शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा संत-महात्म्यांची अवतारभूमी असलेल्या महाराष्ट्रात एकोणीसाव्या शतकात झिपरू अण्णा महाराज ही विभूती होऊन गेली. नशिराबाद ही त्यांची जन्म आणि कर्मभूमी होय. येथे त्यांचे समाधीस्थान आहे. साईबाबा, गजानन महाराज, धुनीवाले बाबा यांच्या प्रमाणेच झिपरू अण्णा महाराज अजानुबाहू होते. असे सांगितले जाते की त्यांना वाचासिद्धी होती व त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या ठरत असत. भक्तांची अशी श्रद्धा आहे की झिपरू अण्णा महाराज हे आजही भक्तांच्या हाकेस धावून येतात.
नशिराबादला पूर्वी नृसिंहपूर असे म्हणत असत. या गावी सन १८७८मध्ये विणकर (साळी) समाजात झिपरू अण्णा यांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव मिठाराम, तर आईचे नाव सावित्री असे होते. महाराजांच्या जीवनचरित्रानुसार, ते दहा-बारा वर्षांचे असताना त्यांना लक्ष्मीनारायण मंदिराचे कल्याणदास महाराज यांचा अनुग्रह झाला. यानंतर झिपरू अण्णा नेहमी चिंतनात मग्न असत. कालांतराने त्यांनी वस्त्रप्रावरणांचा त्याग केला. गावात ते दिगंबरावस्थेतच फिरत असत. असे सांगण्यात येते की त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली होती. ते जे बोलत असत ते खरे ठरत असे. याच प्रमाणे त्यांना भविष्यातील गोष्टीही समजत असत. त्यांनी दाखविलेल्या चमत्कारांमुळे त्यांचे साधुत्व लोकांच्या लक्षात आले. हळुहळू त्यांच्याभोवती भक्तांचा मेळा जमू लागला.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील स्वामी मुक्तानंद हे झिपरू अण्णांच्या भेटीस नेहमी येत असत. त्यांनी १४ वर्षे अण्णा महाराजांची सेवा केली असे सांगण्यात येते. गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद यांचा आश्रम आहे. स्वामी नित्यानंद हे मूळचे केरळमधील होते. इ.स. १९३७ मध्ये ते भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीच्या परिसरात आले व येथेच त्यांनी वास्तव्य केले. झिपरू अण्णांनी या स्वामी नित्यानंद यांच्याकडे मुक्तानंद यांना पाठवले होते. झिपरू अण्णा हे नशिराबाद येथील त्यांचे निष्ठावंत भक्त भय्याजी हणमंत कुलकर्णी यांच्या निवासस्थानी अनेकदा वास्तव्यास असत.
तेथेच वैशाख वद्य नवमीच्या दिवशी, २१ मे १९४९ रोजी त्यांचे देहावसान झाले. यानंतर अण्णा महाराजांचे भक्त यशवंत माधव वाणी यांनी वाकी नदीतिरावरील त्यांच्या धर्मशाळेत अण्णांची समाधी बांधली. १९९१-९२मध्ये एके दिवशी येथील अण्णा महाराजांचे भक्त पंढरीनाथ दगडू भोळे यांना महाराजांचा स्वप्नदृष्टान्त झाला. ‘माझे गुरू कल्याणदास महाराज यांची समाधी बांध’, असा आदेश महाराजांनी दिला. त्यानुसार पंढरीनाथ यांचे पुतणे सचिन भानुदास भोळे यांनी येथे २८ मार्च १९९२ रोजी कल्याणदास महाराजांचे समाधीमंदिर उभारले. झिपरू अण्णा महाराजांचे असे वचन होते की ‘जरी मी देह ठेविला, आत्मा येथेची रमला। श्रद्धा ज्याची जैसी, त्यास तैसी प्रचिती। भक्ताचे हाकेशी धावून येईन मी।।’ यानुसार आजही झिपरू अण्णांना मनापासून हाक दिल्यास ते भक्तांच्या संकटांचे निवारण करण्यास येतात, अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे.
नशिराबाद येथे वाकी नदीच्या तीरावर अण्णा महाराजांचे समाधी मंदिर वसले आहे. गणेशपुरी येथील गुरूदेव सिद्धपीठ आश्रमाच्या अधिष्ठात्री गुरूमाई चिद्विलासानंद यांनी २२ मे २००३ रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आधुनिक पद्धतीने बांधलेल्या मंदिराच्या वास्तूत प्रवेश करताच मंदिराचा प्रशस्त सभामंडप लागतो. येथे डाव्या हातास शनी, विठ्ठल-रुक्मिणी व लक्ष्मी-नारायण आणि त्रिमुखी दत्ताचे मंदिर आहे. ही तिन्ही मंदिरे शेजारी-शेजारी आहेत. मंदिरांच्या वर कमळ फुलाच्या आकारात बांधलेली शिखरे आहेत. येथे हनुमानाचेही स्थान आहे. या मंदिरांच्या मागच्या बाजूस उंच जगतीवर बांधलेले झिपरू अण्णा महाराज यांचे गुरू कल्याणदास महाराज यांचे समाधी मंदिर आहे. येथे महाराजांची बसलेल्या मुद्रेतील संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. मूर्तीसमोर महाराजांच्या संगमरवरी तसेच धातूंत कोरलेल्या पादुका आहेत.
सभामंडपात झिपरू अण्णा महाराज यांची कृष्ण-धवल तसबीर लावलेली आहे. त्याच प्रमाणे येथे मुक्तानंद स्वामी आणि नित्यानंद महाराज यांच्या प्रतिमाही आहेत.
या सभामंडपास खेटून, परंतु सुमारे दीड फूट खोलगट भागात आणखी एक सभामंडप आहे. तेथे डाव्या बाजूच्या कोपऱ्यात झिपरू अण्णांचे समाधी मंदिर आहे. येथे उंच संगमरवरी अधिष्ठानावर अण्णा महाराजांची एक पाय खाली सोडून बसलेली संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या अंगावर वस्त्रप्रावरणे व मस्तकी मंदिल बांधलेला आहे. समाधी मंदिरावर कमळ पाकळ्यांच्या अधिष्ठानात उभारलेले व वर निमुळते होत गेलेले उंच षट्कोनी शिखर आहे.
झिपरू अण्णा महाराज यांच्या समाधी मंदिरात रोज सकाळी ८ व सायंकाळी ७ वाजता आरती केली जाते. दर गुरुवारी १२ वाजता येथे आरती व प्रसाद असतो. मंदिरात दरवर्षी विविध सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अण्णा महाराजांची पुण्यतिथी वैशाख वद्य नवमीला साजरी केली जाते. यावेळी येथे महाराजांच्या पादुकांची पूजा, महाअभिषेक, पारायण, अन्नदान यांचे आयोजन केले जाते. असे सांगण्यात येते की महाराजांचा भक्तपरिवार परदेशांतही आहे. पुण्यतिथी सोहळ्यास हे भक्त आवर्जून उपस्थित राहतात. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात महाराजांचे दर्शन घेता येते.