावर आजही स्पष्टपणे दिसून येतो. याच काळात मंदिराच्या व्यवस्थेसाठी विविध गावे इनाम म्हणून देण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पुणे किंवा मंचर येथून मार्ग उपलब्ध आहेत. भीमाशंकर बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर हे मुख्य मंदिर आहे. खोल दरीत असल्याने मंदिराकडे येण्यासाठी सुमारे २५० पायऱ्या उतरून जावे लागते. या पायरीमार्गावर छत असल्याने भाविकांचे ऊन-पावसापासून संरक्षण होते. पायरीमार्गाला लागून पूजासाहित्य व प्रसादाची अनेक दुकाने आहेत. पायऱ्या उतरल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या मंदिरासमोर चौथऱ्यावर प्राचीन दीपमाळ आहे. मंदिरासमोर दोन स्तंभांच्या आधाराने टांगलेली मोठी पितळी घंटा आहे. ही भव्य घंटा येथील एक आकर्षण आहे. चिमाजी अप्पा यांनी १७३९ च्या वसई मोहिमेत पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून ती येथे अर्पण केली होती. या घंटेवर १७२९ हे वर्ष कोरलेले आहे आणि त्यावर क्रॉस व मेरीची शिल्पे आहेत. या घंटेला आधार दिलेल्या स्तंभांजवळ शनिमंदिर आहे.
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चोचीत मोतीमाळा धरलेला हंसजोडा आहे आणि दोन्ही बाजूस फुलांची शिल्पे आहेत. शनिमंदिराच्या बाजूला लहानशा देवळीत हनुमानाची शेंदूर लावलेली पाषाणमूर्ती आहे.
भीमाशंकर मंदिराची रचना प्रशस्त सभामंडप व गर्भगृह अशी आहे. गर्भगृहाचे बांधकाम सुमारे तेराव्या शतकातील व सभामंडपाचे बांधकाम पेशवे काळातील असल्याचे सांगितले जाते. सभामंडपाच्या प्रवेशद्वारात पानाफुलांची नक्षी व गणपतीचे शिल्प आहे. सभामंडपात नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत आणि छतावर चक्रनक्षी आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात नक्षीदार खांब असून तिथे गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहातील स्वयंभू शिवपिंडीवर चांदीचे आवरण आहे. पिंडीच्या पुढे असलेल्या भिंतीतील देवकोष्टकात पार्वती देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर ऋषीमुनींची शिल्पे आहेत. मंदिराच्या मागील तिन्ही दिशांच्या बाह्यभिंतीतील देवकोष्टकात श्रीकृष्ण, हनुमान व महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी, उंच व निमूळते शिखर आहे. शिखरात चारही दिशांना असलेल्या चार देवकोष्टकांत देवमूर्ती आहेत. शिखरावर चार थरांत छोटी शिखरे आहेत. मुख्य शिखराच्या वरच्या भागात तीन आमलक व त्यावर कळस आणि ध्वज आहे.
मंदिराच्या मागे दगडी बांधकामाचे पाण्याचे कुंड आहेत. मोक्षकुंड व ज्ञानकुंड अशी त्यांची नावे आहेत. येथूनच भीमा नदी उगम पावते. येथे साक्षी विनायक व हनुमान यांची मंदिरे आहेत. कुंडाच्या बाजूला ओवऱ्या असून तिथे भाविकांना कपडे बदलण्यासाठी सुविधा आहे. मंदिरापासून काही अंतरावर श्रीराम मंदिर आहे. अलीकडील काळात बांधलेल्या या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. श्रीराम मंदिराच्या बाजूलाच पार्वती मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावर करमजा देवी मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात प्राचीन शिल्पे आहेत. भीमाशंकर मंदिरापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर जंगलात गुप्त भीमाशंकर स्थान आहे. येथे सुंदर धबधबा आहे. तो फक्त पावसाळ्यात वाहता असतो.
भीमाशंकर मंदिरात विविध धार्मिक विधी आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्रीचा सण येथील सर्वात मोठा उत्सव असून या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या उत्सवाच्या वेळी मंदिरात विशेष यज्ञांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे मोठी गर्दी असते. यावेळी भाविक भीमा नदीच्या पवित्र जलाने शिवलिंगावर अभिषेक करतात. कार्तिक पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा होतो आणि संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो.