येमाई देवी मंदिर

कवठे-येमाई, ता. शिरूर, जि. पुणे


शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरूर-मंचर मार्गावर कवठे-येमाई गाव आहे. गावापासून जवळच असलेले येमाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत असणाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो.

मंदिराची आख्यायिका अशी, रावणाकडून सीतेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम शोकमग्न अवस्थेत सर्वत्र सीतेचा शोध घेत होते. रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक झाडाला, दगडालाही ते सीतेबद्दल विचारत होते. रामाचा हा करुण स्वर त्याच वेळी कैलासावर सारीपाट खेळत असलेल्या शंकर-पार्वतीच्या कानावर गेला. श्रीराम दैवी पुरुष असूनही इतके व्याकूळ कसे होऊ शकतात, असे मनाशी आणून पार्वतीमातेने श्रीरामाची परीक्षा घेण्याचे ठरविले. पार्वतीमाता सीतेचे रूप घेऊन रामापुढे उभी राहिली. परंतु, श्रीरामांनी पार्वतीमातेला लगेचच ओळखले आणि ‘ये माई’, असे म्हणून नमस्कार केला. रामाने ओळखल्यामुळे पार्वतीमाता तेथून निघून जात असतानाच, आता तू आलीच आहेस, तर येथेच वास्तव्य कर, अशा रामाच्या विनवणीवर पार्वतीमातेने येमाई देवीच्या रूपात येथे कायमचे वास्तव्य करण्याचे मान्य केले.

श्री येमाई देवी एक जागृत देवस्थान आहे आणि येथे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच येथे नवस करण्यासाठी आणि नवसपूर्तीनंतर तो फेडण्यासाठी शेकडो भाविक येत असतात. या मंदिर परिसराला राज्य सरकारकडूनही तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पीकपाण्याचा अंदाज घेण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. त्यानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मंदिरासमोर असणारा सुमारे १२५ किलो वजनाचा गोल दगड १३ जणांच्या उजव्या हाताच्या एका बोटाच्या साह्य़ाने उचलण्याचा प्रयत्न केला जातो. हा मान येथील मुंजाळवाडी ग्रामस्थांना पिढ्यान् पिढ्या मिळत आलेला आहे. त्यांच्याकडून हा दगड उचलला गेला, तर त्या वर्षी देवीने चांगले पीकपाणी होण्याचा कौल दिला आहे, असे मानले जाते. या विधीसाठी तालुक्यासह पुणे व नगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी उपस्थित असतात. शेकडो वर्षांपासून हा विधी सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मुख्य रस्त्यावरूनच मंदिराची भव्य कमान नजरेस पडते. कमानीवर रक्षकांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात शेकडो वर्षांपूर्वीचे वटवृक्ष आहेत. त्यामुळे हे स्थान खूप प्राचीन असावे, याची खात्री पटते. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच तीन दीपमाळा दिसतात. नवरात्रोत्सव आणि चैत्र पौर्णिमेला या दीपमाळा प्रकाशित केल्या जातात. त्यावेळी त्यांच्या मंद प्रकाशाने परिसर न्हाऊन निघतो. मंदिराजवळील प्रशस्त जागेत रेखीव अशी दगडी पुष्करणी आहे. या पुष्करणीत बाराही महिने पाणी असल्याचे सांगितले जाते. मुख्य मंदिराच्या समोरच पीकपाण्याच्या अंदाजाचा दगड आहे. त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला सिंहाची शिल्पे आहेत. मंदिराच्या दरवाजासमोरच दोन मोठ्या घंटा लटकवलेल्या आहेत.

सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. प्रशस्त सभामंडपात उत्सवाच्या वेळी अनेक कार्यक्रम होत असतात. गाभाऱ्यातील चांदीच्या मखरात येमाई देवी स्थानापन्न आहे. तांदळा स्वरूपातील देवीची ही मूर्ती प्रसन्न भासते. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर मागील बाजूस महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीपासून १५ फूट खोल संपूर्ण दगडी बांधकामात आहे. त्यामध्ये शिवपिंडी व नंदी स्थानापन्न आहे. याच महादेव मंदिरातून तीन किलोमीटरवर असणाऱ्या कवठे गावातील राजवाड्यापर्यंत पूर्वी भुयारी मार्ग होता, असे सांगितले जाते. येमाई देवी मंदिराच्या कळसावरील कोरीव काम खूपच आकर्षक आहे. त्यामुळे दुरूनही ते लक्ष वेधून घेते.
नवरात्रीच्या दिवसांत येथे अभिषेक, हवन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होतात. अखंड हरिनाम सप्ताहाचेही आयोजन केले जाते. यावेळी संपूर्ण गावासह बाहेरून येणाऱ्या भाविकांनाही महाप्रसादाचे वाटप केले जाते. प्रत्येक पौर्णिमेला आणि श्रावण महिन्यात देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिला या सोहळ्यामध्ये अग्रभागी असतात. भाविकांच्या सोईसाठी मंदिर समितीतर्फे येथे भक्त निवासाची सुविधा करण्यात आली आहे.


उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून ६४ किमी अंतरावर
  • शिरूरपासून गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येण्याची व्यवस्था
  • परिसरात न्याहारी आणि मंदिर परिसरात भक्त निवासाची सु्विधा
Back To Home