यमाई देवस्थान

कनेरसर, ता. राजगुरूनगर, जि. पुणे


पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर या तालुक्याच्या ठिकाणाहून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कनेरसर गावात यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या या देवीकडे रेणुकामातेचे प्रतिरूप म्हणून पाहिले जाते. ही देवी पंचक्रोशीतील अनेक नागरिकांची कुलदेवता आहे. संपूर्ण दगडी बांधकामातील हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.

या मंदिराची आख्यायिका अशी, संत कान्हो महाराज पाठक हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मानसकाका मानले जात. विष्णू आणि रेणुकामातेवर त्यांची निस्सीम भक्ती हेती. दररोज माहूरगडावर देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतरच ते अन्न ग्रहण करीत. वृद्धापकाळात त्यांनी रेणुकामातेला आपल्या गावी केंदूरला येण्याची विनंती केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन रेणुकामातेने मागे न पाहण्याच्या अटीवर केंदूरला येण्याचे मान्य केले. देवीने दिलेल्या शब्दाप्रमाणे ती कान्हो महाराजांच्या मागे चालू लागली. चालताना तिच्या पायातील पैंजणांचा व नूपुरांचा आवाज येत होता. सध्या जेथे मंदिर आहे, तेथे पूर्वी वन होते. या वनात देवीचे मन रमल्यामुळे काही क्षण ती तेथे थांबली. देवीच्या पैंजणांचा येणारा आवाज थांबल्यामुळे पुढे जात असलेल्या कान्हो महाराजांनी मागे वळून पाहिले. त्याच वेळी देवी तेथे लुप्त झाली. कान्हो महाराजांना आपली चूक उमगली आणि त्यांनी देवीची आराधना सुरू केली. ‘ये माई, ये माई’ अशी विनवणी ऐकून देवी त्यांच्यासमोर प्रकट झाली; परंतु अट मोडल्यामुळे देवीने केंदूरला येण्यास नकार दिला. आता याच स्थानावर मी राहीन, असे सांगून देवी कनेरसर येथे अंतर्धान पावली. कान्हो महाराजांनी देवीस ‘ये माई’ असे संबोधल्यामुळे रेणुकामातेच्या या स्थानास यमाईदेवी म्हणून ओळखले जाऊ लागले.

कनेरसर गावाजवळ मुख्य मार्गाला लागूनच यमाई मंदिराची भव्य व रेखीव कमान आहे. कमानीच्या वरच्या बाजूला दोन कळस, देवी सरस्वती आणि तिच्या दोन्ही बाजूंना सिंहाची शिल्पे आहेत. खालच्या बाजूला रक्षकांची दोन शिल्पे आहेत. या कमानीतून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला पूजा साहित्याची दुकाने आहेत. तेथून साधारणतः १०० मीटरवर मंदिराचे नक्षीदार मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारापुढेही सिंहाचे भलेमोठे शुभ्र संगमरवरी शिल्प आहे. या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला ज्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवी या ठिकाणी आली, त्या संत कान्हो महाराज पाठक यांचे छोटेखानी मंदिर आहे.
मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. या सभामंडपाच्या बाहेर व आतील भिंतीवर उत्कृष्ट शिल्पे आहेत. त्यात देव-देवता, संत-महात्मे व अनेक प्राण्यांचा समावेश आहे. कोरीव नक्षीकामामुळे मंदिराचे सौंदर्य उठून दिसते. गाभाऱ्यात नक्षीदार चांदीच्या मखरात यमाई देवीची प्रसन्न मूर्ती आहे. चांदीचा मुकुट व सोनेरी मुखवट्यामुळे देवीचे रूप आणखीनच खुललेले दिसते. गाभाऱ्याबाहेर ४०० वर्षे जुनी सरस्वतीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूला शंकराचे मंदिर आहे. ‘जेथे शक्ती, तेथे शिव’ हे समीकरण येथेही पाहायला मिळते. मंदिराचा कळस खूपच आकर्षक आहे. त्यावर अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेली दिसते. संत-महंतांची शेकडो शिल्पे त्यावर कोरलेली आहेत. शिल्पांवरील आकर्षक रंगकामामुळे त्यावरील बारीक कलाकुसर लक्षात येते.

दररोज पहाटे ५.३०, दुपारी १२.३० व रात्री ८ वाजता देवीची आरती होते. पहाटे ५.३० व दुपारी १२.३० वाजता आरतीबरोबरच देवीला अभिषेक केला जातो. दर मंगळवारी आरतीने मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते; शिवाय प्रत्येक पौर्णिमेला गाव प्रदक्षिणाही होते. यावेळी यमाई देवीची पालखी निघते. १८४७-४८ या वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. गुढीपाडव्याला येथे विशेष उत्सव साजरा होतो. सकाळी देवीचा ओलांडा, पूजा, महाआरती केली जाते. यावेळी येथे पूर्ण वर्षाचे भाकीत सांगितले जाते. त्यात प्रामुख्याने पाऊस व हवामानाचा अंदाज वर्तविला जातो.

चैत्री पैर्णिमेला कनेरसरची यात्रा भरते. मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव होतो. त्यानंतर यमाई देवीच्या यात्रेला सुरुवात होते. यावेळी साडी-चोळी, पातळ वाहून यमाई देवीची पूजा केली जाते. देवीला साकडे घातले जाते. देवीचा मुखवटा घेऊन पालखी गावभर फिरवली जाते. या सोहळ्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाविक उपस्थित असतात. याशिवाय नवरात्रीतही येथे विविध कार्यक्रम असतात.


उपयुक्त माहिती:
:

  • राजगुरूनगरपासून १५ किमी; तर पुण्यापासून ४८ किमी अंतरावर
  • राजगुरूनगरपासून एसटी बसची सुविधा
() खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था
  • संपर्क : मंदिर सेवेकरी : ७७२१८७७४१७
Back To Home